Monday, February 29, 2016

ही तर जेमतेम अक्षरओळख!

ग्रॅव्हिटी वेव्ह्ज ही तर सुरुवात आहे. जेमतेम अक्षरओळख आहे. त्या अक्षरांचे शब्द होतील, विधानं होतील त्यातून कविता-कादंबर्‍याही घडतील! जणू एका पोकळीतून विज्ञान बाहेर पडून मोकळं झालं आहे and now the sky is the limit!


फुटलेला फुगा घ्या. सगळ्या बाजूंनी ताणून धरा. एक ताणलेला पृष्ठभाग तयार होईल. आता त्यावर एक गोटी ठेवा. काचेची, दगडी, शिशाची, कसलीही. सायकलचं बॉल बेअरिंगही चालेल. गोटीचं वजन असं हवं की ताणलेल्या पृष्ठभागावर गोटी आहे तिथे खळगा तयार होईल. (वजन इतकं नको, की पृष्ठभाग फाटेल.)

आता कल्पना करा, पृष्ठभागाऐवजी अवकाशच असा ताणलेला आहे. पृष्ठभागावर गोटी ठेवली, की पृष्ठभाग खालच्या बाजूला वळतो, हे दिसतं. अगदी तसाच अवकाशही वळतो, असं मनात धरा. तो कुठल्या दिशेला वळतो, हे विचारू नका; ती दिशा आकळण्याची क्षमता मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांमध्ये नाही.

पण मनुष्याच्या बुद्धीमध्ये जरूर आहे! मनुष्याच्या बुद्धीने जन्माला घातलेल्या गणितात तर आहेच आहे. माझ्या संवेदनांनासुद्धा हे आकळत नाही; पण मी बुद्धीमधून स्वीकारू शकतो. गणितात हे निश्चित मांडता येतं, हे मला माहीत आहे. तर आपल्या अस्तित्वाला वेढून राहिलेला कालावकाश (या उदाहरणापुरता) त्या ताणलेल्या पृष्ठभागासारखा आहे. सूर्य, तारे, ग्रह किंवा इतर काहीही लहान मोठी वस्तू म्हणजे त्या पृष्ठभागावरच्या गोट्या. एक पटकन कळतं, की गोटीचं वजन जितकं जास्त, तितका पृष्ठभागावरचा खळगा खोल; म्हणजेच पृष्ठभाग सरळ असण्याऐवजी वळलेला असण्याचं प्रमाण जास्त. अगदी हेच नातं अवकाशातल्या वस्तूमधलं द्रव्य आणि त्या वस्तूमुळे तिच्या परिसरातल्या अवकाशावर (खरं तर कालावकाशावर, काळ आणि अवकाश, या दोन्हींवर) होणारा परिणाम, यांच्यामध्ये असतं.

आता विचार करा. एक वस्तू त्या पृष्ठभागावर प्रवासाला निघाली. जोपर्यंत गोटीमुळे झालेला खळगा वाटेत येत नाही, तोपर्यंत वस्तूचा प्रवास सरळपणे, एका गतीने होत राहील. खळगा आला, की ही भटकी वस्तू खळग्यात खेचली जाईल. (खळग्यातली गोटी भटक्या वस्तूपेक्षा खूप मोठी आहे, असं धरा.) जर तिचा वेग जास्त असेल, तर ती थोडी खाली घसरून पुन्हा वर येईल आणि प्रवास चालू ठेवेल. तिचा वेग जर खळगा पार करण्याइतका नसेल तर काय होईल?

ती भटकी वस्तू खळग्यात गोल गोल फिरत खाली जाऊ लागेल! मग तिचा वेग आणि खळग्याची खोली यांच्यात एक शर्यत तयार होईल. वेग जिंकला, तर वस्तू खळग्यात फिरेल, फेरे घालेल आणि वर येऊन (आता वेगळ्या दिशेने) निसटून जाईल. वेग हरला (म्हणजेच गोटी जिंकली) तर गोल गोल फिरत वस्तू गोटीला जाऊन मिळेल!

सूर्य, त्याच्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांच्याही भोवती फिरणारे उपग्रह यांच्या चलनाचं हे वर्णन आहे. ज्याला ’वस्तुमानामुळे निर्माण होणारं गुरुत्वाकर्षण म्हणतात,’ असं आपल्याला न्यूटनने शिकवलं, त्याचा हा वेगळा खुलासा आइन्स्टाइनने केला. संपूर्ण विश्व अशा गोट्यांनी भरलेलं आहे आणि प्रत्येकच गोटी (इतर गोट्यांच्या मध्ये) भटकते आहे आणि प्रत्येक गोटीने स्वतःभोवतीच्या कालावकाशात खळगा तयार केलेला आहे आणि ते खळगे सोबत घेऊनच गोट्या फिरत आहेत आणि लहान मोठ्या गोट्या कधी जवळही येत आहेत आणि त्यांच्या आकारानुसार कधी ग्रहमाला तयार होताहेत, कधी अब्जावधी तारे बाळगणार्‍या दीर्घिकांची टक्कर होते आहे, कधी दोन तारे जवळ येऊन एकमेकांभोवती गरागरा फिरत आहेत ...

प्रचंड वजनाच्या दोन वस्तू या ताणलेल्या पृष्ठभागासारख्या कालावकाशात एकमेकांभोवती वेगाने फिरू लागल्या, तर काय होईल?

जे पृष्ठभागावर होईल, तेच होईल. कालावकाशात तरंग निर्माण होतील. हे तरंग सर्व दिशांनी दूर दूर जात रहातील.

याच तरंगांना आइन्स्टाइन गुरुत्वीय तरंग - ग्रॅव्हिटी वेव्हज म्हणतो. एकाच ठिकाणाहून निघालेल्या असल्या वेव्ह्ज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांमध्ये मिसळल्या, तर विशिष्ट स्वरूपाची नोंद मिळेल. पदवीच्याही अगोदरचं फिजिक्स शिकणार्‍यांना monochromatic light waves मधला interference pattern माहीत असतो, पडद्यावर तो बघताही येतो. तेच, तसंच. आइन्स्टाइनने त्याच्या गणितातून भाकीत वर्तवल्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी हा अतिसूक्ष्म पॅटर्न टिपण्याची क्षमता मानवी उपकरणांना प्राप्‍त झाली.

आणि ग्रॅव्हिटी वेव्ह्ज टिपण्यात यश मिळाल्याची घोषणा झाली!

दोन भाकितं. काचेतून आवाज जात नाही. भिंतीतून प्रकाश जात नाही. पण गुरुत्वाकर्षण जातं. गुरुत्वाकर्षणाला अडवता येत नाही. म्हणजेच गुरुत्वीय तरंगांना अडवता येत नाही. विश्वाच्या पसार्‍यात कुठून कुठून येणारे हे तरंग जर टिपता आले, वाचता आले, त्यांच्या तीव्रतेचं मोजमाप करता आलं, तर विश्वाच्या आरपार ’बघता’ येईल! आजवर आवाक्याबाहेर असलेलं माहीत करून घेता येईल.

ही तर सुरुवात आहे. जेमतेम अक्षरओळख आहे. त्या अक्षरांचे शब्द होतील, विधानं होतील आणि त्यातून कविता-कादंबर्‍याही घडतील! जणू एका पोकळीतून विज्ञान बाहेर पडून मोकळं झालं आहे and now the sky is the limit!

किती रोमांचक आहे हे. किती आश्वासक, किती सुंदर. यापेक्षा सुंदर काही असेल का?

दुसरं भाकीत कोणतं? या शोधाला नोबेल न देण्याइतकी नोबेल प्राइज कमिटी दळिद्री असेल असं वाटत नाही! फारतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी वर्ष दोन वर्षं थांबतील. पण या शोधावर नोबेलचं नाव लिहून झालेलं आहे.