ओम पुरीला पहिला पाहिला तो अर्थात ‘आक्रोश’मध्ये.
आख्खा सिनेमाभर तो गप्प असतो. घामेजलेला, मनात प्रचंड खळबळ कोंडून ठेवल्यासारख्या चेहऱ्याने
डोळे वटारून बघत राहतो. त्याच्या वकिलाकडेसुद्धा तोंड उघडत नाही. त्याच्या बायकोवर
बलात्कार करून तिला ज्यांनी ठार मारून टाकलेली असते; त्यांनी त्यालाच तिच्या
हत्येसाठी जबाबदार ठरवलेलं असतं. आणि हा बोलतच नाही. शेवटी बायकोला अग्नी देताना
स्वतःच्या असहाय्य बहिणीला पाहून त्याला एकदम तो तुरुंगात गेल्यावर तिच्यावर काय
गुदरणार याचा साक्षात्कार होतो आणि कोयता उचलून तो बहिणीला ठार करतो. त्यावेळी
जेव्हा त्याला पोलीस धरतात, तेव्हा त्याला कंठ फुटतो आणि त्याचा शब्दाविना होणारा आक्रोश
ऐकवत नाही.
आदिवासींचं शोषण; लहान गावात असणारं सरकारी
डॉक्टर, वकील, पोलीस या सगळ्या, जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या, व्यवस्थेचं आपमतलबी
साटंलोटं; त्यातून निर्माण होणारी दहशत; नवख्या वकिलाचा कोंडमारा या साऱ्या गोष्टी
‘आक्रोश’मध्ये (पटकथा: विजय तेंडुलकर, दिग्दर्शक: गोविंद निहलानी) चांगल्या
दाखवल्या होत्या. तरी मला एकूण ‘आक्रोश’ आवडला नाही, कारण ‘आपल्या परोक्ष बहिणीवर
बलात्कार होण्यापेक्षा ती मेलेली बरी’ हे मूल्य आदिवासी नव्हे; ते टिपिकल
मध्यमवर्गीय, पारंपरिक मूल्य आहे. आणि असल्या उसन्या मूल्याने पछाडून कोणाचा (बहीण
असली म्हणून काय झालं?) थेट जीवच घ्यायचा, हे मला अजिबात पटलं नाही.
पण त्यातली स्मिता! तिला दोन चार मिनिटांचा एक
सीन काय तो आहे. नवऱ्याबरोबर आवेगाने सेक्स करतानाचा. पण तिच्यामुळे महाभारत घडू
शकेल, अशी दिसते. आणि ओम पुरी. पूर्ण आदिवासी दिसतो. त्याचा तो देवीच्या व्रणांनी
भरलेला ओबडधोबड चेहरा, राठ कुरळे केस आणि चेहऱ्यावरचे दगडी भाव; पूर्ण आदिवासी.
वाटलं होतं, साधू मेहेरसारखा हासुद्धा ठराविकच भूमिका करणार.
तसं मुळीच झालं नाही. ओम पुरीने सिद्ध केलं
की चेहऱ्यावरच्या गोंडसपणापेक्षा अॅटिट्यूड हाच तुमच्या व्यक्तिमत्वाला अर्थ देतो.
तसे दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ, शाहरुख यांपैकी कोणीच गोंडस, चिकणा चुपडा
नाही; पण ओम पुरीइतका खडबडीतही नाही. ओम पुरी टिकणं आणि केवळ दुय्यम रोल न करता
मध्यवर्ती महत्त्वाच्या भूमिका त्याने गाजवणं, यातूनच त्याच्या अभिनयकौशल्याची
उच्च पातळी समजते. आपल्याकडे अजूनही एखाद्या प्रसंगात भावनाकुलतेचा जबरा आविष्कार
दाखवण्याला थोर अॅक्टिंग म्हणतात. एक स्वायत्त व्यक्तिमत्व उभं करणे, प्रेक्षकांना
त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणे; यात अभिनयकौशल्याची कसोटी लागते, असं मानलं जात
नाही.
आता ओम पुरीचे काही चित्रपट समोर आणू.
‘जाने भी दो यारों’ ही एक ब्लॅक कॉमेडी. यात
तो एक भ्रष्ट बिल्डर आहे. तो निगरगट्ट दिसतो, भ्रष्ट दिसतो आणि कॉमेडी चित्रपटातलं
पात्रसुद्धा दिसतो. हा धोतर नेसलेला उघडा भीम रंगमंचावर येतो आणि युधिष्ठिराच्या
डोक्यात गदा घालतो. ‘चाची ४२०’ मध्ये लंपट दिसतो. ‘मंडी’ हा श्याम बेनेगलचा एक
अत्यंत थोर चित्रपट. त्यात हा एक उटपटांग फोटोग्राफर आहे. खास फोटो मिळवायला
उचापती करतो; पण कधी कधी फसतोदेखील. असाच एकदा स्मिताच्या खोलीत घुसलेला असताना ती
त्याला हसत हसत ‘चिल्लाऊं?’ अशी धमकी देते तेव्हाची त्याची तिरपीट बघावी. कुठला
तरी सटरफटर फोटोवाला दिसतो. त्याची देहबोलीच तशी आहे.
पण ‘पुकार’मध्ये वरिष्ठ सेनाधिकारी दिसतो!
काहीच खटकत नाही. त्याचा रुबाब, त्याचा भारदस्त आवाज आणि स्पष्ट, वजनदार शब्दोच्चार
सगळं कसं तोलामोलाच्या अधिकाराची जागा सहजी वागवणाऱ्या माणसाचं वाटतं. हासुद्धा ओम
पुरीच की. ‘मृत्युदंड’मध्ये तो ग्रामीण आहे, ‘खालच्या’ जातीचा आहे; तर तो तसा
दिसतो. ‘मालामाल विकली’ या चित्रपटात पुन्हा त्याची विनोदी भूमिका आहे. ‘प्यार तो
होनाही था’ मध्ये तो चोरीला गेलेला हार शोधणारा, सहृदय पोलीस इन्स्पेक्टर आहे. जिथे
तो जसा दाखवला आहे, तसा दिसतो. अगदी ‘नरसिंहा’मध्ये भडक, बेगडी व्हिलनसुद्धा
दिसतो.
‘अर्धसत्य’मधला
त्याचा अनंत वेलणकर कोण विसरेल! पानवलकरांच्या ‘सूर्य’ या कथेतला अनंता एक हळवा,
संवेदनशील मनुष्य आहे.
त्याचा एक दणकट पोलीस इन्स्पेक्टर होताना न्याहाळणे आणि ‘आपला
मुलगा आता आपल्यावरच डाफरतो!’ यातून विलक्षण सुख मिळवणारा त्याचा बाप बघणे, हे
त्या कथेतून मिळणारे दोन मस्त अनुभव. ओम पुरीचा अनंता बापावर डाफरताना म्हणतो, ‘मेरी
माँको मारता है साला!’ सिनेमाच्या पटकथेत तेंडुलकरांनी अनंतात ट्रॅजिक रंग मिसळले
आहेत. आणि कठोर आवाजाच्या, राकट ओम पुरीला ‘आतून तो हळवा, चटकन दुखावला जाणारा
आहे,’ हे दाखवताना अडचण झाली नाही. दणदणीत आवाजात कंप आणणे त्याला जमत होतं. आणि
ते केव्हा, किती करायचं, हे तारतम्यसुद्धा त्याच्यापाशी होतं.
ओम पुरीचं रूप त्याच्या करीयरच्या आड कधी आलं
नाही; उलट त्यामुळे त्याचा फायदाच झाला असावा. म्हणजे, परदेशी सिनेमावाल्यांना
जेव्हा एखादं भारतीय पात्र दाखवायचं असतं, तेव्हा त्यांना, त्यांच्या
प्रेक्षकांकडून सहजपणे भारतीय म्हणून स्वीकारला जाईल, अशा चेहऱ्याची,
व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता असते. अशा वेळी त्यांना ओम पुरी योग्य वाटला असावा. कारण
ओम पुरीला पुष्कळ इंग्रजी चित्रपट मिळाले. फ्रान्समध्ये घडणाऱ्या ‘A
Hundred Foot Journey’ मध्ये त्याने ‘कदम’ नावाची व्यक्तिरेखा रंगवली
आहे. (अर्थात, त्या ‘कदम’मधल्या मराठीपणाचं प्रमाण ‘इंग्लिश विंग्लीश’ मध्ये ‘गोडबोले’
झालेल्या श्रीदेवीपेक्षा कमीच आहे.) त्याच्या समोर आहे हेलन मिरन, ही जाणती
अभिनेत्री. सिनेमा हलका फुलका आहे; पण ओम पुरी हेलन मिरनच्या समोर कमकुवत ठरला
असता, तर मजा नक्की कमी झाली असती.
ओम पुरीची आणखी एक आठवण आहे: ‘राग दरबारी’.
श्रीलाल शुक्ल यांच्या याच नावाच्या कादंबरीवर एक सीरियल आली होती. उत्तरप्रदेशातल्या
एका गावामधलं राजकारण, हा विषय होता. गावात पाहुणा गेलेला ओम पुरी, हाच सीरियलचा
निवेदक आहे. टायटलचं गाणं साक्षात भीमसेन जोशींनी गायलं होतं. मी पाहिलेल्या
उत्कृष्ट सीरियलांपैकी एक. मनोहर सिंग, दिनेश शाकुल, वीरेंद्र सक्सेना असे सगळेच कसलेले
कलाकार होते. एका लहानशा भूमिकेत झरिना वहाब होती. मजा आली. ओम पुरीच्या आवाजात
कथन ऐकताना विशेष. ओम पुरीची प्रमुख भूमिका असलेली ‘कक्काजी कहीं’ अशी पण एक
सीरियल आली होती; पण तिच्यात खास आठवण्यासारखं काही नव्हतं.
ओम पुरीमुळे पुष्कळ आनंदाचे क्षण मला मिळाले
आहेत. तो एक ताकदीचा नट होता. त्याला तरलपणाचा चांगला सेन्स होता. त्यामुळे
भूमिकेत बारकावे भरणं त्याला शक्य व्हायचं. आता आपल्याकडे सूक्ष्म बारकावे
असलेल्या भूमिकाच फारशा रचल्या जात नाहीत, हा काही ओम पुरीचा दोष नव्हे.