१.
ॲलन शॉ यांनी केलेलं मुखपृष्ठ पांढऱ्या रंगात आहे. अंकाचं, विशेषत: दिवाळी अंकाचं कव्हर पांढऱ्या रंगात नसतं. हे आहे. त्यामुळे हा अंक इतर अंकांच्या गर्दीत उठून दिसत असेल. पांढऱ्या पार्श्वभूमीवर हलक्या रंगात छोटी छोटी चित्रं आहेत. काही खरे, काही काल्पनिक प्राणी आहेत. एक मुलगा-मुलगी जोडी आहे. बरीच मजा मजा आहे. रेषेचं वळण मारिओचं नाही, तपशिलांची गर्दीसुद्धा मारिओइतकी नाही; पण चित्रात रमून जाऊन नवनवीन गंमती सापडत रहाव्यात, हे जसं मारिओच्या चित्रात होतं, तसंच इथे होतं. पांढऱ्या कॅनव्हासवरच्या जणू जलरंगातलं हे चित्र मनात प्रसन्न भाव जागवतं. ज्यांच्यासाठी हा अंक काढला आहे, त्या लहान मुलांना ते पसंत पडायला हवं.
आख्खा अंक रंगीत आहे. भरपूर चित्रं आहेत. आणि चित्रांची शैली एकसारखी नाही. कधी खडूने काढल्यासारखी, कधी ब्रशने रेखाटलेली; लहान मुलांची, ‘चाइल्ड आर्ट’ म्हणावी अशी चित्रं आहेत. मोठ्यांनी काढलेलीसुद्धा आहेत; पण त्यात ‘चित्रं बाळांच्या पसंतीसाठी आहेत,’ ही जाणीव अजिबात सुटलेली नाही. एकही चित्र वास्तव प्रमाणाला धरून नाही, ‘हुबेहूब’ नाही. प्रत्येक चित्रात भाव व्यक्त करण्याला महत्त्व आहे. चित्रांमधली सगळी पात्रं भारतीय आहेत; पण भारतातल्या भारतात किती वैविध्य आहे! ते सगळं इथे व्यक्त झालं आहे. अंक चाळताना डोळ्यात भरत आहे. पानंसुद्धा स्वच्छ पांढऱ्या कागदाची, जाड आहेत; पिवळी, न्यूजग्लेझ, न्यूजप्रिंटची नाहीत. दोनच कॉलम राखलेले आहेत, तीन कुठेही नाहीत; कवितांना पुरेशी मोकळी जागा दिलेली आहे. फाँट मोठा आहे, प्रसन्न आहे. त्यात फार प्रयोग केलेले नाहीत.
यावरून अंकाच्या मांडणीकडे लक्ष दिलेलं आहे, हे कळतं. अंक तयार करताना त्याच्या रूपाविषयी विचार झाला आहे, हे लक्षात येतं.
अंकातला मजकूरसुद्धा विचारपूर्वक निवडलेला दिसतो. संपादकीयामध्ये ‘‘कुल्फी म्हणजे ‘गंगा-जमनी तहजीब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीयपणाचा आविष्कार’’ या शब्दांमध्ये भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रेमो, नवसू, रवी, फिरोज, वनेश, राया या नावांवरून अंकात ‘आंतरभारती’ साकारली आहे, हे समजतं. इथे इतर भारतीय भाषांमधून भाषांतरित केलेल्या गोष्टी आहेत, जी ए कुलकर्णींचा बिम्म आहे, नंदा खरे यांचा अंताजी आहे, चक्क वरुण ग्रोवर हा कवी-लेखक आहे आणि पावरा भाषेतले संवादसुद्धा आहेत.
यावरून हा अंक म्हणजे एका उदात्त, ध्येयवादी दृष्टिकोनातून निघालेला बोअर प्रकार असेल, असा समज होण्याची शक्यता आहे; पण तसं नाही. जे आहे, ते रंजक आहे. बालमनाला रमवणाऱ्या, त्यांचं कुतूहल जागवणाऱ्या गोष्टी आहेत. काही त्या बालकाच्या तोंडून सांगितलेल्यादेखील आहेत. सांगणारे माधुरी पुरंदरे यांच्यापासून राजीव तांबे यांच्यापर्यंत बालवाङ्मयातले नामवंत आहेत. मोबाइलवर सुरू होणाऱ्या आणि खेळाडूला गेममध्येच खेचणाऱ्या खेळाच्या गोष्टीचं पहिलं प्रकरण आहे; तर ‘ढग मोजले आहेत का कधी?’ यात कल्पनेच्या भराऱ्या मुळीच नाहीत, असंही आहे. बालकांना करावेसे वाटतील, असे प्रयोग आहेत आणि त्याबरोबर भाषा शिकणं म्हणजे काय हेसुद्धा आहे. गोष्टीचा भाग म्हणून क्यूआर कोडचा उल्लेख असण्याइतकं वर्तमानाचं भानही आहे! इतके विविध विषय यात आहेत, की पहिल्याच अंकात एवढी उंच उडी घेतल्यावर पुढे तशी उंची सतत गाठता येईल का, असा प्रश्न पडावा!
लहान मुलांसाठीचं वांङ्मय म्हणजे निव्वळ अद्भुत गोष्टी; राजे-राण्या, उडणारा गालिचा, घोडदौड, वगैरे, असा एक समज आहे. यापेक्षा वेगळं काही असलं तरी ते मुलांना हसवणारं, त्यांची करमणूक करणारं, असंच हवं, असाही कल दिसतो. हा अंक मग त्यातला नाही, हे सांगावंसं वाटतं. मुलांना वाचनाची गोडी लावून नवनवीन विषयांची त्यांना ओळख करून देऊन, थोडं जास्त शहाणं करण्याचा उद्देश यात आहे. या अंकाकडे अगोदर पालकांनी, मोठ्या भावंडांनी लक्ष द्यायला हवं आणि अंक लहानग्यांसमोर येईल, असं बघायला हवं. तेवढं केलं की पुढचं ‘कुल्फी’ बघून घेईल, हे नक्की!
आपल्या घरातल्या बालकाने हुशार, शहाणं व्हावं असं कोणाला वाटत नाही? मग असं वाटणाऱ्या प्रत्येकाने ‘कुल्फी’ विकत घेऊन घरातल्या मुलाच्या हाती द्यावा, अशी जोरदार शिफारस मी करतो.
२.
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आम्ही मित्रांनी ‘आजचा चार्वाक’च्या अनुभवाने हुरूप येऊन ‘अबब हत्ती’ नावाचं बालकांसाठी असलेलं मासिक चालवलं होतं. चालू करताना आमच्यासमोर अमुक एका बालनियतकालिकाचं मॉडेल नव्हतं. उलट, आम्ही आमच्या विचाराने आणि उमेदीने ‘हत्ती’त अनेक प्रयोग केले. ‘अभ्यास बिभ्यास’ असा एक विभाग केला ज्यात रोजच्या जगण्याशी विज्ञान कसं, कुठे जोडलेलं आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी माध्यमातली मुलं मराठी वाचत नाहीत, परिणामी त्यांचा मराठी पर्यावरणाशी, मराठी संस्कृतीशी संबंध सैल होतो; म्हणून ‘हत्ती’त चक्क इंग्रजी गोष्टी दिल्या. शब्दकोड्यांऐवजी अंककोडी दिली, ज्यातल्या चौकोनात अक्षरं न भरता आकडे भरावे लागत आणि उभ्या आडव्या चौकोनांसाठी आकडे सुचवणारे सुगावे असत. ‘चित्रकविता’ दिली, जेथे शब्दांना जोडून चित्रं असत, ‘हत्ती’साठी भारत सासणे, दुर्गा भागवत, चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये, निखिल वागळे, नंदा खरे, रमेश रघुवंशी, विश्वनाथ खैरे अशा कितीतरी साहित्यिकांनी लिखाण केलं होतं. ‘हत्ती’त न चुकता विनोद असत, व्यंगचित्रं होती, बारीक माहिती होती, मजा होती. आमची मजा होती.
लहान मुलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती मोठी होतात. त्यामुळे ‘बालवाचकां’साठी असलेल्या नियतकालिकाला वार्षिक वर्गणीदार मिळाले तरी आजीवन सदस्य तत्त्वत:च मिळू शकत नाहीत. लहान मुलांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जशी ती मोठी होतात, तसा त्यांच्या ‘डोक्याचा आकार’ झपाट्याने बदलतो. मोठ्याचं तसं नसतं. मोठ्यांच्यासुद्धा विविध रुची असतात; पण तशा लहान मुलांनाही असतात, त्यांनादेखील विविध विषयात रस असू शकतो. पण नुकतं वाचायला शिकलेल्या बालकासाठी जोडाक्षरविरहित मजकूर तयार करावा लागतो; इथपासून बारा चौदा वय झालेल्यांचं बाहेरच्या जगाविषयी कुतूहल जागं झालेलं असतं. त्यांना एका बाजूने मोठं होण्याची घाई असते आणि त्यातल्या काही पैलूंची घोर भीतीदेखील वाटू लागलेली असते. कायद्याच्या नजरेतून तर अठरा वर्षांखालचे ते सगळे बाल. हा विस्तार फार ऐसपैस रुंद आहे. त्यामुळे ‘लहान मुलांसाठी नियतकालिक’ असं म्हणून पूर्ण अर्थबोध होत नाही. कोणती लहान मुलं? किती वयाची? कोणत्या सांस्कृतिक वातावरणातून आलेली? कोणत्या माध्यमातून शिकणारी? अशा प्रश्नांची उत्तरं निदान स्वत:ला निश्चित माहीत असल्याशिवाय बालांसाठी काही साहित्य निर्माणच करता येणार नाही.
ही समस्या नुसत्या साहित्यसंकलनाची, साहित्यनिर्मितीची नाही; मार्केटिंगचीसुद्धा आहे. टार्गेट वाचकसमाजानुसार नियतकालिकाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरेल. जाहिराती मिळवण्याचा रोख ठरेल. इतकंच नाही, अंकातल्या मजकुराची मांडणी ठरेल, चित्रं ठरतील, रंगसुद्धा ठरतील. अंकाची ‘भाषा’ (म्हणजे मराठी/इंग्रजी नव्हे; सोपी/विचारात पाडणारी), परिसर (सांस्कृतिक, भौगोलिक, भाषिक), संकल्पना (कोणत्या संकल्पनांशी खेळायचं, कोणत्या संकल्पनांचा परिचय करून द्यायचा), लॉजिक (गणिताला किती जागा, किती महत्त्व? वाचकाच्या डोक्याला किती ताण द्यायचा?) या घटकांचा विचार सदा जागा हवा आणि असला उपक्रम सुरू करण्याअगोदर पूर्ण झालेला हवा.
आणि या सगळ्याचा एक सबगोलंकार लाडू करण्याइतकं घातक काही नाही. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या हट्टाची परिणती सगळ्यांनाच खट्टू करण्यात होऊ शकेल.
‘अबब हत्ती’ काढणं ही आमची हौस होती. चार वर्षं काढला. जाहिराती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो दुबळा होता. अंक विकणे, वसुली करणे, अंक वेळेवर काढणे, यातल्या कशाकडे आम्ही द्यायला हवं होतं तेवढं लक्ष दिलं नाही. पण अगोदर म्हटल्याप्रमाणे ती आमची हौस होती. आमचे पैसे होते. मजा केली, हौस भागवली. नो रिग्रेट्स!
समोर ‘कुल्फी’ आल्यावर हे सगळं पुन्हा जागं झालं. ‘कुल्फी’ची निर्मितीमूल्यं देखणी आहेत. विषयांची निवड त्याहून चिकित्सक आहे. त्यावरून ‘कुल्फी’ ही निव्वळ कोणाची तरी हौस आहे, असं वाटत नाही. एका बाजूने सकस साहित्य देत, बालकांवर सुसंकार करत त्यांचं रंजन करावं; असा गंभीर, सज्जड विचार ‘कुल्फी’मागे जाणवतो. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी जाणवते. मराठी सोडून इतर भाषांमध्ये कोणाचा काय अनुभव आहे, याचा अभ्यास झाला असेल; मराठीतच सध्या बालवाचकाची मन:स्थिती - त्याहीपेक्षा बालकांच्या मातापित्यांची मन:स्थिती - काय आहे, कागदावर लिहिलेलं वाचण्यात एकूण समाजाला किती रस उरला आहे, अशा अनेकानेक पैलूंचासुद्धा विचार झाला असेल. कुणी नवीन काही करू गेलं, त्यामागे बांधिलकी असल्याचं जाणवलं; की दुसरं काही नाही तरी वडिलकीच्या नात्याने उत्तेजन द्यावंसं वाटतं. ‘कुल्फी’ या पायरीच्या वर आहे, असं वाटतं. म्हणून उत्तेजनाच्या पुढे जाणं सुचतं.
No comments:
Post a Comment