रामनवमीनिमित्त रामाची गाणी आठवू लागलो. तर ही आठवली:
१. हाय रामा ये क्या हुवा
२. रामा रामा गजब हुई गवा री
३. मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया
४. राम करे कहीं नैना ना उलझे
यातलं एकही भक्तिगीत नाही. हे मी मुद्दाम केलं, असं वाटेल; पण नाही. तसं झालं. पहिलं गाणं जर रंगील्यातल्या उर्मिलाचं आठवलं, तर मग त्यानंतर माणिक वर्माच्या आवाजातली ‘कौसल्येचा राम’ किंवा ‘विजयपताका श्रीरामाची’ ही गाणी आठवणं शक्य नाही.
पण मग विचारात पडलो: या गाण्यांमधून रामाचा उद्धार तर केलेला आहे; पण भक्तिभावनेचा लवलेश नाही. का या बाया भलत्या ठिकाणी, विनाकारण रामाला मध्ये आणत आहेत? ‘अग बाई’ किंवा ‘अय्या, इश्श,’ म्हणावं तसं रामाचं नाव घेतलं आहे.
याची रामावेगळी उदाहरणं आहेत का?
पुष्कळ आहेत! ‘आजा आजा मै हूँ प्यार तेरा, अल्ला अल्ला इनकार तेरा’ ही काही ईश्वराची प्रार्थना नाही. ‘अल्ला बचाये नौजवानोंसे’ हा काही संकटातून वाचवण्यासाठी केलेला धावा नाही. ‘खुदा भी आसमासे जब जमींपर देखता होगा, मेरे मेहबूबको किसने बनाया सोचता होगा’ यातल्या उपरवाल्याची भूमिका सर्वशक्तिमान, विश्वाचा निर्माता असल्याची नाही.
मग इंग्रजीत जसं ‘ओ माय गॉड’ म्हणतात किंवा ‘जीझस ख्राइस्ट!’ असा उद्गार काढतात, ते आणि हे भारतीय उपखंडातलं एकच आहे का?
माहीत नाही! देवाचं, येशूचं नाव विनाकारण घेण्याला तिथे ब्लास्फेमी – ईश्वरनिंदा – मानलं जातं. आपल्याकडे जसं कोणीही कधीही ‘पांडुरंगा,’ म्हणू शकतो, तसंही तिथे चालत नाही. म्हणजे, बोलणारे बोलतात पण त्याला श्रद्धावानांची मान्यता नाही. आपल्याकडे नेमकं उलट आहे. श्रद्धावान लोकच उठता बसता पांडुरंगाचं नाव घेतात.
‘रामा’चा उद्धार करण्यामागच्या कूट प्रश्नाचं हेच तर रहस्य आहे! आपल्याकडे नामजप, नामस्मरण या गोष्टींना मूल्य आहे. ज्ञानाचा, ईश्वरप्राप्तीचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. रामाचं नाव घेत राहिला म्हणूनच वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणूनच अगदी प्रेम, शारीरिक आकर्षण व्यक्त करायचं झालं, तरी राम मध्ये येतो. नव्हे, रामाला मध्ये घेऊन पापाचं काही प्रमाणात परिमार्जन होतं, असाही विश्वास यात असावा. हेसुद्धा खरं आहे की देव, परमेश्वर आपल्यापासून दूर बसलेला नसतो; उलट तो आपल्यातच असतो, कोणालाही प्राप्य असतो, अशी इथली आध्यात्मिक श्रद्धा आहे. त्यात एकदा देवाला ‘कर्ता करविता’ म्हटलं की प्रेमासकट सगळ्याच गोष्टीचं टेपर त्याच्यावर ठेवता येतं. उरता उरला प्रश्न सलगीचा. देव, ईश्वर हे काही गंभीर प्रकरण आहे, त्याला वचकून राहायचं असतं, असे संस्कार आपल्याकडे केले जात नाहीत. ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने आहे लंगडा’ असं एकनाथ लिहून जातात. विठ्ठलाचा उल्लेख विठ्या ते विठाबाई, असा हवा तसा करण्याची मुभा संतांना आणि संतांच्या मागोमाग सर्व भक्तांना असते. रामाशी ही अशी भाषिक सलगी करण्यामागेदेखील हेच कारण असावं.
आणि ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला की जे होतं, तेच होऊन हा गुण मुसलमानांच्यात संक्रमित झाला असावा. पश्चिम आशिया, इंडोनेशिया, आफ्रिका इथल्या मुसलमानाचं काय असतं, हे बघायला पाहिजे. आपल्यासारखं, ‘तुम्हारा चाहनेवाला खुदा की दुनियामें मेरे सिवा भी कोई और हो, खुदा न करे’ असं पर्सनल मामल्यात बिनदिक्कत परमेश्वराला अडकवणारं नसावं.
म्हणजे आपण शेवटी भक्तीपाशीच येऊन पोचलो! इतकं म्हणता येईल, की हा भक्तीचा खास भारतीय प्रकार आहे (जाणकारांनी अधिक माहिती द्यावी).
एकपत्नी मर्यादापुरुषोत्तम रामाची ही कथा; गोकुळात गोपींना घेऊन रासक्रीडा करणाऱ्या कृष्णाचं तर बघायला नको. आपला मराठमोळा वग मथुरेच्या बाजारात दूध विकायला चाललेल्या गौळणींची वाट कृष्ण आणि पेंद्या यांनी अडवल्याशिवाय सुरूच होत नाही. ‘हळू हळू बोल कृष्णा, हळू हळू बोल रे; सासू दळते पलीकडे, तिला लागेल कानोसा; नणंद बसली माजघरा, तिला लागेल कानोसा’ असली किंवा ‘कुजबुज उठली गोकुळी, राधा कृष्णावरी भाळली’ असली भावगीतं आपण सुखाने लिहितो, ऐकतो.
आजच्या, भावना दुखवून घेऊन तात्काळ हमरीतुमरीवर येण्याच्या काळात हे चालेल का? आज याला सुसंस्कृत मानलं जाईल का? प्रॉब्लेम असा आहे की संस्कृतीत सुधारणा बॅकडेटेडच कराव्या लागतात. ‘कसा ग बाई झाला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’ असं कुणी कधी लिहिलं – गायलंच नाही, असं म्हणता आलं नाही; तर यात पहिल्यापासून केवळ आध्यात्मिक अर्थच आहे, असं म्हणावं लागतं. ‘खुन्या मुरलीधर’, छिनाल बालाजी’ ही नावं मागे चालत होती; आता मात्र त्यांच्यामुळे भावना दुखावतात, असं म्हणून कसं चालेल? बघूया. योगीजींच्या राज्यातलं कोर्ट प्रशांत भूषण यांना धडा शिकवायला समर्थ असणार. गण गवळणीच्या महाराष्ट्रात हे लोण कधी येतंय, ते पाहू.