Sunday, June 2, 2013

एकुलती एक


’एकुलती एक’ हा चित्रपट पाहिला.

तो आवडला की नाही, हे इथे सांगायचं नाही, की त्याचं परीक्षण करायचं नाही. ’एकुलती एक’ मधल्या काही गोष्टी खास वाटल्या, त्या सांगायच्या आहेत.

हा चित्रपट सचिन पिळगावकरने निर्माण केला आहे. चित्रपट एक बाप आणि त्याची मुलगी, यांच्या भोवती फिरतो. बापाची भूमिका सचिनने, तर मुलीची भूमिका सचिनची मुलगी श्रीया हिने केली आहे. श्रीयाचा हा पहिलाच चित्रपट म्हटल्यावर बापाने मुलीला लाँच करण्यासाठी चित्रपट काढला, असं म्हणणं वावगं ठरू नये. यात काही विशेष नसून हा चित्रपटसृष्टीचा नियमच आहे.

या चित्रपटाचा वेगळेपणा असा, की ही मुलगी ’मी सुंदर नाही,’ असं म्हणते! गंमतीत नाही, तर गंभीरपणे, मनापासून म्हणते! असं कधी झालेलंच नाही. प्रत्येक पुत्र वा पुत्री सर्वगुणसंपन्न, अत्यंत सुंदर, सर्वात लोकप्रिय असाच असतो वा अशीच असते. चित्रपटातली सर्व पात्रं त्याच्या वा तिच्या नुसत्या दर्शनाने घायाळ होत असतात. किंवा भारावून जात असतात. किंवा मंत्रमुग्ध होत असतात. आणि ही मुलगी म्हणते, मी सुंदर नाही! हे कसं काय?

गंमत अशी, की ती सुंदर असणे – नसणे हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. त्यामुळे ती सुंदर नसून काहीच बिघडत नाही. कथानकाला कसलं वळण मिळत नाही की कोणाच्या वर्तनात ती सुंदर नसण्याने फरक पडत नाही.

पण म्हणूनच या विधानामुळे ती मुलगी - आणि हा चित्रपट - मॅचुअर वाटतात ना! जो परिणाम साधण्यासाठी त्याला वा तिला कुठून कुठून ग्लॅमर चिकटवण्याचा, बहुतेकदा आचरट म्हणावा असा प्रयत्न होत असतो, तसल्या प्रकारचा परिणाम असा सहज घडून येतो. माझ्यासारखा प्रेक्षक आपोआप तिच्या - आणि चित्रपटाच्या - बाजूचा होऊन जातो! (जब we मेट’ मध्ये करीना चित्रपटात शिरते, तीच ’इतनीभी सुंदर नही हूँ मैं’ असं म्हणत. तिथेच चित्रपटाने माझा गळा पकडला!)

आणि ही मुलगी, जिच्या बापाने तिला लाँच करण्यासाठी तिच्याभोवती फिरणारा चित्रपट बनवला, ती इतकी सहज वावरते, साधी वाटते; की ’ही नाचतेय, अभिनय करून दाखवतेय, तर्‍हेतर्‍हेचे कपडे घालून मिरवतेय,’ असं मनात येतच नाही. श्रीयाचा वावर पूर्ण सराईत आहे. आणि अजिबात आगाऊ नाही. (आता हा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी तिचा पुढचा चित्रपट बघणं भाग आहे.)

पुढे. चित्रपटाला सांगण्यासारखं काही कथानकच नाही. मुख्य पात्रांची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्यात काही गैरसमज, संकट, संघर्ष, स्पर्धा, असलं काहीही होत नाही. चित्रपटाला व्हिलन नाही की व्हँप नाही. आणि तरीही तो रटाळ होत नाही! पात्रांच्यातल्या तणावाने सीन उचलून धरला आहे, असं मोजून एकदा होतं. इतर वेळी तसं नसूनदेखील बोअर होत नाही.

संवादांची भाषा एकदम आजची आहे. आणि सहज आहे. चांगल्या म्हणवलेल्या मराठी चित्रपटांचं एडिटिंग मार खातं. त्यामुळे चित्रपटाच्या प्रवाहात गचके बसत रहातात. तसं इथे होत नाही. एडिटिंग नावाचा प्रकार असतो, हे जाणवूही नये, इतकं ते शांत आणि सफाईदार आहे.

आवर्जून सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट. अशोक सराफचं काम उत्तम आहे, यात काय सांगायचं? सांगायचंय ते सुप्रियाबद्दल. तिला फार थोडं फूटेज आहे. चित्रपटात तिची एंट्रीसुद्धा उशीरा आहे. पण तिने असं काही बेअरिंग पकडलंय, की तिचं पात्र चित्रपटातलं महत्त्वाचं पात्र आहे, असं प्रेक्षकाच्या मनावर ठसतं. इतक्या थोडक्या स्पेसमध्ये असा परिणाम साधणे, हे अभिनयकौशल्य थोरच होय.

पुरे. आणखी लिहीत गेलो, तर परीक्षण होईल. तेवढा काही हा चित्रपट लक्षणीय नाही.