हा लेख 'सजग'च्या ऑगस्ट-सप्टेंबर च्या अंकात प्रसिध्द झाला आहे. त्या वेळी करोना-कोविडबद्दल जी आणि जेवढी माहिती होती, त्यावरून लिहिलेला आहे. त्यामुळे 'या रोगावर लस नाही' असं विधान यात आलं आहे. आणखीही काही अल्प माहितीवर आधारलेली विधानं यात आहेत.त्यापेक्षा जास्त मोठं मला भविष्याबद्दल केलेला विचार वाटतो! सामाजिक बदल सावकाश होतात;पण मला जी 'दिशा' वगैरे अपेक्षित होती, तसं काही होईलसं आता वाटत नाही.
की आणखी वाट पहावी?
मानवसमाजाची मोठी प्राणहानी करणार्या
कोरोना व्हायरसमुळे होणार्या कोविड१९ सारख्या साथी यापूर्वी अनेकदा येऊन गेल्या आहेत.
त्यांच्यापैकी काही - नव्हे बहुसंख्य - कोरोनापेक्षा कित्येक पटींनी जास्त हानिकारक
होत्या. १९१८ सालच्या इन्फ्लुएन्झाचा प्रसार सैनिकांमुळे जगभर झाला आणि तेव्हा अँटिबायॉटिक्स, अँटिव्हायरस लस, असलं काही नव्हतं.
जगाच्या एक तृतियांश लोकसंख्येला त्या साथीने ग्रासलं आणि बळी पडणार्यांच्यात तरुणांची
संख्या जास्त होती. त्यावरही तेव्हा उपाय नव्हता आणि एक वर्षभर थैमान घालून इन्फ्लुएन्झाचा
प्रभाव ओसरला. तुलनेने कोरोना अल्पावधीत जगभर पसरला. जिकडे जन्माला आला, त्यापेक्षा कितीतरी जास्त हानी कोविडने हजारो किलोमीटर दूर असलेल्या इतर देशांत
केली. ही हानी अजून संपलेली नाही. ती आटोक्यात आली आहे की नाही, याविषयीसुद्धा निश्चित सांगता येत नाही.
विसाव्या शतकात मानवाला वर्ल्ड वॉर
- विश्वयुद्ध - म्हणजे काय, याचा प्रत्यय आला,
एकविसाव्या शतकात वैश्विक साथ म्हणजे काय, याचा
अनुभव मिळाला. समग्र मानवजातीपुढे संकट उभं करणार्या, पँडेमिक
- विश्वव्यापी - असा दर्जा देण्यात आलेल्या कोविडवर लस नाही. कोरोना व्हायरस नष्ट करेल,
असा अक्सीर उपाय नाही. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संशयितांना चौदा दिवस कोंडून घालणे, काहीही न
झालेल्यांनी एकमेकांपासून दूर रहाणे, संपर्क टाळणे, असले उपाय करावे लागत आहेत. जीवरक्षणासाठी आवश्यक असलेल्या या उपायाचे गंभीर
सामाजिक, आर्थिक परिणाम नाइलाजाने भोगावे लागत आहेत. हे परिणाम
इतके गंभीर आहेत की सार्या जगात लाखो लोकांचा रोजगार जाऊन त्यांचं पोट भरण्याची जबाबदारी
घेण्याची पाळी शासनावर येत आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. रस्ते, रूळ, पाणी आणि आकाश, अशा सर्व मार्गांनी
होणारी वाहतूक जवळपास थांबली आहे. ज्याला ‘आधुनिक’ असं म्हणता येईल, अशी रहाणी रूढ झाल्याच्या नंतर,
म्हणजे किमान शतकभरानंतर अशी वेळ मानवावर आली आहे. पूर, सुनामी, भूकंप यांमुळे या प्रकारचा परिणाम होतो;
पण त्याला भौगोलिक मर्यादा असतात. कोरोनाचा प्रभाव विश्वव्यापी आहे.
द वर्ल्ड इज अ व्हिलेज - जग म्हणजे
एक खेडं होय - याचा इतका प्रखर प्रत्यय यापूर्वी कधी आला नव्हता. माहितीची देवाणघेवाण, बाजारपेठ, एकमेकांवरील अवलंबित्व,
सारं एखाद्या खेड्यासारख्या संकुचित परिसरात जसं असावं, तसं आज जगभराचं झालेलं आहे, हे कोरोनाने अधोरेखित केलं
आहे. अर्थात याला अपवाद आहेत; पण ते अपवाद जागतिक संदर्भात नगण्य
आहेत. अस्तंगत होऊ घातले आहेत.
या परिस्थितीमधून काही प्रश्न उभे
रहातात. हे प्रश्न आधुनिक जगतातील प्रत्येकासाठी निर्वाणीचे आहेत. प्रत्येकाने त्यावर
विचार करणे गरजेचं आहे. शासन, आंतरराष्ट्रीय
यंत्रणा, वगैरे या बाबतीत जे निर्णय घेतील, त्यांचा प्रभाव अक्षरश: प्रत्येकाच्या जगण्यावर पडणार असल्याकारणाने प्रत्येकाने
हे प्रश्न जमतील त्या प्रमाणात समजून घ्यायला हवेत. त्या दृष्टीने हा एक प्रयत्न. अधिकारापेक्षा
कर्तव्यापोटी निपजलेला.
१.
कोरोनाची लागण नुसत्या हातमिळवणीतून
होऊ शकते. शिंकण्या खोकण्यातून होऊ शकते. कोरोनाग्रस्त व्यक्तीने स्पर्श केलेल्या
वस्तूला काही काळानंतर स्पर्श करणार्याला होऊ शकते. इतकंच नाही; कोरोनाग्रस्त असलेल्याच्या निकट काही काळ घालवल्यास,
विशेषत: चित्रपटगृह वा इतर कोणतंही बंद सभागृह अशा ठिकाणी असलेल्या गर्दीत
एखादा जरी कोरोनाग्रस्त असला तरी कोविड होण्याचा धोका असतो. थोडक्यात, मी स्वत:च्या स्वच्छतेची कितीही काळजी घेतली, तरी जोपर्यंत
परिसरात लागण अस्तित्वात आहे, तोपर्यंत मी सुरक्षित नाही. आणि
‘कम्युनिटी स्प्रेड’, म्हणजे लागण कुठून,
कोणाकडून पसरते आहे, याचा निश्चित पत्ताच लागू
नये, असंही होऊ शकतं, हे लक्षात घेतलं,
तर ‘परिसर’ या शब्दाचा अर्थ
संपूर्ण जग, असाच करावा लागतो. कोरोनावर आज इलाज नाही. तो उद्या
सापडू शकतो पण तसला अन्य व्हायरस यापुढे कधीही येऊ शकतो आणि असाच किंवा जास्त हाहाकार
माजवू शकतो. लस शोधणं हे वेळखाऊ काम आहे. ती सापडेपर्यंत जगात होणारी वित्तहानी,
प्राणहानी रोखता येत नाही. या गोष्टी लक्षात घेता माझं आरोग्य जगातल्या
इतर सर्वांच्या आरोग्याशी अतूटपणे जोडलेलं आहे, हे मान्य करावं
लागतं.
वेगळ्या शब्दांत मांडायचं, तर ‘जर सगळे निरोगी, तरच मला रोग न होण्याची शाश्वती’.
याचा अर्थ असा की माझ्या आरोग्यरक्षणासाठी
जगातल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी, काही प्रमाणात का होईना, घ्यायला हवी. म्हणजेच जगातल्या
‘मागास’ जनसमूहांवर आरोग्यासाठी होणारा
खर्च वाढवायला हवा. हा वाढीव खर्च ज्या त्या सरकारकडून वा जागतिक पातळीवरच्या संस्थांच्या
मार्फत केला जाऊ शकेल. हे करण्यासाठी जो निधी लागेल, तो दुसर्या
कशावर तरी होणारा खर्च कमी करूनच उपलब्ध होऊ शकेल. किंवा नागरिकांवरील करभार वाढवून
उभा केला जाऊ शकेल. यातलं काहीही करताना काही हितसंबंधांना धक्का पोहोचेल. आणि ते
हितसंबध याला विरोध करतील. असे हितसंबंध जर राज्यकर्त्यांमध्येच रुजलेले असतील,
तर होणारा विरोध प्रभावी असेल. कोविडसारख्या साथीच्या रोगांचा धोका हितसंबंधांना
सहन कराव्या लागणार्या तोट्यापेक्षा जास्त आहे, असं दाखवता येईल
का? हे कोण कोणाला दाखवून देईल?
याला पर्याय आहे. ११ सप्टेंबर २००१
रोजी सिद्ध झालं की अमेरिकेसारखा बलाढ्य आणि भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित भासणारा देशदेखील
दहशतवादापासून मुक्त राहू शकत नाही. पण यातून ‘दहशतवादापासून सार्या जगाची मुक्तता केल्याखेरीज कुणीच सुरक्षित होऊ शकणार
नाही,’ असा निष्कर्ष काढला जाऊन त्यानुसार जगाच्या राजकारणाने
वळण घेतलं नाही. सर्व देशांनी आपापल्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली. विमानतळांवरच्या
तपासण्या पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त कडक झाल्या. अमेरिका- ब्रिटन यांसारख्या देशांमध्ये
नुसत्या संशयावर विसंबून शस्त्र चालवण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले.
तसंच साथीच्या रोगांबाबत करता येईल.
आजसुद्धा काही देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी काही रोगप्रतिबंधक उपाययोजना केलेल्या
असाव्या लागतात. तशाच धर्तीच्या उपाययोजना सर्वत्र लागू करता येतील. रोगसंसर्गाच्या
संदर्भात विमानतळावर वेगळी तपासणी सुरू होऊ शकेल.
मात्र ओळखपत्रं, बॉम्ब, शस्त्रं यांच्या संदर्भातल्या
तपासण्यांपेक्षा रोगप्रतिबंधक तपासण्या सध्या तरी अधिक अवघड वाटतात. एक शक्यता आहे
की कोरोनाच्या वेगवान प्रसारामुळे आणि कल्पनातीत आर्थिक हानीमुळे अशा तपासण्या करणार्या
उपकरणांचा, अॅप्सचा, द्रव्यांचा शोध लागण्याला
जोरदार उत्तेजन मिळू शकेल.
म्हणजे, (तुलनेने) विकसित, (तुलनेने) श्रीमंत
राष्ट्रांनी अविकसित समाजांच्या आरोग्यावर लक्ष केन्द्रित करून मोठी आरोग्यमोहीम काढण्याऐवजी
देशाच्या, ‘उच्चश्रेणीय वस्तीच्या’ सीमा
अधिकाधिक सीलबंद करण्याच्या दिशेने तंत्रविद्येचा रोख वळू शकेल. आणि यांपैकी कोणता
पर्याय कमी खर्चाचा आहे, यावर ही निवड ठरेल.
2. वर्क फ्रॉम होम
कोरोनाने बहुतेक सर्वांना घरी बसवलं.
मात्र
, त्यांच्यापैकी काही जण, उदा. सॉफ्टवेअर
डेव्हलप करणारे, घरबसल्या काम करू शकत होते. ते तसं करू लागले.
त्यांच्याशिवाय इतर अनेकांना हा शोध लागला की आपण रोज उठून ऑफिसात जाण्याची गरज नव्हती,
आपणसुद्धा घरून तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतो. स्काइपवर आणि व्हॉट्सअॅपवर
एकमेकांना दिसत संभाषण करता येतं, हे सगळ्यांना माहीत होतं;
पण ‘झूम’सारख्या अॅप्सच्या
मदतीने चक्क शेकडो लोकांची सभा कॉम्प्युटरवर भरवता येते, हे नवीन
ज्ञान झालं. तशा सभा, बैठकी होऊ लागल्या. घरून काम करण्यामध्ये
प्रवासाचा वेळ वाचतो. दगदग वाचते. सोबत डबा न्यावा लागत नाही की बाहेरचं जेवावं लागत
नाही. मालकाच्या दृष्टीने पाहता वाचलेला वेळ कामात लागून जास्त मोठी टार्गेट्स सेट
करता येतात. परिणामी घरून काम करताना ऑफिसमध्ये मिळते तेवढीही उसंत मिळत नाही,
अशी तक्रार काही जण करू लागले.
घरी राहून काम करण्याचे दोन्ही बाजूंनी
फायदे, तोटे असले तरी कोरोनाचं उच्चाटन झाल्यावर या नव्या कार्यपद्धतीचा
परिणाम कार्यसंस्कृतीवर झाल्याशिवाय रहाणार नाही. सध्या जे ‘वर्क
फ्रॉम होम’ चालू आहे, त्याचं स्वरूप कामचलाऊ
आहे; पण त्यातून काम करणारा आणि करून घेणारा, दोघांची सोय बघणारं मॉडेल विकसित होईल, यात शंका नाही.
कोणत्या प्रकारच्या उद्योगात हे शक्य आहे, याचा आणि जिथे शक्य
आहे तिथे त्या मॉडेलला कोणतं रूप द्यावं, याचा अभ्यास सुरू झालाही
असेल. नजीकच्या भविष्यात इंटरनेट, मोबाइल फोन आणि कॉम्प्युटर
यांवर विविध मॉडेल्स आधारलेली असतील; पुढे थ्रीडी प्रिंटरचाही
समावेश यात होऊ शकेल. यातून अर्थातच टेक्नॉलॉजीला दिशा मिळेल, वेगही मिळेल.
2. कारखान्यांचं यांत्रिकीकरण
सॉफ्टवेअरशी संबंधित आणि इतर काही
कामं काम करणारा घरी राहून करू शकतो. पण सगळीच नाही. विशेषत: वस्तूंच्या उत्पादनाचं
काम. तिथे फॅक्टरीला पर्याय नाही. प्रत्यक्ष फॅक्टरीत निर्मिती होण्याला पर्याय नाही.
पण ती निर्मिती करणार्या ‘हातां’ना आहे! अशा साथीमुळे (आणि
अर्थात अतिवृष्टीमुळे, संपामुळे, प्रवासाची
साधनं बंद पडल्यामुळे, वगैरे) कुशल-अकुशल कामगार घरी अडकतात आणि
उत्पादन ठप्प होतं, हे लक्षात आल्यावर फॅक्टरीतली अधिकाधिक कामं
यंत्रांकडून, यांत्रिक रचनांकडून करून घेण्याकडे कल वाढेल. रोबोविज्ञानाला
जोरदार पुष्टी मिळेल. आज जी कामं कौशल्याची मानली जातात, ती ‘चौथ्या औद्योगिक क्रांती’मध्ये यंत्रं करू लागतील,
काम करत शिकत, सुधारत जाणारे सॉफ्टवेअर अल्गोरिदम
माणसापेक्षा खूप जास्त कार्यक्षम असतील, अशी भाकितं आजच होत आहेत.
कोरोनामुळे तो भविष्यकाळ जवळ येईल.
पुन्हा, टेक्नॉलॉजीच्या दिशेला ठाम वळण मिळेल, वेगही येईल.
यंत्रांनी कामं करणे आणि त्यातून काम
करणार्या माणसांची गरज कमी होत जाणे, हा खूप मोठा समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय विषय आहे.
त्यात न शिरता, ती वेळ लवकर येईल आणि त्या प्रकारच्या जगाशी,
जगण्याशी जुळवून घेण्याला मनुष्यप्राण्याला असलेला अवसर कमी होईल,
इतकं ‘कर्तृत्व’ कोरोना गाजवेल,
हे नक्की.
3. धर्म आणि धार्मिकता
कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला पडताना
कुठलाही धर्म, पंथ, संप्रदाय
त्यातून सुटला नाही. कोरोनावर इलाज नाही म्हणताना सृष्टीचा पालक असलेल्या ईश्वरावर
भरवसा ठेवून वा त्याची भक्ती करून उपयोग होत नाही, हे स्पष्ट
झालं. जोपर्यंत कोरोनावर लस शोधली जात नाही, त्या लसीची सखोल
चाचणी होत नाही, लसीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन ती सर्वत्र
उपलब्ध होत नाही; तोपर्यंत या पृथ्वीतलावरच्या प्रत्येकाचं जीवन
अनिश्चित आहे, हे जगातल्या सर्व ठिकाणच्या, विविध धर्म-पंथ-संप्रदाय मानणार्या सर्वसामान्यांच्या डोक्यात ठसेल का?
थोडं विस्ताराने पहावं लागेल.
हा रोग वयस्कांना जास्त धोकादायक आहे, हे खरं आहे. पण वयस्कांना जसा तो धोकादायक आहे,
तसाच ज्यांची प्रतिकारशक्ती क्षीण आहे, त्या सर्वांनादेखील
धोकादायक आहे. आजही कोरोनामुळे मृत्यू येण्याचं प्रमाण प्लेगसारख्या भयंकर रोगाच्या
(किंवा गेल्या शतकातील इन्फ्लुएन्झाच्या) तुलनेत अगदी कमी आहे. म्हणजेच कोरोनापीडितांपैकी
बहुसंख्य लोक कोरोनावर लागू होणारं विशिष्ट असं औषध घेतलं नाही, तरी बरे होतात. बरे होताना त्यांच्या शरिरात कोरोना व्हायरसला प्रतिकार करण्याची
शक्ती निर्माण होते आणि व्यक्तीव्यक्तीमध्ये ही प्रक्रिया होत राहिली की केव्हा
ना केव्हा तरी समाजातील सर्वांमध्ये अशी प्रतिकारशक्ती येऊन साथ आपोआप विलय पावण्याची
आशा ठेवता येते.
या तर्कात गोम अशी आहे की ज्यांची
प्रतिकारशक्ती कमी आहे, असे सगळे दुबळे लोक
मरून गेल्यावरच (उर्वरित) समाज कोरोनामुक्त होईल. आणि हे तर आजही बहुतेक प्राणघातक
रोगांच्या बाबतीत खरं आहे. पण दुबळ्या, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या
लोकांना उपचाराविना मरू दिलं जात नाही. तसं करणं मानवतेला धरून नाही म्हणून,
दुबळ्यांचं रक्षण करा अशी धर्माज्ञा आहे म्हणून, शरिराने दुबळा असलेल्या एखाद्याची बौद्धिक क्षमता समाजासाठी अतिमोलाची असते
म्हणून, मरू शकणारा वृद्ध वा दुर्बल दुसर्या सबळ तरुण व्यक्तीचा
प्रिय सुहृद असतो म्हणून, वगैरे. थोडक्यात, कोरोनामुळे होणारा मृत्यू न मरणार्या इतरांसाठीसुद्धा दु:खदायक असू शकतो.
या अशा दु:खदायक संकटापासून आपली सुटका
करण्याची क्षमता देवात, श्रद्धेत,
भक्तीत नाही; ती केवळ वैज्ञानिक मार्गाने प्राप्त
केलेल्या उपचारातच आहे, अशी जाणीव सामाजिक स्तरावर होण्याची कितपत
शक्यता आहे, हा अवघड प्रश्न आहे. जगात सर्वत्र जरी धर्मपालन करणार्यांचं,
ईश्वरावर श्रद्धा बाळगणार्यांचं, धार्मिक कर्मकांडं
नेमाने करणार्यांचं प्रमाण नास्तिकांपेक्षा, अश्रद्धांपेक्षा,
अज्ञेयवाद्यांपेक्षा खूप जास्त असलं; तरी ज्या
प्रदेशातल्या जनतेचं जीवन विज्ञानाने सुकर केलं आहे, तिथल्या
जगण्याच्या सामान्य व्यवहारामध्ये ईश्वराची लुडबूड कमी असते. युरोपात असं घडलं. ज्यांच्या
समोर घडलं, त्यांचा ईश्वरावरचा विश्वास कमी झाला, असं म्हणण्यापेक्षा विज्ञानावर विश्वास वाढला, असं म्हणणं
जास्त योग्य ठरेल. विज्ञानावर विसंबण्याची एक संस्कृती तिथे तयार झाली आणि ती संस्कृती
पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित झाली. विज्ञानाने घडवून आणलेल्या नंतरच्या विकासामुळे
ती संस्कृती अधिकाधिक घट्ट होत गेली.
ही प्रक्रिया इथे
, आपल्या देशात घडली नाही. वैज्ञानिक शोध लागण्याच्या प्रक्रियेला
इथला समाज साक्षी नाही. इथल्या समाजाला विज्ञानामधून उगम पावलेलं आधुनिक तंत्रज्ञान
आयतं मिळालं आहे. त्या आयतं मिळण्यातून ईश्वराला, श्रद्धेला,
भक्तीला आव्हान मिळण्याची वेळ आलीच नाही. इथला नास्तिक, अश्रद्ध, अज्ञेयवादी केवळ बुद्धीमधून, फार तर कौटुंबिक संस्कारातून घडलेला आहे. सामाजिक अनुभवसंचितातून नाही.
तर तशी वेळ आजच्या या कोविडनामक अमोघ
रोगाच्या अस्त्राच्या आघातामुळे आली आहे का?
तसं वाटत नाही. अजूनही इथे ‘परमेश्वरच आपला तारणहार आहे,’ या
विश्वासाला धक्का बसला आहे, बसेल, असं जाणवत
नाही. समाजात विज्ञान रुजण्याची प्रक्रिया इथे सुरूही झालेली नाही आणि एकूण राजकीय,
सामाजिक सूर बघता नजीकच्या भविष्यकाळात ती सुरू होण्याची शक्यताही नाही,
असंच म्हणावं लागतं. या उलट अशी प्रक्रिया पश्चिमेत पार पडून विज्ञान
तिथल्या सामाजिक गृहितांचा अविभाज्य भाग होऊन गेलं आहे. त्यामुळे कोरोनामुळे अमेरिकेत,
युरोपात कमी काळात जी मोठी हानी झाली, तिचा परिणाम
म्हणून तिथल्या आरोग्यव्यवस्थेमध्ये मोठे बदल संभवतात; विज्ञानाकडून
श्रद्धेकडे जनमत फिरण्याची शक्यता मात्र नाही.
4. स्थलांतरित
हा दुहेरी प्रश्न आहे. आणि इथला
आहे. एका बाजूने स्थलांतरितांचा आणि दुसरीकडून स्थलांतरितांकडून काम करून घेणार्यांचा.
कोरोनाचा धोका स्पष्ट झाला आणि लोक घरी बसू लागले. आपोआप ओला-उबर चालवणार्यांचा धंदा
धोक्यात आला. इमारतींचं बांधकाम थांबलं आणि तिथले मजूर बेकार झाले. लोक बाहेर जायचे
थांबले आणि कपड्यांना इस्त्री करण्याचं कारण उरलं नाही. इस्त्री करणार्यांचं काम बंद
झालं. जे कोणी पगारदार होते, त्यांच्या नोकर्या
राहिल्या; पण पगार सगळा शाबूत राहिला, असं
झालं नाही. रस्त्यावरची वाहतूक थांबली आणि पेट्रोल पंपावर काम करणारे, हायवेवर गाड्यांची छोटीमोठी कामं करणारे मेकॅनिक बेकार झाले. मुंबईतल्या लोकल
धावायच्या बंद झाल्या, बसगाड्या डेपोत विसावल्या आणि दूर दूरहून
प्रवास करून मुंबई महानगरीमध्ये गुजराण करणारे, रोजंदारीवर काम
करणारे, हातगाडी चालवणारे, पानपट्टीवाले,
पाणीपुरीवाले, वडापावची गाडी लावणारे, रस्तोरस्ती, नाक्यानाक्यावर गजरे, पिशव्या, पिना, पर्सा विकणारे,
सगळ्यासगळ्यांचं काम गेलं.
देशभरातून लोक पोट भरायला मुंबईत येतात.
इथे कमावतात आणि घरी पाठवतात. मुंबईला काम करणारे हात मिळतात, काम करणार्यांना रोजगार मिळतो. पण फुटकळ कामं करून कमावणार्यांना
कसल्याच ‘विम्या’चं पाठबळ नसतं. ज्या क्षणी
पैशाची आवक थांबते, त्या क्षणी त्यांच्या गरजा भागण्याच्या थांबतात.
तसं झालं नसेल; पण त्यांना असुरक्षित वाटू लागलं, हे खरं. यातले जे कोणी बाहेरचे होते, त्यांच्यासमोर निर्णय
होता, उद्या कोरोनाने मरायचं की आज उपासमारीने. त्यातले बहुसंख्य
ताबडतोब गावाच्या दिशेने निघाले.
मोठ्या शहरांमधून हे, छोटी कामं करणार्यांचे लोंढे ज्या प्रमाणात बाहेर पडले,
ते पहाता त्यांना त्या त्या शहरांचा आधार वाटला नाही, हे उघड आहे. मध्यमवर्गीयांच्या घरी भांडी-लादी पोछा, स्वयंपाक, वगैरे कामं करणार्या बायकांना असा ‘विमा’ बहुतांश मिळाला. त्यांच्या ‘मालकिणीं’नी त्यांचा पगार चालू ठेवला. (पण कोरोनाचा लॉकडाउन
लांबत गेला तर त्या विम्याचं काय होईल, हे अनिश्चित आहे.) पण
बाकी बहुतेक सगळे निराधार झाले, असं दिसतं. त्यांना रहाण्याच्या
जागेचं भाडं भरणं अशक्य झालं, प्रवास अशक्य झाला आणि पोट भरणंसुद्धा
कठीण झालं.
त्यांच्यासाठी हा प्रचंड मोठा भ्रमनिरास
नसेल? शहर काम देतं, शहरात येऊन कमाईची
निश्चिंती होते, आपलं आयुष्य सेट होतं, हा विश्वास कित्येक पिढ्यांना आशा देत राहिला. देशाच्या आर्थिक, औद्योगिक विकासातला असमतोल झाकलेला राहिला. शहरं अवास्तव फुगत गेली,
बकाल होत गेली, तिथल्या गरीब वस्त्यांची स्थिती
बिघडत गेली, तरी शहर उपाशी ठेवत नव्हतं. अचानक कोरोना आला आणि
शहर चालतं ठेवण्यात मोठं बळ लावणार्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्थैर्य मिळालं
आहे हा केवळ भ्रम होता.
दुसर्या बाजूने या लोकांना कामाला
लावणार्यांपैकी काहींच्या लक्षात येत आहे, की त्यांच्याविना जगणं अशक्य आहे, असं नाही! त्यांची
उपयुक्तता आणि त्यांना द्यावा लागणारा मोबदला, यांचा तराजू तपासून
पहायला हवा.
उद्या जेव्हा कोरोना जाईल, तेव्हा दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा जुना खेळ मागील पानावरून
पुढे चालू होईल, ही शक्यता शंभरातील शंभर बाबतीत प्रत्यक्षात
येणं कठीण आहे. आपापल्या गावी गेलेलेसुद्धा असाच हिशेब करतील. घरी, आपल्या मुलुखात, परिचित वातावरणात रहाण्याचं मोल पुन्हा
एकदा तपासून बघतील. त्यांनी जर थोडा पैसा गाठी ठेवला असेल, तर
तिथेच काहीतरी करू बघतील. यातून शहरांपासून दूर, छोटे रोजगार
सुरू होण्याला चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला, सामाजिक घडीला किंचित
का होईना धक्का बसेल, वेगळी दिशा मिळेल.
5. पर्यावरण
कोरोनाने आणलेल्या लॉकडाउनचा एक परिणाम
चक्क सुखद आहे. तो म्हणजे, परिसरातील प्रदूषणात
जाणवणार्या प्रमाणात झालेली घट. चैत्रपौर्णिमेचा चंद्र फारच लख्ख दिसत होता. त्याच्या
प्रखरपणात पृथ्वीच्या जवळ येण्याचा जेवढा वाटा होता, त्यापेक्षा
जास्त हवा स्वच्छ होण्याचा होता. लॉकडाउन झाला आणि मुंबईला मरीन ड्राइवच्या समुद्रात
डॉल्फिन माशांचं दर्शन घडलं. वाळकेश्वरच्या रस्त्यावरून मोर फिरू लागले. गोंगाट बंद
झाला. पक्ष्यांचं कूजन वाढलं. हे सगळीकडे घडलं. जलंदरमधून दोनशे किलोमीटर दूर असलेल्या
हिमालयातल्या धौलाधर रांगा दिसू लागल्या. उत्तर भारतात हवेच्या प्रदूषणाने वीस वर्षांमधली
सर्वात तळची पातळी गाठली, असा निर्वाळा नासानेच दिला!
ज्या कोणाला मनुष्यप्राण्याच्या निसर्गचक्रातील
हस्तक्षेपामुळे घडू लागलेल्या ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनच्या थराला पडलेलं भोक, वगैरे गोष्टींमुळे मनुष्याच्याच
अस्तित्वाला केवढा धोका निर्माण होतो आहे, हे कळतं; तो प्रत्येक जण लॉकडाउनमुळे परिसरात जो फरक पडू लागला आहे, त्याने सुखावला आहे. या गोष्टी सर्व प्राणीसृष्टीसाठी, वनस्पतींसाठी उपकारक आहेत; इतकंच नव्हे, खुद्द मानवासाठीसुद्धा उपकारकच आहेत, ही जाणीव त्याला
आहे. त्या प्रत्येक सुजाण ‘विश्वनागरिका’ला सध्याची स्थिती अशीच रहावी, अशी इच्छा होते आहे. आणि
अशी इच्छा होणारे जगभर पसरलेले आहेत.
तर, जगभरातून याबाबतीत काही दबाव निर्माण होण्याची शक्यता किती आहे?
याविरुद्ध दबाव कोण आणेल, याचाही विचार करायला हवा.
नोकरी गमावून बसलेल्या कामगाराला पुन्हा
काम सुरू करायचं आहे. म्हणजेच, त्याला त्याचा
कारखान सुरू व्हायला हवा आहे. त्याच्या मालकालाही हवा आहे. प्रत्येक टॅक्सीवाल्याला
लोकांनी टॅक्सीने प्रवास करावा, अशी इच्छा आहे. मालवाहतूक तर
वाढायला हवीच. अर्थचक्राला गती मिळाली की समाजातल्या सर्वच स्तरांमधल्या काम करणार्या
लोकांचे रोजगार चालू होतात, त्यांच्या क्रयशक्तीवर वस्तू विकल्या
जातात, त्यांचं अधिकाधिक उत्पादन होऊ लागतं, त्यातून रोजगार वाढतात आणि चक्राला गती मिळते. यालाच आर्थिक विकास म्हणतात.
तो जर हवा असेल, तर जलंदरमधून हिमालय दिसण्याची अपेक्षा सोडूनच
द्यावी लागेल. प्रदूषण काही प्रमाणात मान्य करावंच लागेल.
पर्यावरण सुधारण्याच्या विरुद्ध असलेल्या
पर्यायाचे पुरस्कर्ते हे त्यांच्या लहानमोठ्या कमाईसाठी प्रस्थापित अर्थव्यवस्थेवर
अवलंबून असलेले लोक आहेत. अर्थव्यवस्थेला मोकाट सोडू नये म्हणजे पर्यावरण सुधारेल, असं म्हणणारे दूरचा विचार करणारे आहेत आणि त्याबरोबर
अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याने ज्यांची सुस्थिती ताबडतोब धोक्यात येणार नाही,
असे सुखवस्तू वर्गातले लोक आहेत.
पण ग्रेटा थुनबर्गसारखी शाळकरी वयातली
मुलगी जे म्हणते, की ‘आमच्या भवितव्याचा सौदा करण्याची हिम्मत तुम्हाला होतेच कशी’ त्याला मिळणारा पाठिंबा वाढतो आहे. या परस्परविरोधी भूमिकांची टक्कर भविष्यात,
पर्यावरण ढासळल्याने अपरिमित वित्त आणि प्राणहानी होण्याचा क्षण येईल,
तेव्हा अटळ आहे. कोरोनामुळे टक्कर न होता सामोपचाराने वाट काढण्याची
एक संधी समोर आली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, जिथे आकांक्षा
जागलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, तिथे पर्यावरणाच्या भल्यासाठी
कमाईचा, तात्काळ मिळणार्या फायद्याचा त्याग करण्याकडे कल होणार
नाही. या बाबतीत काही होणार असेल, तर ते विकसित देशांमध्येच होऊ
शकेल. भारताला दूरच्या भविष्याचा विचार आज परवडणारा नाही. विकसित राष्ट्रांना ते शक्य
आहे. तिथेही अर्थातच पर्यावरणरक्षणाला विरोध करणार्यांचा दबाव खूप मोठा आहे. तरीही
ही अनमोल संधी न सोडता मार्ग काढण्याचा प्रयत्न तिथे निश्चित होईल.
6. जागतिक सहकार्य?
गेल्या शतकात युरोपातले देश काही प्रमाणात
एकत्र आले आणि त्यांनी युरोपियन युनियन स्थापन केली, युरोपभर एक चलन सुरू केलं, प्रवासावरचे निर्बंध काढून
टाकले, वगैरे. या घटनांमागे तंत्रज्ञानापेक्षा अर्थशास्त्र हे
जास्त मोठं कारण होतं. (आणि अर्थशास्त्रीय कारणांमुळेच त्या एकत्र येण्याला आज धक्के
बसताना दिसत आहेत.) मात्र कोरोनाने ‘प्रगत’ जगाला दाखवून दिलं आहे की आर्थिक, सांस्कृतिक,
भाषिक, वगैरे भेद कसेही असले, तरी आज सगळं जग इतकं जवळ आलं आहे की किमान आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांचे हितसंबंध
एक प्रकारे एकमेकांत अडकलेले आहेत. राष्ट्रांच्या सीमा कोरोनाचा प्रसार थांबवू शकल्या
नाहीत. कोरोनावर इलाजसुद्धा विश्वव्यापी स्तरावरच व्हावा लागेल. व्यापार, वगैरे बाबतीत घडून गेलेलं जागतिकीकरण खिळखिळं होण्याच्या स्थितीत असताना वेगळ्या
संदर्भात जागतिकीकरणाची निकड समोर आली आहे.
यातून काही प्रमाणात, काही संदर्भात जगातील देशांचं प्रशासन एकसूत्री होईल
का?
आपण पाहिलं की आरोग्याच्या बाबतीत
जागतिक भूमिका घेण्याला जो पर्याय आहे, तो खर्चिक आहे. आणि निर्दोष नाही. तर किमान माणसाचं (आणि सृष्टीचंसुद्धा) आरोग्य,
हा विषय प्रत्येक देशाने स्वतंत्रपणे न हाताळता, त्याबाबतीत जागतिक सांमंजस्य असावं, सर्वांना लागू होईल
असं एक जागतिक धोरण तयार करावं आणि त्याची अंमलबजावणी जागतिक हितसंबंधांच्या चौकटीत
व्हावी, असा प्रस्ताव उद्या येऊ शकेल का?
बघावं लागेल.
एकूण असं दिसतं की कोरोना नामक विश्वव्यापी
गंडांतरामुळे माणसाच्या जगण्यातले काही मूलभूत प्रश्न अचानक ऐरणीवर आले आहेत. कोरोनाने
मानवाला काही नवीन ज्ञान दिलं आहे, असं नाही; पण एकूण जगण्याकडे, जगरहाटीकडे
समग्रतेने बघण्याचा मोका मिळवून दिला आहे. अशा वेळी ‘सर्वांचं,
बहुसंख्यांचं हित लक्षात घेता अमुक व्हायला पाहिजे,’ अशा प्रकारची भावनिक आवाहनं होणारच आहेत. पण त्यांना कोण किती महत्त्व देईल,
हे
कोणता मार्ग किफायतशीर आहे
कोणाच्या हितसंबंधांना जास्त धोका
पोचतो आहे
भविष्याच्या दृष्टीने आजच बदल स्वीकारणे
कितपत धोरणी ठरेल
या प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून
आहे. विसाव्या शतकाने मानवाला दोन महासंहारक महायुद्धांचा अनुभव दिला. पहिल्या महायुद्धानंतर
‘लीग ऑफ नेशन्स’ नावाची संस्था निर्माण
झाली खरी; पण ती दुबळी होती आणि अल्पजीवी ठरली. सर्व राष्ट्रांमध्ये
कार्य करणारी आणि आपल्या काही पोटसंस्थांमधून जागतिक संतुलन सांभाळण्याला हातभार लावणारी
यूनोसारखी संस्था निर्माण व्हायला एक महायुद्ध पुरेसं ठरलं नाही; त्याहून संहारक असं दुसरं महायुद्ध त्यासाठी व्हावं लागलं. एकविसाव्या शतकाने
कोरोनासारख्या ‘पँडेमिक’चा अनुभव देताना
लाखो, कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेवर घाला घालणार्या जागतिक
स्तरावरील मंदीचं संकट समोर आणून ठेवलं. मग इतक्याच गंभीर अशा दुसर्या तडाख्यानंतर
जागतिक स्तरावर हालचाल होईल, याची वाट बघायची का?
एक तळटीप:
कोरोनामुळे जगासमोर आलेल्या सामाजिक, आर्थिक, वगैरे क्षेत्रांमधल्या
काही ‘गंभीर’ प्रश्नांचा विचार आपण केला.
‘कला’ हे क्षेत्र या प्रकारचं नाही,
माणसाच्या जगण्यावर ‘गंभीर’ घाला घालणारं नाही. पण कोरोनाने कलाक्षेत्रालासुद्धा न भूतो असा तडाखा दिला
आहे. त्याची दखल घेणं वावगं ठरू नये.
जिथे गर्दी होते, तिथे कोरोनाच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण तयार होतं,
हे लक्षात आल्यावर जसे मॉल बंद झाले, तशीच चित्रपटगृहं,
नाट्यगृहं बंद झाली. टीव्ही चालू राहिला पण टीव्हीवरच्या मालिकांचं चित्रीकरण
थांबलं. ते आता हळू हळू सुरू होत आहे; पण उघड्यावर चित्रीकरण
होण्याला फारशी हरकत नसली, तरी बंद दालनांमधलं काम सुरक्षित नाही.
आपापल्या घरात जरी लोक मास्क लावून वावरत नसले; तरी एका घरातले
नसलेले कलाकार तसा आव आणत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा संभव टाळू शकत नाहीत. रंगभूमीला
बसलेला तडाखा जास्त जबर आहे. नाटक ‘रिअल टाइम’मध्ये सादर होत असतं आणि त्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक समोर असण्याची
अटळ गरज असते. ही गरज जशी प्रेक्षक-नाट्यकलावंत यांमध्ये असते; तशीच प्रेक्षक-प्रेक्षक यांच्यातसुद्धा असते. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमच्या
जमान्यात चित्रपट जरी पूर्णांशाने ‘सामूहिक करमणूक’ राहिलेला नसला; तरी नाटकाचं तसं (अजून) झालेलं नाही.
कोविडचा धोका पूर्णपणे नगण्य होण्याची शक्यता भविष्यात केव्हा येईल, हे अजिबात स्पष्ट नसताना रंगभूमी कोणतं वळण घेईल? नाटकाच्या
तालमी कशा होतील? प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादाविना नाटक ‘नाटक’ ठरेल का? अपेक्षित नाट्यानुभव
देईल का?
हे प्रश्न नाट्यक्षेत्रातल्या मंडळींना
पडत आहेत. ते यातून कसा मार्ग काढणार, हे बघावं लागेल. या प्रश्नांची दखल घेत नाटकं कशी लिहिली जातील, हादेखील प्रश्न आहेच. मराठी नाटक अजूनही बहुतांश घरात घडतं. घराबाहेरचे प्रसंग
कमी असतात. त्यामुळे दोन पात्रांनी एकमेकांसमोर मास्क लावून येणे आणि घडणार्या प्रसंगाला
उचित असा मुद्राभिनय करणे, ही समस्या तुलनेने कमी प्रमाणात भेडसावणार
आहे!
पण मास्क हा जर सार्वजनिक जीवनाचा
अविभाज्य भाग बनणार असेल, तर वर्तमानात घडणार्या
कथा-कादंबर्यांमध्येही तसंच वर्णन करावं लागेल! ते होईल आणि त्यातून निर्माण होणारे
गुंते विषयांच्या नवनवीन वाटा समोर आणतील, यात शंका नाही. पण
गहन प्रश्न कलेचा नाहीच. गहन प्रश्न सलगीचा आहे! प्रणयाराधनाचा आहे! व्हिक्टोरियन जमान्यातल्या
इंग्लंडात बायका पायसुद्धा झाकणारे झगे घालत आणि तो झगा किंचित वर होऊन तळपाय दिसणे,
हे रोमांचकारक असे, असं म्हणतात. तो जमाना जगभर
पुन्हा येणं कठीण आहे; पण मग काय येईल? ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो (कोविडधारी) मरणाचा’
हे वचन वर्तनात परिवर्तित होईल का?