Wednesday, March 28, 2012

ग्रेस

हे लिहावं की नाही, या विचारात पुष्कळ वेळ गेला. लिहून टाकावं, असा निर्णय झाल्यावर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
मी गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय बंग यांच्या सर्च या संस्थेच्या शोधग्राम या वसाहतीत रहात असतानाची गोष्ट. तिथे चालणार्‍या कामाविषयी लिहिणे, लिहून आणणे, हे माझं काम होतं. एके दिवशी लायब्ररीत मी काँप्युटरवर काही तरी लिहीत असताना अभयभाऊंचं बोलावणं आलं. मी गेलो. अभयभाऊ म्हणाले, "आपल्याकडे कवी ग्रेस आले आहेत. काही दिवस रहाणार आहेत. तू त्यांच्याबरोबर रहा. त्यांना कंपनी दे."
ग्रेस! मी ग्रेसच्या कविता वाचल्या होत्या. ’राजपुत्र आणि डार्लिंग’ हे पुस्तक एकदा, दोनदा, तीनदा, अनेकदा वाचलं. न थांबता, शेवटचं पान संपवलं, की ताबडतोब पहिल्या पानावर सुरुवात करून वाचलं. सगळं लक्ष एकवटून, मन एकाग्र करून वाचण्याचा प्रयत्न केला. काहीही कळलं नाही. शेवटी ’हे हवेवर काढलेलं चित्र आहे, थेट मराठी वाटणारे ध्वनी ऐकवत केलेली भ्रमिष्ट बडबड आहे,’ असं ठरवून बाजूला केलं. संदिग्धता हा कलेचा दुर्गुण नाही, तर ते कलेचं सामर्थ्य आहे, हे मान्य असूनही ग्रेसची दुर्बोधता मला कधी आवडली नव्हती.
पण त्याची शब्दकळा भुरळ घालत होती. या ओळीनंतर ही दुसरी ओळ कशी कोणाला सुचू शकते, याचा विलक्षण अचंबा वाटायचा. टोकदार प्रतिमा, तीव्र भाव; पण एकुणात काही तरी सांगण्यापेक्षा लपवण्यावर जास्त भर, असं वाटायचं. हा कवी मराठी कोळून प्यायला आहे, त्यामुळे विधानांमागून विधानं करूनही वाचकाला आशयाचा लाभ करून देण्याऐवजी संभ्रमित करून टाकणं याला लीलया जमतं. याच्या भाषावैभवामुळे ’आपल्या हाती काहीएक आशय लागलेला नाही,’ हे वाचकाला शेवटपर्यंत उमगतच नाही, असंही सुचलं होतं. ग्रेसबद्दल वाईट मत नाही झालं (आशय सांगण्याऐवजी आशय लपवणारी कविता करण्यामागे कवीकडे काहीतरी कारणं असतीलच; ग्रेस बुद्धिमान आहे, यात तर तिळमात्र शंका नाही); पण ’ग्रेस माझा आवडता कवी आहे,’ असं म्हणणार्‍यांच्या नावापुढे एक फुली मारू लागलो.
ग्रेसचं गद्यही तसंच. चर्चबेल आणि स्नोफॉल. जणू हा कवी काही वर्षं युरोपात राहिला आहे. ग्रेसने नूरजहानवर एक लेख लिहिला आहे. त्यात त्याच्या (ग्रेस मरेपर्यंत एक तरुण कवी होता, यात वाद नसावा. व्यक्‍ती म्हणून उल्लेख करताना जरी आदरार्थी अनेकवचन वापरणं योग्य असलं, तरी लिखाणाचा संदर्भ असताना ग्रेस, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि नंतरच्या पिढीतले सगळे; यांचा उल्लेख ’अमुक कवितेत कवी म्हणतात,’ असा करणंच उलट अनैसर्गिक वाटतं.) पद्धतीनुसार भावगर्भ विधानं आहेत. पण नूरजहानच्या थोर गाण्यांपैकी फारच कमी गाण्यांचे उल्लेख आहेत. याने नूरजहानची मोजकीच गाणी ऐकून केवळ शैलीवर एक उत्कट लेख घडवला की काय, असा संशय यावा.
तर अशी माझ्या मनातली ग्रेसची प्रतिमा. आणि ती प्रतिमा बनवणारे जवळपास सारे तपशील स्मरणात अस्पष्ट झालेले. ’ती गेली तेव्हा’ यासारखी गाणी सोडली, तर ग्रेसची एक ओळ मनात जिवंत नाही. ग्रेसशी मी बोलू काय! मी लटपटलो. पण शोधग्राममध्ये मराठी साहित्याशी सलगी असलेला मीच होतो.
प्रसंग कठीण होता. काही दिवस दारूच्या पूर्ण अधीन झालेल्या त्यांना गाडीत टाकून त्यांचा एक मित्र शोधग्रामला घेऊन आला होता. अभयभाऊंनी तात्काळ त्यांची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना तपासून औषधं चालू करून आणि सुरुवातीला झोपेची गोळी देऊन अभयभाऊंनी काम सुरू केलं. ग्रेसना अजिबात एकटं वाटू न देण्याचं काम माझ्यावर होतं. खरं तर मी त्यांच्याशी, ते माझ्याशी काय बोलले, मला आठवत नाही. पण आम्ही खूप गप्पा केल्या. साहित्यावर केल्या, शोधग्रामबद्दल केल्या. तिथला परिसर, निसर्ग यांच्यावर केल्या. त्या काळात त्यांनी कधीही दारूची मागणी केली नाही की आठवण काढली नाही. गप्पांमध्ये आमचा दिवस सुरळीत पार पडत असे. मराठी, इंग्रजी, वैश्विक साहित्याचे दाखले ते देत. उतारे पाठ म्हणून दाखवत. काय लय!
ग्रेसना माणसांची आवड आहे आणि समोरच्याला खूष करण्याची कला अवगत आहे, हे माझ्या लक्षात आलं. समोर कुणी इंटेलेक्चुअल असो, की कष्टकरी; ग्रेस त्याला वा तिला सहजी सुखावून टाकत. त्यांना वेळच्या वेळी औषध द्यायला मुली येत. त्यांच्याशी तर त्यांची मैत्रीच झाली. रात्री मात्र ते बेचैन होत. झोपेची गोळी दिली तरी झोपी जात नसत. फोनवर खूप बोलत. कळवळून बोलत. "कर्णिक, मला सोडून जाऊ नका; हे इथेच बसा. किंवा या शेजारच्या कॉटवरच झोपा," अशी मला विनंती करत.
दोन गोष्टी सांगायच्या आहेत. खरं तर, त्या सांगण्यासाठीच हे लिहायला घेतलं. एक म्हणजे, त्यांच्या कवितेची तोंडदेखली स्तुती करणं मला जमेना. मी त्यांच्या कवितेचा विषय टाळतो आहे, हे त्यांच्या अर्थातच लक्षात आलं. ते मुळीच नाराज झाले नाहीत. किंवा ’माझी कविता कशी श्रेष्ठ आहे,’ असं हिरिरीने पटवून देण्याच्या मागेही लागले नाहीत. तेवढे समंजस आणि परिपक्‍व ते होते. पण त्यांनी त्यांच्या कवितेच्या पंक्‍ती म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या खणखणीत, स्पष्ट, उत्कट वाणीतून त्यांचे वजनदार शब्द ऐकणे हा रोमांचक अनुभव होता. पण ते तिथे थांबत नसत. त्या ओळींमधून एक अत्यंत सुसंगत विधान ते उलगडून दाखवत. एक प्रकारे त्यांनी माझी शाळाच घेतली. माझ्यासाठी तो फार मोठा अनुभव होता. टिपिकल ग्रेसच्या अगम्य ओळी. त्यातून पहाता पहाता एक दणदणीत विधान उभं रहात असे. मी मनातल्या मनात वरमलो. त्यांचे संदर्भ वर वर हाती न लागणारे असत. ते त्यांनी सांगितले, की आशय नीट उलगडत असे. त्यात पौराणिक, सांस्कृतिक आणि वैयक्‍तिक संदर्भ असत. पण वडाची साल पिंपळाला, असा प्रकार नव्हता. ग्रेस आवडणार्‍यांच्या नावापुढे फुली मारणं जरी मी बंद केलं नाही; तरी ग्रेस हा खोटारडा किंवा भ्रमोत्पादन करणारा कवी नव्हे; तसं म्हटलं, तर त्याचा अपमान होईल, हा धडा मात्र मी घेतला.
त्यांच्या काव्यात उघड वा छुपेपणाने आई फार आहे. ते जेव्हा स्वतःच्या काव्याबद्दल, निर्मितीप्रेरणेबद्दल बोलत, तेव्हाही आईचं नाव येई. पण त्यांची आई त्यांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी सोडून गेली होती! म्हणजे, त्यांच्या मनातली आई, खरी आई नव्हती; तुटपुंज्या आठवणींमधून त्यांनी स्वतःच तयार केलेली प्रतिमा होती. एकलव्याच्या समर्पित निष्ठेने त्यांनी ती प्रतिमा कायम जपली आणि तिच्यापासून प्रेरणा घेत एक अद्‍भुत प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यांच्या प्रतिभेला एका इंजिनाची गरज होती, जे या प्रतिमेतून त्यांनी स्वतःसाठी बनवून घेतलं.
त्यांना गोळीविना रात्रभर गाढ झोप लागू लागली आणि त्यांनी शोधग्रामचा निरोप घेतला. जाताना एका कागदावर त्यांनी स्वहस्ते डॉ राणी बंग यांच्यावर चार ओळी लिहिल्या. जिथे ते राहिले, त्या ’बहावा’ या गेस्ट हाउसच्या भिंतीवर त्या काव्यपंक्‍तीची फ्रेम लटकवण्यात आली. आजही ती तिथे असेल.
"नागपूरला माझ्या घरी या," असं आमंत्रण मला वारंवार देऊन ते गेले. मी कधीही त्यांच्या घरी गेलो नाही. एक कारण संकोच. त्यांच्या त्या दुर्बल स्थितीत मी त्यांना सोबत केली, या कर्तव्यपालनाच्या बळावर त्यांच्या नॉर्मल, सामाजिक जगण्यावर आक्रमण करणं ठीक नाही, असं मला वाटत राहिलं. दुसरं कारणही सांगितलं पाहिजे. सर्चचा जो ड्रायव्हर त्यांना घरी सोडून आला, तो मला म्हणाला, "काका, त्यांच्या घराच्या सगळ्या भिंतींवर त्यांचेच फोटो आहेत. लहान फोटो, मोठे फोटो. किती फोटो!" हे ऐकून मी घाबरलो. ’अशा आत्मप्रेमी माणसाशी आपण किती वेळ बोलू शकणार? त्यात ते फोटो सतत समोर दिसत असताना!’ असं मला सुचलं आणि संकोचाला पाठबळ मिळालं.
पण मनात ते खुटखुटत राहिलं. नागपूरला जाण्याची वेळ अनेकदा आली. आठवण झाली, की आपण चुकतोय का, असा प्रश्न चाटून जायचा. मग एकदा ते मुंबईला आले असताना मित्राला बरोबर घेऊन मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात गेलो. त्यांचं भाषण ऐकलं. भाषण संपवून ते उतरले की भेटू, असं मनाशी म्हणत राहिलो. पण ते उतरले आणि त्यांच्याभोवती त्यांच्या चाहत्यांचा गराडा पडला. ग्रेस यांच्या कवितेवर, त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वावर प्रेम करणार्‍यांची संख्या मोठी. आणि प्रेमही अगदी दुथडी भरून. त्यात ग्रेसना प्रेम देण्याघेण्याची आवड. मी थोडा वेळ वाट पाहिली. मग लक्षात आलं, की गर्दीत घुसून ’मी अमुक अमुक. आपण शोधग्राममध्ये भेटलो होतो,’ असं म्हणावं लागेल. पुन्हा संकोच आड आला. त्यांना आठवलं नाही तर? आठवलं आणि आवडलं नाही तर? न भेटताच मी बाहेर पडलो. आता ते नाहीत. आता भेटता येणार नाही. नागपूरला गेलो, तर एका राहून गेलेल्या कामाची आठवण टोचत बसणार नाही.