मला कान तसा उशीरा आला आणि जसा आला, तसा मी
लताच्या आवाजात पूर्ण बुडालो. तेव्हा नाकातोंडात गेलेलं पाणी अजून नीटसं निघालेलं
नाही. परिणामी मला कायम वाटत आलं आहे की वेडा होऊन गाणी
ऐकण्याच्या काळात मी आशा, गीता, शमशाद यांना समरसून एन्जॉय करू शकलो नाही. थोडा
अपवाद नूरजहानचा. शमशादला तर नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारणं जडच गेलं. त्यात
शमशाद सुरुवातीला ऐकली, ती नौशादची. ’बैजू बावरा’ आणि ’दीदार’. दूर कोई गाये
आणि बचपनके दिन भुला न देना. दोन्ही लता-शमशाद ड्युएट्स. काय काय सुचायचं.
’बचपनके दिन भुला न देना’ हे गाणं बालवयातले नर्गिस आणि दिलीप कुमार गातात. घोड्यावर
बसलेले तबस्सुम आणि परिक्षित सहानी. मोठी झाल्यावर नर्गिसचा आवाज फुटतो आणि
लताऐवजी ती शमशादच्या आवाजात गाऊ लागते. दिलीप कुमारचाही आवाज फुटतो आणि शमशादचं
रूपांतर रफीमध्ये होतं!
या संस्काराला ’किस्मत’मधल्या कजरा
मुहबतवालाने हातभार लावला. या गाण्यात बबिता पुरुषाच्या वेषात आणि विश्वजित
बाईच्या वेषात आहे. बबिताच्या तोंडचे शब्द जरी पुरूषाचे असले तरी तिला आवाज दिला
आहे आशाने. आणि बाईच्या भावना व्यक्त करणारा विश्वजित गातो शमशादच्या आवाजात.
संगीतकार जणू सांगतो आहे, आशाचा आवाज बघा कसा स्त्रीला शोभेसा नाजुक, लाडिक आहे;
तर शमशादचा आवाज मर्दानी आहे. स्त्रीवेषातल्या पुरुषाला शोभेलसा आहे.
ओ पी नय्यरला खरंच असं वाटत होतं का? मुळीच
नाही. ’किस्मत’ १९६८ चा. त्याच्या दहा वर्षं अगोदर आलेल्या ’नया दौर’मध्ये सुद्धा
शमशाद-आशा यांचं द्वंद्वगीत आहे, रेशमी सलवार कुरता जालीका. या गाण्यातले
शब्दही बाईचे आणि बुवाचे आहेत. मात्र चित्रपटात नाचणार्या दोन्ही बायाच आहेत. आणि
पुरुषाच्या वेषात नाचणारी बाई आशाच्या आवाजात, तर बाईच्या वेषात नाचणारी बाई
शमशादच्या आवाजात गातात. दोन्हींपैकी एकही नायिका नसताना. म्हणजे, दहा वर्षात ओ पी
लतामुळे निर्माण झालेल्या धारेला लागला! कारण बाईचा आवाज किनरा हवा, हा संस्कार
निःसंशय लताचाच.
म्हणून तर शमशादला नायिकेचा आवाज म्हणून
स्वीकारायला जड गेलं. आणि ओ पी नय्यरने जणू या विचाराला फूस लावली. कभी आर कभी
पार हे ’आरपार’मधलं टायटल साँग असेल शमशादने गायलेलं; पण ते नायिका श्यामाच्या तोंडी नाही. कहींपे निगाहें कहींपे निशाना
हे नाही. ’सीआयडी’तलं बूझ मेरा क्या नाम रे नाही. लेके पहला पहला प्यारमधला
शमशादचा आवाज नायिका शकीलाला नाही. शकीला तोंड उघडते, तेव्हा आशाचा आवाज ऐकू येतो.
असं करता करता जेव्हा ’जुन्या’ गाण्यांच्या
विश्वात आत आत गेलो आणि मागचे संदर्भ सुटले, तसे कान मोकळे झाले आणि अमीरबाई,
जोहराबाईपासून एकेका आवाजाची आपापली वेगळी लज्जत घेताना मजा येऊ लागली. मग
खुर्शीदचं घटा घनघोर अत्यंत आवडतं झालं. इतकं की पावसाळ्याच्या सुरुवातीला
सिलोनवर ते ऐकायला उतावळा होऊ लागलो. कभी न बिगडे किसीकी मोटर रस्तेमें
मधली धापा टाकणारी सुरैया गुदगुल्या करू लागली. दूर कोई गाये हे गाणं लताचं
नसून शमशादचं आहे, असं मनात आलं. मनके अंदर हो प्यारकी अग्नी या तिच्या
कडव्यात शमशाद जी उफाड्याने गाते, अभीसे है ये हालच्या आगेमागे जे वळसे
घेते, ते कानात साठू लागले. त्या पार्श्वभूमीवर त्यातलं लताचं मेरे अंगना लाजका
पहरा मिळमिळीत भासलं. ’अंदाज’मध्ये लता नौशादसाठी प्रथम गायली. तेव्हाच्या
रीतीप्रमाणे लतानेही ’अंदाज’मध्ये जाड आवाज काढला आहे. तेव्हा त्यातल्या डरना
मोहबत करलेमध्ये शमशादच्या सफाईसमोर लताची सुप्त ताकद तेवढी जाणवून घ्यावी. लता
झाली तरी ती विष्णूचा अवतार नव्हे की जन्मापासूनच तिला स्वसामर्थ्याची पूर्ण जाणीव
असावी. ’अंदाज’च काय, नौशादच्याच पुढच्या ’बाबुल’मध्ये सुद्धा तिचा नवोदितपणा
गेलेला नाही. पंछी बनमेंमध्ये मंदबुद्धी हातवारे करणार्या नर्गिसला तिचा सखी
हाथोंसे हॉय म्हणणारा आवाज एकदम जुळतो. आणि किसीके दिलमें रहना था
म्हणताना पातळ, किनर्या आवाजाला वजन येतं. या गाण्यात बसायी थी कोई मेहेफिल
मधला लताचा ’ह’ खणखणीत आहे, शमशादचा गुळगुळीत आहे!
’बाबुल’ची नायिका नर्गिस की मुनव्वर सुलताना?
नौशादचं काही कळत नाही. ’बाबुल’मध्ये नर्गिस लताच्या आणि मुनव्वर सुलताना
शमशादच्या आवाजात गातात; तर ’दीदार’मध्ये नर्गिसला शमशादचा आणि निम्मीला लताचा
आवाज आहे. ’दीदार’ची नायिका काय निम्मी? कदाचित नर्गिसचा आवाज लहानपणी लताचा होता
आणि नंतर फुटला, असं ठरल्यावर नौशादचा इलाज राहिला नसेल. पण त्याचमुळे शमशादच्या
उंच चढलेल्या खणखणीत आवाजात चमनमें रहके वीराना ऐकताना समोर नर्गिस दिसते. शमशाद
आणि नायिका एकत्र पहाण्याचा सर्वात स्ट्राँग संस्कार या गाण्याने केला.
ओपी नय्यरचं जे झालं, ते इतर संगीतकारांचं खूप
अगोदर झालं. उदाहरणार्थ नौशाद. ’बाबुल’, ’दीदार’ अशा चित्रपटांमध्ये दोन नायिकांना
दोन आवाज देताना नौशादने लता आणि शमशाद यांच्यात कोणाला वर-खाली लेखलं नाही. पण ’जादू’मध्ये?
एकाच नलिनी जयवंतला दोन आवाज. लो प्यारकी हो गयी जीत गाताना लता आणि जब
नैन मिले नैनोंसे व रूपकी दुष्मन पापी दुनिया गाताना शमशाद. आणि पुढे ’अमर’मध्ये
मधुबाला आणि निम्मी, दोघींनाही लताचाच आवाज. कसा प्रवास आहे! ’जादू’ हा नलिनी
जयवंतचा उत्सव आहे. आणि ’जादू’तली गाणी उडती, पश्चिमी ढंगाची आहेत. लो प्यारकी
हो गयी जीत गाणं चांगलं आहे; पण रूपकी दुष्मनची बेहोषी त्यात नाही. मारे
अखियाँ हे शब्द एकदा खाली आणि एकदा वर, ही शमशादची खमंग गंमत ऐकूनच कळेल. इथल्या
नलिनी जयवंतच्या मनमोकळ्या देहबोलीला शमशाद न्याय देते; लता नाही. लताच्या बाबतीत
नौशादचा एकूणच प्रॉब्लेम असावा. चावट चालींची, उच्छृंखल गाणी काय त्याने दिली
नाहीत? पण लताच्या आवाजातलं एक आठवत नाही. नौशादची लता कायम साफ, शुद्ध, सरळ. लो
प्यारकी हो गयी जीतच्या पुढे त्याची मजल जात नाही. अनिल विश्वासला बरं जमलं नाचे
रे गोरी जिंगू सारख्या गाण्यांमध्ये.
त्या, एकोणीसशे पन्नासच्या आगे मागे काळात
शमशादचं अपील सणसणीत असावं. ’परदेस’मधलं मेरे घुंगरवाले बाल (गुलाम महम्मद)
आणि ’आवारा’तलं एक दो तीन (शंकर जयकिशन), दोन्ही गाणी पडद्यावर कक्कू गाते.
आवाज शमशादचा. तोच बेहोष, मनमुक्त भाव. या गाण्यांमधले, विशेषतः घुंगरवाले बालमधले,
सूर कमी ऐकू येतात; त्यातली अनावर उच्छृंखलता कानातून थेट हृदयात शिरते. चाल गाता
गाता पलिकडे कुठल्याकुठे फिरायला जाऊन, ज्याला जिप्सी म्हणावं असं भावदर्शन शमशाद
लीलया घडवते. असं वाटतं, तिची आणि फॉर्मातल्या किशोरची जोडी बरी जमली असती. पण
किशोर फॉर्मात आला तेव्हा कुणी या दोघांना एकत्र आणलं नाही. किशोर-शमशादचं बेस्ट
ड्युएट अर्थात ’नया अंदाज’मधलं मेरे नींदोंमें तुम. पुन्हा हे गाणं
किशोरपेक्षा शमशादचंच. किशोरला तेव्हा वजन आलं नव्हतं. आणि ’नया अंदाज’मध्ये शमशादच्या
आवाजात मीनाकुमारी गाते हे चालून गेलं. याला एक कारण म्हणजे मेरे नींदोंमें तुम
हे गाणं दिसतं त्यापेक्षा जास्त ऐकू येतं. किशोर दिसतो आणि ऐकूही येतो; पण गाण्याच्या
मालकी हक्काचे शेअर्स मीनाकुमारीकडे किरकोळ आहेत, शमशादकडे जास्त.
आणि ओपीकडे सर्वात जास्त. शमशादची गोडी ओपीनेच
लावली. नौशाद तसा चालवाला माणूस. ओपी किंवा अनिल विश्वासबरोबर जसं गाणार्याचं
अंतरंग खुलून येतं, तसं नौशादबरोबर होत नाही. शमशादचा रगेलपणा ओपीच्या एकेका
गाण्यात कसा उचंबळून येतो. बूझ मेरा क्या नाव रे गाताना त्या रे ला
ती काय मस्त आत वळवते. हे शमशाद लीलया करते. करताना जराही योजून केल्यासारखं होत
नाही. कजरा मोहबतवालामध्ये नाही का हाय रे मैं तेरी कुरबान मधला
शेवटचा न कसा तिच्या आवाजात फडफडून जिवंत होतो! लेके पहला पहला प्यार
या गाण्यात रफी, शमशाद आणि आशा, तिघे आहेत. तुमनेभी देखा होगा उसको सितारों, आओ
आओ मेरे संग
मिलके पुकारो, अशा विरहिणीच्या शब्दांना साजेसा आवाज आशा लावते; पण तेव्हाच्या लतामय वातावरणात आग लावून देणार्या ओ पी नय्यरच्या जादूचं रहस्य ज्या रसरशीत ताजेपणात होतं, तो विरहभावामध्ये नव्हता. तो होता, मुखडेपे डाले हुवे जुल्फोंकी बदली, चली बलखाती कहाँ रुक जाओ पगली अशा अवखळपणात. तो जसा रफीत जागा होत होता, तसाच शमशादमध्ये जिवंत होत होता. ओपी-शमशाद हे एक प्रकरणच आहे.
मिलके पुकारो, अशा विरहिणीच्या शब्दांना साजेसा आवाज आशा लावते; पण तेव्हाच्या लतामय वातावरणात आग लावून देणार्या ओ पी नय्यरच्या जादूचं रहस्य ज्या रसरशीत ताजेपणात होतं, तो विरहभावामध्ये नव्हता. तो होता, मुखडेपे डाले हुवे जुल्फोंकी बदली, चली बलखाती कहाँ रुक जाओ पगली अशा अवखळपणात. तो जसा रफीत जागा होत होता, तसाच शमशादमध्ये जिवंत होत होता. ओपी-शमशाद हे एक प्रकरणच आहे.
’बहार’.’जुनी’ वैजयंतीमाला शिंकली तरी ती
नाचातली मुद्रा असते, इतकी ती नृत्यमय आहे. नाचणे म्हणजे आनंद, नाच हेच जीवन, हे जणू तिचं जगण्याचं
पहिलं तत्त्व असावं. आणि तिला ’बहार’मध्ये आवाज कोणाचा, तर आत्मनिर्भरतेचा प्रत्यय
देणार्या शमशादचा. पण ’बहार’मधल्या वैजयंतीला स्वतःतल्या जादूचा साक्षात्कार
झालेला नव्हता. त्यामुळे सैंया दिलमें आना रे, दुनियाका मजा लेलो, या
गाण्यांमध्ये शमशादने तिचं काम चोख केलेलं असलं तरी पडद्यावर गाणी अपेक्षेइतकी
रंगत नाहीत. म्हणजे, वैजयंती नाचते, छान दिसते, ठीक; पण या दोघींच्या रसायनाकडून
अपेक्षाच जास्त निर्माण होतात, त्याचं काय? ’बहार’वाल्या एसडीचंच ’शबनम’मधलं गाणं ये
दुनिया रूपकी चोर वैजयंतीला मिळायला हवं होतं. कामिनी कौशल नाही पटत. बंगाली,
गुजराती, मराठी, अशा पॅन इंडियन भाषांमधल्या या गाण्यात वैजयंतीने काय धमाल केली
असती.
एवढं झाल्यावर सांगावं लागतं की शमशादला
चेहेरा कुणी दिला असेल, तर तो निगार सुलतानाने. ’नमूना’तल्या टमटमसे झाको ना
रानीजी ची मजा सी रामचंद्रची आहे. पतंगामधल्या मेरे पिया गये रंगूनवरही त्याची
छाप आहेच. (शमशादबरोबर आवाजच मुळी ’चितळकर’ आहे!) पण इथली निगार ’दिसते’. शमशादच्या
भरदार आवाजापुढे झाकोळून जात नाही. आणि खटकतही नाही. निगार काही थोराड, पुरुषी
नाही. नीट बाई आहे. पण तिच्यात विलक्षण तोरा आहे. जो नर्गिसमध्येसुद्धा सापडतो.
थोडासा गीताबालीत दिसतो. सुचित्रा सेनमध्ये तो भरपूर आहे. प्रत्येकीचा वेगळा आहे,
निगारचा तोरा ’शमशादी’ आहे! आणि शमशादच्या आवाजातली लखलखीत धार नजरेत उतरवणारी
तेजस्वी निगार बघायची असेल, तर अर्थात ’मोगले आझम’. तेरी मेहेफिलमे किस्मत आजमाकर
हम भी देखेंगे हे गाणं कोणाकरता बघावं? कोणाकोणाकरता बघावं! दिलीपचा मुघल
राजपुत्राचा रुबाब, स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाला
प्रियकरावर ओवाळून टाकलेल्या प्रेमिकेचा अप्रतिम अभिनय करणारी मधुबाला आणि प्रेम, मैत्री, कशाहीपेक्षा अस्मिता जास्त प्रिय असल्याचं शब्दांविना जाणवून देणारी निगार. गाणं लीजण्ड होतं, ते असं. मोगले आझममध्ये ग्रेट गाणी आहेत; श्रवणीय आहेत, प्रेक्षणीय आहेत. पण मला तेरी मेहेफिलमें पुन्हा पुन्हा बघताना, ऐकताना जास्त आनंद मिळालेला आहे.
प्रियकरावर ओवाळून टाकलेल्या प्रेमिकेचा अप्रतिम अभिनय करणारी मधुबाला आणि प्रेम, मैत्री, कशाहीपेक्षा अस्मिता जास्त प्रिय असल्याचं शब्दांविना जाणवून देणारी निगार. गाणं लीजण्ड होतं, ते असं. मोगले आझममध्ये ग्रेट गाणी आहेत; श्रवणीय आहेत, प्रेक्षणीय आहेत. पण मला तेरी मेहेफिलमें पुन्हा पुन्हा बघताना, ऐकताना जास्त आनंद मिळालेला आहे.
शमशादच्या आवाजाचं, गायकीचं हे वैशिष्ट्य
म्हणावं का? आत्मविश्वासातून आलेला मोकळेपणा. शरीर फोडून बाहेर उसळणारा उत्साह. जिचं
मन जिंकणं हे एक आव्हान आहे आणि जो पुरुष तिचं मन जिंकेल, त्याचा स्वतःवरचा विश्वास उदंड वाढेल; अशा स्त्रीत्त्वाचं प्रतीक. आपल्या संस्कृतीतल्या बाईत, मुलीत हे – किमान त्या
काळात – कमीच असल्यामुळे या आवाजाला नंतरच्या, लता-आशाच्या काळात आक्रमकपणाचं लेबल
चिकटलं. एक गोष्ट खरी, बडी मुशकिलसे दिलकी बेकरारीको करार आया, के जिस
जालिमने तडपाया उसीपर मुझको प्यार आया (’नगमा’ – नाशाद) या शब्दांना शमशादच्या
गळ्यातून बाहेर येताना वरकड आशय प्राप्त होतो. हे जे काही प्यार आया प्रकरण आहे,
ते सहजासहजी घडलेलं नाही. आणि तो जो कोण जालिम आहे, त्याने हे सीरियसली घेतलं
नाही, तर गंभीर प्रसंग ओढवेल, असं सुचत रहातं.
लता आडवी आल्यामुळे आज शमशादचा विचार ’एका
आत्मनिर्भर स्त्रीचा बेगुमान उद्गार’ असा होत नाही. पण ते तसं जाणवत रहात असणारच.
म्हणून त्याचं वर्तमान इंटरप्रिटेशन काही तरी भलतंच होतं. आणि दुसर्या कुठल्याही
गायिकेपेक्षा शमशादने गायलेल्या गाण्यांची उत्तान रिमिक्स रूपं अवतरत रहातात. समाजाच्या
कानांवरचा लताचा फिल्टर विरत जाईल, तशी शमशाद नव्याने मोठी होईल!