महाभारत युद्धात सरतेशेवटी भीमाने दु:शासनाला ठार केलं. मग भीमपुढे झाला. मेलेल्या दु:शासनाच्या छाताडावर बसला आणि त्याने दु:शासनाची छाती फाडली. भीमच तो, त्याला माणसाची छाती फाडायला हत्यारांची गरज नव्हती. काही क्षणांपूर्वी मृत पावलेल्या दु:शासनाचं रक्त थंड तर झालं नव्हतंच; वहायचंही थांबलं नव्हतं. छाती फोडली जाताच त्या गरमरक्ताची चिळकांडी उसळली. रोमारोमात खून चढलेला भीमते रक्त गटागटा प्यायला. खदखदा हसला. दु:शासनाच्या रक्ताने बरबटलेले हात वर धरून तो युद्धभूमीवरून धावत सुटला. थेट द्रौपदीच्या छावणीत गेला. म्हणाला, 'ये, द्रौपदी, तुझी वेणी घालतो.' तब्बल तेरा वर्षं वेणी न घालता केस मोकळे ठेवलेली द्रौपदी पुढे झाली आणि तिने तेरा वर्षांनंतर प्रथमच स्वत:ची वेणी घालून घेतली. रक्ताने बरबटलेल्या हातांनी.
कसं वाटतं? महाभारतकाराला बरं नाही वाटलं. असलं अघोरी, अमानुष कृत्य भीमाच्या हातून घडलं, याला महाभारतकाराने - असं तरी कशाला, आपल्या पौराणिक परंपरेने - दोन एकात एक गुंतलेली कारणं दिली आहेत. एक म्हणजे दु:शासनाने मुळात जेव्हा द्रौपदीला भर दरबारात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या घोर कृत्याला तिथल्या तिथे अटकाव करू न शकणार्या भीमाने तिथल्या तिथेच दरबारातील सर्वांच्या साक्षीने गर्जना केली, 'या दु:शासनाची मी छाती फोडून त्याचं रक्त प्राशन करीन!'
आणि द्रौपदीनेही नंतर बजावलं, 'जोपर्यंत दु:शासनाच्या रक्ताने भिजलेल्या हातांनी माझी वेणी घातली जाणार नाही, तोपर्यंत मी वेणीच घालणार नाही.' आणि वनवासाचा संपूर्ण काळ, त्यानंतर युद्ध सुरू होण्यापर्यंतचा काळ ती पांडवांना सतत डिवचत राहिली, की 'बघा, हे माझे मोकळे केस बघा. ते कोणी, कसे मोकळे केले, या आठवणीने तरी तुमचं पौरुष जागं होऊ द्या!'
तेव्हा मेलेल्याच्या शरिराची विटंबना करणे याला आपल्या परंपरेत आधार आहे. वर्तमानातही गुंड टोळ्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या कुणाचा मर्डर केल्यावर त्याचं प्रेत लाथाडताना आपण सिनेमात पाहिलेलं आहे. त्यातही वस्तुस्थिती आहेच.
पण भीमाला खून चढला होता आणि द्रौपदीची वेणी घालून झाल्यावर तो थरथरत होता आणि त्याला पुन्हा शांत करण्यासाठी युधिष्ठिराला विशेष प्रयत्न करावे लागले होते, असंही महाभारत म्हणतंच. भीमाच्या करणीतल्या किळसवाण्या, क्रूर भागावर 'प्रतिशोधाचं' किंवा 'अपरिहार्य प्रतिज्ञापूर्तीचं' पांघरूण घालत नाही. आणि गुंड टोळ्यांचं वर्तन म्हणजे आदर्श वर्तणुकीचे धडे होत, असं हिंसक जमावबाजीचं माथेफिरू राजकारण करणारे सोडून कुणी म्हणणार नाही.
आता सांगा, हे पुरावा नष्ट करणं काय भानगड आहे? आपल्या बाईशी दुसरा संबंध ठेवतो, हे पाहून एखाद्याचं टाळकं फिरतं आणि भावनेच्या भरात तो त्याचा खून करतो, समझे. बरोबर नसलं, तरी समझे. त्या मुडद्यावर तो 'क्रीगा! टारझन बुंडेलो!' म्हणत टारझन स्वत: मारलेल्या सिंहाच्या किंवा वाघाच्या प्रेतावर जसा नाचत असे, तसा नाचला, तरी एक वेळ समझे. पण बाजारातून बॅगा आणणं, प्रेताचे तीनशे की तीस तुकडे करणं, एका बॅगेत ते तुकडे आणि दुसरीत कपडे भरून दोन्ही बॅगा जंगलात टाकून देणं, म्हणजे काय पुरावा नष्ट करणं? बास?
मुद्दा केवळ मृत मानवी शरिराच्या विटंबनेचा नाही. तसं म्हटलं, तर देहदान केलेल्याच्या कलेवराचं डिसेक्शन टेबलवर जे होतं, त्याला कुणी धार्मिक मनुष्य विटंबनाच म्हणेल. मुख्य मुद्दा भावनिक नाहीच. मुद्दा सामाजिक नीतीचा आहे. नीती ही अशी गोष्ट आहे, जी लॉजिकमध्ये नीटशी बसत नाही. तरी तिचा संबंध मानवी समाजाच्या स्थैर्याशी लावता येतो. पूर्ण तिर्हाइत माणसाची प्रेतयात्रा जात असताना नमस्कार केला जाणे, त्या प्रेतयात्रेपुढे आपलं वाहन दामटण्याचा प्रयत्न न करणे, या सुसंस्कृततेच्या पातळीत मानवी जिवाबद्दल आदर व्यक्त होतो. ज्या अर्थी आपण माणूस आहोत, त्या अर्थी या समाजात आपल्या जिवाला विनाकारण धोका नाही, असा विश्र्वास तयार होतो. ज्यामुळे माणसं स्वत:चा जीव बचावण्याच्या आयडिया काढत न बसता स्वत:ला आणि समाजाला जास्त उपयोगी ठरतील, अशा कामात मग्न होतात. अर्थात, सर्वसाधारण माणसं. उगीच या आणि त्या नराधमाची अपवादात्मक उदाहरणं देण्यात अर्थ नाही.
की हा सगळा भ्रमच? परिक्षेत कॉपी करून कॉपीचा कागद फाडून टाकणे, 'आदर्श'संबंधित फायली बेपत्ता करणे आणि खून करून प्रेताचे तुकडे पिशवीत भरून टाकून देणे, हे सगळे एकाच पातळीवरचे गुन्हे? पुरावा नष्ट करणे? माझा जीव, माझी प्रतिष्ठा, माझं यश सहीसलामत सुटलं की पुरे. ह्यूमन डिग्निटी गेली चुलीत! त्या तंदूरमध्ये जळलेल्या दिल्लीतल्या बाईसारखी!
इथे आरती प्रभूंची एक कविता द्यायची आहे; पण अजून ती मिळाली नाही.
Thursday, July 7, 2011
Subscribe to:
Posts (Atom)