मन्ना डे गेला.
बातमी कळल्यावर लगेच
लिहिण्याची ऊर्मी आली नाही, हे कबूल करायला हवं. पण इतके दिवस गेल्यावर हेसुद्धा
कबूल करायला हवं की नाही लिहिलं, तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. एका कर्तव्याला
चुकलो, असं खुटखुटत राहील. तेव्हा लिहिणं भाग आहे.
इंटरनेटच्या जमान्यात माहिती
यूँ मिळते. मन्ना डे १९४२ पासून गातो आहे. म्हणजे तो रफी, मुकेश, तलत, किशोर या
सगळ्यांना बर्यापैकी सीनियर आहे. मन्ना डेची अर्ध्याहून अधिक गाणी
धार्मिक-आध्यात्मिक-भाष्यकारक; हिंदी सिनेमाच्या परिभाषेत सांगायचं तर ’भिकार्याची
गाणी’ आहेत. पण मला इथे मन्ना डेच्या एकूण कारकीर्दीचा आढावा घ्यायचा नाही आहे.
(तरी, तलत-रफी-मुकेश जसे शेवटी शेवटी बेसूर, अमधुर होऊ लागले, तसं मन्ना डेचं झालं
नाही. तो जोपर्यंत गायला, तोपर्यंत गाण्याला न्याय देत राहिला, हे आवर्जून
नोंदवावंसं वाटतं.) मला मन्ना डे - म्हणजे मन्ना डेचा आवाज - कोण होता, हे चाचपडून
बघायचं आहे. ’तरुण नसलेला आवाज’ हे त्याचं ब्रँडिंग का झालं, या प्रश्नाचं उत्तर
शोधण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे.
आपण पार्श्वगायकांची
चर्चा करत आहोत. पडद्यावर नायक - किंवा आणखी कोणी - तोंड हलवतो आणि त्याला मागून
आवाज पुरवतो, तो पार्श्वगायक. असं जरी असलं, तरी आवाजाला काहीतरी व्यक्तिमत्त्व
असतंच. म्हणजे, ’ये जिंदगीके मेले’, ’आयेभी अकेला’ आणि ’चल अकेला’ या तीनही
गाण्यांची जात एकच असली तरी गायक वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा भावही बदलतो.
कसा? तर रफीला ’ये जिंदगीके मेले’ (मेला - नौशाद) गाताना ऐकताना ’जगण्याविषयी इतकं
कडवट होण्याइतकं वाईट या रगेल पुरुषाला काय भोगावं लागलं असेल?’ असा प्रश्न सुचतो.
’या हळव्या जिवाला असं म्हणायची पाळी आली, यात काय आश्चर्य?’ हा प्रश्न तलतचं
’आयेभी अकेला’ (दोस्त - हंसराज बहल) ऐकताना सुचेल. आणि ’खरंच; कित्ती खरं सांगतो
आहे हा!’ असा समरस भाव मुकेशच्या आवाजातलं ’चल अकेला’ (संबंध - ओ पी नय्यर) ऐकताना
मनात उमटेल.
मन्ना डेचं ’कालका पहिया
घूमे भैया लाख तरहे इन्सान चले, लेके चले बारात कभी तो कभी बिना सामान चले’ (चंदा
और बिजली - शंकर जयकिशन) ऐकताना काय वाटतं?
असं वाटतं, हे शब्द याच
आवाजासाठी घडले. हा आवाज या, असल्या शब्दांचीच वाट पहात होता.
शास्त्रीय संगीतातली
गाणी सगळ्यांनी गायली. तलतचं ’मैं पागल मेरा मनवा पागल’ (आशियाना - मदन मोहन) हे
गाणं केदार रागातलं आहे, हे कळल्यावर वाटतं, ’असेना. नायकाची व्याकुळता किती
प्रत्ययकारी झाली आहे या गाण्यात!’ रफीचं ’नाचे मन मोरा’ (मेरी सूरत तेरी आँखे -
सचिन देव बर्मन) हे कसं तेजस्वी आहे! भैरवी खूप आहे हिंदी सिनेमात; पण भैरवीत असलं
तेज विरळा. मुकेशचं ’आँसू भरी है ये जीवनकी राहें’ (परवरिश - दत्ताराम) हे गाणं
कल्याण रागातलं आहे, हे कळून काय फरक पडतो? नेमस्त मुकेशचं टिपिकल हरलेपण. किशोरचं
’वो शाम कुछ अजीब थी’ (खामोशी - हेमंत कुमार) हे गाणंसुद्धा कल्याण रागातलंच आहे. शर्ट
धुवून त्यावरचा मळ काढून टाकावा, तसा एरवीचा छचोरपणा दूर करून कशी मनातली हुरहूर
व्यक्त करतो आहे किशोर!
मन्ना डेचं रागेश्रीमधलं
’कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबीरा रोया - मदन मोहन) ऐकताना काय होतं?
असं वाटतं, हे खरं
शास्त्रीय गायन. या आवाजामुळे ही सतार, ही आरोह-अवरोहात फिरणारी चाल, यांना किंमत
प्राप्त होते आहे.
रफी रगेल आहे, जेव्हा दुःख,
प्रेम, देशभक्ती, मैत्री असलं काहीही रफीच्या आवाजात व्यक्त होतं, तेव्हा ते एका
तगड्या पुरुषाचं दुःख, प्रेम, वगैरे असतं. मुकेशच्या बाबतीत ते एका सरळ, सत्यवचनी
माणसाचं असतं. तलत हळवा, व्याकुळ आहे. आणि किशोर उपरोधिक, जगण्याकडे एक खेळ म्हणून
बघणारा. अर्थात यातल्या प्रत्येकाच्या बाबतीत अपवाद आहेत (म्हणूनच ते थोर आहेत);
पण त्यांची नॉर्मल प्रकृती ही अशी आहे. मन्ना डेने ’देख कबीरा रोया’त ’कौन आया’ गायलंय,
ते मुळी एका नायकाला गायक ठरवण्यासाठीच. या सिनेमात आणखी एक जण असतो शायर. तो गातो, ’हमसे आया न
गया, तुमसे बुलाया न गया’. ही चालसुद्धा शास्त्रीयच आहे आणि गोड, सुरेल आहे. पण ते
गाणं तलत गातो. आणि त्या गाण्याचे शब्द उर्दू वळणाचे आहेत. परिणामी गाणं शायरी
म्हणून ऐकू येतं. ’कौन आया मेरे मनके द्वारे’चे शब्द देशी तर आहेतच, त्यांच्यात
प्रेम असलं तरी विरह, व्याकुळता, असलं काही नाही. ते ठळकपणे शास्त्रीय संगीत ठरतं.
आणि ते गाणं मन्ना डे
गातो.
मन्ना डेमुळे ते
’शास्त्रीय’ म्हणून डिफाइन होतं. तलतच्या आवाजामुळे शायरीला उठाव येत असेल; पण तलत
’शायरपणा’चं व्यवच्छेदक लक्षण नाही. मन्ना डे शास्त्रीयतेचं आहे.
नौशादने जवळपास सगळी
गाणी शास्त्रीय संगीतात दिली आणि नौशादने मन्ना डेचा आवाज क्वचित वापरला, यावरून
मन्ना डे आणि शास्त्रीय संगीत यांचं समीकरण नाही, असं म्हणावं का? नाही! कारण एकदा
चाल शास्त्रीय संगीतात बसवली, की गाण्यातले भाव व्यक्त करायला रफी जास्त उपयुक्त
ठरतो! उलट, शब्द काही असोत, शास्त्रीय गायन अशी ओळख स्पष्ट व्हायला मन्ना डे बरा
पडतो.
आणखी एक तुलना करून
बघूया. आता तलत बाहेर. विनोदी, बहुधा आचरट गाणी. ’सर जो तेरा चकराये’ (प्यासा - एस
डी बर्मन) हे गाणं जॉनी वॉकरच्या तोंडी असलं आणि त्यात खास त्याच्या तोंडचे
’मालीश, चंपी मालीश’ असे उद्गार असले तरी ते गाणं साहीरने लिहिलेलं, जनता जनार्दनाची
मानसिकता व्यक्त करणारं गाणं आहे. रफीनेही ते मोकळेपणाने गायलं आहे, आचरटपणा करत
नाही. अर्थात, रफीनेही ’हम काले हैं तो क्या’ (गुमनाम - शंकर जयकिशन) सारखी वाकडे
तिकडे हेल काढणारी गाणं म्हटली आहेतच. ’डॅनी केप्रमाणे यॉडलिंग करणार्या किशोर
कुमारने फारच लवकर एक विदुषक, सर्कशीतला जोकर, अशी स्वतःची प्रतिमा बनवून
जोपासल्यामुळे त्याने असंख्य आचरट ढंगाची गाणी म्हटली (त्यातल्या काहींना ’गायली’
म्हणावंसं वाटत नाही). तसल्याच प्रकारच्या सिनेमात त्याने कामंही केली. पण त्याने
तसलं प्लेबॅक क्वचित दिलं असेल. आणि मन्ना डे? ’किसने चिलमनसे मारा’ (बात एक रातकी
- एस डी बर्मन), ’प्यारकी आगमें तन बदन जल गया’ (जिद्दी - एस डी बर्मन), ’फुल
गेंदवा न मारो’ (दूजका चांद - रोशन), ’गोरी तोरी बाँकी’ (आधी रातके बाद -
चित्रगुप्त), ’मेरे भैंसको डंडा क्यूं मारा’ (पगला कहींका - शंकर जयकिशन) असली
तद्दन आचरट गाणी त्याने जॉनी वॉकर, मेहमूद, आगा आणि वेड लागलेला शम्मी कपूर
यांच्यासाठी गायली आहेत. एका बाजूने ही शास्त्रीय संगीतातली गाणी आहेत; तर
दुसरीकडून बालबुद्धी पब्लिकला वेडगळ चाळे दाखवून हसवणारी गाणी आहेत. एकदा धंद्याला
बसलं, की निवड करायला फारसा वाव नसतो, तरी ही गाणी मन्ना डेच्या कीर्तीत भर घालत
नाहीत, हे नक्की.

तर मन्ना डेच्या वजनदारपणाचा
फायदा संगीतकारांनी उचलला आहे. त्याच संगीतकारांनी त्याला पोरकटपणा करायला
लावण्यामागे सिनेमावाल्यांची कोणती कम्पल्शन्स असतील कोण जाणे. तशी ’आकाशवाणी’वाली
किंवा जीवनावर भाष्य करणारी गाणी मन्ना डेने उदंड म्हटली आहेत. ’निरबलसे लडाई
बलवानकी’ (तूफान और दिया - वसंत देसाई), ’कस्मे वादे प्यार वफा’ (उपकार - कल्याणजी
आनंदजी), ’इन्सानका इन्सानसे हो भाईचारा’ (पैगाम - सी रामचंद्र), ’जिंदगी कैसी है
पहेली’ (आनंद - सलील चौधरी) ही काही उदाहरणं. (यात मराठीसुद्धा आहे. ’कालचक्र हे
अविरत फिरते’ हे ’दोन घडीचा डाव’मधलं गाणं मन्ना डेने अस्खलित मराठीत म्हटलं आहे.
त्याचे मराठी उच्चार एकदम साफ. ’अ आ आई म म मका’ आठवतं?)
सलील चौधरी आणि मन्ना डे
ही एक बरी जोडी आहे. ’हरियाल सावन ढोल बजाता आया’ आणि ’धरती कहे पुकारके’ ही लताबरोबरची
’दो बिघा जमीन’मधली दोन ग्रेट द्वंद्वगीतं.
’ऐ मेरे प्यारे वतन’ हे काबुलीवालातलं पठाणी बाजाचं चटका लावणारं गाणं. ’जा तोसे
नही बोलू कन्हैया’ ही ’परिवार’मधली करकरीत मन्ना डे आणि मखमली लता यांची अफलातून
जुगलबंदी. वा!
पण एक मुद्दा उरतो. सुरेलपणापलिकडे
मन्ना डे गाण्यात काय घालत होता? त्याचे उच्चार स्पष्ट होते. ’सुर ना सजे’ (बसंत
बहार - शंकर जयकिशन) मध्ये तो ’स्वरकी साधना’च्या पुढे नीट ’परमेश्वरकी’ म्हणतो.
पण हिंदी सिनेमाच्या नायकात जसं आपोआप डोळ्यांना दिसणारं काही तरी झेड एलिमेंट
असावं लागतं, तसंच प्लेबॅक सिंगरच्या आवाजात जादा काही तरी लागतं. आणि ते मन्ना
डेकडे नव्हतं.
आणि आता उरला मुद्दाम
शेवटी ठेवलेला बेस्ट मन्ना डे. शास्त्रीय संगीत आणि भिकार्यांची गाणी यात दादा
असलेल्या मन्ना डेला जर कोणी नायक, रोमँटिक नायक बनवलं असेल, तर ते - अहो
आश्चर्यम् - शंकर जयकिशनने. एक काळ होता जेव्हा मला जर कोणी विचारलं असतं, ’हिंदी
सिनेमाच्या अथांग सागरात सर्वात जास्त आवडत्या अशा कुठल्या एका गाण्याचं नाव तू घेऊ
शकशील?’ तर एक क्षणही न थांबता मी उत्तरलो असतो, "होय. ’ये रात भीगी भीगी’ हे
ते गाणं." आजही ’ये रात भीगी
भीगी’ (चोरी चोरी - शंकर जयकिशन) मला आवडतंच; पण
तेव्हा मला ते परिपूर्ण वाटायचं. ती घुमणारे टोल वाजत होणारी सुरुवात, मग ते
उचंबळणारे व्हायोलिनचे सूर, त्यात वरच्या पट्टीत घुसणारा मन्ना डेचा आवाज आणि मग
या अद्भुत वातावरणाला कापत जाणारी लताची तान! यापेक्षा भारी काही असूच शकत नाही
जणू! रात्र आहे, सोबत आहे, हुरहूर आहे, उद्याच्या इच्छापूर्तीची अंधुक आशा आहे, या
सगळ्यावर संयमाचा नाजुक पण सध्या पक्का, असा पदर आहे -- आणि या स्वप्नवास्तवाला
जिवंत करणारे शैलेंद्रचे शब्द आहेत. तो राज कपूर आणि त्याची ती उद्धट देहबोलीची
मनमोकळी नर्गिस. मी ’चोरी चोरी’ पाचेक वेळा पाहिला. हे गाणं गोची करायचं. राज कपूर
पहायचाय, नर्गिसवर नजर लावून बसायचंय आणि
असं असताना ’ये रात भीगी भीगी’चे सूर वाजले की माझे डोळेच मिटायचे. असं वाटायचं, सगळी
संपूर्ण इन्द्रियगोचरता केवळ कानांच्यात एकवटावी आणि ’ये रात भीगी भीगी’च्या
सुरांनी सगळा काळ-अवकाश भरून जावा.
केवढं ऋण आहे त्याचं
माझ्यावर! कसं नाही लिहायचं त्याच्यावर? तरी ’बसंत बहार’, बूट पॉलिश’ राहिले.
’देवदास’मधलं ’आन मिलो’ राहिलं. ’परिणीता’मधलं ’चली राधे रानी’ राहिलं. दत्तारामची
मन्ना डे-लता द्वंद्वगीतं राहिली. ’चुंदरिया कटती जाये रे’ राहिलं. आणि सगळ्यात मोठं असं ’ऐ मेरी जोहरा जबीं’ (वक्त - रवी) कसं राहिलं? थोडा मध्यमवयाकडे झुकलेला बलराज सहानी कसा फिट्ट बसतो नाही, मन्ना डेच्या आवाजाला!
असो. रफीसारखा पुरुषी,
तलतप्रमाणे उत्कट, मुकेशसारखा सत्यवचनी, किशोरसारखा उत्फुल्ल, वात्रट नसला तरी मन्ना
डे काही एका लेखात आख्खा मावणारा गायक नव्हताच.