Friday, December 10, 2021

झिम्मा. एक पंचमस्तंभी घातपात.

१.      इतकं चपखल नाव क्वचित सापडतं! ‘झिम्मा’ हा एक खेळ आहे. पारंपरिक खेळ आहे. बायकांचा पारंपरिक खेळ आहे. आणि अनेकींनी मिळून खेळायचा खेळ आहे. या नुसत्या नावात चित्रपटाचा अर्धाअधिक आशय व्यक्त होतो!

२.      जगण्याच्या लढाईतल्या छोट्या छोट्या विजयांची ही गोष्ट आहे. कोणीच महापराक्रम करत नाही की कुठे क्रांती होत नाही की कोणी कोणाला चीतपट करत नाही.

मात्र या छोट्या छोट्या विजयांची बेरीज मोठी आहे. म्हणजे दोन अधिक तीन ही बेरीज पाच न होता पन्नास होत आहे. हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. हे कसं, ते पाहू.

 काही गृहीतकं. बायका ही एक ‘दलित’ जात. हे जग पुरुषांचं आहे. पुरुषांच्या आसऱ्याने बायकांनी जगावं, आनंदी रहावं, पराक्रम करावेत. पुरुषाला केंद्रस्थानी ठेवून मग बाई पुरुषाच्या, किंवा अनेक पुरुषांच्या डोक्यावर मिरेसुद्धा वाटू शकते. पण ती जर एकूण पुरुषजातीला न जुमानण्याची भूमिका घेणार असेल, तर तिची खैर नाही. चित्रपटातल्या सात बायकांना अंतर्यामी हे माहीत आहे. काहींना हे दुय्यमत्व जगावं लागत आहे, तर काही इथे तिथे स्वातंत्र्याची टोपी घालून मिरवत आहेत. लंडनला फिरायला जातात, याचा अर्थ त्या सुखवस्तू तर आहेतच. त्यांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा भागल्या आहेत. चित्रपटातली गोष्ट गरजा भागण्याच्या पुढची आहे. बाईला मनोमन खुपणाऱ्या, अपमानित करणाऱ्या, शब्दांत पकडता येईलच अशा नसणाऱ्या खऱ्या खोट्या जुलमाभोवतीची ही गोष्ट आहे. आणि टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे सर्व सुखी माणसं एकाच प्रकारे सुखी असली; तरी प्रत्येक दु:खी माणसाचं दु:ख वेगळं असतं, त्याचं स्वत:चं असतं. इथल्या सगळ्या बायका दु:खी आहेत, असं नाही; पण प्रत्येकीच्या मनात काही सल आहे, काही अधुरेपण आहे.

 एकीला आत्मविश्वास सापडतो, एकीला अती प्रेमळ जोडीदार नकोसा होऊ लागलेला असतो, त्यातून मार्ग मिळतो. एकीला शोध लागतो की काही बंधनं आपली आपणच स्वत:वर घालून घेतलेली असतात. एक जण सोशल मीडियावर मित्र झालेल्याला भेटायला निघूनच जाते आणि तिच्या तशा जाण्याचं दुसऱ्या एकीला फार म्हणजे फारच अप्रूप वाटत रहातं.

 सर्वसाधारणपणे एका चित्रपटात नायक-नायिकेबरोबर आणखी एक दोन कथाप्रवाह असणं दुर्मिळ नाही; इथे सात आहेत! नायक-नायिका असं कोणीच नाही. अशा स्थितीत सात स्वतंत्र कथाप्रवाह एकाच वेळी मांडणे, हे अतिशय अवघड काम आहे. तसं करताना ‘एक प्रवेश संपला, दुसरा सुरू’ असा तुटकपणा जाणवणं सहज शक्य आहे. पण इथे तसं होत नाही. एकीची गोष्ट सुरू असते आणि बघता बघता ती दुसरीच्या गोष्टीला टेकू/खो देते. त्यातूनच तिसरीची गोष्ट पुढे सरकू लागते. आणि यात आपण एका जंक्शनवर उतरून गाडी बदलून दुसरीकडे चाललो आहोत, असं अजिबात होत नाही. अर्थात, यात कोणाचीच गोष्ट मध्यवर्ती होत नसल्याने शेवटी एक फील गुड स्किट बघितल्यासारखं काहींना वाटू शकेल; पण वर म्हटल्याप्रमाणे साती जणी मिळून एक गंभीर आशयाचा गोफ विणतात, हे समजा उघड जाणवलं नाही तरी नेणीवेत नक्की रुजत असणार.

 ३३.      ‘झिम्मा’ या नावाला धरून असलेलं गाणं चित्रपटभर अधून मधून वाजत रहातं आणि त्या आशयाकडे लक्ष वेधत रहातं. किमान मला तरी तसं सतत होत राहिलं. ते गाणं नसतं, तर त्या घातपाती आशयापर्यंत पोचायला मला वेळ लागला असता.

४. ४. हो, हा चित्रपट पंचमस्तंभी आहे. पोटात शिरून घातपात करणारा आहे. ‘मला आवडला,’ असं म्हणणाऱ्या पुरुषांनी पुन्हा विचार करावा आणि मग पूर्ण जबाबदारीने हे विधान करावं.  सर्व वयाच्या बायका हा चित्रपट प्रचंड एन्जॉय करतात, असं मी ऐकून होतो; त्याचा प्रत्यक्ष प्रत्ययसुद्धा घेतला. आता हा योगायोग नव्हे की संपूर्ण चित्रपटात पुरुषाची बाजू उजवी ठरली, खरी ठरली, बाईला पडतं घ्यावं लागलं, याचं एक उदाहरण (मला आठवत) नाही. बाईच सदा वरचढ ठरणे, हे नॉर्मल नाही. आता, ‘आजही ९९% चित्रपटांमध्ये पुरुषच वरचढ ठरताना दिसतो आणि त्याला हे उत्तर आहे,’ असं एखादी बाणेदार बाई म्हणेलही; पण व्यवस्था पुरुषप्रधान आहे, हे लक्षात घेतलं, तर पुरुष वरचढ ठरणे, हेच अपेक्षित आहे! न्याय-अन्याय बाजूला ठेवले, तर तशीच रूढी आहे.

म्हणजे कसं, तर बंड बिंड केलं किंवा शिकली सवरली किंवा नाव बिव कमावलं, तरी बाईने पुरुषावर कुरघोडी करता कामा नये. आणि अशी ‘शिकवण’ चित्रपटाने, टीव्ही मालिकेने, नाटकाने दिली; तर त्यात पुरुषाला दिलेलं झुकतं माप वावगं ठरत नाही. कारण सगळी समाजव्यवस्थाच पुरुषाला झुकतं माप देण्याकडे झुकली आहे. असं दाखवणे, असा संदेश देणे हे नॉर्मलच आहे. आणि उलट केलं, तर ते कितीही बरोबर, न्याय्य असलं; तरी ते ‘वेगळं’, लक्षणीय होय.

थोडं तपशिलात जायचं, तर प्रकाश झाच्या ‘मृत्युदंड’ या चित्रपटात पुरुषत्वहीन परंतु अरेरावी नवऱ्याची बायको परगावी जाते आणि  गर्भवती होऊन परतते. तेव्हा तिला नवी अस्मिता गवसते; कारण खोट तिच्यात नसून नवऱ्यात आहे, याचा बिनतोड पुरावाच तिला मिळतो. पण हे प्रेक्षकांना पसंत पडलं नाही. अगदी चित्रपट पहाणाऱ्या बायकांनासुद्धा. नवऱ्याशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संग करणे, तो मिरवणे आणि थेट नवऱ्यालाच आव्हान देणे या एकावर एक कडी करणाऱ्या कृत्यांपैकी एकही भारतीय जनमानसाला मान्य होणं शक्य नव्हतं. त्यात बायकादेखील आल्या.

‘झिम्मा’मध्ये मात्र एका दृश्यात दोन तरुण मुली निस्संकोचपणे एका पुरुषासमोर सॅनिटरी पॅडबद्दल चर्चा करतात आणि त्याच्या उपस्थितीमुळे अवघडून जाण्याऐवजी त्याचीच टिंगल करतात! आता, ‘मृत्युदंड’ पासून आजपर्यंत काळ बदलला, असं म्हणता येतं, हे खरं; पण हा सीन बघताना ज्याप्रकारे थेटरातल्या बायका प्रचंड खिदळतात, ते पहाता त्यांना या प्रसंगातून बंधमुक्ततेची, आकाशात भरारी घेतल्याची अनुभूती मिळते, यात मला तरी शंका नाही.


अशा कितीतरी लहान लहान विषयांना ‘झिम्मा’ स्पर्श करतो. मैथिली आणि कबीर एकमेकांच्या जवळ येताहेत, असं दिसू लागतं आणि ती वाग्दत्त नवऱ्याला सोडून कबीरची होणार की काय, असं सुचू लागतं. पण तसं होत नाही. ते ‘मित्र’ होतात! आकर्षक तरुण आणि आकर्षक तरुणी एकमेकांच्या जवळ येतात, याचा अर्थ त्यांच्यात शारीरिक आकर्षण निर्माण होणारच; या निसरड्या अपेक्षेला थप्पड बसते.

आणि बाई-पुरुष यांच्यात असंही नातं असू शकतं, या मूल्याचं बीज रुजतं. आज कॉलेजवयात असलेल्या पिढीला यात कदाचित नवल वाटणार नाही; पण चित्रपट, मालिका यांचा प्रेक्षकवर्ग असलेल्या थोड्या मोठ्या (ते खूप मोठ्या) वयाच्या बायकांच्या हे पचनी पाडणे, हे कौशल्य आहे.

आणि त्यात घातपात आहे!

एक जण होणाऱ्या बायकोला म्हणतो,‘ मला तुझी सतत आठवण येते,’ आणि ती उत्तरते, ‘मला माझी स्पेस हवी आहे! ती दे, सारखा सोबत राहू नकोस!’ वास्तविक पारंपरिक स्थिती उलट आहे. लग्न झाल्यावर बायका नवऱ्याच्या मंत्रिमंडळात ‘होम मिनिस्टर’ होण्यात धन्यता मानतात. संसारात रममाण होतात. नवऱ्याच्या, मुलाबाळांच्या,कुटुंबाच्या जीवनात स्वत:ला विरघळवून टाकतात. नवरा त्याची स्पेस व्यवस्थित सांभाळत असतो. तो मित्रांबरोबर जातो, पितो, त्याला सार्वजनिक जीवन असू शकतं, नोकरीधंद्याच्या निमित्ताने तो दिवस दिवस बाहेर असतो, वगैरे. बायको त्याच्या परतण्याकडे डोळे लावून घराची जबाबदारी सांभाळते. दिवसेदिवस हे असं असण्याचं प्रमाण कमी होत चाललंय; पण अजून बहुसंख्येचं मानस याच दिशेला झुकलेलं आहे. नवरा बायको दोघे नोकरी करत असले; तरी मित्रांच्या बायका एकमेकींच्या मैत्रिणी व्हाव्यात, अशी अपेक्षा असते. एका ठिकाणी काम करणाऱ्या बायकांचे नवरे मित्र होणे ऐकिवात नाही!

म्हणून स्पेस मागणारी बाई हा घातपात आहे! असे प्रसंग चित्रपटभर आहेत. घातपात चित्रपटात नाही; चित्रपट पाहून त्याला उत्स्फूर्तपणे दाद देणाऱ्या बायकांच्या मनात उमलतो आहे.

५. ५.  हा चित्रपट ‘बायकांचा’ आहे, हे कोणीही म्हणेल. यातल्या बायका कर्तृत्ववान, कुठल्याशा क्षेत्रात उच्च प्रतीचं कौशल्य असलेल्या नाहीत. या अर्थी त्या सामान्य आहेत. लंडनच्या ट्रिपमध्ये अचानक कुणाच्या अंतरंगातलं चित्रकलेचं, गायनाचं, यँवचं, त्यँवचं महान कौशल्य जागं होतं आणि मग ती जग जिंकायला निघते, असलं काहीही अजिबात होत नाही.

पण एक गोची आहे. किंवा लबाडी आहे. यातली एकही बाई मुरकत नाही! आख्खं अस्तित्व पुरुषाचं लक्ष वेधण्याभोवती गुंफणारी नाही. पुरुषासारखं होणे, पुरुषाची बरोबरी करणे, एकापेक्षा अधिक पुरुषांना वश करणे यात बुडालेल्या अनेक बायका स्त्रीवादीसुद्धा ठरू शकतात; पण इथली एकही बाई या प्रकारची स्त्रीवादी नाही. एक इंदू आहे, जी सुरुवातीला तशी आहे की काय, असा संशय येतो; पण ती आजी आहे! सगळ्यांमध्ये सर्वात वयस्क आहे! तिला तिच्यावर लादलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोशा झाल्या आहेत आणि त्या धुमसणाऱ्या बंडाच्या भावनेतून ती काही बाही करू बघते. पण ते तेवढंच.

ही लबाडी नाही का? बायका बायका एकत्र येतात आणि पुरुषाला निस्संदर्भ करून मजा करू लागतात! नटतात, मुरडतात, शॉपिंग करतात,भांडतात; बायकांकडून जे जे (परंपरेला) अपेक्षित आहे, ते ते वर्तन करतात; फक्त एक गोष्ट सोडून. एकूण विश्वाच्या मध्यभागी पुरुषाला ठेवणं कमी कमी करत जातात. त्यांना पुरुषांविना मोकळं जगण्याचा नवा अर्थ सापडतो.

प्रचलित व्यवस्थेविरुद्ध हा घातपात आहे!

एक सांगायला हवं. चित्रपट मुळीच निर्दोष नाही. काही पात्रांचा मानसिक प्रवास तर्काला पटत नाही. रंग काहीसे जादा खेळकर आहेत. लंडनचा भूगोल यात एक महत्त्वाचं पात्र होऊ शकलं असतं, पण तसा प्रयत्न जाणवत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या घातपाती स्वरूपासमोर फिक्या, बिनमहत्त्वाच्या ठरतात.


चित्रपट पूर्णपणे व्यावसायिक आहे. त्यात कुठेही ‘आर्ट फिल्म‘चा आव नाही. एकेकाला जेव्हा काहीतरी ‘ज्ञान’ होतं,  तेव्हा ते सोप्या शब्दांत स्पष्टपणे ऐकू येतं. त्यात काहीही तरल, सांकेतिक नाही. पटकन कळेल, अशा स्वरूपात हे जीवनविषयक संदेश नसते; त्याऐवजी तिथे ‘दिग्दर्शक दिसला असता’, तर ‘झिम्मा’ लोकप्रिय ठरण्याबरोबर जास्त नावाजला गेला असता.

तसं नसल्याने ‘झिम्मा’ अगदीच पंचमस्तंभी, घातपाती ठरतो! संस्कृतिरक्षकांनी याची नोंद घ्यावी!