Saturday, January 28, 2023

वाळवी: ‘उद्याचा’ चित्रपट?

 १.

वाळवी आवडला. अगदीच. परेश मोकाशी अपेक्षाभंग करणार नाही, असं वाटत होतं; नाही झाला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ जसे लक्ष घालून काढलेले चित्रपट होते, तसाच हासुद्धा आहे.

चार पात्रांचा चित्रपट आहे. आणखी पात्रं आहेत, पण गोष्ट त्यांची नाही. गोष्ट चार पात्रांची. एक पात्र सोडून बाकी तीन ‘नॉर्मल’ वागतात, बोलतात. चौथं पात्र काहीसं तऱ्हेवाईक आहे. तीन नॉर्मल पात्रांच्या आयुष्यात असं काहीतरी होतं ज्यामुळे त्यांना वेगळं, ॲब्नॉर्मल वागावं लागतं. पण तो एक संदर्भ सोडल्यास जगण्यातल्या सर्व प्रसंगी त्यांचे प्रतिसाद नॉर्मलच आहेत. परंतु पाय घसरावा आणि घसरण थांबवता येऊ नये, असं त्यांचं होतं. प्रॉब्लेम असा आहे की चारांपैकी कोणाशीही समरस होऊन चित्रपट बघत पुढे सरकणाऱ्या कथानकात सामील होणं प्रेक्षकाला शक्य होत नाही. तटस्थ राहून, घडणाऱ्या घटनांपासून लांब रहात त्रयस्थपणे चित्रपट बघणं अपरिहार्य ठरतं. हे बहुसंख्यांच्या पचनी पडत नसावं. कोणीतरी हिरो असतो, कोणी हिरॉइन असते (किंवा एखादं तिसरं पात्र आडून निवेदकाची भूमिका बजावतं) आणि त्याच्या वा तिच्या जागी स्वत:ला कल्पून गोष्ट छान एन्जॉय करता येते, अशी सोयीस्कर रचना ‘वाळवी’ची नाही. सर्वसाधारण प्रेक्षकासाठी ही मोठीच अडचण ठरत असावी.

चित्रपटात हिंसा आहे. पण आशयाचा भर हिंसा दाखवण्यावर नसून पात्रांच्या वर्तनावर आहे. ज्यांनी टॅरान्टिनोचे चित्रपट पाहिले असतील, त्यांना सहज होऊन जाणारी हिंसा बघताना अडचण येऊ नये. चित्रपट महोत्सवामध्ये पहायला मिळणारे चिनी, कोरियन चित्रपट तर भडक हिंसा चवीचवीने दाखवत रहातात. तसं ‘वाळवी’त काही नाही. खरं तर आजकालच्या गुन्हेगारी चित्रपटांमध्ये किंवा युद्धपटांमध्ये खूप माणसं मरत असतात. त्यांचे मृत्यू ‘घटना’ नसतात. ती मरत रहातात आणि चित्रपट पुढे सरकत रहातो. हे लक्षात घेता ‘वाळवी’मधल्या हिंसेला किमान भावनिक आक्षेप असू नये.

पण मारधाड सिनेमातली हिंसा खटकत नाही, ती करणाऱ्याविषयी प्रेक्षकाच्या मनात अढी निर्माण होत नाही, याला सज्जड कारण आहे. जेव्हा मारणारा ‘आपल्या बाजूचा’ असतो आणि तो शत्रूपक्षातल्यांचं निर्दाळण करत असतो, तेव्हा ती हिंसा क्षम्यच नाही, समर्थनीयसुद्धा असते. दसऱ्याला रावण जाळतात, त्याला हिंसेचा उत्सव कुणी म्हणत नाही! मरणारे अगदी रावण नसून नुसते चेहरा नसलेले सैनिक असतील, तरी चालतं. मग तर एका मशीनगनने डझनावारी मृत्यू घडवले तरी भावना दुखावत नाहीत. व्हीडिओ गेममध्ये हेच तर असतं. याच्या उलट प्रकारदेखील चालतो. म्हणजे खलनायकाने, त्याच्या साथीदारांनी नायकपक्षातल्या कोणाला मारणे, छळणे, इजा करणे. इथे त्या हिंसेमुळे प्रक्षोभ निर्माण होतो; पण त्या ‘अन्याया’चं क्षालन करण्याच्या निमित्ताने पुढे जी हिंसा उसळणार असते, त्यासाठी केलेली ती प्रेक्षकाच्या मनाची तयारी असते. चमत्कारिक वाटेल; पण ही हिंसा प्रक्षोभ निर्माण करत असली, तरी नैतिक पातळीवर अस्वस्थ करत नाही!

हे दोन्ही नसेल तेव्हा मात्र गोची होते. ओळखीच्या पात्राची हत्या दुसऱ्या ओळखीच्याच पात्राने केली आणि दोघांपैकी कुणीच दुष्ट, समाजकंटक, विकृत नसलं की कसा प्रतिसाद द्यायचा, हे कळत नाही. यासाठी एकतर चित्रपटासारखी कलाकृती आस्वादताना पूर्ण तटस्थ होणं जमलं पाहिजे किंवा हिंसा या मानवी कृतीकडे चिकित्सक नजरेने बघता आलं पाहिजे. या नैतिक पेचावर मात करता आली तर ‘वाळवी’ हा चित्रपट धमाल आहे. (मी पाहिला तेव्हा थिएटरात पन्नासेक प्रेक्षक होते आणि त्यातले बहुसंख्य वेळोवेळी खदाखदा हसत होते.)

चित्रपटाचं नाव अगदी यथार्थ आहे, असं चित्रपट संपताना अवश्य वाटतं; पण हे बरोबर आहे का? संपताना काय वाटतं, याचा उपयोग काय? पुस्तकाचं मुखपृष्ठ, बातमीचा मथळा यांनी वाचकाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. तसं झालं तरच बातमी, पुस्तक वाचलं जाणार. आणि वाचून झाल्यावर त्याबद्दल बरंवाईट मत बनणार. ‘वाळवी’ या नावामधून प्रेक्षक आकर्षिला जात असेल, असं वाटत नाही.

२.

‘वाळवी’ बघताना ‘अंदाधुन’ची आठवण आली. एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि एक नाट्य वेगाने उलगडताना गुंतागुंत वाढत जाते. ‘अंदाधुन’ इतकी गुंतागुंत ‘वाळवी’त नाही. ‘वाळवी’ ची पटकथासुद्धा ‘अंदाधुन’ इतकी वेगवान नाही. पण घटना पटापट समोर मांडत त्यांच्यात प्रेक्षकाला खिळवून पुढे काय होणार, या प्रश्नाच्या गुंत्यात त्याला अडकवण्याचं तत्त्व तेच आहे. अशा वेळी ‘अमुक ठिकाणी तपशील चोख नाही, तमुक बारकावा चुकीचा आहे’; असे आक्षेप इथेही घेणं बरोबर नाही. दिग्दर्शक जे मांडतो आहेत, त्यानुसार पुढे जात गोष्टीची मजा घेण्यातच सिनेमाची गंमत आहे. ‘वाळवी’ची पटकथा ‘वॉटरटाइट’ नाही. काढायचीच तर खुसपटं काढता येतील. पण ते मुद्याला सोडून असेल. गोष्ट रहस्याची नाही, गोष्ट प्रेमाची नाही, नवशिक्या गुन्हेगारांची नाही. गोष्ट एका कृतीमुळे अटळ घटनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणसांची आहे. ती जर गंभीरपणे मांडली असती, तर सगळे तपशील, बारकावे महत्त्वाचे ठरले असते आणि त्यांच्या सूक्ष्म तपासणीला सामोरं जाणं चित्रपटाला भाग पडलं असतं. पण जे नाही, त्याची बळजबरी कशाला? चित्रपटाची मांडणी खास परेशटाइप क्रेझी ह्यूमरची आहे. इथे त्या ह्यूमरचा रंग गडद आहे, एवढंच. जे आहे तेच बघावं आणि त्यातच चित्रपटाचं गमक शोधावं.

चित्रपटातले संवाद विशेष लक्षणीय आहेत. म्हणजे, एखाद्या प्रसंगातलं नाट्य अधोरेखित करणारे आहेत. या चटपटीत संवादांविना प्रसंग कदाचित उठावदार झाले नसते. शब्दांमुळे नाट्याला धार येते! आणि असं असूनही हा ‘बोलपट’ नाही. बडबड करत नाही. एडिटिंगसुद्धा सीन रेंगाळू देत नाही. पटकथा खुलासे करत बसत नाही. यामुळे काही प्रेक्षकांचा आकलनाचा गोंधळ उडून नेमकं काय चाललं आहे, हेच कळत नाही, असं होऊ शकतं. पण त्यामुळे आस्वादाला बाधा येत नाही. (फार तर चित्रपट पुन्हा बघण्याची इच्छा होईल. ते चांगलंच की!)

चित्रपटात गाणं नाही, हे थिएटरमधून बाहेर पडताना आठवतं. म्हणजेच गाणं असतं, तर व्यत्यय आला असता! पार्श्वसंगीतसुद्धा प्रसंगांना उठाव देण्यापुरतं आहे. चित्रपटाची ‘थीम सांगण्या’चा अविर्भाव त्यात नाही. पार्श्वसंगीताची पट्टीदेखील वरची लागलेली नाही आणि संगीतामुळे घटना, संवाद यांच्यापासून लक्ष विचलित होत नाही.

अभिनय हे ‘वाळवी’चं खास अंग. चित्रपटात जरी एकही प्रसंग वास्तवाशी, संभाव्यतेशी फारकत घेणारा नसला तरी कथानकाचे पाय सर्ववेळ जमिनीला लागलेले नाहीत. अशा वेळी अभिनयाची जातकुळी निश्चित करण्याला महत्त्व येतं. यात शिवानी सुर्वे हिने रंगवलेलं पात्र सर्वात ‘स्मार्ट’ आहे, लेखनातच तिला लक्षवेधी वन लायनर देण्यात आले आहेत.  तिचा वावर, तिची नजर आणि सर्वात भारी तिचे उद्‌गार, यांनी एकेक प्रसंग जिवंत होतात. कथानक पुढे नेण्याला या पात्राचा सर्वात मोठा हातभार लागतो. हिच्या खालोखाल अनिता दाते. जे घडतं, त्याला हीसुद्धा कारणीभूत आहे. पण अनिताचे सीन्स तुकड्या तुकड्यात येतात. पण त्या तुकड्यांमध्ये तिच्याशी संबंध येणाऱ्यांच्या जगण्याला वळण देण्याची तिची क्षमता लक्षात येते. शिवानीचं पात्र आणि अनिताचं पात्र, हे या चित्रपटाल्या पटकथेतले दोन ध्रुव आहेत. किंवा दोन चाकं आहेत. बिचारे दोन पुरुष त्या चाकांच्या बेलगाम गतीत भिरभिरत जातात.

चित्रपट बघताना हसू येत असलं तरी तो काही लॉरेल-हार्डीचा निरागस विनोद नाही. तो चार्ली चाप्लिनचा कारुण्याची खोली असलेला विनोदही नाही. किंवा आचरट अविर्भाव आणि पडापड यांमधून रंगणारी स्लॅपस्टिक कॉमेडीसुद्धा नाही. जे समोर येतं, त्यातली भीषणता ‘एका थ्रिलरमधला थरार’ यात गुंडाळली जाऊ नये; ती भीषणता समोर येणाऱ्या घटनांमध्ये नसून तुमच्या आमच्या सारख्या माणसांच्या मनात आहे, हे ठसवण्यासाठी योजलेलं माध्यम म्हणून तो विनोद आहे. स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे यांनी त्यांच्या भूमिकांचं बेअरिंग चांगलं सांभाळलं आहे. स्वप्निलची चाल आणि सुबोधचा एकूण वावर पात्रांचा नॉर्मलपणा ठसवत रहातो. घटना गंभीर पण माणसं सर्वसाधारण, या विरोधाचं भान स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे या दोघांच्या वावरात आहे. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शकाचं!


 

‘वाळवी’ हा चित्रपट इतिहासात स्थान बनवून बसणारा चित्रपट नाही. त्यात तांत्रिक कमकुवतपणा आहे, प्रेक्षकाला अंतर्मुख करून टाकणारा, हादरवून टाकणारा अनुभव नाही, पात्रांपासून दूर नेताना कुठल्या दाहक सत्याचं निकटदर्शन देण्याचा अविर्भाव नाही. पण जे नाही, त्यापेक्षा जे आहे, त्याकडे बघता ‘वाळवी’ हा चित्रपट नि:संशय लक्षणीय आहे. परेश मोकाशी या दिग्दर्शकाच्या एकूण कलानिर्मितीत सकारात्मक भर टाकणारा आहे. तो बघितला तर उद्या कितीतरी निमित्ताने होणाऱ्या चर्चेत त्याचा उल्लेख करता येईल, त्यातले प्रसंग आठवून सांगावेसे वाटतील.

३.

आता थोडं या लिखाणाच्या शीर्षकाविषयी.

याला ‘उद्याचा सिनेमा’ असं का म्हणायचं?

स्वानुभवापासून सुरुवात करतो. आमच्या जुन्या घरी ज्या सुताराने उपलब्ध जागेबरहुकूम फर्निचर बनवून दिलं; तो अगदी नम्र, हळू आवाजात बोलणारा, लाजाळू म्हणावा असा तरुण पुरुष होता. आमच्या घराबरोबर त्याने  परिचयातल्या कितीतरी घरी असंच फर्निचर बनवून दिलं. पूर्ण विश्वासू माणूस. त्याच्यावर घर सोपवून बाहेर जायला कोणाला काही वाटलं नाही. त्यामुळे त्याने त्याच्या बायकोचा खून केला, ही गोष्ट पचवायला सर्वांना जड गेलं. बायकोचा खून करून त्याने तिचा मुडदा स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या खाली लपवण्याचा प्रयत्न केला. पण ते उघडकीला आलं आणि तो काही वर्षं तुरुंगात गेला. आमच्यातला एक जण त्याला अगोदर खटला चालू असताना आणि नंतर तुरुंगात भेटूनही आला. त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आणला; त्याचा वावर, त्याचं बोलणं यांची आठवण काढली की हा माणूस खून करू शकेल, हे खरंच वाटत नाही. पण खून तर त्याने केलाच. त्याचा साधाभोळा चेहरा आणि त्याने रागाच्या भरात केलेला बायकोचा खून या दोन गोष्टी एकत्र आणताना मानवी मनाच्या आकलनाच्या कल्पना थोड्या ताणाव्या लागल्या.

तो तुरुंगातून बाहेर आला आणि गावी गेला याला आता खूप वर्षं झाली. आता खून करून प्रेताचे तुकडे करून बॅगेत भरले आणि दूर जंगलात टाकून दिले (किंवा तंदूरमध्ये जाळून टाकले, किंवा आणखी काही) अशा बातम्या पेपरात वाचण्याची नजरेला सवय झाली. असं करणारे भाषा, धर्म, शिक्षण, कमाई असल्या कुठल्याच रकान्यात सोयीस्करपणे मावत आहेत, असं नाही. (मारणारा मुसलमान असल्यावर घटनेला धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी वापरण्याचं हिडीस राजकारण सोडून देऊ.) मागे मुंबईत असा प्रकार झाला तेव्हा माझ्या संपर्कातले काही जण त्यांना ओळखणारे निघाले. ते हादरले होते. नीट नोकरी, व्यवसाय करणारे, सर्व विषयांवर आपल्यासारख्याच प्रतिक्रिया देणारे, आपल्यासारखेच दिसणारे वागणारे हे लोक असलं काही कसं करू शकतात, हे त्यांना उमजत नव्हतं.

‘वाळवी’मध्येसुद्धा एकेका पात्राच्या स्वभावातली सामान्य वैशिष्ट्यं जेव्हा निस्संकोच व्यक्त होतात तेव्हा त्यातून क्षणिक हसू आलं तरी लगेच दचकायला होतं. प्रसंग काय आणि हे आपले नॉर्मल वागताहेत! अशा भयंकर वेळी सगळी सगळी अवधानं विसरली जायला हवीत. अंगावर येऊन कोसळलेल्या दारुण संकटानेच मन भरून जायला हवं. थरकाप उडायला हवा. पण त्या पात्रांचं तसं काहीच होत नाही. ते अस्वस्थ होतात, संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करतात; पण ते करताना त्यांची डोकी ठिकाणावर असतात. त्यांच्या विचारप्रक्रियेतलं लॉजिक डळमळीत होत नाही. चित्रपटाच्या प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं नाही आणि सारासार विवेक जागा ठेवला, तर चित्रपटाचा आस्वाद कठीण होईल.

पण अगदी नॉर्मल भासणारे असलं कृत्य करतात, हे तर वास्तव आहे! इतकंच नाही, गर्दीचं रूपांतर झुंडीत करून त्यांना घाऊक हिंसा करण्यासाठी उत्तेजन मिळताना आपण पहातो आहोत. अमेरिकेत कुणीतरी माथेफिरू उठतो आणि ऑटोमॅटिक बंदूक चालवून डझनभर निष्पाप जीवांची हत्या करतो आणि अशा घटना तिथे अपवादात्मक म्हणता येणार नाहीत, इतक्या सातत्याने घडत असतात. आपल्या देशाची स्थिती फार वेगळी नाही. झुंडींनी केलेली हिंसा तर आपल्याला आता धक्कादायकसुद्धा वाटत नाही. आणि मग भीती वाटू लागते की सामाजिक हिंसेला तर मान्यता मिळते आहे; मग त्याच प्रकारची हिंसा व्यक्तिगत पातळीवर होण्याकडे प्रवृत्ती व्हायला अजून किती वेळ आहे? 

चित्रपट ही आधुनिक लोककला आहे. समाजात जे घडतं, त्याचे पडसाद चित्रपटात लगेच पडतात. ‘वाळवी’ बघून जर मराठी प्रेक्षकाला अस्वस्थ वाटत असेल, ‘हे असलं तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्यात इतक्या सहजतेने होताना दाखवता कामा नये,’ अशी प्रतिक्रिया त्याच्या मनात उमटत असेल; तर हा चित्रपट सामाजिक भावस्थितीचं प्रतिबिंब दाखवत नाही, असं म्हणणं भाग आहे. पण तेवढंच नाही. तो भविष्याची चाहूल घेतो आहे का? आज सामाजिक हिंसा आपण मान्य केली आहे; उद्या तशीच हिंसा वैयक्तिक पातळीवर होऊ लागली तर आपण त्या स्थितीचा असाच सहज स्वीकार करू का? त्या ‘उद्या’चा आरसा तर ‘वाळवी’ आपल्यासमोर धरत नाही? वाळवी समाजवास्तूलाच तर लागलेली नाही?

 

‘वाळवी’ या चित्रपटाचा रोख हे प्रश्न प्रेक्षकापुढे उभे करण्याकडे आहे, असं जाणवत नाही. पण सध्याच्या सामाजिक वातावरणाकडे काळजीने बघणाऱ्याची या प्रश्नांपासून सुटका नाही.