Saturday, October 29, 2022

ऋषी सुनक की रिशी सुनक?

१.

आतापर्यंत किती देशांच्या प्रमुखपदी विराजमान होण्याचा मान भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळाला आहे?

ब्रिटन हा काही पहिला देश नाही. फिजी या देशात भारतीय वंशाचे लोक पुष्कळ आहेत. इतके, की तिथे त्यांच्यापैकी एक पंतप्रधानही झाला. मॉरिशसचंसुद्धा तसंच आहे. मलेशियाची गोष्टसुद्धा वेगळी नाही. अर्थात, या तीनही ठिकाणी ब्रिटिशांनी उसाच्या मळ्यात किंवा आणखी कुठे मजुरी करण्यासाठी भारतातून माणसं नेली आणि ती तिथली झाली. वेस्ट इंडीजमधल्या देशांमध्येसुद्धा असे ‘तिथले झालेले’ अनेक भारतीय आहेत. रोहन कन्हाय किंवा कालीचरण ही क्रिकेटपटूंची नावं जशी भारतीय वाटतात, तसंच नोबेल विजेता नायपॉलसुद्धा भारतीय वंशाचाच आहे. पण अजून बार्बाडोस किंवा अँटिग्वा किंवा तिथेच आणखी कुठे भारतीय वंशाची व्यक्ती देशाच्या प्रमुखपदी बसल्याचं ऐकिवात नाही. होईल!

ब्रिटनच्या शेजारी आयर्लंड नावाचा देश आहे, जिथे लिओ वराडकर नावाचा मनुष्य राष्ट्रप्रमुख झाला होता. ‘वराडकर’ या नावाचं नातं भारताशीच काय, महाराष्ट्राशीसुद्धा लागतं! पण वराडकरांचं नाव फार कोणी घेताना दिसत नाही. आपण गे असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि आयर्लंडसारख्या कॅथॉलिक देशाचा (आणि जगातला चौथा) गे राष्ट्रप्रमुख ते झाले. पण यामुळे भारतीय लोक त्यांचं नाव घेत नाहीत, हे कारण नसावं.

पाकिस्तानचं काय? आपण भारतीय वंशाबद्दल बोलत असू, तर जिनांपासून भुत्तोंपर्यंत राष्ट्रप्रमुखांचा वंश भारतीयच होता. जिना मुंबईकर होते, भुत्तो पुण्याला शिकायला होते. पण भारतीय वंश, वगैरे चर्चा करताना मुसलमान पूर्णपणे वगळायचे, असा संकेत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचं कोणी बसल्याचा उल्लेखही होत नाही.

असो. तर, असं सगळं मागे घडून गेलं असताना ब्रिटन या देशाच्या बाबतीत इतकी चर्चा का व्हावी?

या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पण ते कागदावर मांडणं गडबडीचं आहे.

ब्रिटन या देशाने एकेकाळी भारतावर राज्य केलं होतं. अगोदर ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर राणी व्हिक्टोरिया (आणि नंतर पाचवा, मग सहावा जॉर्ज आणि शेवटी दुसरी एलिझाबेथ) यांनी भारतावर सत्ता गाजवली.  नुसती गाजवली नाही, या देशाच्या जवळपास सर्व व्यवहारांवर ब्रिटिशांनी ठळक छाप बसवली. त्यांनी भारतात रेल्वे आणली, पोस्टाची सेवा सुरू केली, कायदे बनवून त्यांची पुस्तकं तयार केली, शिक्षणव्यवस्था घडवली, वगैरे वगैरे. ब्रिटिशांनीच जमीनदारी सुरू केली आणि एक प्रकारच्या रयतेच्या पिळवणुकीला अधिकृत स्वरूप दिलं. त्यांच्या गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या कापडाला भारताची बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांनी इथला कापडउद्योग मारला. उलट, त्यांना सोयीच्या अशा कापसाची लागवड होण्यास उत्तेजन दिलं. वगैरे वगैरे.

मग ब्रिटिशांनी भारताला आधुनिकतेशी ओळख करून देऊन उपकार केले की प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट करून अन्याय केला? ब्रिटिशांना उपकारकर्ते मानून त्यांचं गुणगान करावं की त्यांनी केलेल्या अन्यायासाठी त्यांचा राग धरावा? दोन्हींमध्ये तथ्य आहे. एक बारीक गडबड अशी आहे, की एकाच तोंडातून दोन्ही व्यक्त होत असल्याचं सापडण्याची शक्यता या देशात फारच मोठी आहे. आणि तोंडाने केलेल्या बडबडीपेक्षा कृतीला जास्त वजन द्यायचं, तर भारतीयांना ब्रिटिशांपुढे न्यूनगंड वाटतो, असं खुशाल म्हणता येतं. ब्रिटिशांकडून मान मिळाल्यावर त्याचं खूप जास्त मोल त्यांना वाटतं. प्रिन्स चार्ल्स येतो आणि मुंबईच्या डबेवाल्यांचं कौतुक करून जातो, तेव्हाच इथल्या उच्चभ्रू नियतकालिकांमध्ये डबेवाल्यांच्या व्यावसायिक सफाईवर स्टोऱ्या येऊ लागतात. आपलं संशोधन लॅन्सेटमध्ये छापून येण्यात आपला मोठा सन्मान झाला, असं इथल्या डॉक्टरला वाटतंच वाटतं. टाटांनी लँडरोव्हर विकत घेण्याचा अभिमानच काय, गर्व मोटारगाड्यांच्या क्षेत्रातल्या भारतीयाला वाटतो.

म्हणूनच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाचा मनुष्य विराजमान होणे, हा राष्ट्रीय चर्चेचा विषय होतो. भारतीय अस्मितेला त्यातून अतीव सुख होतं. एकेकाळी आमच्यावर राज्य करणाऱ्या देशाचा प्रमुख आमच्यापैकी एक होतो, ही गोष्ट भारतीय अस्मितेला विलक्षण सुख देऊन जाते. मग त्याचे वडील केनियातून तिकडे गेले होते आणि केनियात गेलेले त्याचे आजोबा मूळ ज्या गावचे होते, ते गाव पाकिस्तानात आहे, या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही. उलट, त्याचा धर्म हिंदू आहे, त्याची बायको चक्क इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची मुलगी आहे, यामुळे त्यांना होणाऱ्या सुखात भर पडते.

ऋषी सुनक (की रिशी सुनक? या प्रश्नाकडे आपल्याला लवकरच वळायचं आहे) ब्रिटनचे पंतप्रधान होण्याकडे ‘इकडून’ बघण्याऐवजी ‘तिकडून’ बघितलं तर काय दिसतं?

तर असं दिसतं की ब्रिटन हा एक उदारमतवादी देश आहे. तिथले मूलनिवासी वर्णाने गोरे असले आणि त्यांचा धर्म (राजघराणं सोडून) प्रॉटेस्टंट ख्रिस्ती असला तरी तिथे राहणारा, त्या भूमीला आपली मानणारा आणि त्या भूमीच्या भल्यातच स्वत:चं भलं मानणाऱ्या कोणाही माणसाला - मग तो वेगळ्या धर्माचा का असेना - ते ‘आपला’ मानतात. त्यांच्या देशाच्या प्रमुखपदी त्याला बसवताना त्यांना असुरक्षित, अस्वस्थ वाटत नाही. कारण तो समाज उदारमतवादी आहे. ‘वेगळ्या’ माणसाला सामावून घ्यायला ते बिचकत नाहीत.

लंडनचा महापौर असाच ‘पाकिस्तानी’ आहे. नव्या मंत्रीमंडळातले मंत्रीसुद्धा केवळ गोरे नाहीत.

यातून ब्रिटन या देशाचा, ब्रिटीश नागरिकांच्या मनी रुजलेला उदारमतवाद तर दिसून येतोच; त्यापुढे आणखीही काही दिसून येतं. अशा बाहेरून येऊन तिथल्या झालेल्या लोकांमुळे ब्रिटनचं भलंच होतं, हे त्यांनी जाणलं आहे. उजवी गुणवत्ता असलेले लोक जगभरातून येतात, ब्रिटनला आपली भूमी मानतात आणि मग त्यांना ब्रिटनच्या भल्यातच स्वत:चं भलं दिसू लागतं, ही गोष्ट उदारमतवादाबरोबर ब्रिटीश जनतेच्या आत्मविश्वासाविषयीदेखील काहीतरी सांगून जाते. ‘ते’ येतील आणि हळूहळू त्यांची बहुसंख्या होईल आणि मग आपल्यावर ते राज्य करू लागतील आणि आपण आपल्याच घरी दुबळे, दुय्यम होऊ; असलं काही ब्रिटीश लोकांना होताना दिसत नाही. आपल्या समाजाला थोडा वेगळा रंग मिळाला, तर त्यातून आपलं काही बिघडत नाही, असं वाटण्यात त्यांचा समंजसपणा आणि स्वत:विषयीचा प्रगाढ आत्मविश्वास दिसून येतो. यात स्वार्थ आहे, पण तो चार पायऱ्या वरचा स्वार्थ आहे. वर्ण आणि धर्म यांच्या वर उठलेला स्वार्थ आहे.

यात त्यांचा गौरव आहे.

अमेरिकेची स्थिती थोडीशीच वेगळी आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश युरोपातून गेलेल्या लोकांनी काबीज केलेला, वसवलेला आणि नावारूपाला आणलेला देश आहे. शेतात काम करायला त्यांनी अफ्रिकेतून माणसं उचलून नेली आणि गुलाम केली. पिढ्यानपिढ्या तिथे राहिलेले हे एकेकाळचे आफ्रिकन लोक आता स्वत:ला ‘आफ्रिकन-अमेरिकन’ मानायला तयार नाहीत. ते म्हणू लागले आहेत, जसे गोरे लोक इटालियन-अमेरिकन किंवा आयरिश-अमेरिकन नाहीत, नुसते ‘अमेरिकन’ आहेत; तसेच आम्हीसुद्धा नुसते अमेरिकनच!

पण अमेरिकेतही उदारमतवाद रुजतो आहे. बराक ओबामा हे त्यांचे पहिले ‘काळे’ अध्यक्ष. ओबामा यांचं मधलं नाव ‘हुसेन’ असल्याचा विरोधी प्रचार जरी झाला तरी त्यामुळे ओबामांची निवड टळली नाही. तिथल्या बहुसंख्य नागरिकांना काळ्या आणि हुसेन ओबामाच्या हाती देशाची सूत्रं सोपवण्यात अडचण वाटली नाही.

हे देश उदारमतवादी खरे; पण इथून (किंवा कुठूनही) तिथे जाणाऱ्यांचं काय? ते का जातात?

ते स्वत:च्या उन्नतीसाठी जातात. तिथे गेल्यामुळे आपलं भलं होईल, कायमचं तिथे राहण्यात आपल्या मुलाबाळांचंसुद्धा हित आहे; असं ठामपणे वाटतं म्हणूनच जाणारे तिथे जातात. त्यांना गुणवत्ता हवी असते, यांना सुबत्ता. दोघांच्या गरजा, इच्छा या देशबदलातून पूर्ण होतात. दोघेही सुखी होतात. एका देशाचा ‘रंग’ थोडा बदलू लागतो पण त्यात त्या समाजाला काही वावगं वाटत नाही.

इथे थोडं थांबू.

 २.

नशीब काढण्यासाठी, जगण्यातले कष्ट कमी करण्यासाठी स्थलांतर करण्याची रीत नवी नाही. प्राचीन काळापासून हे होत आलं आहे. आणि प्राचीन काळापासून ‘कुठे’ जायचं, या प्रश्नाला एक ठळक उत्तर ‘सिंधु नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश’, म्हणजेच हिंदुस्तान (हे नावच मुळी सिंधुवरून तयार झालं आहे), हे आहे. जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी बुद्धांच्या शिकवणुकीचे ग्रंथ मिळवण्यासाठी आलेल्या चिनी फाहियानपासून एक हजार वर्षांपूर्वी आलेल्या इटालियन मार्को पोलोपर्यंत अनेकांनी हिंदुस्तानातल्या सुबत्तेची वर्णनं लिहून ठेवली आहेत. मार्को पोलोने म्हटलं आहे, ‘‘मी पॅरिस पाहिलं, मी रोम पाहिलं; पण पाटलिपुत्र या शहराइतकं भव्य शहर माझ्या पाहण्यात नाही.’’ असल्या प्रवाशांनी केलेल्या नोंदींमुळे आपल्याला त्या काळातल्या भारतीय सुबत्तेविषयी लेखी पुरावे सापडतात. या देशाच्या सुबत्तेबद्दल काय सांगावं? सातशे वर्षांपूर्वी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन पोचलेल्या पोर्तुगीज पाहुण्याला निरोप देताना तिथल्या राजाने ज्या भेटी दिल्या, त्या भेटींनी जहाज भरून गेलं आणि त्यांचं मूल्य पोर्तुगालच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त होतं!

तर या प्रदेशाची कीर्ती दूरवर पसरली होती आणि कुठून कुठून लोक इथे येत गेले. दोन मार्गांनी. एक, उत्तर सीमेवरच्या खैबर खिंडीतून. आणि दोन, समुद्रमार्गे पश्चिम किनाऱ्यावर. आपल्याला इतिहासात केवळ खैबर खिंडीतून आलेल्या ‘आक्रमकां’विषयी सांगितलं जातं. शक आले, कुषाण आले, ग्रीक आले, तुर्क आले, अफगाण आले, मोगल आले, वगैरे. आपल्याला हे सांगितलं जात नाही की भारतात अरब मुसलमान प्रथम आले ते व्यापारी म्हणून. भारतातली सर्वात जुनी मशीद महम्मद पैगंबराच्या हयातीत बांधली गेली. केरळमध्ये. हे व्यापारी आले, इथे राहिले, त्यांच्या वंशजांनी इथल्याच राजांकडे नोकऱ्या पत्करल्या, वगैरे. खैबर खिंडीतून आलेला पहिला ‘आक्रमक’ गझनीचा महमूद असावा. हा केरळातल्या व्यापाऱ्यांच्या नंतर चारशे पाचशे वर्षांनी आला.

इथे येणारे आक्रमक होते का?

एक म्हणजे, तेव्हा देश, राष्ट्र ही संकल्पना जन्मालाच आलेली नव्हती. आणि भारतात, हिंदुस्तानात तर जागोजाग वेगवेगळी राज्यं होती. चंद्रगुप्त, अशोक, अकबर, औरंगजेब अशा मोजक्या राजांनी या प्रदेशाच्या मोठ्या भागाला व्यापून टाकणारी साम्राज्यं स्थापली. एरवी आपापसात लढणारी, कधी गुण्यागोविंदाने नांदणारी वेगवेगळी राज्यंच. त्यामुळे ‘भारतावर आक्रमण केलं,’ असं म्हणणं बरोबर होणार नाही.

दुसरं असं की यातलं कोणीच परत गेलं नाही! म्हणजे, तीनशे वर्षांपूर्वी इराणच्या नादिरशहाने दिल्ली लुटून नेताना कोहिनूर नेला; ते सोडलं तर इथून बाहेर संपत्ती नेण्याचा प्रकार झाला नाही. जो आला, तो इथला झाला. सगळे इथले झाले. इथल्या मातीत मिसळले. इथल्या लोकांचे डीएनए तपासले तर या सगळ्या तथाकथित आक्रमकांच्या खुणा त्यात सापडतील. मुळात आर्य बाहेरूनच आले आहेत, हे विसरून कसं चालेल? (संघाच्या राजकारणाला ‘बाहेरून आलेले आर्य’ ही कल्पना गैरसोयीची ठरते म्हणून ते काहीतरी वेगळं मांडतात. आणि ‘आदि’वासींना वनवासी म्हणतात!)

याला ढळढळीत अपवाद अर्थात युरोपियन गोऱ्यांचा. ब्रिटिशांचा. त्यांनी या देशाला कधीही ‘आपला’ म्हटलं नाही. भारत ही त्यांची वसाहत होती आणि भारतातून त्यांनी आवाढव्य लूट नेली. इतकी, की अठराव्या शतकापर्यंत, म्हणजे जेमतेम तीनचारशे वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक व्यापारामध्ये ज्या भारताचा हिस्सा पंचवीस टक्के होता, त्या भारताला ब्रिटिशांनी भिकेला लावलं.

पण तरीही भारतात जाणे, तिथे राहणे या प्रतिष्ठेच्या गोष्टी होत्या. व्हिक्टोरिया राणीच्या गळ्यातल्या ब्रिटीश साम्राज्याच्या रत्नहारातला सर्वात देदीप्यमान हिरा भारत, हा होता.

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की हे जे कोणी या देशात येत गेले, त्यांचं इथल्या लोकांनीदेखील स्वागतच केलं! त्यांना सामावून घेतलं. अलिबागच्या किनाऱ्याला लागलेल्या ज्यू लोकांना जसं ‘शनिवार तेली’ नाव दिलं, तसं. गुण्यागोविंदाने एकत्र राहण्यात भारतीयांना प्रॉब्लेम नव्हता आणि बाहेरून आलेल्यांनी इथल्या संस्कृतीत, वैभवात भरच टाकली. इथलं संगीत, इथलं स्थापत्य, इथली राज्यव्यवस्था, इथली भाषा, इथली पाककला, सगळ्या सगळ्यामध्ये या हजारो वर्षं ‘बाहेरून’ येत गेलेल्यांची छाप आहे.

मग तेव्हाचा भारत, किंवा हा ‘सिंधु नदीच्या पलीकडचा प्रदेश’, आजच्या युरोप-अमेरिका यांच्यासारखा होता, असं म्हणायला हरकत नाही. काहीच फरक नाही. नशीब काढायला, संपत्ती मिळवायला लोक इथे येत गेले, कोणीही परत गेले नाहीत, आले ते इथलेच झाले, इथल्या लोकांच्यात संस्कृतीत मिसळून गेले; इथल्या समाजाला, संस्कृतीला विविध रंग मिळत गेले आणि अचाट वैविध्याने नटलेला हा देश तयार झाला! हेच, हेच आज युरोप-अमेरिकेत (किंवा आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला) जाणाऱ्यांचं इप्सित असतं. त्यांना इथे परत यायचं नसतं. तिथल्या समाजात मिसळून जाता जाता आता कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशांमधल्या अधिकाराच्या जागा इथून गेलेले पटकावू लागले आहेत. इथे पिढ्यानपिढ्या घालवलेल्यांसाठी जसा हा देशच त्यांचा झाला आहे; तसंच तिथे गेलेल्यांचं होताना आपण बघत आहोत. एक चूक मात्र करत आहोत. तिथे जाऊन तिथले झालेल्यांकडून या देशाशी लिप्ताळा ठेवण्याची अपेक्षा करत आहोत. जे सर्वस्वी चूक आहे. कन्हैयाचा कन्हाय झाला, तो पुन्हा कन्हैया होणार नाही. विद्याचा विडिया झाला, तो भारतात येऊन निरिक्षणं लिहील; पण त्याचं इमान तिथेच राहील.

मग रिशीला ऋषी म्हणण्याचा आटापिटा कशाला? धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असं मनाशी धरून बसलेल्यांना हे सांगायला हवं की राष्ट्र बदलण्यासाठी धर्म बदलण्याची गरज नसते! सुनक महाशय उद्या पितांबर नेसून शिवलीलामृत म्हणते झाले, तर ते इथल्या भावनाकुल लोकांना स्वस्तात पटवण्यासाठी असेल; ते त्यांच्या देशाशी असलेलं इमान एक टक्कासुद्धा सोडणार नाहीत. मोदीराज्यात अदानी जसे जगातले दोन नंबरचे श्रीमंत हस्ती झाले, तसं नारायण मूर्तींना ब्रिटनमध्ये धंदा वाढवून होता येणार नाही!

रिशी सुनक यांच्याशी सलगी अवश्य करावी, त्यांना अहमदाबादला नेऊन झोपाळ्यावरही बसवावं पण त्यातून त्यांच्या भावना कितपत हेलावतील, याची शंका आहे. इथे येऊन इथले न झालेल्यांमध्ये ब्रिटिशांचा नंबर पहिला आहे, हे लक्षात ठेवायला हवं!