Tuesday, April 4, 2017

रामाची गाणीरामनवमीनिमित्त रामाची गाणी आठवू लागलो. तर ही आठवली:
१. हाय रामा ये क्या हुवा
२. रामा रामा गजब हुई गवा री
३. मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया
४. राम करे कहीं नैना ना उलझे

यातलं एकही भक्तिगीत नाही. हे मी मुद्दाम केलं, असं वाटेल; पण नाही. तसं झालं. पहिलं गाणं जर रंगील्यातल्या उर्मिलाचं आठवलं, तर मग त्यानंतर माणिक वर्माच्या आवाजातली ‘कौसल्येचा राम’ किंवा ‘विजयपताका श्रीरामाची’ ही गाणी आठवणं शक्य नाही.

पण मग विचारात पडलो: या गाण्यांमधून रामाचा उद्धार तर केलेला आहे; पण भक्तिभावनेचा लवलेश नाही. का या बाया भलत्या ठिकाणी, विनाकारण रामाला मध्ये आणत आहेत? ‘अग बाई’ किंवा ‘अय्या, इश्श,’ म्हणावं तसं रामाचं नाव घेतलं आहे.

याची रामावेगळी उदाहरणं आहेत का?

पुष्कळ आहेत! ‘आजा आजा मै हूँ प्यार तेरा, अल्ला अल्ला इनकार तेरा’ ही काही ईश्वराची प्रार्थना नाही. ‘अल्ला बचाये नौजवानोंसे’ हा काही संकटातून वाचवण्यासाठी केलेला धावा नाही. ‘खुदा भी आसमासे जब जमींपर देखता होगा, मेरे मेहबूबको किसने बनाया सोचता होगा’ यातल्या उपरवाल्याची भूमिका सर्वशक्तिमान, विश्वाचा निर्माता असल्याची नाही.

मग इंग्रजीत जसं ‘ओ माय गॉड’ म्हणतात किंवा ‘जीझस ख्राइस्ट!’ असा उद्गार काढतात, ते आणि हे भारतीय उपखंडातलं एकच आहे का?

माहीत नाही! देवाचं, येशूचं नाव विनाकारण घेण्याला तिथे ब्लास्फेमी – ईश्वरनिंदा – मानलं जातं. आपल्याकडे जसं कोणीही कधीही ‘पांडुरंगा,’ म्हणू शकतो, तसंही तिथे चालत नाही. म्हणजे, बोलणारे बोलतात पण त्याला श्रद्धावानांची मान्यता नाही. आपल्याकडे नेमकं उलट आहे. श्रद्धावान लोकच उठता बसता पांडुरंगाचं नाव घेतात.
‘रामा’चा उद्धार करण्यामागच्या कूट प्रश्नाचं हेच तर रहस्य आहे! आपल्याकडे नामजप, नामस्मरण या गोष्टींना मूल्य आहे. ज्ञानाचा, ईश्वरप्राप्तीचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. रामाचं नाव घेत राहिला म्हणूनच वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणूनच अगदी प्रेम, शारीरिक आकर्षण व्यक्त करायचं झालं, तरी राम मध्ये येतो. नव्हे, रामाला मध्ये घेऊन पापाचं काही प्रमाणात परिमार्जन होतं, असाही विश्वास यात असावा. हेसुद्धा खरं आहे की देव, परमेश्वर आपल्यापासून दूर बसलेला नसतो; उलट तो आपल्यातच असतो, कोणालाही प्राप्य असतो, अशी इथली आध्यात्मिक श्रद्धा आहे. त्यात एकदा देवाला ‘कर्ता करविता’ म्हटलं की प्रेमासकट सगळ्याच गोष्टीचं टेपर त्याच्यावर ठेवता येतं. उरता उरला प्रश्न सलगीचा. देव, ईश्वर हे काही गंभीर प्रकरण आहे, त्याला वचकून राहायचं असतं, असे संस्कार आपल्याकडे केले जात नाहीत. ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने आहे लंगडा’ असं एकनाथ लिहून जातात. विठ्ठलाचा उल्लेख विठ्या ते विठाबाई, असा हवा तसा करण्याची मुभा संतांना आणि संतांच्या मागोमाग सर्व भक्तांना असते. रामाशी ही अशी भाषिक सलगी करण्यामागेदेखील हेच कारण असावं.


आणि ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला की जे होतं, तेच होऊन हा गुण मुसलमानांच्यात संक्रमित झाला असावा. पश्चिम आशिया, इंडोनेशिया, आफ्रिका इथल्या मुसलमानाचं काय असतं, हे बघायला पाहिजे. आपल्यासारखं, ‘तुम्हारा चाहनेवाला खुदा की दुनियामें मेरे सिवा भी कोई और हो, खुदा न करे’ असं पर्सनल मामल्यात बिनदिक्कत परमेश्वराला अडकवणारं नसावं.

म्हणजे आपण शेवटी भक्तीपाशीच येऊन पोचलो! इतकं म्हणता येईल, की हा भक्तीचा खास भारतीय प्रकार आहे (जाणकारांनी अधिक माहिती द्यावी).

एकपत्नी मर्यादापुरुषोत्तम रामाची ही कथा; गोकुळात गोपींना घेऊन रासक्रीडा करणाऱ्या कृष्णाचं तर बघायला नको. आपला मराठमोळा वग मथुरेच्या बाजारात दूध विकायला चाललेल्या गौळणींची वाट कृष्ण आणि पेंद्या यांनी अडवल्याशिवाय सुरूच होत नाही. ‘हळू हळू बोल कृष्णा, हळू हळू बोल रे; सासू दळते पलीकडे, तिला लागेल कानोसा; नणंद बसली माजघरा, तिला लागेल कानोसा’ असली किंवा ‘कुजबुज उठली गोकुळी, राधा कृष्णावरी भाळली’ असली भावगीतं आपण सुखाने लिहितो, ऐकतो.


आजच्या, भावना दुखवून घेऊन तात्काळ हमरीतुमरीवर येण्याच्या काळात हे चालेल का? आज याला सुसंस्कृत मानलं जाईल का? प्रॉब्लेम असा आहे की संस्कृतीत सुधारणा बॅकडेटेडच कराव्या लागतात. ‘कसा ग बाई झाला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’ असं कुणी कधी लिहिलं – गायलंच नाही, असं म्हणता आलं नाही; तर यात पहिल्यापासून केवळ आध्यात्मिक अर्थच आहे, असं म्हणावं लागतं. ‘खुन्या मुरलीधर’, छिनाल बालाजी’ ही नावं मागे चालत होती; आता मात्र त्यांच्यामुळे भावना दुखावतात, असं म्हणून कसं चालेल? बघूया. योगीजींच्या राज्यातलं कोर्ट प्रशांत भूषण यांना धडा शिकवायला समर्थ असणार. गण गवळणीच्या महाराष्ट्रात हे लोण कधी येतंय, ते पाहू.

Saturday, January 7, 2017

ओम पुरीओम पुरीला पहिला पाहिला तो अर्थात ‘आक्रोश’मध्ये. आख्खा सिनेमाभर तो गप्प असतो. घामेजलेला, मनात प्रचंड खळबळ कोंडून ठेवल्यासारख्या चेहऱ्याने डोळे वटारून बघत राहतो. त्याच्या वकिलाकडेसुद्धा तोंड उघडत नाही. त्याच्या बायकोवर बलात्कार करून तिला ज्यांनी ठार मारून टाकलेली असते; त्यांनी त्यालाच तिच्या हत्येसाठी जबाबदार ठरवलेलं असतं. आणि हा बोलतच नाही. शेवटी बायकोला अग्नी देताना स्वतःच्या असहाय्य बहिणीला पाहून त्याला एकदम तो तुरुंगात गेल्यावर तिच्यावर काय गुदरणार याचा साक्षात्कार होतो आणि कोयता उचलून तो बहिणीला ठार करतो. त्यावेळी जेव्हा त्याला पोलीस धरतात, तेव्हा त्याला कंठ फुटतो आणि त्याचा शब्दाविना होणारा आक्रोश ऐकवत नाही.


आदिवासींचं शोषण; लहान गावात असणारं सरकारी डॉक्टर, वकील, पोलीस या सगळ्या, जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या, व्यवस्थेचं आपमतलबी साटंलोटं; त्यातून निर्माण होणारी दहशत; नवख्या वकिलाचा कोंडमारा या साऱ्या गोष्टी ‘आक्रोश’मध्ये (पटकथा: विजय तेंडुलकर, दिग्दर्शक: गोविंद निहलानी) चांगल्या दाखवल्या होत्या. तरी मला एकूण ‘आक्रोश’ आवडला नाही, कारण ‘आपल्या परोक्ष बहिणीवर बलात्कार होण्यापेक्षा ती मेलेली बरी’ हे मूल्य आदिवासी नव्हे; ते टिपिकल मध्यमवर्गीय, पारंपरिक मूल्य आहे. आणि असल्या उसन्या मूल्याने पछाडून कोणाचा (बहीण असली म्हणून काय झालं?) थेट जीवच घ्यायचा, हे मला अजिबात पटलं नाही.

पण त्यातली स्मिता! तिला दोन चार मिनिटांचा एक सीन काय तो आहे. नवऱ्याबरोबर आवेगाने सेक्स करतानाचा. पण तिच्यामुळे महाभारत घडू शकेल, अशी दिसते. आणि ओम पुरी. पूर्ण आदिवासी दिसतो. त्याचा तो देवीच्या व्रणांनी भरलेला ओबडधोबड चेहरा, राठ कुरळे केस आणि चेहऱ्यावरचे दगडी भाव; पूर्ण आदिवासी. वाटलं होतं, साधू मेहेरसारखा हासुद्धा ठराविकच भूमिका करणार.

तसं मुळीच झालं नाही. ओम पुरीने सिद्ध केलं की चेहऱ्यावरच्या गोंडसपणापेक्षा अॅटिट्यूड हाच तुमच्या व्यक्तिमत्वाला अर्थ देतो. तसे दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ, शाहरुख यांपैकी कोणीच गोंडस, चिकणा चुपडा नाही; पण ओम पुरीइतका खडबडीतही नाही. ओम पुरी टिकणं आणि केवळ दुय्यम रोल न करता मध्यवर्ती महत्त्वाच्या भूमिका त्याने गाजवणं, यातूनच त्याच्या अभिनयकौशल्याची उच्च पातळी समजते. आपल्याकडे अजूनही एखाद्या प्रसंगात भावनाकुलतेचा जबरा आविष्कार दाखवण्याला थोर अॅक्टिंग म्हणतात. एक स्वायत्त व्यक्तिमत्व उभं करणे, प्रेक्षकांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणे; यात अभिनयकौशल्याची कसोटी लागते, असं मानलं जात नाही.

आता ओम पुरीचे काही चित्रपट समोर आणू.

‘जाने भी दो यारों’ ही एक ब्लॅक कॉमेडी. यात तो एक भ्रष्ट बिल्डर आहे. तो निगरगट्ट दिसतो, भ्रष्ट दिसतो आणि कॉमेडी चित्रपटातलं पात्रसुद्धा दिसतो. हा धोतर नेसलेला उघडा भीम रंगमंचावर येतो आणि युधिष्ठिराच्या डोक्यात गदा घालतो. ‘चाची ४२०’ मध्ये लंपट दिसतो. ‘मंडी’ हा श्याम बेनेगलचा एक अत्यंत थोर चित्रपट. त्यात हा एक उटपटांग फोटोग्राफर आहे. खास फोटो मिळवायला उचापती करतो; पण कधी कधी फसतोदेखील. असाच एकदा स्मिताच्या खोलीत घुसलेला असताना ती त्याला हसत हसत ‘चिल्लाऊं?’ अशी धमकी देते तेव्हाची त्याची तिरपीट बघावी. कुठला तरी सटरफटर फोटोवाला दिसतो. त्याची देहबोलीच तशी आहे.

पण ‘पुकार’मध्ये वरिष्ठ सेनाधिकारी दिसतो! काहीच खटकत नाही. त्याचा रुबाब, त्याचा भारदस्त आवाज आणि स्पष्ट, वजनदार शब्दोच्चार सगळं कसं तोलामोलाच्या अधिकाराची जागा सहजी वागवणाऱ्या माणसाचं वाटतं. हासुद्धा ओम पुरीच की. ‘मृत्युदंड’मध्ये तो ग्रामीण आहे, ‘खालच्या’ जातीचा आहे; तर तो तसा दिसतो. ‘मालामाल विकली’ या चित्रपटात पुन्हा त्याची विनोदी भूमिका आहे. ‘प्यार तो होनाही था’ मध्ये तो चोरीला गेलेला हार शोधणारा, सहृदय पोलीस इन्स्पेक्टर आहे. जिथे तो जसा दाखवला आहे, तसा दिसतो. अगदी ‘नरसिंहा’मध्ये भडक, बेगडी व्हिलनसुद्धा दिसतो.

 ‘अर्धसत्य’मधला त्याचा अनंत वेलणकर कोण विसरेल! पानवलकरांच्या ‘सूर्य’ या कथेतला अनंता एक हळवा, संवेदनशील मनुष्य आहे.
त्याचा एक दणकट पोलीस इन्स्पेक्टर होताना न्याहाळणे आणि ‘आपला मुलगा आता आपल्यावरच डाफरतो!’ यातून विलक्षण सुख मिळवणारा त्याचा बाप बघणे, हे त्या कथेतून मिळणारे दोन मस्त अनुभव. ओम पुरीचा अनंता बापावर डाफरताना म्हणतो, ‘मेरी माँको मारता है साला!’ सिनेमाच्या पटकथेत तेंडुलकरांनी अनंतात ट्रॅजिक रंग मिसळले आहेत. आणि कठोर आवाजाच्या, राकट ओम पुरीला ‘आतून तो हळवा, चटकन दुखावला जाणारा आहे,’ हे दाखवताना अडचण झाली नाही. दणदणीत आवाजात कंप आणणे त्याला जमत होतं. आणि ते केव्हा, किती करायचं, हे तारतम्यसुद्धा त्याच्यापाशी होतं.

ओम पुरीचं रूप त्याच्या करीयरच्या आड कधी आलं नाही; उलट त्यामुळे त्याचा फायदाच झाला असावा. म्हणजे, परदेशी सिनेमावाल्यांना जेव्हा एखादं भारतीय पात्र दाखवायचं असतं, तेव्हा त्यांना, त्यांच्या प्रेक्षकांकडून सहजपणे भारतीय म्हणून स्वीकारला जाईल, अशा चेहऱ्याची, व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता असते. अशा वेळी त्यांना ओम पुरी योग्य वाटला असावा. कारण ओम पुरीला पुष्कळ इंग्रजी चित्रपट मिळाले. फ्रान्समध्ये घडणाऱ्या ‘A Hundred Foot Journey’ मध्ये त्याने ‘कदम’ नावाची व्यक्तिरेखा रंगवली आहे. (अर्थात, त्या ‘कदम’मधल्या मराठीपणाचं प्रमाण ‘इंग्लिश विंग्लीश’ मध्ये ‘गोडबोले’ झालेल्या श्रीदेवीपेक्षा कमीच आहे.) त्याच्या समोर आहे हेलन मिरन, ही जाणती अभिनेत्री. सिनेमा हलका फुलका आहे; पण ओम पुरी हेलन मिरनच्या समोर कमकुवत ठरला असता, तर मजा नक्की कमी झाली असती.

ओम पुरीची आणखी एक आठवण आहे: ‘राग दरबारी’. श्रीलाल शुक्ल यांच्या याच नावाच्या कादंबरीवर एक सीरियल आली होती. उत्तरप्रदेशातल्या एका गावामधलं राजकारण, हा विषय होता. गावात पाहुणा गेलेला ओम पुरी, हाच सीरियलचा निवेदक आहे. टायटलचं गाणं साक्षात भीमसेन जोशींनी गायलं होतं. मी पाहिलेल्या उत्कृष्ट सीरियलांपैकी एक. मनोहर सिंग, दिनेश शाकुल, वीरेंद्र सक्सेना असे सगळेच कसलेले कलाकार होते. एका लहानशा भूमिकेत झरिना वहाब होती. मजा आली. ओम पुरीच्या आवाजात कथन ऐकताना विशेष. ओम पुरीची प्रमुख भूमिका असलेली ‘कक्काजी कहीं’ अशी पण एक सीरियल आली होती; पण तिच्यात खास आठवण्यासारखं काही नव्हतं.

ओम पुरीमुळे पुष्कळ आनंदाचे क्षण मला मिळाले आहेत. तो एक ताकदीचा नट होता. त्याला तरलपणाचा चांगला सेन्स होता. त्यामुळे भूमिकेत बारकावे भरणं त्याला शक्य व्हायचं. आता आपल्याकडे सूक्ष्म बारकावे असलेल्या भूमिकाच फारशा रचल्या जात नाहीत, हा काही ओम पुरीचा दोष नव्हे.

Tuesday, August 2, 2016

कोण मुबारक बेगम?

लता गायला लागेपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या गायिका होऊन गेल्या, त्यांना सर्वांना स्वतःचं स्थान आहे. त्यांच्या करियरचा स्वतःचा असा काही ग्राफ आहे. त्यात नूरजहान, सुरैया, खुर्शीद सारख्या गाणार्‍या नट्या होत्या तशाच जोहराबाई, अमीरबाई, शमशाद यांसारख्या फक्‍त आवाज देणार्‍या गायिकासुद्धा होत्या. यातल्या प्रत्येकीची गायकी स्वतंत्र आहे आणि कोणाच्याही गाण्यांची, गायकीची चर्चा करताना लताचा संदर्भ न घेता करता येते. किमान, ज्यांचे कान लताच्या गायकीने एकारून टाकले नाहीत, त्यांना नूरजहानचं ’बैठी हूँ तेरी याद का लेकर के सहारा’ किंवा शमशादचं ’न आँखों में आँसू न होठों पे आहे’; किंवा सुरैयाचं ’दूर पपीहा बोला’ किंवा खुर्शीदचं ’घटा घनघोर’ ऐकताना लता आठवत नाही. त्या गाण्यांमध्ये कमी जास्ती ठरवताना लताला मधे आणावं लागत नाही.

यांच्यातली शेवटची गायिका गीता दत्त. ’घूंघटके पट खोल’ किंवा ’मेरा सुंदर सपना’ असली गाणी तिला मिळाली आणि पुढेही सुरुवातीला ओ पी नय्यर आणि काही प्रमाणात (गुरुदत्तमुळे?) एस डी बर्मन य़ांनी तिला गाणी दिली. पण सूर्य उगवल्यावर तारे दिसेनासे व्हावेत, तशा गीतासकट सगळ्याच गायिका गायब (संदर्भ गायब होण्याचा आहे; गुणवत्तेचा नाही) झाल्या. आशासकट ज्या कोणी उरल्या, त्यांना लताच्या पुढे दुय्यम स्थानच स्वीकारावं लागलं. आता, लता-आशा या बहिणींचं स्थान भक्कम झाल्यावर त्यांनी दुसर्‍या कुणाला उभंच राहू दिलं नाही, असं म्हटलं जातं. त्यात तथ्य असो वा नसो, लताच्या गायकीला न अनुसरता कुणी नवी गाणारी गातेय, असं होण्याची शक्यता उरली नाही, हे खरं. त्यासाठी लताचं गाणं थांबावं लागलं; इतकंच नाही, लताची छाया असलेल्या अलका याज्ञिकच्या गाण्याने कान किटून थेट फ्यूजन संगीताचा वेगळा बाज आणणार्‍या रेहमानचं आगमन व्हावं लागलं.

यांच्यात मुबारक बेगम कुठे बसते? प्रामाणिक उत्तर द्यायचं तर बसत नाही. तिचा आवाज असा, की तो लताच्या गायकीचं अनुकरण करू शकत नाही. जीवनाची मजा वैविध्यात असते, असं किती जरी म्हटलं; तरी लता-आशा यांच्यातल्या वैविध्यात इथल्या संगीतकारांची आणि श्रोत्यांची हौस जणू पूर्णपणे फिटली. इतर गायिकांच्या एखाद्‍ दुसर्‍या गाण्यामुळे या विधानाला बाधा येत नाही. तरी असं होतंच की एखादं गाणं त्या वेळच्या प्रसंगामुळे, त्यातल्या शब्दांमुळे, चालीमुळे मनात अडकून पडतं आणि आपोआप गाण्याच्या आवाजाची स्मृतीसुद्धा मनात एक खास स्थान धरून बसते.

याचं ऑल टाइम थोर उदाहरण म्हणजे ’कभी तनहाइयोंमें हमारी याद आयेगी’. या गाण्याच्या थोरवीबद्दल नवीन काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही; ऐकावं आणि मान झुकवावी. (वा झुकवू नये. मान झुकवणं मान्य नसल्यास पुढचं वाचू नये! कारण ते जगाला मान्य आहे, असं गृहीत धरून पुढचं लिहिलं आहे). भुताटकीचं गाणं आहे. ’ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया; न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आयेगी’ या भयंकर शापवाणीला इतकी अनुरूप चाल लावणार्‍या स्नेहल भाटकरला वंदन असो. असं वाटतं, मुबारक बेगमने काय वेगळं गायलंय हे गाणं? या गाण्यातली खास तिची काँट्रिब्यूशन म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे ’ये बिजली राख कर जायेगी’ म्हटल्यावर ’तेरे’ म्हणताना तिचा आवाज फाटल्यासारखा होतो. वाटतं, शाप देणारीला काय पराकोटीच्या वेदना होताहेत शाप देताना! शापाचा एक हिस्सा तिने स्वतःच्या दिशेनेदेखील रोखला आहे! मुबारक बेगमचा आवाज या तिखट तळतळाटाला एकदम फिट बसला आहे. तिची निवड करणार्‍या स्नेहल भाटकरला धन्यवाद द्यायला हवेत. या गाण्यावर मुबारक बेगमचाच स्टॅम्प आहे. (असतो. प्रत्येक गाण्यावर एकेकाचा स्टॅम्प असतो. ते कधीतरी नंतर) ही चाल आणि तिचा आवाज एकमेकांना भेटण्यासाठीच जन्माला आले जणू. (https://www.youtube.com/watch?v=rpYFab53aqM)

पण मग कुठेतरी वाचायला मिळतं, की स्नेहल भाटकरला हे गाणं लताकडूनच गाऊन घ्यायचं होतं; पण योग आला नाही. मग वाटतं, धन्यवाद लताला द्यायला हवेत की तिने हे गाणं सोडलं! असेना लता थोर; हे गाणं लता गाते आहे, अशी कल्पना करताच येत नाही.

मुबारक बेगमचा आवाज गरतीपणापेक्षा बैठकीला जवळचा आहे. तरी त्या आवाजात एक निरागस हरलेपणाचा भावसुद्धा आहे. ’तुम्हारा दिल मेरे दिलके बराबर हो नही सकता, वो शीशा हो नही सकता, ये पथ्थर हो नही सकता; हम हाले दिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये’ या गाण्यात सामान्य गणिकेच्या आवाजाला असाव्यात तशा मर्यादा तिला असल्यासारखं वाटत गाण्याची सुरुवात होते. पण त्यामुळे गाणं खाली येत नाही; ती मर्यादा त्या गाण्याच्या, त्या वेळच्या प्रसंगाच्या आशयाचा भागच असल्यासारखं वाटतं. म्हणजे पुन्हा संगीतकार सलील चौधरीचेच मार्क वाढतात! गाणं ’हम-’ वर थबकतं आणि लगेच ’हाले दिल सुनायेंगे’ हे शब्द येताना वाजणारा ढोलक आवाजाला मागे सारतो. चित्रपटातल्या बाकी सर्व (बाईच्या) गाण्यात लता. तीसुद्धा कुठली लता, तर ’बिछुआ’ आणि ’जुल्मी संग आँख लडी’ वाली! त्या मस्तवाल उग्रनारायणसिंहाच्या मैफिलीतलं मुबारक बेगमचं गाणं पूर्णदेखील होत नाही, इतकं ते कमी दखलपात्र. पण तिचा आवाज या सगळ्या माहोलात नेमका बसतो आणि गाणं मनात जागा बनवतं. (https://www.youtube.com/watch?v=Fv6-VaS3oGs)

’देवदास’मधलं तिचं गाणं - ’वो न आयेंगे पलटकर’ हे याला पूर्ण न होण्याच्या गुणधर्मामुळे एका परीने समांतर; पण इफेक्ट वेगळा. चंद्रमुखीचा निरोप घेऊन देवदास कायमचा सोडून चालला आहे आणि पार्श्वभूमीवर मुबारकच्या आवाजातलं हे गाणं अंधुक ऐकू येतं आहे: "नाही येणार तो!" नीट लक्ष दिलं नाही, तर गाण्याचे शब्द धड ऐकूही येणार नाहीत. आणि ऐकू आले नाहीत तरी प्रसंग पुरेसा बोलका आहे. शब्द ऐकू आले तर चंद्रमुखी नव्हे; तिच्यासारख्या नाच-गाणी करणारींचा, वेश्यांच्या मनचा दर्दच जागतो. त्यांच्याकडे इतके येतात आणि जातात. काही पुन्हा पुन्हा देखील येतात. पण नातं असतं ते तेवढ्यापुरतंच. येणारा नाच बघायला, गाणं ऐकायला, मन रिझवायला, शरिराची भूक भागवायला येतो. त्यापलिकडे त्याने यावं, अशी आस मनी उपजल्यास हेच उत्तर - वो न आयेंगे पलटकर उन्हे लाख हम बुलाये! समाजातल्या खालच्या स्तरातलीची आस ही अशी मुबारक बेगमच्या आवाजातच व्यक्‍त व्हावी जणू. (https://www.youtube.com/watch?v=0uOD04nHurA)

मुबारक बेगम एक नंबरची गायिका नाही, तिचा आवाज मेनस्ट्रीम नायिकेला शोभत नाही; या सर्वमान्य विधानाला एकच अपवाद. आश्चर्य म्हणजे तो अपवाद कोणाचा; तर चित्रपटातल्या तीन वेगळ्या बायकांना एकच आवाज देणार्‍या, लताचे जवळपास गुलाम होऊन गेलेल्या शंकर-जयकिशनचा. हे कसं घडलं, योजून घडलं की योग आला; माहीत नाही. पण ’मुझको अपने गले लगालो’ हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीमधलं मेनस्ट्रीम गाणंच आहे. महम्मद रफीबरोबर गाताना मुबारक बेगमचा आवाज जराही बिचकत नाही, दुय्यम ठरत नाही, त्याच्या मागे मागे जात नाही. त्या आवाजात लाडिकपणा सापडतो, सेक्सीपणा सापडतो आणि शंकरजयकिशनी स्मार्टपणा तर सापडतोच सापडतो. त्यात हे गाणं ठेक्याचं, उडतं नाही; ते नीट मेलडीवालं आहे. चटकदार आहे; गोडही आहे. (https://www.youtube.com/watch?v=D7vA3gKYIvA)

राहून राहून आश्चर्य वाटतं, हे कसं झालं असेल? शंकरजयकिशनला मुबारक बेगम मेनस्ट्रीमसाठी आवश्यक अशा बरोब्बर नेमक्या सुरात, भावनेत कशी वाजवता आली? जे बाकी कोणीच केलं नाही? ग्रेट! त्या काळात काही कारणांमुळे लता रफीवर रागावली होती आणि त्याच्या बरोबर गात नव्हती. पण तिच्या दुर्दैवाने तो काळ फारच नायकप्रधान मांडणीचा, शम्मी कपूरवाला होता. लता रफी एकत्र न गाण्याने रफीचं काहीएक नुकसान झालं नाही; उलट इतर गायिकांना संधी मिळू लागली. त्यातलंच हे एक गाणं. कधी कधी वाटतं, भांडण थोडं लांबायला हवं होतं! आपल्या कानांचं थोडं भलं झालं असतं! शंकरजयकिशनने नंतर मुबारक बेगमला घेतल्याचं माहीत नाही!

Friday, July 1, 2016

माझे ’अलौकिक’ अनुभव

सतीश तांबेने साक्षात्काराची कळ लावली आणि पुढे घनघोर चर्चा झाली. त्याचा एकूण अविर्भाव आणि अधल्या मधल्या कॉमेंटींना उत्तर देतानाची शब्दयोजना; यांच्यामुळे चर्चा रुळावर राहिली, पांचटपणाकडे घसरली नाही. मीसुद्धा हात धुवून घेतले. ’हात धुवून घेतले’ असं म्हणायचं कारण, मला असल्या विषयावरच्या चर्चा पूर्ण फिजूल, वांझ वाटतात. तरीपण काहीतरी लिहावंसं वाटलं. आणि चर्चा थिल्लर नसल्याने संयमपूर्वक लिहावं लागलं.

असो. पण यामुळे मलाच आलेले काही अनुभव आठवले! त्यातला एक मला स्वतःला साक्षात्कारी वाटतो. तो शेवटी सांगतो. अगोदरचे दोन जास्त इंटरेस्टिंग आहेत.

गोष्ट जुनी आहे, लग्नाअगोदरची. चरस घेण्यात अप्रूप राहिलं नव्हतं पण त्या दिवशी मला लागला. उभं रहाणं सोडा, डोळे उघडे ठेवणं अशक्य झालं. दुपारी लंचटाइममध्ये केलेले उद्योग. माझ्या सांगण्यावरून मला बागेत आडवा सोडून मित्र निघून गेला. मी पडून.

आपली शुद्ध हरपली होती, हे मला शुद्ध येऊ लागल्यावर कळलं. काय तो अनुभव! सुरुवात झाली ती एका संपूर्ण nothingness मधून. प्रकाश नाही, ध्वनी नाही, काही नाही. ज्ञानेद्रियाद्वारे कसल्या अनुभूतीचं ग्रहणच नाही. अर्थात अस्तित्वाची जाणीवही नाही. शून्य.

मग मला त्वचेवर अगदी अस्पष्ट, हळुवार, सुखद झुळूक जाणवू लागली. वार्‍याची झुळूक. अस्पष्ट. सुखद गारवा. तोपर्यंत मी ’मी’ नव्हतो. मी असं काही नव्हतं. त्या झुळुकीने मला अस्तित्व दिलं. तरी ते तेवढंच होतं. मला मन नव्हतं, शरीर नव्हतं, इच्छा-वासना नव्हत्या. त्या मंद, सुखद गार, अधून मधून येणार्‍या झुळुकीचा अनुभव घेत मी नुसता होतो.

मग तशाच प्रकारे गुपचुप आवाज आले. संगीत. अनाहत संगीत. अमुक असं कुठलं वाद्य नाही. पण पक्ष्यांचे आवाज होते. तेसुद्धा अस्फुट. दुरून येणारी चिवचिव जशी. कोकिळा अजिबात नाही.

मग प्रकाश आला. रंग आले. हिरवळ आली. निळं, ढगाळ आकाश आलं. मी त्या अवकाशात होतो; पण खाली किंवा वर असा काही नव्हतो. आणि तिथे मनुष्यप्राणी नव्हता. प्राणीच नव्हता. गंधाचं काय ते आता आठवत नाही. पण हे असं चालू राहिलं आणि कुठल्यातरी क्षणी मला आवाज ओळखू आले. तेव्हा कुठे त्या अनुभवात पहिल्यांदा शब्द आले. मग मात्र भराभर माझी जाणीव जागी होत गेली आणि मी डोळे उघडले.

गवतात आडवा होतो. डोळ्यांजवळ गवताची पाती होती. अतीव आनंदाचा अनुभव घेतल्याची भावना होत होती. तो अनुभव संपला, आपण पुन्हा जगण्याच्या जाणिवेत आलो, याचं दुःख होत होतं.

माझा अनुभव मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो शतांशानेही आलेला नाही. त्या अनुभवात तपशील, असं काही नव्हतं; त्यामुळे ते आठवण्याचा प्रश्न नाही. पण ती अस्तित्वशून्य शांतता मला पक्की आठवते.

काय़ अर्थ लावावा याचा? सोपं उत्तर म्हणजे मला स्वप्न पडलं. मी माझ्याशी म्हणतो की मी मेलो आणि परत आलो. माझ्या स्वतःसाठी ती अनुभूती इतकी प्रत्ययकारी होती की माझ्यापुरती मला काहीही शंका नाही. आणि म्हणून मला चक्क माहीत आहे की मला स्पर्श, ध्वनी आणि प्रकाश यांच्यामधून जे स्वर्गीय सुंदर वातावरण जाणवलं, ते म्हणजे मेल्यानंतरचा स्वर्ग नव्हे. ते मृत्यूच्या अलिकडचं आहे. मृत्यू म्हणजे पूर्ण शांतता. मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता. मृत्यू म्हणजे विश्व नामक अस्तित्वात संपूर्णपणे विलीन होणे. न-असणे.

पण त्या अनुभवाने जरी मी थक्क झालो, मला निखळ, आशयशून्य आनंदाचा दुथडी भरून अनुभव जरी मिळाला, तरी मी एक टक्कासुद्धा जास्त शहाणा झालो नाही. मला काय झालं हे मी मित्राला सांगायचा प्रयत्न केला. काय सांगू, किती सांगू असं झालं आणि काहीच सांगता येत नाही, असंही झालं. आज मला त्याची आठवण अशी येत नाही. कारण ’हे असं काही तरी असतं,’ या सदैव जागृत ज्ञानासह मी जगत आलो आहे.


दुसरा अनुभव इतका नाट्यपूर्ण नाही. मध्ये बरीच वर्षं गेली. माझा गडचिरोलीचा मुक्काम संपत आला आणि मला जाणवलं की मी आसपासचा परिसर अजिबात बघितलेला नाही. मग मी एकदा हेमलकसाला जाऊन आलो. आणि मग जुजबी चौकशा करून थोडक्या अंतरावरची राज्याची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात (आता छत्तीसगड) जायचं ठरवलं. राजनंदगाव. त्याच्याजवळचं डोंगरगाव. तिथली देवी.

गेलो. राजनंदगावला पोचलो. गडचिरोलीतले रस्ते गुळगुळीत होते. सीमा ओलांडल्याबरोबर ते एकदम बेकार झाले. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेळ लागला. डोंगरगावला ट्रेन जात होती. मला एक गाडी मिळू शकत होती. तिला खूप वेळ होता म्हणून मी बीयर प्यायचं ठरवलं. गडचिरोलीत दारूबंदी. राजनंदगावात नाही. चला, साजरं करूया.

एका बारमध्ये गेलो. किंग फिशर ही एकच बीयर होती. पण स्ट्राँग होती. मला स्ट्राँग मुळीच नको होती. मी बार बदलला. तिथेही तेच! तिसर्‍यांदा तसं झाल्यावर विचारणा केली. तर कळलं की तिथे स्ट्राँग बीयरची फॅक्टरी आहे म्हणून ती मुबलक मिळते; पण फक्‍त तीच मिळते.

आलिया भोगासी ... असं म्हणत स्ट्राँग मागवली. पण च्यायला उभ्या हयातीत कधी बियरच्या एका बाटलीवर थांबू शकलेलो नाही, ते तिथेही शकलो नाहीच. परिणामी शेवटची गाडी गेली. दोन स्ट्राँग बीयर मला चढली. एकट्याने प्यायलो म्हणून असेल किंवा पुष्कळ दिवसांचा उपास सोडला म्हणून असेल पण मला धड चालता येईना. जेवतो कसला, स्टेशनच्या आवारातल्या एका झाडाच्या पारावर आडवा झालो तो झोपच लागली.

सकाळी जाग आली तेव्हा मनाशी चडफडत होतो. ’आता गाडी उशीरा, ती पकडून वर जाऊन हिंडून फिरून परत येऊन गडचिरोली गाठणं शक्य नाही, आणि परत तर जायलाच पाहिजे, हे काय झालं, बीयर नडली,’ वगैरे. तोंडावर पाणी मारून चहा प्यावा म्हणून उभा झालो.

आणि कल्पनातीत थक्क झालो. मी चक्क डोंगरगाव स्टेशनात होतो!

कसा आलो? ट्रेन पकडली? कुठली? ट्रेनमध्ये कसा चढलो? खिशात तिकीट बिकीट मुळीच नव्हतं. मला नीट आठवत होतं की मी खालच्या स्टेशनच्या आवारात एका झाडाखाली बसून ’आता काय करावं?’ असा विचार करत होतो. नकळत आडवा झालो आणि पुढची जाणीव ही आत्ता सकाळी उठल्याची.

मग वर कसा आलो? एकटाच तर आहे. दुसर्‍या कोणी आणलं असणं शक्य नाही. खूप डोक्याला ताण दिला. काहीही आठवलं नाही. नाही, हे बरोबर नाही. नीट आठवलं की आपण खालच्या स्टेशनवरच बसल्या बसल्या आडवं होऊन झोपलो.

आता हे काय आक्रीत?

चहा प्यायलो आणि देवळाकडे गेलो. परिसर बरा होता. देवळात देवीच्या दर्शनाला मोठ्ठी रांग होती. तिथपर्यंत जात असताना मनात आलं की देवीने आपल्याला वर आणलं. हा काही तरी संकेत आहे. आता देवीचं दर्शन घेणं भाग आहे.

पण खरं सांगतो, ती लाईन बघून माझा मूड गेला. एवढी होती देवीची इच्छा तर तिने मला देवळात लवकर प्रवेश मिळवून देण्याचीदेखील व्यवस्था करायला हवी होती, असं म्हणून मी देवळात न शिरताच परतलो.

पुढे काही नाही. हे इतकंच.


तिसरा अनुभव थेट साक्षात्काराचा. पण या दोन अनुभवांच्या तुलनेत अगदी मिळमिळीत. तो क्षण मला अगदी नीट आठवतो. वरच्या दोन अनुभवांच्या मधला काळ. नोकरी सोडली होती आणि काहीच करायचं ठरवलं नव्हतं. पूर्ण अनिश्चित. बायकोभरोसे (ती नोकरी करत होती). तर मी मुतारीत शिरलो आणि चक्क सू करताना मला लख्ख लक्षात आलं की पैसे मिळवण्याचा आणि अक्कल असण्याचा, अंगी हुन्नर असण्याचा, कष्ट करण्याचा काही एक संबंध नाही. दुनियेला जे हवं आहे, ते दिलं की दुनिया पैसे देते. लता मंगेशकरला देते आणि सिगारेट कंपनीलाही देते. या पलिकडे कसलंही गणित नाही. काही चांगलं वाईट नाही. उगीच अन्याय बिन्याय असलं काही चिकटवू नये. ’त्याच्या बुद्धीचं चीज झालं नाही,’ म्हणू नये. आणि अर्थात पैसे मिळवण्यावरून जगात कोणाचीही किंमत करू नये.

याचं लॉजिक मी नंतर रचलं. पण जेव्हा हे कळलं, ते आतून कळल्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी अजिबात शंका नव्हती. ज्ञान होणं आणि माहिती असणं यातला फरक इथे असतो. माहिती विसरते, कमी जास्त होते, ज्ञान एकदा झालं की भागच होतं अस्तित्वाचा. सायकल शिकल्यासारखं. पण हे ज्ञान असं घट्ट ठसल्याचा परिणाम पुढे अनेक वर्षांनी जेव्हा जाहिराती, मार्केट यांची ओळख झाली तेव्हा जाणवला. हे हरामी गरज मॅन्युफॅक्चर करतात! आणि ती पुरवून पैसे करतात. याचा मला भयंकर राग आला. निसर्गाला धंद्याला लावण्याइतकं हे बेकार वाटलं.

पण ते पुढचं. साक्षात्कार तो तेवढाच. त्याला इंट्यूशन म्हणयची मुभा तुम्हाला आहेच. मनाच्या आत चालू असलेल्या मंथनाचं नवनीत अचानक उसळलं आणि मी त्याला साक्षात्कार म्हणालो.

असेल. तसंही असेल. सगळ्या साक्षात्कारांचंसुद्धा तसंच असेल.

Wednesday, June 15, 2016

मधुमेहावर शस्त्रिक्रियेचा इलाज!१५ जूनच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पान ४ वर एक महान बातमी आहे: पोटाचा सुटलेपणा कमी करण्यासाठी असलेल्या ’gastric bariatric शस्त्रक्रियेमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो! अशी शस्त्रक्रिया झालेल्यांचा अभ्यास केल्यावर त्यातल्या १०० टक्के लोकांमध्ये सुधारणा दिसून आली; ६५ टक्के लोकांना मधुमेहावरच्या औषधांची गरज उरली नाही आणि ते ’नॉर्मल’ प्रमाणात साखर खाऊ शकतील. शस्त्रक्रिया न करता नियमित औषध घेणारे, व्यायाम करणारे व डॉक्टरांनी शिफारस केलेली जीवनशैली अंगिकारणारे यांच्या गटातील ७५ टक्के लोकांमध्ये सुधारणा दिसली. हे ग्रेट आहे!

मधुमेह बरा होतो, असा दावा असल्याने ही बातमी महान आहे, असं मुळीच नाही. बातमी महान असण्याची कारणं अशी:
       अमेरिकन डायाबिटिस असोसिएशनच्या परिषदेत या अभ्यासासाठी ज्यांचा गौरव करण्यात आला, त्या डॉ        शशांक शहा यांनी निष्कर्ष सादर करण्याअगोदर शस्त्रिक्रिया झालेले आणि इतर इलाज करणारे, असे 
       स्पष्ट दोन गट करून ४ वर्षं अभ्यास केला.
       निष्कर्ष जाहीर झाला, गौरवही झाला; संपला अभ्यास, असं म्हणून ते मोकळे झाले नाहीत. बर्‍या झालेल्या        मधुमेह्यांवर लक्ष ठेवून ते परत रोगग्रस्त होतात का, हे तपासण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
       भारत आणि पश्चिमेतले देश, इथल्या लोकांच्या रोगग्रस्ततेमध्ये फरक असतो, असं एक भलं मोठं 
       विधान त्यांनी केलं. (आपल्या अभ्यासक्रमातली सर्व पुस्तकं तिथल्या डॉक्टरांनी, तिथल्या रोग्यांचा 
       अभ्यास करून लिहिलेली असतात आणि आपण बैलाप्रमाणे त्यांना अनुसरून निदान करत असतो, 
       औषधांचं प्रमाण ठरवत असतो आणि समाजातील विविध रोगांचा फैलाव ठरवत असतो. अलिकडच्या 
       काळात दोन वेळा भारतातल्या लोकसंख्येमधील मधुमेह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं. दोन्ही वेळा  
          WHO ने मधुमेहाची व्याख्या बदलली आणि ती आपण स्वीकारली, या एकमेव कारणामुळे! 
       अर्थात मधुमेहावरील औषधांचा खप दोन्ही वेळा प्रचंड वाढला, हे सांगायला नको.)

या बातमीमधून जशी वैज्ञानिक शिस्त दिसते, तसाच विज्ञानाचा नम्रपणासुद्धा दिसतो. या तुलनेत मोदीराज्यात ऊत आलेली आणि whatsapp वर फिरत असलेली ’तुळशीमुळे भूकंप होत नाहीत’ आणि ’गाईच्या मुतात एड्सप्रतिबंधक गुण असतात’, असल्या छापाची विधानं किती भंपक, मूर्ख, उद्धट आणि बेपर्वा वाटतात.

एक्स्प्रेसला बातमीदारी कळते. एक्स्प्रेसची पत्रकारिता वेगळी आहे.

(http://indianexpress.com/article/lifestyle/health/gastric-bariatric-surgery-may-help-diabetics-shows-study-mumbai-2853386/)