Thursday, May 23, 2013

IPL: चोरोंका राजा रुपैया!



क्रिकेटच्या इतिहासात डब्लू जी ग्रेस, व्हिक्टर ट्रंपर, रणजी, ब्रॅडमन, असे जे कोणी महानातले महान खेळाडू होऊन गेले, त्यात सर्वात जुना ग्रेस. या सगळ्यांच्या आहेत, तशा ग्रेसच्याही आख्यायिका आहेत. त्यातल्या एकीत असं घडतं की तो बॅटिंग करायला येतो आणि पहिल्या बॉलवर त्याची बेल उडते. तर हा पठ्ठ्या तात्काळ बेल जागेवर ठेवून पुन्हा बॅटिंग करायला उभा! अंपायर अर्थातच आक्षेप घेतो. तेव्हा ग्रेस उत्तरतो, ’लोक माझी बॅटिंग बघायला आलेत; तुझं अंपायरिंग बघायला नाही.’

ग्रेसचं तेव्हा खरं होतं आणि आज T20 च्या जमान्यात तर जास्तीच खरं आहे. लोक T20 च्या सामन्याला जातात, ते दोन संघांमधला क्रिकेटिंग संघर्ष बघायला नाही. ते जातात  फटक्यांची आतषबाजी पहायला. धावत जाऊन सीमारेषेवर पकडलेल्या कॅचचा किंवा तसलाच दुसरा कसला थरार अनुभवायला. जसं की एक ओव्हर उरलीय आणि ६ – १० – २० रन्स पाहिजेत आणि १ – २ – ४ विकेट उरल्यात आणि रन्स होतात किंवा होत नाहीत किंवा एका ओव्हरमध्ये चार चार विकेटच पडतात किंवा नको तेव्हा नो बॉल पडतो आणि होत्याचं नव्हतं होतं किंवा ... एकूण काहीतरी सनसनाटी, थरारक, उन्मादक, बेहोष करणारं घडतं. पैसा वसूल!

थेट पूर्वीच्या फ्रीस्टाइल कुस्त्यांसारखं. किंवा सिनेमातल्या शेवटच्या फाइटसारखं. निकाल काय लागणार हे माहीत असूनदेखील प्रेक्षकाचं चित्त धरून ठेवून त्याला सुखसंवेदनेत धुंद, बेहोष करणे, हेच त्यातलं दिग्दर्शकीय कौशल्य असतं. ही सुखसंवेदना बालिश असते, या आरोपात तथ्य नाही. ती सगळ्यांची गरज असते. प्रमाण कमी-जास्त असेल, पण गरज सर्वांचीच असते.

आणि जो कुणी समाजाची असली गरज पूर्ण करतो, त्याला समाज पुरेपूर मोबदला देतो; हा सामाजिक व्यवहारांचा मूलभूत नियम आहे. मोजपट्टी लोकप्रियतेची असो की पैशाची; निकष हाच. भूक लागल्यावर खायला मिळण्यात बेहोष करणारं सुख, रोमांचक थरार नाही. मादक पदार्थात आहे. जुगारात आहे. म्हणून तिथे जास्त पैसा आहे. IPLमधून असल्याच कसल्यातरी गरजेची वा मागणीची पूर्तता होत असते. म्हणून IPL सामन्यांना प्रचंड गर्दी होते. ईडन गार्डनसारखा नव्वद हजार माणसं बसवण्याची क्षमता असलेला स्टेडियम भरून जातो (आणि टीम जिंको वा न जिंको, शाहरुख खान प्लसमध्येच जातो). रस्त्यावरच्या दुकानातल्या टेलिव्हिजनसमोर जमाव जमतो. तीन तासात केवढं नाट्य! तो गेल दे दनादन बॉल लांब लांब भिरकावत असतो. फिल्डिंग करणारे जीव तोडून धावत असतात. त्यांनी फेकलेल्या बॉलवर रन आउट होऊ नये म्हणून फलंदाज (बायका क्रिकेट खेळायला लागल्या आणि ’बॅट्समन’चे जेंडर न्यूट्रल ’बॅटर’ झाले.) सूर मारून क्रीज गाठायचा प्रयत्न करतात. काय ती नो बॉलनंतरची फ्री हिट! काय तो अधून मधून होणारा टाइम आउट! काय ते गौरव कपूर, कपिल देव, सिद्धूचं झंपक झंपक झपॅक! पैसा वसूल!

सिनेमातली फाइट कधी चालत्या ट्रेनच्या टपावर, कधी कड्यावर असते. कधी भन्नाट वेगाने चाललेल्या मोटारींमधून लोक एकमेकांवर गोळीबार करतात. बाँब फेकतात. अशा स्टंट्सच्या वेळी डबल वापरतात. ज्यांचे मुखडे आणि मसल्स प्रेक्षकांना प्यारे असतात, ते नाही भाग घेत अशा दृष्यांच्या चित्रिकरणात. वेगळेच कुणी तरी आपला जीव धोक्यात घालत असतात.

आणि हे सर्वांना माहीत असतं.

आणि तरीही कुणाच्या आस्वादाचा बेरंग होत नाही. हे खरं नाही, हे नाटक आहे; ही जाणीव रसभंग करत नाही. कारण नाटकच तर बघायचं असतं! अगदी थेट फ्रीस्टाइल कुस्त्यांसारखं.

मग हे फिक्सिंग फिक्सिंग काय चाललं आहे? त्या श्रीशांतने, विंदूने कोणाचं काय घोडं मारलंय? IPL हे क्रिकेट आहे, ते नाटक नाही, असं कोण खुळा समजत आलाय?

क्रिकेट आणि T20 यांच्यात साम्य आहे, हे खरं. क्रिकेटलाच वळवून वाकवून T20 ची निर्मिती करण्यात आली आहे. ५० षटकांच्या एक दिवसीय क्रिकेटमुळे या नवनिर्मितीला प्रेरणा मिळाली. चिवटपणा, स्टॅमिना, हवामानाचा परिणाम आणि विकेटची होणारी वा न होणारी खराबी हे घटक एक दिवसाच्या सामन्यात बाद झाले; पण जीवनाच्या वाढत्या वेगात  पाच पाच दिवस चालणारा सामना तसा कालबाह्यच होत चालला होता / आहे. पण म्हणून वीस षटकांमध्ये दहा विकेट्स, हे गणित न पटण्यासारखं आहे. नवा बॉल आहे म्हणून फास्ट बोलर, जुन्या बॉलसाठी स्पिनर, असल्या गोष्टी तर नष्टच झाल्या. चेंडूला फ्लाइट देऊन फलंदाजाला मोहात पाडणे आणि त्याला थोड्या धावा खिलवून त्याचा बकरा करणे, हे परवडेनासं झालं. (इरापल्ली प्रसन्ना कधी T20ची कॉमेंटरी करेल काय!)  फॉरवर्ड शॉर्टलेग ही फील्डिंग पोझिशन T20ला माहीत नाही.

पण असा वाद तरी कशाला घालायचा? षटकार हा काय क्रिकेटिंग स्ट्रोक आहे? हनुमान नाहीतर भीम, असल्या लोकांचा तो फटका. एका मजबूत दांडूने एक मोठासा बॉल ताकद एकवटून उंच आणि दूर भिरकावण्याच्या अमेरिकन बेसबॉलमध्ये शोभणारा. बोलरला विचलित करण्यासाठी किंवा निकराच्या प्रसंगी शिस्त धाब्यावर बसवून धोका पत्करण्यासाठी उचलला चेंडू, तर समझे. पण इथे तर पाउसच षटकारांचा. त्यांची गणती. जणू शक्तीचे प्रयोग चालल्यासारखं सर्वात लांब गेलेल्या फटक्याला बक्षीस. क्रिकेटच्या आस्वादकाला दिवसाकाठी डझनावारी षटकार बघणं ओंगळ वाटेल.

त्या चीअरलीडर बाया. T20 सुरू झालं, तेव्हा रोज रात्री पार्टी असायची. चीअरलीडर बायांना तिथे हजर असण्याची अटच होती. त्यांचं दुसरं काम काय? एका बाईने आरोप केला, जो बोलावेल त्याच्याबरोबर आम्ही झोपावं, अशी अपेक्षा असते; तर तिला तात्काळ हाकलून दिली. तिच्या आरोपाची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता! (कुणी बाईनाहीम्हणते, म्हणून काही खेळाडू संतापून तमाशा करत, असंही ऐकिवात आहे!) पार्टीला बडे बडे लोक असत. प्रत्येक खेळाडूला पार्टीला येण्याची सक्त सूचना असे. (मोजून दोन खेळाडूंनी ती सूचना पाळली नाही, म्हणतात: सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड.) मंदिरा बेदी आठवते? तेव्हापासून एक तरी टंच बाई असतेच बोलायला. किंवा टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी बघायला.

एवढंसुद्धा नको. T20च्या जाहिराती आठवा. ’हे क्रिकेट आहे,’ असं त्यांत लांबून तरी सुचवलेलं असतं का? गेल्या वर्षी ऑफिशियली सर्कशीतले, जत्रेतले खेळ दाखवण्यात आले. यावर्षी झंपक झंपक! भरघोस पैशांच्या मोबदल्यात शरीर हलवणारे कपिल देव, सिद्धू यांसारखे नाच्ये. द्रविड आणि पाँटिंग अजून बाटली उघडल्याच्या आवाज तोंडातून काढण्यापर्यंत आलेत; पुढच्या वर्षी सुनील गावस्करसकट त्यांचीही ढुंगणं हलायला लागतील, काही सांगता येत नाही

मर्यादित षटकांच्या सामन्यांमधून निवृत्त झालेला सचिन IPL का खेळतो?  तो काय पुढच्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे की काय? बहुधा नाही. मग IPL ला काय सोनं लागलंय? पैशाचं? की गर्दीचं? की नीता अंबानीच्या आदेशाला नाही म्हणता येत नाही?

हा काहीतरी धर्मबुडवेपणा चाललेला आहे, याला आवरा; असं इथे सुचवायचं नाही. मुद्दा इतकाच आहे, की “हे क्रिकेट नव्हे, हा तमाशा आहे, याकडे गंमत जंमत म्हणूनच बघा, ही एक गंभीरपणे मनावर घेण्यातली स्पर्धा आहे, असा विचार चुकूनही मनात आणू नका,” असं तुम्हाआम्हाला पटवण्याचा इतका आटापिटा चाललेला असताना खरं म्हणजे, IPL हा कुणाच्या तरी सुपीक मेंदूतून निघालेला पैसे कमावण्याचा मस्त धंदा आहे, यात शंका असू नये. खेळणारे खूष, बघणारे खूष, संघमालक खूष, माजी खेळाडू खूष, प्रायोजक खूष, चॅनेलवाले खूष! कोणाला हरायचंच नाही, सगळेच प्लस!

राहिला मुद्दा बेटिंगचा. तुम्हाला मटका माहीत आहे? रतन खत्री मटका चालवत असे. रात्री साडेआठ आणि साडे अकरा वाजता मटक्याचा आकडा जाहीर होत असे. त्यातले तपशील राहू देत; पण तेव्हाही खेळणारे म्हणत की कुठल्या आकड्यावर किती पैसे लागलेत, हे बघून आकडा ठरवला जातो; जेणेकरून वळण (म्हणजे बेटिंग) घेणारे घाट्यात जाणार नाहीत. तरीही ज्यांना हे पूर्ण मान्य होतं तेसुद्धा मटका खेळतच. स्टेशनजवळच्या पत्त्यांच्या क्लबपासून व्हेगसपर्यंत शेवटी क्लबवालाच प्लस होतो, हे महावचन कुठल्या जुगार्‍याला माहीत नाही? म्हणून कोणी खेळायचं थांबलंय का?

अर्थ असा की बेटिंग हा केवळ तांत्रिक गुन्हा आहे. पेपरातच छापून आलं आहे की बेटिंगच्या साइट्सवर स्पष्ट नोटीस असते, की अमुक अमुक देशांमध्ये बेटिंगला कायद्याची मान्यता आहे; तिथल्याच नागरिकांनी बेटिंग करावं! उद्या त्यातल्या एखाद्या देशाने बेटिंगवर बंदी घातली, तर तिथे सर्रास चालू असलेली गोष्ट लगेच गुन्हा ठरेल. आणि समजा भारतात बेटिंगला मान्यता देणारा कायदा ’पूर्वलक्षी प्रभावाने’ (असं झालंय) पारित झाला; तर श्रीशांत आणि कंपनीला सोडून द्यावं लागेल. बेटिंग करणे आणि घेणे म्हणजे खून आणि बलात्कार नव्हेत की त्याला ऑनर किलिंग म्हणा की विवाहाने दिलेला अधिकार म्हणा, तो गुन्हाच ठरावा.

स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग. माझा अजिबातच विश्वास नाही की या प्रकाराची टीम ओनर्सना, बीसीसीआयच्या दिग्गजांना काही कल्पना नव्हती. सहा चेंडूंमध्ये चौदा धावा देण्याची किंमत जिथे साठ लाख असू शकते, तिथली एकूण उलाढाल काय असेल! येवढा पैसा इथून तिथे फिरतोय आणि धुरंधर राजकारण करणार्‍यांना माहीत नाही?

एकूण, IPL च्या मॅचेसमध्ये आणि बेटिंगमध्ये कोणी कोणाला फसवत नाही की लुबाडत नाही. एका पेपरने छापलं, “एक अब्ज लोकांची फसवणूक!” IPL चं मार्केटिंग इतकं जबरी आहे, की देशभर त्याची हवा पसरते; तरी एकदम अब्जाची भाषा करणे म्हणजे बेडकाला बैल होण्याचं स्वप्न पडण्यासारखंच आहे. असो. जिथे सगळा चोरांचा, जुगार्‍यांचा, दोन नंबरच्या पैशाचा बाजार आहे; तिथे या खिशातले पैसे त्या खिशात गेले तर गहजब कशासाठी? उलट, बेटिंगला, सामन्यांना, तिथल्या नाच्यांना, आणि पर्यायाने खेळणार्‍यांना अजिबात महत्त्व न देणे, यातच शहाणपणा आहे, कर्तव्यपालन आहे. कशाला त्या XXXXXना प्रतिष्ठा द्यायची?

बाय द वे, पेपरात आणि न्यूज चॅनेल्सवर श्रीशांत आणि कंपनीची नावं गाजू लागण्याअगोदर कोणाची नावं, का गाजत होती; आठवतंय?