Wednesday, December 26, 2012

स्पेशलवाले


माझा जन्म मुंबईच्या गिरणगावात झाला आणि सोळा वर्षांचा होईपर्यंत मी तिथे राहिलो, वाढलो. त्यामुळे, नवरात्र, गणपती यांसारख्या सार्वजनिक उत्सवातला कानठळ्या बसवणारा आवाज; तसंच गोविंदा, कबड्डी सामने यांसारख्या, नंतर सार्‍या मुंबईचीच ओळख बनलेल्या प्रथा-संस्था यांच्याशी तिथे माझी चांगली ओळख झाली. आणखी एक ’संस्था’ मला तिथे परिचयाची झाली, जिची जान पहचान इतर मुंबईकरांना किती आहे वा होती, मला कल्पना नाही. इतकंच नाही, गिरणगाव आणि नंतर मुंबई शहर सोडून दुसरीकडे रहायला गेल्यावर मलाच ती परकी झाल्यासारखी आहे. ती ’संस्था’ म्हणजे स्पेशलवाले. त्यांच्याकडे मी किंवा माझ्या आसपासच्या कोणी कधी पोलीस खात्याचा भाग म्हणून बघितल्याचं आठवत नाही. ते तसे होते, हे कालांतराने तर्कातून सुचलं. माझ्या मनात तेव्हा त्यांना स्वतंत्र अस्तित्व होतं. आणि ग्लॅमरसुद्धा. त्यांच्या काही आठवणी आहेत, त्या सांगतो.

लहान असताना, म्हणजे शाळेत जाण्याच्या काळात ते दुरून दिसत. त्यांच्या जवळ जाण्याची वेळ कधी आली नाही. मला तशी लहान असल्यापासूनच रात्री बाहेर हिंडण्याची हौस. चाळीत आमच्या मजल्यावर अनेकांकडे गणपती येत असे. बहुतेकांकडचा गौरीबरोबर जाणारा. शेवटच्या रात्री सामुदायिक जागरण असे. त्या काळात आणि त्या वयात मध्यरात्रीचे बारा म्हणजे डोक्यावरून पाणी. ते वाजून गेले म्हणजे जागरण ’संपन्न झालं’. झब्बू खेळत बसलेली मोठी मंडळी झोपायला गेली, की आम्ही दोघे तिघे बाहेर पडायचो. त्यात जबाबदार मानला जाणारा मी. पण त्या प्रसंगी आमचा लीडर रमेश. रस्त्यावर सामसूम असे. दहा एक मिनिटांनी एखादी गाडी त्या अतिरुंद आंबेडकर रोडने जात असे. मी ऐन रस्त्याच्या मध्ये आडवा झोपत असे. दिवसाउजेडी खुळ्यासारखं वाटणारं आणि अशक्यही असलेलं ते कृत्य करण्यात मला सुख होत असे. एखादी सिगारेट किंवा कोणाचकडे पैसे नसतील तर सिगरेटचं थोटुक ओढ; पहाटेपूर्वीच्या काळोखात पाव वाटत फिरणार्‍या तीन चाकी गाडीवाल्याची नजर चुकवून पावाची चोरी कर; नाही तर नुसतंच निर्मनुष्य रस्त्यावरून दादर टीटी ते लालबाग फीर, हे उद्योग अत्यंत रोमँटिक वाटून घेत आम्ही करत असू. आम्ही पांढरपेशांची बावळट मुलं. रमेश तसा नव्हता. त्याची नजर चोहीकडे फिरत असे. आणि ’स्पेशलवाले’ असं तो पुटपुटला की आम्ही धूम ठोकत असू.
तेव्हा कळलंही नाही, पण माझ्या मनात स्पेशलवाल्यांची एक प्रतिमा रुजली. आणि हे माझ्या पुष्कळ उशीरा लक्षात आलं. खूप नंतर, नोकरी लागून जगाची, जगण्याची, मुंबईची यथायोग्य ओळख पाळख झाल्यानंतर. एकदा आम्ही ग्रँट रोड - चर्नी रोड परिसरात होतो आणि शेवटची ट्रेन चुकली. (म्हणजे रात्रीचा एक वाजून गेला होता.) दोन पर्याय होते. एक, बसने घरी जाणे. घरी जायला बस रात्रभर होती. पण आमच्यातल्या काहींना मरणाची झोप येत होती. काही दोन पावलं सरळ चालण्याच्या स्थितीत नव्हते. मग आम्ही चौपाटी गाठली आणि वाळूत विसावलो. मी आणि एक जण शेवटची सिगारेट ओढत होतो आणि मला दुरून दोघे जण डुलत डुलत आमच्या दिशेने येताना दिसले.
"उठ, चल." त्यांच्याकडे खूण करत मी सोबत्याला म्हणालो.
"का? ते आपल्याकडे येताहेत कशावरून? आणि आले तर काय झालं?" तो म्हणाला.
"एक तर इथे झोपलेल्यांना उभं रहा सांगितलं तरी रहाता येणार नाही आहे. दुसरं म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला वास येतो आहे. त्यांना इथपर्यंत यायला लावण्यापेक्षा आपण पुढे जाण्यात शहाणपणा आहे." मी.
सोबती गिरणगावात वाढलेला नव्हता. गिरगावकरसुद्धा नव्हता. "कोण आहेत ते?" तो आश्चर्याने उद्‌गारला.
"स्पेशलवाले." मी उत्तरलो.
त्याच्या "म्हणजे?"कडे दुर्लक्ष करून मी त्याला उठवलं आणि पुढे झालो. ते थांबले. एकाने तंबाखू काढून तळव्यावर चोळायला सुरुवात केली. त्यांनी निवांतपणे आमची चौकशी केली. कोण, कुठून आलात, इथे काय करता, वगैरे. अशा वेळी आपली पांढरपेशी बोली म्हणजे अमोघ इन्शुरन्स आहे, हे मला जाणवलं. तोंडचा वास लपवणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात मीच जीभ जड न झालेला होतो.
आम्ही चोर, भिकारी नाही याची खात्री पटल्यावर एक म्हणाला, "इथे सुनसान जागेत झोपताय. कोण आलं लुटायला, तर काय कराल? हत्यार आहे का काही जवळ? की नुसता दीड वीत बांबू?"
मी ओशाळा हसलो.
"जा, तिथे टिळकापाशी झोपा. तिथे आमची माणसं असतात. पहिल्या गाडीने जा घरच्याला."
मी आडवे असलेल्यांच्या शिव्या खात त्यांना ओढत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी घेऊन गेलो. तिथे भगभगीत उजेड होता. पण इलाज नव्हता. स्पेशलवाल्यांची मर्जी बिघडवण्याची माझी टाप नव्हती.

याच्या अगोदरची एक गोष्ट. माहीमला, कोकण नगरमध्ये रहात असताना दिवाळीनिमित्त नाटकं, वगैरे बसवली जात. सोसायटीच्याच हॉलमध्ये नाटकाची प्रॅक्टीस चाले. प्रॅक्टीस संपली, की वडीलधारे घरी जात. दम मारायला गेटबाहेर जाऊन थोड्या गप्पा करणे, असा आमचा तरुणांचा शिरस्ता होता. एकदा असेच अर्ध्या चड्डीतले दोघे आले. एकाकडे सायकल होती. त्याने आमच्याकडे लाइट मागितला. कोणी तरी नम्रपणे दिला. त्यांची ओळख कोणीच कोणाला सांगावी लागली नाही. इतक्यात गल्लीतून एक जण एकटाच आला. सायकलवाल्याच्या ’शिळोप्याच्या’ चौकशा चालल्या होत्या: नाटक असतं का सोसायटीचं? वा. कोण बसवतं? वा. कुठलं नाटक आहे या वर्षी? वगैरे. चालत येणारा जवळ, अगदी रस्त्याच्या पलिकडल्या बाजूला समोर येईपर्यंत या दोघांचं जणू दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. पण मला खात्री होती, तो असा सुखासुखी जाऊ शकत नाही. अगदी जवळ आल्यावर एकाने त्याला "ए!" म्हटलं.
तो थांबला. पण रस्ता ओलांडून जवळ आला नाही.
या दोघातला एक जण डुलत डुलत पलिकडे गेला.
"कुठून आला?"
"कामावरून."
"कंपनीचं कार्ड आहे?"
"नाही. टेम्परवारी आहे."
"रेल्वेचा पास?"
"--- "
काय होतंय कळायच्या आत त्याच्या फाडकन कानाखाली बसली. तो थेट आडवाच झाला. मला वाटलं, बेशुद्ध पडणार. कसला? तो कळवळला देखील नाही. स्पेशलवाल्यांपैकी आमच्या जवळ जो उभा राहिला होता, तो शांतपणे आम्हाला म्हणाला, "बरंय. जास्त वेळ बाहेर काढू नका. रात्र खूप झालीय."
त्याला घेऊन दोघे गेले. आम्ही गप्पा संपवून निमूट आपापल्या घरी परतलो. आमच्यात एक दोघे होते, ज्यांचे मित्र पोलीस होते. कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनात त्यांची ओळख होती, वटही होती. पण स्पेशलवाल्याशी मैत्री असल्याचं सांगणारा कुणी भेटला नाही. स्वतःकडे कुठलं ना कुठलं आयडेंटिटी कार्ड असणं किती मोलाचं आहे, हे माझ्या लक्षात आलं. आयडेंटिटी कार्ड तुम्हाला समाजात ठाक ठीक बसवतं. तुम्ही ’नागरीक’ असण्यावर शिक्का मारतं. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, की नोकरदार की नुसतेच किरकोळ व्यावसायिक; रेल्वेचा पास चालतो. कारण तुम्ही नियमितपणे कुठे तरी येजा करत असता. जगाच्या आर्थिक व्यवहारात तुमचा सहभाग असतो. म्हणजे जगात कायदा आणि सुव्यवस्था नांदण्यात तुमचे हितसंबंध गुंतलेले असतात.
तुम्ही ’समाजकंटक’ नसता. ’जनता’ असता.

एकदा अचानक मी आणि एक मित्र यांनी ठरवलं, हाइकला जायचं. तेव्हा मी चुनाभट्टीला रहात होतो. पुन्हा शेवटची कर्जत लोकल गेली होती. आम्ही चुनाभट्टीलाच होतो. चालत सायनला आलो. सर्कलमध्ये उभे राहिलो. अनुभव असा, की रात्री मुंबईबाहेर जाणार्‍या ट्रक्सची रीघ लागलेली असते आणि जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात, त्यातला एक थांबून लिफ्ट मिळायला. त्या दिवशी मात्र अर्धा तास उलटला तरी एक ट्रक थांबायचं नाव घेईना! वेळ नुसताच चालला होता. पावसाची चिन्हं होती आणि आम्ही मुंबईतच अडकलो होतो.
स्पेशलवाले आले. स्पेशलवाला कधीही एकटा नसतो. जोडी असते. आमच्याशी बोलून त्यांनी खात्री करून घेतली, की आम्ही कसल्या कुहेतूने निर्मनुष्य रस्त्यावर उभे नाही आहोत. मग एक म्हणाला, "इथे गेल्या आठवड्यात दोघांनी हात दाखवून ट्रक थांबवला आणि लुटला. तेव्हापासून इथे ट्रकवाला थांबत नाही. या,"
असं म्हणून ते आम्हाला थोडं पुढे घेऊन गेले. त्यांनी हात केल्यावर पहिलाच ट्रक थांबला. त्यात त्यांनी आम्हाला बसवून दिलं.

यातल्या एकाही प्रसंगी मी किंवा इतर कोणी स्पेशलवाल्याकडे नाही त्याचं ओळखपत्र मागितलं की त्यांनी दाखवलं. त्यांनी सुरुवातच दमदाटीने केलीय, असंही मला आठवत नाही. मला त्यांची भीतीही वाटली नाही. पुढची घटना स्पेशलवाल्यांची नाही, सरळ सरळ पोलिसांची आहे. सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात नवी, म्हणजे तीस वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझं घर होतं बोरिवलीला. मस्त पार्टी करून आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. प्यायल्यानंतर ताबडतोब झोपी जायचं असेल, तर कशाला प्यायची? झोप काय, आपल्याला अशीही येतेच! पोटात जेवण आणि डोक्यात मस्त नशा घेऊन रस्त्याने वा आडवाटेने वा मनुष्यवस्तीबाहेर रानात मुक्‍त फिरलं कीच पिण्याचं चीज होतं, असं तेव्हाचं ठाम तत्त्व होतं. तर आम्ही फिरत फिरत फारच दूर, रस्ता संपून जेटी येते, तिथे गेलो. मुंबईच संपली! पुढे पाणी. पलिकडे जायचं असेल, तर होडी किंवा फेरीबोट. वारेवा. बोरिवली छानच प्रदेश आहे; असे सुखी होत आम्ही आसमंतात चिटपाखरू नाही, तिथे पार टोकाला बसून होतो.
जीप आली. आमच्यावर हेडलाइट्सचा झोत टाकून इंजीन बंद करून लांब रस्त्यावरच उभी राहिली. जीप पोलिसांची आहे, हे कळायला डिटेक्टिव असण्याची गरज नव्हती.
मी उठलो. जीपजवळ गेलो. वर सांगितलेली ’इन्शुरन्स’ची ढाल परजली. ती कामी आली. पण जीपमधला साहेब खमक्या होता. म्हणाला, "या, बसा जीपमध्ये!"
आलिया भोगासी असावे सादर. सगळे - म्हणजे चार जण - जीपमध्ये चढलो. मग जीप बोरिवलीभर फिरली. वेस्ट संपवून फाटकातून (तेव्हा ब्रिज झाले नव्हते) ईस्टला गेली. मधे मधे थांबत होती. थांबली, की काळोखातून एक पोलीस अवतरत असे. जीपमधल्या साहेबाला कडक सलाम ठोकून एक डायरी पुढे करत असे. डायरीत सही करता करता साहेब जुजुबी चौकशा करी. असे काही तास फिरत शेवटी आम्ही एकदाचे बोरिवली पोलीस स्टेशनात पोचलो. पोलीस स्टेशनच्या आवारात शिरून जीप थांबली.
साहेब उतरला आणि आमच्याकडे ढुंकूनही न बघता आत चालता झाला! आता? "जा!" असा हुकूम झाल्याशिवाय जायचं की नाही? "जाऊ का?" असं विचारलं, तर परिणाम ठीक होईल की होणार नाही? काही कळेना. आम्ही एक बाकडं शोधलं आणि त्यावर जाऊन बसलो. सकाळ व्हायला फार उशीर नव्हता. लख्ख उजाडलं तसं, परवानगी विचारण्याच्या अविर्भावात जीपमध्ये होते त्यातल्या एका पोलिसाला म्हणालो, "जातो!"
आणि गेलो.

’दारू प्यायली म्हणजे आपण काही पाप केलेलं नाही. अपरात्री रस्त्यात फिरताना आपण धतिंगही करत नाही आहोत. आपल्यातल्या काही जणांची जीभ जड झालीय आणि पावलं डगमगताहेत, इतकंच; आपण जनतेचाच एक भाग आहोत. आपलंच रक्षण करण्याचं कर्तव्य पार पाडण्याच्या क्रियेत असणार्‍या पोलिसांची आणि आपली टक्कर होते आहे,’ या तर्काला धरून मी निर्भय राहिलो. गुन्हेगार शोधणार्‍या पोलिसी नजरेच्या मध्ये जरी आम्ही आलो, तरी अखेरीस या पोलिसांचं स्थान आपण आणि गुन्हेगार यांच्या मध्ये आहे, असाच बुद्धीचा निर्णय झाला. रात्रीबेरात्री ही मुंबई चोराचिलटांच्या हवाली नसते, तिथे कायद्याच्या रक्षकांची गस्त असते; असा विश्वास वाटला.
तो विश्वास मी अजून धरून ठेवला आहे. मी उत्तर प्रदेशातल्या लहान शहरांमध्ये पाच वर्षं राहिलो आहे. दिल्लीतसुद्धा रात्री हिंडलो आहे. मुंबईत गुन्हेगारांना पोलिसांची दहशत वाटत असावी, असा माझा समज होता. उत्तरेत एकूणच प्रजेला पोलिसांची दहशत असते, असं मला तिथल्या सहकार्‍यांनी सांगितलं. उत्तरेत पोलिसांसमोर पांढरपेशेपणाचा विमा कुचकामी ठरतो, असं ते ठामपणे म्हणत. ’जनता’ या शब्दापुढे ’जनार्दन’ हा शब्द आठवतो. ’प्रजा’ या शब्दा‌आधी ’राजा’ हा शब्द असणार, असं मनात येतं. दिल्लीतलं बलात्कार प्रकरण आणि त्याविषयीच्या संतापाचं तेल पोलिसांवर काढण्याचा प्रकार, यातून स्पेशलवाल्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

Saturday, December 8, 2012

सिनेमा असाही असतो!

       गेली ४२ वर्षं ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’चं आयोजन होत आहे. २००४ सालापासून तो गोव्यात स्थिरावला आहे. या वर्षी मी गेलो. आणि फेस्टिवलच्या प्रेमात पडलो. तिथून मी महाराष्ट्र टाइम्ससाठी काही वृत्तांत पाठवले. शेवटचा तिथल्याच ’गोवादूत’ या वर्तमानपत्राला पाठवला. त्यांनी ते कधी जसेच्या तसे, कधी काटछाट करून छापले. अजून खूप लिहावंसं वाटत आहे. बघू. तोपर्यंत त्या वृत्तांतांवर योग्य ते संस्करण करून इथे देतो आहे. अनेक वृत्तांतांचा जुडगा असल्यामुळे अंमळ लांब झाला आहे. उभ्या उड्या मारत वाचा. कुठे रेंगाळावंसं वाटलं, तर रेंगाळा. दहा दिवसात जागतिक सिनेमाने माझ्यावर उत्कट अभिव्यक्‍तीचा धबधबा ओतला. त्यात चिंब भिजून निमूट रहाणं मला शक्य नाही. म्हणून हा उपद्‌व्याप.


फिल्म फेस्टिवलचं वातावरण कसं असतं? फेस्टिवल मुंबईचा असो, की पणजीचा; संपर्काची आणि उद्‍घोषणांची भाषा इंग्रजी असते. गोव्यात कोंकणीत गाणी आणि संभाषणं ऐकू आली; पण इंग्रजीच्या प्रमाणात कमीच. गळ्यात फेस्टिवलचा बॅज घालून फिरणार्‍यांच्या चेहेर्‍यावर भाव असे, की आम्हीच काय ते जगणारे, जीवन उपभोगणारे आणि बाहेर रस्त्यावर दिसतात ते लोक म्हणजे झाडं आणि फर्निचरप्रमाणे पार्श्वभूमीचा भाग. जणू जगन्नियंत्याने चित्र काढलंय ते आमचं आणि बाकीचे म्हणजे निव्वळ कॅनव्हास!
हे असं सुचलं की गोंधळायला होतं. ’सगळ्या गरजा भागलेले जे इथे जमलेत, ते आपल्या तथाकथित उच्च अभिरूचीची भूक किंवा गरज भागवण्यासाठी की उच्चभ्रूपणाचे चोचले पुरवण्यासाठी?’, असा प्रश्न पडला. मग एकेकाच्या देहबोलीकडे निरखून बघायला झालं. मग जाणवलं, खरंच वेगळे, चांगले सिनेमे बघण्यासाठी आलेले असे किती तरी जण तिथे होते. त्यांच्या आपापसात हिरिरीने चर्चा चालल्या होत्या. त्या चर्चा ऐकताना सिनेमाच्या तंत्रापासून अनुभवण्याच्या दृष्टिकोनापर्यंत अनेक बाबतीत नवीन तथ्य समोर आलं. मलाही प्रश्न पडत होतेच. ’एल्स’मध्ये दिसतं की फ्रेंच घरातही (व्यावसायिक लेखक असलेली) बाईच घरकाम करते आणि ’माझा बॉस येणार आहे तर त्याच्यासमोर तुझी फेमिनिस्ट बडबड आज नको,’ असं तिचा नवरा तिला ऐकवतो आणि त्याच फ्रेंच समाजात स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मुली मन घट्ट करून वेश्याव्यवसाय करतात; ’मैं लुट गयी, बरबाद हो गयी!’ यातलं अक्षरही मनात उमटू न देता!
एकूण इकडून पहा की तिकडून; फिल्म फेस्टिवल हा जाणिवा जागृत करणारा अनुभव असतो!

स्टुडंट’ या कझाक चित्रपटाने विचित्रच अनुभव दिला. सुरुवातीच्या क्रेडिट्समध्ये ’क्राइम अँड पनिशमेंटवर आधारित’ असं लिहून आलं आणि सिनेमा बघणं अशक्य झालं. फ्योदोर दोस्तोव्हस्कीची ही कादंबरी ज्याने वाचली आहे, त्याला तिच्या गुंतून जाण्याचा; रोद्या, सोनिया, राझुमिखिन, वगैरे पात्रांच्या जगण्याशी समरस होण्याचा अनुभव आलेला असणारच. चित्रपट सुरू झाला आणि मला मूळ कादंबरी विसरून फक्‍त पटकथेपुरतं लक्ष देणं अशक्य झालं. मनात घर करून राहिलेली दोस्तोव्हस्कीची सगळी भुतं जिवंत झाली आणि मी त्यात रमून गेलो. आता इतकंच सांगता येतं, की दीडेकशे वर्षांपूर्वीची कथा आजच्या काळातही बसते. कझाख दिग्दर्शकाने गुंतागुंत कमी केली आहे आणि पाप, पापक्षालन, नैतिकता या जगण्याच्या गाभ्याजवळच्या मूल्यांपेक्षा कथेला विषमतेच्या, भांडवलशाही व्यवस्थेतल्या ’बळी तो कान पिळी’ या अन्यायाच्या जास्त जवळ नेलं आहे.
सिस्टर’ या चित्रपटाने शरीरविक्री करण्यातला आणखी एक सूक्ष्म पदर उलगडून दाखवला. ’एल्स’मधल्या मुली पुरुषांची हौस भागवून पैसे कमावतात; पण त्या बुद्धिमान असतात, त्यांच्यात निर्णयक्षमता असते. ’सिस्टर’मधली मुलगी कमीत कमी शब्दांत सांगायचं, तर ’गंदी नालीकी कीड’ आहे. तिला अन्य काही करणं माहीत नाही. ती जशी आहे (म्हणजे गन्दी नालीकी कीड) तशी आहे; तिला चांगली म्हणता येत नाही की वाईट. कथा रसाळपणे सांगितली आहे, कलावंतांनी कामं चांगली केली आहेत आणि इथेही व्यक्‍तीच्या दुर्दशेमागे भांडवलशाही समाजव्यवस्था, हेच कारण आहे. पण ती मुलगी आणि तो मुलगा हे गन्दी नालीके कीडे वाटत नाहीत; गोंडस दिसतात, त्यांच्याविषयी आपोआप सहानुभूती वाटावी, अशी दिग्दर्शिकेची इच्छा असावी, अशी खात्री वाटत रहाते, हा या चित्रपटाचा एकमेव पण वर्मी लागणारा दोष आहे!

फेस्टिवलला आल्यावर पहिला-दुसरा दिवस ओळखीचे चेहरे शोधण्यात आणि न कळणार्‍या भाषांमधली नावं वाचण्याचा आनंद घेण्यात जातो. जे सिनेमे आपण बघतो, ते त्यांच्या वेगळेपणामधूनच आवडून जातात. पण थोर थोर दिग्दर्शकांच्या थोर थोर कलाकृती समोर येणे, ही नॉर्मल अपेक्षा आहे आणि ’थोर’ या शब्दाचा अर्थ पातळ करू नये, हे कळायला खरोखरच वेगळ्या विषयावरची, वेगळी ट्रीटमेंट असलेली, तरलपणाची वरची पातळी गाठणारी फिल्म अनुभवावी लागते. ’एल्स’ ही फिल्म सुंदर होतीच; पण ’वॉर विच’ बघताना जसं आपण एक बक्षिसाच्या लायकीची फिल्म बघितली, असा विश्वास वाटला, तसं एल्स बघताना नव्हतं झालं. पण अगोदर म्हटल्याप्रमाणे सव्वाशेर समोर आले कीच शेर ठेंगणा होतो!

कॅनडाच्या किम ग्युएन या दिग्दर्शकाची चौथी फिल्म असलेल्या ’वॉर विच’चा विषय आफ्रिकेतल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका बारा वर्षाच्या मुलीच्या आयुष्याची परवड दाखवणे, हा आहे. स्वतःच्या हाताने तिला आईवडिलांना गोळ्या घालाव्या लागतात, एके ४७ लाच आता आई आणि बाप समज, हा हुकूम बिंबवून घ्यावा लागतो, तेरा वर्षांची होत नाही तोच लग्न करावं लागतं आणि आणखी एका वर्षात ती आईदेखील होते. वाटेत तिथल्या श्रद्धा-अंधश्रद्धा, तिथल्या समाजाने स्वीकारलेली पराकोटीची आंधळी हिंसा आणि यातून वाट काढत आशा न सोडण्याची मानवी वृत्ती यांचं प्रत्ययकारी दर्शन घडतं. चित्रपट आफ्रिकन समाजाला ’बिच्चारे’ म्हणतनाही की बरोबर ठरवत नाही. या दिग्दर्शकाकडून संवेदनाशील नजरेतून मांडलेल्या, जगण्याचे सूक्ष्म विभ्रम टिपणार्‍या चित्रपटांची अपेक्षा धरायला हरकत नाही.
आर्तर वीचेक या दिग्दर्शकाचा ’ऑल मॅथ्यूज विमेन’ हा चित्रपट चकवा देणारा ठरला. बाहेरख्याली वृत्तीचा एक पुरुष मरतो आणि त्याने संबंध ठेवलेल्या बायकांच्या स्वप्नात यायला सुरुवात करतो, या वर्णनाचा चित्रपट सरळ सरळ चावट असणार, असं आपण ठरवतो; पण ही एक फँटसीसम घडामोड वगळल्यास संपूर्ण चित्रपट एका वेगळ्याच तरल पातळीवर वावरतो. पहाता पहाता मॅथ्यूच्या बायकोचा होतो आणि स्मृतीचं, दुसर्‍यांच्या अपेक्षांचं ओझं या पैलूंना स्पर्श करून नातेसंबंधांमधल्या, माणसामाणसातल्या बंधांबद्दल भाष्य करून जातो. विशेष गोष्ट अशी, की हे भाष्य ठोस विधानाच्या स्वरूपात येत नाही, बघणार्‍याला डिवचून स्वतःच स्वतःचे डोळे उघडायला लावतं.
उना नोचे या चित्रपटाच्या गोष्टीपेक्षा त्यातले तपशील किती तरी जास्त दाहक आहेत. चित्रपटाला वेग आहे. भरगच्च घटना आहेत. बघून क्यूबामधल्या जीवनाचा रासवट पोत आणि स्त्री-पुरुष नात्याची आदिमता अक्षरशः भाजून टाकते. जुळ्या भावाबहिणीची आणि एका मित्राची ही गोष्ट. पण त्यात आईबाप येतात, शेजारी येतात, रस्त्यावरचे भणंग येतात, कॉलगर्ल्स येतात. जगण्यात असण्यापेक्षा नसण्याचं वजन जास्त असताना माणसं कशी लसलसत्या वासना अंगावर वागवत हिंसेच्या धारदार सुरीवर तोल सांभाळत जगतात, हे दाखवताना चित्रपट मानवी जिद्दीचंही दर्शन घडवतो.
हेच फिल्म फेस्टिवलचं मर्म. चांगले चित्रपट पहाणे, हे नाही! देशोदेशीचं जगणं बघून आपल्या जगण्याचं भान वाढणे आणि आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा जग आणि जगणं किती मोठं आहे, हे जाणवून नम्र व्हावसं वाटणे, हेच अशा चित्रपट महोत्सवाचं यश होय!

फिल्म फेस्टिवल म्हणजे जिथे देशोदेशीचे वेगळ्या पठडीतले चित्रपट दाखवले जातात, या चिंचोळ्या अर्थाचा इफ्फीने या वर्षी एक वेगळा विस्तार केला. या वर्षी प्रथमच इएसजी (एण्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा)-आयनॉक्सच्या परिसरात खास गोवेकर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे स्टॉल्स उभारण्यात आले. लफ्फेदार नऊवारी साड्या नेसलेल्या गोवेकर महिलांकडून एकेक पदार्थ घेताना एक प्रकारचा ’एथ्निक’ आनंद मिळाला. ’आमच्यात’ बनवल्या जाणार्‍या पदार्थांचा - अभिमान नव्हे, गर्वच - बहुतेकांना असतो. त्या गर्वात ’हे आमचं वैशिष्ट्य तुमच्यात कुठे?’ असा स्नॉबिश प्रश्न लपलेला असतो. त्या प्रश्नाला निरुत्तर व्हावं लागलं. रोज नवे पदार्थ! त्यांची नावं मुद्दाम विचारून घ्यावी लागली. तारल्याचं हुमण, सुंगटं, तळलेले मासे - कुठले? तर आज बोय, उद्या बांगडा आणि परवा तारलं, असा रोज बदलता मेनू. या बरोबर उकड्या तांदळाचा भात म्हणजे खास गोवन फिश करी राइस ही डिश झाली. गोड पदार्थ हवे असतील, तर हळदीच्या पानातल्या पातोळ्या, मणगणं, तांदळाची खीर. आणि तांदळाच्या पिठात गोड चव घालून केलेले मुठले. हे हिंदू पदार्थ. ख्रिश्चन प्रेपरेशन्स म्हणून उण्डे, चिकन काफ्रियल, मटणाची शाकुती. याखेरीज मुगाचे, बेसनाचे  लाडू, केक, वगैरे आहेच. एकूण चैन आहे. पहिल्या दिवशी अज्ञानातून बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन फिश करी राईस खाल्ला. नंतर तिथल्याच स्टॉलवर जिभेचे लाड करून घेतले.
फेस्टिवलमधल्या इंडियन पॅनोरमाच्या उद्‍घाटनासाठी ओम पुरी येऊन गेला. लाइफ ऑफ पायच्या निमित्ताने इर्फान खान आणि तब्बू येऊन गेले. देऊळ आहे म्हणून उमेश कुलकर्णी आणि ’संहिता’ दाखवण्यात येणार असल्यामुळे सुमित्रा भावे. यातला मुद्दा असा, की आपापल्या चित्रपटाच्या वेळी मराठी, भोजपुरी, वगैरे भाषेतले कलावंत येऊन गेले. थांबलं कोणीच नाही! सिनेमा हे माध्यम इतर सर्व माध्यमांची अजूनही नवनव्या पद्धतीने बनवली जात असलेली भेळ आहे; तर साहित्य, संगीत, चित्रकला, नृत्य अशा इतर कलांच्या क्षेत्रातल्या कलावंतांना या देशाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात हजेरी लावावीशी वाटत नाही का? फेस्टिवलचा एक अर्थ सिनेमाच्या निमित्ताने विविध कलांमध्ये संवाद, आत्मशोध, असा काही होऊ नये काय?
बाकीच्यांना दुरून यावं लागतं पण इथे ऐन गोव्यात कोंकणीत काय होतं आहे, हे जाणून घेण्यासाठी विचारणा करायचं म्हटलं, तर साहित्य अकादमी पारितोषिकाने सन्मानित असलेल्या हेमा नाईक यांचीच भेट झाली. त्यांनी मोकळेपणाने कबूल केलं की सिनेमा हे साहित्यिकांसाठीसुद्धा डोळे उघडणारं, काही तरी नवीन शिकवणारं माध्यम आहे; पण आठ वर्षांपूर्वी गोव्यात इफ्फी येण्यापूर्वी याची काहीच कल्पना नव्हती. त्या पूर्वी गोव्यात फिल्म सोसायट्या होत्या; पण ठराविक वर्तुळांपलिकडे जाण नव्हती. इफ्फीला येऊन वेगळ्या भाषांमधले, वेगळ्या संस्कृतींचे सिनेमे बघू लागल्यावर ’सिनेमा’ या कलेचे एकेक पैलू लक्षात येऊ लागले. ’आता मॅच्युरिटी थोडी वाढली आहे, असं म्हणायला हरकत नाही.’ अशीही पुस्ती त्यांनी जोडली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्यात अजून सिनेमाचं कल्चर रुजलेलं नाही. तांत्रिक बाजू मजबूत नाहीत. आता इथे फिल्म सिटी होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे; पण त्या‍अगोदर वर्कशॉप्स, सेमिनार्स, वगैरेंच्या माध्यमातून थोडं ’कपॅसिटी बिल्डिंग’ व्हायला हवं.
’उत्तम कादंबरीवर उत्तम चित्रपट निर्माण होतो, हे जसं खरं तसंच सिनेमा लहान लहान गोष्टींचं निरीक्षण करून त्यातलं मर्म उलगडतो, हे सुद्धा खरं आहे. उदाहरणार्थ गोव्यातल्या जीवनात वेगाने बदल होत आहेत. अगदी साधे बदल, म्हणजे आता पिगरीज जवळ जवळ दिसेनाशा झाल्या आहेत. सिनेमा असले विषयसुद्धा खुलवतो. आणि सिनेमाच्या या संस्कारातून साहित्यिक नक्कीच प्रेरणा घेऊ शकतात. मला तर स्क्रिप्ट रायटिंगच्या तंत्रामधून कादंबरी लिहिण्याचा प्रयोग व्हायला हवा, असंसुद्धा वाटतं.’ त्या शेवटी म्हणाल्या.
कोंकणीतले ज्ञानपीठ विजेते साहित्यिक रवींद्र केळेकरांनी सुरू केलेल्या ’जाग’ या साहित्यिक नियतकालिकाची परंपरा त्यांच्यापश्चात त्यांची भाची माधवी सरदेसाई यांनी चालू ठेवली. ’जाग’ला आता चांगली चाळीस वर्षांची परंपरा आहे. हेमा नाइक यांच्या म्हणण्याला माधवी सरदेसाईंनी पुष्टी दिली. सिनेमा आणि साहित्यिक यांचा संवाद व्हायला हवा, त्यामुळे साहित्याचा लाभच होईल, असं त्या म्हणाल्या. पणजी आणि मडगाव, दोन्हीकडे फिल्म सोसायट्या आहेत आणि त्यांनी हे काम फार पूर्वीपासून चालू ठेवलेलं आहे, असं सांगून त्या पुढे म्हणाल्या, ’ मात्र आता उत्तमोत्तम चित्रपट सहजी उपलब्ध होत असल्यामुळे फिल्म सोसायट्यांची ’चळवळ’ ही ओळख पातळ झाली आहे.
हा विषय काढल्यावर एक सूर तक्रारीचाही ऐकू आला. ’एवढा फिल्म फेस्टिवल होतो, पण साहित्यिकांना, इतर क्षेत्रातल्या कलावंतांना सन्मानाने आमंत्रित केलं जात नाही, आम्हाला हौस आहे म्हणून आम्ही स्वतःच्या प्रेरणेने येतो,’ असं वैषम्य एका साहित्यिकाने व्यक्‍त केलं. यावर ’सिनेमा आणि इतर कला यांच्यातला संवाद अर्थपूर्ण ठरेल, असं जर खरोखर वाटत असेल, तर त्या दृष्टीने तुम्हीच पुढाकार का घेत नाही?’ असा प्रश्न विचारायला मी विसरलो!

सांस्कृतिक काही बाही
गेल्या वर्षीपासून इफ्फीने डेलिगेट्सची रहाण्याची सोय करण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मागे ’फिल्म्स व्हिलेज’ नावाची जागा करून तिथे टेण्ट्स उभारायला सुरुवात केली. या वर्षी सगळे टेण्ट्स फुल्ल झाले. पण माझ्याप्रमाणे १९ च्या रात्री चेक-इन करणारे थोडे होते आणि त्यामुळे २० ला सकाळी अडचण झाली नाही. २१ पासून मात्र गर्दी झाली आणि एका संडासाचं दार लागत नाही; साबण, टूथपेस्ट ठेवायला जागाच नाही, वॉश बेसिनसमोर आरसाच नाही, अशा तक्रारी ऐकू येऊ लागल्या. पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसं त्यांचं निराकरणही होऊ लागलं. आरसा आला, कपडे, वस्तू ठेवायला दोन खुर्च्या आल्या. तंबू असलेल्या जागेत सिगारेट, दारू, ड्रग्ज यांना परवानगी नव्हती. बायकांचे आणि पुरुषांचे तंबू वेगळे. एका तंबूत जरी चार पलंग असले, तरी लेडीज तंबूत बाप्याला किंवा उलट, परवानगी नाही. यातल्या कुठल्याही नियमाचं उल्लंघन केल्यास बाहेर काढलं जाण्याची धमकी. याचा परिणाम असा झाला की लोकांनी व्हिलेजच्या बाहेर उभं राहून बियर प्यायली आणि रिकामे कॅन्स तिथेच टाकून दिले. सकाळी सकाळी कंपाउंडच्या बाहेर रिकाम्या बीयर कॅन्सचा कचरा दिसला. बरोबर फिल्मावरच्या कागदांची रिळं सुटून कागदाच्या रिबिनीची भेंडोळी. त्या ठिकाणाहून चित्रपट बघण्याच्या ठिकाणी, म्हणजे आयनॉक्सला जाण्यासाठी दर पंधरा मिनिटांनी चकाचक, विमानतळावर असतात तसल्या एसी गाड्यांची सोय. सकाळी मी गाडीची वाट पहात असताना कचरा गोळा करायला एक जण माणसं घेऊन आला. कचरा उचलण्याचं काम चालू असताना त्याची तणतण चालू होती. एवढे फिल्मा बघायला येतात, तर कचरा टाकण्याची सोय नको? मी त्याला सांगितलं की प्रत्येक तंबूत एक बास्केट आहे आणि कंपाउंडमध्ये तो बघा एक ड्रमच आहे. ’मग या सुसंस्कृत लोकांना योग्य ठिकाणी कचरा टाकायचं का सुचत नाही?’ तो डाफरला, ’बाहेर सिगारेटी ओढा, बीयर प्या; पण कॅन्स आणि रिकामी पाकिटं आतल्या ड्रममध्ये नेऊन टाका की!’
दुसर्‍या दिवशी ड्रम कंपाउंडच्या बाहेर होता आणि एकही कॅन रस्त्यावर पडलेला नव्हता!
फेस्टिवलला येणार्‍यांबद्दल काय मत करून घ्यावं अजून ठरत नाही. खूप चांगले प्रश्न विचारणारे भेटतात आणि स्नॉबिश नमुनेसुद्धा सापडतात. एकाला तिकीट देताना आतल्या मुलीने चूक केली. बिचार्‍याला एका ठराविक विंडोवर जाऊन ते तिकीट कॅन्सल करावं लागलं आणि मग तो पुन्हा तिकीट विंडोवर आला. तर रांगेत माझ्या पुढे असलेली बाई त्याच्यावर उखडली, ’लाइनच्या शेवटी जाऊन उभा रहा, मध्ये घुसायचं नाही!’ तो चाचरत म्हणाला, ’चूक माझी नाही, तिने चुकीचं तिकीट दिलं!’ तरी तिचा गुस्सा कमी झाला नाही. तेवढ्यात शेजारच्या रांगेतल्या एकाने तिला त्याचा बॅज दिला आणि तिकीट काढून द्यायची विनंती केली. ’पास एकच आहे; पण मला दोन तिकिटं हवी आहेत,’ तो म्हणाला.
आता हे घुसणं नाही का? तर तिचं उत्तर असं: तो सेंट्रल गवर्नमेंटमधला मोठा ऑफिसर आहे. माझा एक प्रकारे बॉस आहे. त्याला मी कसं नाही म्हणणार? वर काचेतल्या मुलीला ती दम भरते, सीनियर ऑफिसर आहे, त्याला पण तुम्ही दोन तिकिटं देणार नाही?! काँप्युटर एकच तिकीट देतो, या उत्तराने तिचं समाधान झालं नाही. ’असं कसं? मोठ्या ऑफिसरसाठी अशी प्रोव्हिजन हवीच!’ ती उद्‍गारली.
याला काय म्हणायचं? ’लोकशाही बीकशाही असली म्हणून काय झालं? आम्ही स्पेशल लोक, आम्हाला इतरांपेक्षा जास्त मिळण्याचा हक्कच आहे!’ ही कुठली वृत्ती?
असो. फेस्टिवलसारखी जत्रा म्हटली की सगळ्या प्रकारचे लोक सापडणार. आणि एका बाजूला चांगला आणि भरपूर गरम चहा वीस रुपयांना विकणार्‍या स्टॉलसमोर तीस रुपयांना चांगली आणि चहाच्या दुप्पट क्वांटिटीची थंड बीयर विकणारा स्टॉलही असणार.

कोरियाचा, नेमकं म्हणायचं तर दक्षिण कोरियाचा काय प्रॉब्लेम आहे? कमर्शियल सिनेमा (उदाहरणार्थ करण जोहर, यश चोपडा) जसा अवाढव्य महालात रहाणार्‍या लोकांच्या भावनिक नातेसंबंधांबद्दल असणार, तसाच समांतर सिनेमा वास्तवदर्शनाच्या नावाखाली (बहुधा) गरीब जनतेबद्दल असणार, हे गणित बरोबर ठरवणारे कोरियाचे दोन चित्रपट पाहिले. दोन्हींमधली पात्रं गरीब होती. पण दोन्हींमध्ये निर्दय हिंसा होती. द वेट (प्रतीक्षा) चित्रपटाचा नायक मुडद्यांना घासून पुसून; गरज असल्यास शिवून, टाके घालून दफनासाठी वा दहनासाठी ’तयार’ करतो. त्या मुडद्यांची चित्रं काढतो. चित्र काढताना त्यांना विशिष्ट पोजमध्ये ’बसवतो’. या निमित्ताने आपल्याला विविध वयाचे स्त्रीपुरुष पुढून मागून पूर्ण नागड्या अवस्थेत दिसतात. कोण कसा मेला, हे दाखवण्याच्या निमित्ताने गोळ्या घालणे (एक जण येतो आणि चक्क मुडद्याच्या डोक्यात गोळी घालतो!), गळा चिरणे, जांघेत लाथ घालणे, डोक्यात जड पाइप हाणणे, हे प्रकार बघायला मिळतात. तेच सेक्सचं. हा रस्त्याच्या कडेला उकिडवा बसलेला असतां एक जोडपं येतं आणि तिथेच उभ्या उभ्या सेक्स करू लागतं. चित्रपटभर असा अंगावर येणारा भडकपणा. चित्रपट सुरू होतो तो वॉश बेसिनमधून बाहेर वहाणार्‍या रक्‍तमिश्रित पाण्याच्या दृष्याने. शेवटपर्यंत रक्‍त वहातं, टपटप ठिबकतं, साचतं, साकळतं.
का? पिएटा या चित्रपटातसुद्धा पाय मोडणे, यंत्रात हात अडकवून तुटेपर्यंत पिळणे, तिसर्‍या मजल्यावरून खाली फेकणे असले प्रकार होते. तिथे या सगळ्याचं प्रत्यक्ष दर्शन नव्हतं. बटबटीतपणाची ती त्रुटी या ’द वेट’ने मोअर दॅन भरून काढली. पिएटाचा दिग्दर्शक किम की डुक याने स्प्रिंग समर ऑटम विंटर हा नितांतसुंदर सिनेमा काढणारा. मग ही हिंसा का? ’विकृती’ हे उत्तर सोपं असलं तरी अंधारात मारलेल्या बाणासारखं आहे. असं तर नसेल की कोरियाची कलाभाषा बटबटीत हिंसेने बनली असेल? कोरियाला मोडीत काढण्यासाठी, कोरियाविषयी किळस व्यक्‍त करण्यासाठी ह प्रश्न उपस्थित केलेला नाही. आपल्या इथल्या तमिळ सिनेमातल्या अभिनयाची भाषा आपल्यालाच भडक वाटते. अमेरिकन सिनेमात एकमेकांवरचं अतीव प्रेम व्यक्‍त करतानासुद्धा (अनेकदा) तो आणि ती भयंकर हातघाईवर येऊन सेक्स करतात. भारतीय कलेत इमोशन फार आहे. कारण भारतीय जगण्यात इमोशनचा भाग रीझनपेक्षा जास्त आहे. तसंच कोरियाचं नसेल? तिथले रंगच भडक असतील. त्यामुळे त्या रंगांनी काढलेली चित्रं भडक होत असतील. सिस्टर या स्विस सिनेमातला चोर्‍यामार्‍या करत आणि ते इतर लहान मुलांना शिकवत गुजराण करणारा मुलगा गोंडस दिसतो, हे मला आक्षेपार्ह वाटलं. पण कदाचित माझ्या भारतीय नजरेला तो गोरागोमटा मुलगा गोंडस दिसला असेल. स्विस किंवा युरोपियन नजरेला कदाचित दिसतही नसेल!
कुठल्याही कलेबद्दल मूल्यविधान करण्याअगोदर ज्या समाजातून ती कला निपजली, त्या समाजाचा ’इडियम’ जाणून घ्यायला हवा. इडियम म्हणजे वाक्‌प्रचार. जगण्यातल्या तपशीलांमधून भाषेला मिळालेले अर्थपूर्ण शब्दप्रयोग. आपल्या बॉलिवुडी सिनेमांमधल्या नाचगाण्यांना नाक मुरडणार्‍यांनी हा विचार अवश्य करावा.

अखेरची इच्छा!
तुर्कस्तान हा एक अपवादात्मक देश आहे. अटलांटिक महासागरापासून अत्यंत दूर असलेला हा देश अमेरिकाप्रणित नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा (नाटो)सदस्य आहे. पश्चिमेला ग्रीस. तिथून युरोप खंड सुरू होतो. तिथून ख्रिस्ती धर्म सुरू होतो. इस्लामधर्मीय तुर्कस्तानला केमाल अतातुर्क या सुलतानाने सांस्कृतिक दृष्ट्या आशियातून युरोपात नेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नाही, तरी तुर्कस्तानच्या जीवनावर कायमचा परिणाम होऊन गेला. पश्चिम आशियातल्या इतर मुसलमान देशांइतकी कडवी धार्मिकता तुर्कस्तानात नाही. बायकांवर बंधनं कमी आहेत. सार्वजनिक जीवन जास्त मोकळं आहे.
तरी तुर्कस्तान हा देश आशियातच आहे! कसा, हे ’ट्रेस’ या चित्रपटाने दाखवलं. दोन मुलगे, तीन मुली असलेला एक मध्यमवयीन विधुर पुरुष. अत्यंत हट्टी आणि अरेरावी. कॉलेजात जाणार्‍या तरुण मुलाला कानात काही तरी घालतो म्हणून सुनावतो. कोणाचं ऐकत नाही, स्वतःचाच हट्ट पुरा करतो, असा त्याचा स्वभाव कुटुंबियांना माहीत असल्याने त्याच्या वाटेला कोणी जात नाहीच, त्याला विरोधही कोणी करत नाही. एक त्याची म्हातारी आईच काय ती त्याला उलट बोलू शकते. ही त्याची ऐंशीच्या पुढची आई एके दिवशी घरात पडते आणि हॉस्पिटलातला डॉक्टर सांगतो, हिचे फार दिवस राहिलेले नाहीत, पेन किलर देत रहा आणि शक्यतो मन दुखवू नका. त्यात ती मुलाकडे इच्छा व्यक्‍त करते, मला गावी ने!
आणि चित्रपट खर्‍या अर्थाने सुरू होतो. सगळ्यांच्या विरोधाला झुगारून तो आईला घेऊन निघतो. त्याचा मुलगा येणार नाही म्हणतो, तर त्याच्या मुस्कटात देऊन बरोबर यायला भाग पाडतो. अडीच दिवसांचा प्रवास करून दूर, त्याची मोठी मुलगी रहाते, त्या गावी पोचायच्या आत आई ट्रेनमध्येच मरते. वाटेत उतरून तिच्यासाठी कॉफिन बनवून घेतो. पुढचा प्रवास जावयाच्या मित्राच्या मोटार गाडीने. बर्फाने भरलेल्या डोंगराळ रस्त्याने जात असताना बंडखोर आडवे येतात आणि परतायला भाग पाडतात. खालच्या गावातले नातेवाईक समजूत काढतात, की हे सुद्धा तुमचंच गाव. आणि ते बंडखोर मुळीच ऐकणार नाहीत. तेव्हा आईला इथेच पुरा. मुलगा (म्हणजे तरुण मुलाचा बाप) गप्प बसतो. अपरात्री एक घोडा विकत घेऊन येतो, त्यावर कॉफिन चढवून मुलाला बरोबर घेऊन निघतो. प्रचंड कष्टाचा प्रवास. वाटेत घोडा आडवा होतो. मग दोघे कॉफिन कधी उचलत कधी ओढत प्रवास चालू ठेवतात. म्हातारा कधीही मुलाकडे मदत मागत नाही. पण त्याला एकट्याला हे काम मुळीच झेपणारं नाही, हे उमजणारा मुलगा बापापेक्षा जास्त भार घेत रहातो. रात्रभर हाल‍अपेष्टा भोगत, मरणाचे थकत दोघे गावापाशी पोचतात. गावातल्या स्मशानभूमीमधल्या वडिलांच्या थडग्याजवळ जाऊन म्हातारा वडिलांची क्षमा मागतो आणि पुढे जाणं चालूच ठेवतो. पुढे येते एका टेकडीवरची आर्मेनियन दफनभूमी. तिथल्या एकुलत्या एक झाडाखाली दोघे विसावलेले असताना पार्श्वभूमीवर मेलेल्या आईचे शब्द ऐकू येतात:
"माझं सगळं गाव बंडखोरांनी उद्‍ध्वस्त केलं. सगळ्यांना ठार मारून टाकलं. माझ्या नवर्‍याची हत्या माझ्या डोळ्यांदेखत झाली. नवर्‍याला मारून मग बंडखोरांनी माझं लग्न तुझ्या बापाशी लावून दिलं. मला माझ्या लोकांच्यात पुरून घ्यायचं आहे. त्या आर्मेनियन दफनभूमीतच मला पूर. हीच माझी शेवटची इच्छा समज!"
’अगोदर केलेल्या ऍबॉर्शनमुळे आता तुला गरोदर रहाणं कठीण आहे,’ असं ऐकल्यावर ’तूच सगळे निर्णय घेतोस!’ असं म्हणत नवर्‍याशी भांडण करणारी मुलगी; मनगटावर मैत्रिणीचं नाव कोरूनसुद्धा ती प्रेमाला प्रतिसाद देत नाही, हे कळल्यावर निराश झालेला मुलगा, कुटुंबातले इतर ताणतणाव आणि वर म्हटलेला युरोप-आशिया भेद, अशा सामाजिक समस्यांच्या वर गोष्ट अशा रीतीने अचानक उठते आणि ’माणसाने ठरवलेली स्वतःची ओळख बळजबरीने पुसून टाकता येत नाही’, असं भान देते; असहाय्य माणसाने व्यक्‍त केलेली इच्छा प्राण पणाला लावून पुरी करणे, यातला कर्तव्यभाव समोर आणते आणि आईने आपल्या कुटुंबालाच एक प्रकारे डिस्‌ओन केलं आहे, हे स्वीकारूनही तिच्या इच्छेपुढे मान तुकवणार्‍या मुलाची बांधिलकी मातृप्रेमाशी मानायची की एका अतिअभिमानी माणसाने मानवी आत्मजाणिवेच्या अभिव्यक्‍तीला केलेला हा सलाम आहे, अशा भलत्याच, खोल आणि उच्च मानवी पैलूंना स्पर्श करते. आणि संस्कृतीचा अर्थ आपण उथळपणे तर लावत नाही, अशी आशंका मनात उमटवते!

चित्रपटातल्या कथानकात नसेल, दिग्दर्शक जे सांगू बघतो आहे त्यातही नसेल; पण चित्रपटातल्या तपशिलांमध्ये संस्कृतीचं प्रतिबिंब उमटतंच, असं आग्रहाने म्हणत असताना एक भारतीय चित्रपट येतो आणि धारणांच्या मुळावरच घाव घालतो! ’एलार चार अध्याय’ हा चित्रपट रवींद्रनाथांच्या कथेवर की कथांवर आधारित असल्याचा दावा चित्रपटाच्या श्रेयनामावलीत होता. तसं असेलही. पण रवींद्रनाथांच्या नावाने कुंकू लावलं, की त्यामुळे सौभाग्य उजळतं, असं धरून चालायचं कारण नाही. कथा, पटकथा हे चित्रपटाचं सर्वात महत्त्वाचं अंग, असं जरी म्हटलं जात असलं, तरी चित्रपटाचं कल्याण वा वाटोळं शेवटी दिग्दर्शक करत असतो. हा चित्रपट एला हिच्या जीवनातले चार भाग दाखवतो. शाळकरी एला ते सत्तावीस वर्षांची एला असा तो प्रवास आहे. या प्रवासात एला कायम गंभीर दिसते. प्रेमसुद्धा गंभीरपणे करते. इथून तिथे गंभीरपणे जाते. तिथून इथेसुद्धा गंभीरपणे येते. कधी गंभीरपणे स्वतःच्या त्यागाबद्दल बोलते. तसंच दुःखाबदलही बोलते. ते बोलून झाल्यावर कर्तव्याबद्दल, देशप्रेमाबद्दल, क्रांतीबद्दल बोलते. ती ज्या क्रांतिकारकाकडे काम करते, तो सतत जाकीट घालून चिरूट ओढत कुटिल डाव रचतो. आपल्याच अनुयायांना छद्मीपणे खेळवतो. शेवटी त्यातले बरेच एकमेकांविरुद्ध कट रचणारे, पोलिसांना फितूर असलेले, मोह आणि वासना यांना बळी पडून क्रांतीला सुरुंग लावणारे असल्याचं कळतं. एकेका दृष्यातले संवाद जीवनाच्या गूढ अर्थाचा, नातेसंबंधांचा, प्रेमाचा, वासनेचा, द्वेषाचा उहापोह करतात.
काही कळत नाही. हे नाटक आहे आणि त्यातली पात्रं वास्तवातली नसून प्रतिकात्मक आहेत, असं मानून अर्थ काढायचा, तर स्वतंत्र, स्वायत्त कवितांमधल्या ओळी एकापुढे एक मांडल्या आहेत, असं म्हणावं लागेल. आणि एकेक ओळ सुटी करून बघायची, तर ’जीवन हे यँव असतं’, जीवन हे त्यँव असतं’ अशा विधानांमध्ये जितकं तथ्य असतं, तितकं या ऑडिओविजुअल सादरीकरणात आहे, असं म्हणावं लागेल. एकेक फ्रेम देखणी. दुसर्‍यांच्या कष्टावर बसून खाणारा बंगाली भद्रवर्ग. त्यांची भव्य, टेस्टफुल्ली डेकोरेट केलेली घरं. त्यातल्या बोलभांड बायका आणि सुसंस्कृत पण दुबळे पुरुष. संथ कॅमेरा. जरा संधी मिळाली की सखोल अर्थाचा भास देणार्‍या ओळी आळवलेल्या. असो.
बाहेर आल्यावर म्हणूनच भीती वाटली, की हे बघून विदेशी नजरेचं भारतीय संस्कृतीबद्दल काय मत होईल? ’दिगंत’ हा कोंकणी चित्रपट सामान्य, बाळबोध होता. पण ’एला ...’ पेक्षा वाईट चित्रपट बघायला मिळाला नाही.

फेस्टिवलला जसे विदेशी चित्रपट होते, तसेच विदेशी प्रेक्षकही होते. त्यात नुसते बघायला आलेले कमी होते. या ना त्या कारणाने चित्रपटनिर्मितीशी संबंध असलेले जास्त होते. आमच्याच टेण्टमध्ये दोघे स्वीडिश होते. एक चांगला वयस्क होत. त्याचं नाव लोका देवदास ऊर्फ ब्योन स्कालेन. हा योगा या विषयावर शैक्षणिक फिल्म्स बनवतो. त्याच्याबरोबर त्याचा फोटोग्राफर. दोघांनी रोज चार, पाच, सहा चित्रपट बघायचा सपाटा लावला. इंग्रजी उत्तम बोलतात. अचानक एकाने मला विचारलं, बर्गमनचा सीन्स फ्रॉम अ मॅरेज पाहिला का? मी दचकून विचारलं, ’इंगमार बर्गमन?’ ’हो,’ तो उत्तरला. मी प्रोग्राम शीट काढली. तर त्यात बर्गमनचा चित्रपट नव्हता. त्याने ज्या चित्रपटाचं नाव घेतलं, त्याचा दिग्दर्शक म्हणून वेगळं नाव होतं. म्हणून मी ऑफिशियल कॅटलॉग उघडला. तर त्यात दिग्दर्शक म्हणून बर्गमनचं नाव! प्रोग्रॅममधल्या चुकीमुळे राहिला.
मग तो म्हणाला, बर्गमन रहायचा त्याच बेटावर मी रहातो. स्वीडनच्या किनार्‍यापासून थोड्या अंतरावर एक मोठं बेट आहे. त्याच्या पलिकडे जे छोटं बेट आहे, तिथे बर्गमन रहायचा. चांगलं दीड हजार फूट लांब त्याचं घर होतं. रोज दुपारी तीन वाजता घरातल्या होम थिएटरवर चित्रपट दाखवायचा. घरात सक्‍त ताकीद. संध्याकाळच्या स्वयंपाकाचं कामसुद्धा तीनच्या आत उरका! तीननंतर आवाज होता कामा नये. शेजार्‍यांनासुद्धा अशीच ताकीद.
बर्गमनची म्हणे एक जुनी गाडी होती. इतकी जुनी गाडी स्वीडनमध्ये चालत नाही; पण याने कधी गाडीचा टॅक्स भरलाच नाही. मग ती मोडीत तरी कशी निघणार? रंगात येऊन त्याने बर्गमनच्या आणखी गोष्टी सांगितल्या. म्हणाला, बर्गमनला बारा मुलं होती. शिवाय त्याचं प्रत्येक हिरॉइनबरोबर लफडं होतं . सगळ्या हिरॉइनींना त्याने मुलं दिली आहेत!
यावर कसा विश्वास ठेवावा? इन्ग्रिड बर्गमन, लिव उलमन ...
बर्गमन म्हणे बिस्किटं खाताना शेवटचं बिस्किट खात नसे. हे त्याच्या चाहत्यांना माहीत झालं होतं. मग तो उठून गेला, की ’बर्गमनने खाल्लेल्या पुड्यातलं शेवटचं बिस्किट’ उचलायला झुंबड उडत असे!
इंगमार बर्गमन हे सिनेमातलं इतकं मोठं नाव आहे, की त्याच्या या गॉसिपलासुद्धा भरपूर वाचक लाभतील!

असं कसं असेल?
लिलेट नेव्हर हॅपण्ड हा फिलिपिनो सिनेमा. फिलिपीन्सची राजधानी मनिलामध्ये घडतो. नायिका एक बारा तेरा वर्षांची मुलगी. तिचा लहान भाऊ ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्यांमधल्या लोकांना फुलं विकतो. किमान इतके इतके पैसे आणले नाहीस तर खबरदार, अशी आईची ताकीद. नाही जमले की रडतो. मग त्याची बहीण लिलेट धमकावून, दरडावून गाडीवाल्यांना फुलं घ्यायला लावते आणि आईच्या मारापासून त्याची सुटका करते. नाव विचारलं, की ’स्नोव्हाइट’ असं सांगते. ते तिचं स्वप्न आहे. टॉम क्रूज आपला बाप आहे, असं तिला खरोखरच वाटत असतं. सावत्र बापाने तिचा कौमार्यभंग केलेला असतो, पण त्याचा स्वीकार करून ती भविष्यावर नजर ठेवून जगत असते. तिची मोठी बहीण एका डान्स बारमध्ये नाचत असते आणि अर्थातच शरीरविक्री हा तिचा जोडव्यवसाय असतो. आई जुगार खेळण्यात मग्न. बाप असाच टपोरी आवारा.
हे जग ’आपलं’ नसलं, तरी मुंबईकराला किंवा जगातल्या कुठल्याही महानगरात रहाणार्‍याला अपरिचित नाही. असं असतं. झोपडपट्टीत जन्म होऊन बाहेरच्या समाजाशी, ऐतिहासिक वारशाशी, विविध कलापरंपरांशी संपर्क न आलेल्या, खास महानगरी पिलावळ म्हणता येईल अशा, ’लुम्पेन’ एलिमेंट्सचं हे जग. फिलिपीन्ससारख्या अमेरिकेच्या प्रभावाखालच्या देशात त्याचं रूप आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त भडक, जास्त किळसवाणं असणार याविषयी सुद्धा शंका घ्यायचं कारण नाही. हे पटवून घेता येतं; पटत नाही, ते त्या मुलीचं, लिलेटचं पात्र.
ती निरागस आहे. तिचे टपोरे डोळे कुतूहल, आसक्‍ती, ताजेपणा, या बालपणाच्या वैशिष्ट्यांचंच दर्शन घडवतात. पण तिच्यात ’बालसुलभता’ नाही! अशी कशी ती पूर्णपणे भ्रष्ट? अमेरिकन बाईने चालवलेल्या बालककेंद्रातून ती वारंवार पळून जाते; याचं कारण ’रस्त्यावर मुक्‍तपणे जगणार्‍या मुलांना भिंतींच्या आत जगणं सहन होत नाही’, असं सांगता येतं. तिची आई तिला धंद्याला लावायचा प्रयत्न करते, याला तिचा जराही आक्षेप नाही. बळजबरीला आहे. म्हणून ती आईकडूनही पळून जाते आणि थोरल्या बहिणीच्या बारमध्ये घुसून तिथल्या मालकिणीला भुरळ पाडून वेट्रेस होते. तिथे पैसे बरे मिळतात म्हटल्यावर खुशाल एका वयस्क पुरूषाबरोबर सेक्स करते. कोणी साधा फोटो काढतो म्हटल्यावर पैसे मागते. वाटेल ते करायची तयारी ठेवते. सावत्र बाप समोर येतो तेव्हा त्याच्याशी सेक्स टाळण्यासाठी खुशाल स्वतःच्या शरिराचा लिलाव पुकारते. तिला यातून वाचवण्याच्या एकमेव उद्देशाने बारवर पोलिसांकरवी धाड घालणार्‍या त्या अमेरिकन बाईचा दुस्वास करते. सहानुभूती मिळवण्यासाठी पूर्ण अक्कलहुशारीने धडधडीत खोटं बोलते. तिच्या सेंटरमधल्या इतर लहान बच्चांना सेक्सची शिकवणी देते. तिच्यात महत्त्वाकांक्षा आहे पण अजिबात स्वप्नाळू न होता आपलं वास्तव जगणं आणि आपली स्वप्नं दोन्हींचा तोल  व्यवस्थित सांभाळण्याचं कसब तिच्यात कुठून येतं? हे अशक्य वाटतं. असं कसं असेल? बारा वर्षांची मुलगी; तिला लंगडी खेळावीशी वाटत नाही, सेक्सशी शून्य संबंध असलेल्या गंमतींमध्ये रमावंसं वाटत नाही. थोराड पुरुषांकडून होणारे अत्याचार पैशांसाठी कसेतरी सहन करून वर ’नाही तरी त्याचा डिक लहानसाच होता,’ असं शांतपणे कशी म्हणते ती? आपल्या चित्रपटांमध्ये दाखवतात, तसं बालकांनी मंदबुद्धीच असावं, असं नाही; पण हे तर दुसरं टोक. बाजारपेठी, मागणी-पुरवठ्याच्या रोखठोक व्यवहाराशी इमान राखणारी भांडवली अर्थव्यवस्था आपल्याकडेही अशीच बालकं घडवणार का?
वाइल्ड वन्स हा आर्जेंटिनाचा चित्रपट. पाच मुलं बालकांचा तुरुंग फोडून पळतात. पळताना दोघांना गोळ्या घालून ठार करतात. रानात जातात. म्होरक्या म्हणतो, ’त्या डोंगरापलिकडे गॉडफादर रहातो, त्याच्याकडे जाऊन आपण सुखाने राहूया.’ वाटेत खाद्य मिळवण्यासाठी; पैसे, बंदूक हस्तगत करण्यासाठी खुशाल कोणाला ठार मारतात. एक जण त्यांना आसरा देतो; तर ’चल, त्याला गोळी घाल; जे सापडेल ते उचलून पळून जाऊ,’ असं एकजण सुचवतो. एकाला जंगलात एका गाडीतून एक पुरुष एका बाईचा मुडदा घेऊन उतरताना दिसतो. तो तिला पुरण्याची तयारी करत असताना त्याची गाडी, त्यातले पैसे चोरण्यासाठी या पाचातला एक जण त्याच्यावर गोळी चालवतो. त्याला तसाच तडफडत ठेवून आपल्या सोबत्यांना विसरून एकटा गाडी घेऊन निघून जातो. असं कसं? गुन्हेगार असले तरी विशीच्या खालची एकदम पाच पाच मुलं अशी कशी विकृत असतील की बारक्या फायद्यासाठी एखाद्याचे प्राण घेतील? मानवी समाज ज्या पायावर उभा रहातो, ती मूल्यं इतकी ठिसूळ, भुरटी असतात का? की त्यांच्या संस्कारांचे आघात सातत्याने होत राहिले नाहीत, तर मुलंसुद्धा आदिम वन्य जीव होऊन जातात? त्यांच्यात करुणा, सहानुभाव यांचा लवलेश उरत नाही?
आणि सर्वात आक्षेपार्ह म्हणजे, जी व्यवस्था मुलांना असं करून टाकते, त्या व्यवस्थेचा निःसंदिग्ध धिक्कार हे चित्रपट बनवणार्‍यांना करावासा वाटत नाही? तरीही ’लिलेट’ बघवते कारण कुठेच तिच्यावर दया दाखवण्याचा, त्या अमेरिकन बाईच्या उपकार करण्याच्या भावनेची बाजू घेण्याचा आव नाही. संपूर्ण गोष्ट लिलेटच्या बाजूने सांगितली जाते. अगदी शेवटही तिच्याच मालकीचा आहे. ’वाइल्ड वन्स’चा दिग्दर्शक म्हणाला, ’यात अगदी निकटचे क्लोज‍अप्स आहेत आणि लँडस्केपचे शॉट्स आहेत. दोन्हींमधली स्पेस एक्स्प्लोअर करण्याचा माझा प्रयत्न आहे.’ ठीक आहे; पण या दोघांना ’बालपण हे एक मिथक आहे, मध्यमवर्गीय थोतांड आहे,’ असं खरंच वाटतं का? अस्वस्थ करणारे प्रश्न.

      बाहेर आलं की समोर दिसतो, किंग फिशरचे बियरचे नळ असलेला स्टॉल. स्टॉलच्या बाजूच्या मंडपातल्या सुशोभित खुर्च्यांवर बसून चिल्ड बियर प्यायची. कधी कधी शेजारी बँडवाले येतात आणि गोवन संगीत वाजवतात. सांस्कृतिक रंजन.

अल्गोरिदम्स नामक रोचक डॉक्युमेंटरी
फिल्म फेस्टिवल म्हणजे केवळ फीचर फिल्म्स नव्हे. मुळात फीचर फिल्म्समध्ये सुद्धा इंटरनॅशनल काँपिटिशन, सिनेमा ऑफ द वर्ल्ड, इंडियन पॅनोरमा - फीचर, इंडियन पॅनोरमा - नॉनफीचर, फेस्टिवल कॅलीडोस्कोप, मास्टर स्ट्रोक्स, तुर्किश करंट, डॉक्युमेंटरीज, वगैरे, वगैरे विभाग होते. इंटरनॅशनल काँपिटिशन या विभागातले जास्तीत जास्त चित्रपट बघावेत, असा शिरस्ता आहे. पण इतर विभागांना स्पर्शच केला नाही, असं व्हायला नको म्हणून एखाद्‌दुसरी डॉक्युमेंटरी; गोव्यात आलो आहोत, तर इथे दाखवलेली ’दिगंत’ ही कोंकणी फिल्म; इंडियन पॅनोरमातली ’एलार चार अध्याय’ अशी व्हरायटी साधण्याचा प्रयत्न केला. असं करताना कधी फसायला झालं, तर कधी घबाड सापडलं. ’अल्गोरिदम’ आणि ’मोअर दॅन हनी’ या दोन्ही डॉक्युमेंटर्‍या समाधान देऊन गेल्या.
आयन मॅक्‌डोनाल्ड या ब्रिटिश दिग्दर्शकाची इंग्लिश, हिंदी, तमिळ आणि ओडिया या चार भारतीय (इंग्रजीला भारतीय म्हणायला काहीच हरकत नसावी) भाषांमधल्या डॉक्युमेंटरीचा विषय ’भारतातील अंध बुद्धिबळपटू’ हा होता. २००८ साली स्वीडनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पर्धेच्या निवडप्रक्रियेपासून ती सुरू होते आणि २०१२ साली ग्रीसमध्ये झालेल्या स्पर्धेपर्यंतचा काळ दाखवते. स्पर्धा ज्युनियर खेळाडूंची. एकेक जण अंध कसा झाला याची कहाणी त्यात येते. घरी त्यांचं दैनंदिन जीवन कसं असतं, हे आपल्याला दिसतं. त्यांना कोचिंग कसं दिलं जातं, त्यांचा मूड कसा सांभाळला जातो, स्पर्धेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करतात आणि त्यांची सामर्थ्यस्थळं व दुबळेपणा कशात असतो, हे सुद्धा आवर्जून दाखवलं जातं. आणि या डॉक्युमेंटरीचा नायक या ज्युनियर खेळाडूंपैकी कोणी नाहीच. खेळाडूंना शोधून, त्यांना आणि त्यांच्या पालकांना सतत आशावादी मनःस्थितीत ठेवण्यासाठी झटणारा ’चारुसर’ हा कोच आहे. त्याचा ध्यास, त्याचा प्रांजळपणा सतत समोर येत रहातो.
स्पर्धेच्या निमिताने एकत्र आलेले अंध खेळाडू गप्पा मारताना दिसतात. (ही डॉक्युमेंटरी आहे, यात ’पटकथा’ नाही, संवाद लिहून दिलेले नाहीत, कोणीच अभिनय करत नाही, तर जे दिसतंय ते खरोखर घडतं आहे, हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगावं लागतं.) त्यांची एक तक्रार पुन्हा पुन्हा ऐकू येते, ती म्हणजे पूर्ण आंधळे आणि अंशतः आंधळे यांना एकाच मापाने मोजलं जातं, याची. आंधळ्यांना सोंगट्या चाचपाव्या लागतात आणि एक सोंगटी तिच्या भोकातून काढून जिथे हलवायची आहे, त्या जागेवरच्या भोकात अडकवावी लागते; तर ज्यांना चेसबोर्ड दिसतो, ते सोंगटी सरकवू शकतात. यात आंधळ्यांना जास्त वेळ लागतो आणि स्पर्धेतला डाव ठरविक वेळत पूर्ण करण्याचं बंधन असल्यामुळे आंधळ्यांवर अन्याय होतो.
चारूला हे मान्य नाही. चारूचं ठाम म्हणणं आहे, की चेस हा एक खेळ असा आहे, ज्यात डोळस आणि आंधळे, समान पातळीवर असतात. तो म्हणतो, आंधळ्यांनी डोळस खेळाडूंना हरवण्याचंच ध्येय समोर बाळगलं पाहिजे. डॉक्युमेंटरी संपल्यानंतरच्या चर्चेत तर दिग्दर्शक म्हणाला, बुद्धिबळात आंधळे डोळसांपेक्षा पुढे असतात! कसं? तर बुद्धिबळात समोर दिसणारा बोर्ड आणि त्यावरच्या सोंगट्यांची स्थिती, हे पुरेसं नसतं. पुढच्या एक किंवा दोन किंवा तीन चाली, प्रत्येक चालीनंतर होऊ शकणारी प्रतिस्पर्ध्याची संभाव्य चाल, मग त्याला उत्तर, असं सगळं कल्पनेत आणावं लागतं. बदलत्या प्रतिचालीनुसार डावपेच बदलत ठेवण्याची तत्पर तयारी राखावी लागते. आणि यात आंधळे डोळसांपेक्षा जास्त माहीर असतात. एका खोलीतून चालत घराबाहेर पडणे, डोळसासाठी ’काम’ नसतं. अवकाशाचं दर्शन होत असल्यामुळे विचारशक्‍तीला जराही ताण न देता डोळस ही क्रिया पूर्ण करू शकतो. याउलट आंधळ्याला खोलीचा दरवाजा कोणत्या दिशेला, किती पावलांवर आहे; तिथून बाहेर पडल्यावर कुठल्या दिशेने किती अंशात वळल्यावर बाहेर जाणारं दार येतं; वाटेत कसले अडथळे आहेत; पायर्‍या आहेत का; असल्यास किती ... असा सगळा भला मोठा व्यूह मनात जागा ठेवावा लागतो. सध्याच्या स्थितीपासून पुढे जाण्यासाठी सारखं हे असं व्यूह रचत जाणं आंधळ्याला आवश्यक असल्यामुळे बुद्धिबळात हेच एका फॉर्मल पातळीवर करणे त्याला सोपं जातं!
सुरू झाल्यापासून आपल्याला कळतं की भारताला या स्पर्धेत आजवर ब्राँझसुद्धा मिळालेलं नाही. अपेक्षा अशी निर्माण होते, की एक पारितोषिक मिळणार आणि डॉक्युमेंटरीची सांगता होणार. पुढे तर तशी जणू सूचनाही मिळते. पण तसं होत नाही. आणि तरीही डॉक्युमेंटरी नैराश्याच्या सुरात संपत नाही. कोच चारू टीसीएसमधली त्याची सॉफ्टवेअर इंजिनीयरची नोकरी चालू ठेवतो आणि पुढच्या स्पर्धेसाठी मनसुबे रचू लागतो. चेसबोर्डचे क्लोज‌अप्स, गॉगलच्या काचेत उमटणारी प्रतिबिंबं, बोटांच्या अस्वस्थ हालचाली, खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबियांची मनोगतं, चारुचा दुर्दम्य आशावाद या सगळ्या साक्षात्कारी दर्शनात ही १०० मिनिटांची डॉक्युमेंटरी कधी संपते, कळतही नाही. मुलगा आंधळा आहे, किंवा आजारात त्याची दृष्टी गेली आहे, हे कळल्यावर स्वतःच्या जगण्याचं केंद्र मुलाला बनवणारी आई, बुद्धिबळापेक्षा तुला अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, असं बजावणारा बाप, बुद्धिबळामुळे मुलाला एकाग्रतेत मदतच होईल असं सांगणारा चारुचा सहकारी, अभ्यासात मोठे असणारे खूप असतात पण बुद्धिबळात गती असलेला लाखात एक असतो आणि तो लाखातला एक तुमचा मुलगा आहे असं त्या पालकांना कळकळीने सांगणारा चारु ... एका वेगळ्या दुनियेच्या या दर्शनातून जगाकडे बघण्याची आपली दृष्टीच बदलून जाते. दयेने नव्हे, तर बरोबरीने वागवलं जावं, ही आंधळ्यांची इच्छा मनाला भिडते. डॉक्युमेंटरीची निर्माती गीता म्हणाली, याला एका छोट्या फीचर फिल्म‌इतका खर्च आला. आणि चार वर्षं लागली म्हणून पैशांचं गणित जमवता आलं. एका वर्षात हे शक्य नव्हतं! दिग्दर्शकाने पुस्ती जोडली, १०० मिनिटांच्या या डॉक्युमेंटरीसाठी २८० तासांचं शूटिंग केलं! यात कोणी अभिनय केलेला नाही, की सेट लावलेला नाही. जे घडलं, ते शूट केलं.

"मी सिनेमा काढणारच!"
चित्रपट करायला काय लागतं?
इच्छा लागते. अगदी टायटॅनिक, अवतार किंवा रावन, वगैरे बनवायचे नसतील; आपलं मनोगत रुपेरी पडद्याच्या माध्यमातून व्यक्‍त करण्यासाठी चित्रपट करायचा असेल, तर इच्छा महत्त्वाची ठरते.
आणखी?
आणखी काहीही लागत नाही! म्हणजे, कॅमेरा लागतो, फिल्म केलेलं एडिट करायला सॉफ्टवेअर लागतं, प्रिंट्स काढावे लागतात आणि या सगळ्यासाठी बर्‍यापैकी पैसा लागतो. पण, दहा वीस वर्षांपूर्वी ते पैसे इतके होते, की पाठीशी कोणी मजबूत असामी असल्याखेरीज चित्रपट निर्मितीचा विचारही अशक्य होता. आता तसं राहिलं नाही. आता एकूण खर्च आवाक्यात आला आहे. जो कोणी स्वतःची सक्षमता सिद्ध करू शकेल आणि आपल्याला जो चित्रपट निर्माण करायचा आहे, त्याचं महत्त्व पटवू शकेल; त्याला कर्ज, अनुदान देणार्‍या देशी विदेशी संस्था हातात पैसे घेऊन उभ्या आहेत. म्हणून म्हटलं, चित्रपट बनवण्यासाठी काय पाहिजे, तर इच्छा पाहिजे. इच्छा असेल, तर जिद्दीने चित्रपट कसा काढता येतो, याचं दर्शन ’आय ऍम अ गुड पर्सन आय ऍम अ बॅड पर्सन’ या चित्रपटाच्या द्वारे घडतं. चित्रपटाची निर्मिती करणारी इन्ग्रिड व्हेनिन्जर स्वतः हजर होती. चित्रपटात एक आई आणि तिची मुलगी, यांच्या मुख्य भूमिका होत्या. आईच्या भूमिकेत इन्ग्रिड स्वतः होती. आणि तिच्या मुलीच्या भूमिकेत चक्क तिची मुलगी होती. फेस्टिवलला तिच्या बरोबर तिचा मुलगा देखील आला होता आणि तो चित्रपटात होताच! पुन्हा इन्ग्रिडच्या मुलाच्याच भूमिकेत. किती पैसे वाचवले! नवर्‍याच्या भूमिकेत मात्र वेगळा कुणी तरी.
पुढे. चित्रपट सुरू होण्या‌अगोदर निवेदन करताना तिने आवर्जून सांगितलं, की ती एक ’इंडिपेण्डंट फिल्म मेकर’ आहे. म्हणजे, ती कुठल्या स्टुडिओसाठी फिल्म बनवत नाही. स्वतःच स्वतःचे चित्रपट बनवते. अर्थातच तिला बाहेरून स्टुडिओचं आर्थिक पाठबळ मिळत नाही. चित्रपटातली इन्ग्रिडची भूमिका पुन्हा फेस्टिवलसाठी चित्रपट बनवणार्‍या बाईची! यावरून पक्का समज व्हावा की ही नक्कीच आत्मकथनात्मक फिल्म आहे. स्वतःचीच कहाणी इन्ग्रिडने चित्रपटातून सांगितली आहे. प्रेक्षक असं हमखास समजणार, म्हणून इन्ग्रिड चित्रपट सुरू होण्या‍अगोदरच्या निवेदनात अगदी आवर्जून असं सुद्धा सांगते, की ’हा चित्रपट वास्तवदर्शन नाही, हे माझं जगणं नाही; हे माझं दुःस्वप्न - नाइटमेअर - आहे!’ चित्रपट बघितल्यावर असं बजावण्याचं कारण समजतं.
चित्रपटाच्या सुरुवातीला एक बाई सकाळी उठते आणि रोजचं रूटीन असल्याप्रमाणे नवर्‍याचं हस्तमैथुन करून हात धुते आणि घरकामाला लागते. स्थळ टोरोंटो, कॅनडा (इन्ग्रिड तिथलीच). मग तयारी करून ती आणि तिची मुलगी विमानात बसतात आणि इंग्लंडमध्ये ब्रॅडफर्ड या गावी जातात. कारण तिथल्या फिल्म फेस्टिवलमध्ये या बाईचा चित्रपट दाखवण्यात येणार असतो. बाई जितकी परक्याशी संभाषण करायला, नवनवीन गाठीभेटी करायला उत्सुक तेवढीच मुलगी शांत, गप्प, मोबाइलवरच्या गेममध्ये रमणारी. ब्रॅडफर्डला बाईचा चित्रपट दाखवला जातो. आपल्यालाही त्याचा अखेरचा भाग बघायला मिळतो. त्यात एकामागोमाग एक समोरून नागड्या पुरुषांच्या ’त्या’ भागाचे क्लोजप्स वेगाने दिसतात. नंतरच्या प्रश्नोत्तरात एक जण तिला म्हणतो, ’तू पुरुषांचा द्वेष करतेस, हे उघड आहे.’ तर ती उत्तरते, ’नाही!’ त्यावर तो म्हणतो, म्हणजे तुला सेक्स आवडत नाही!
संध्याकाळी बाई बाहेर पडते, बारमध्ये जाते, नाचते, मित्र गाठते आणि त्याच्याबरोबर रात्र काढून पहाटे चार वाजता परतते. मुलगी काहीही न करता हॉटेलच्या रूमवर असते. मुलीने उदासपणा सोडून लोकांमध्ये मिसळावं असा बाई जोरदार प्रयत्न करते; पण मुलगी दाद देत नाही. एकूणच आईच्या बरोबर रहायला कंटाळलेली मुलगी आईबरोबर पुढच्या बर्लिनच्या फेस्टिवलला न जाता पॅरिसच्या कझिनकडे जाते.
इथून चित्रपट सांधा बदलतो. मुलगी निघून गेल्यावर बाई एकटी होते. एकटेपणा घालवण्यासाठी टोरोंटोला मुलाशी स्काइपवरून बोलते. बर्लिनला रेल्वे स्टेशनपासून प्रेक्षणीय स्थळांपर्यंत ठिकठिकाणी हिंडून अनोळखी लोकांना ’माझा चित्रपट अमुक थिएटरमध्ये आहे, तो प्लीज बघा’ अशी विनंती करते. अपेक्षेप्रमाणे काही लोक तिचं ऐकतात, काही पूर्ण दुर्लक्ष करतात. चित्रपट बघायला पंधरा एक लोक येतात. तर तेसुद्धा ती गोड मानून घेते. तिचा एकटेपणा आपल्याला जाणवत रहातो. सतत हसतमुख राहून भेटेल त्याच्याशी किंवा तिच्याशी चांगले संबंध बनवण्यासाठी उतावीळ असणार्‍या त्या बाईच्या अंतर्यामीच्या एकाकीपणाचा आपल्याला अगदी जवळून साक्षात्कार होतो. पॅरिसला गेलेल्या मुलीचं अगदी उलट होतं. तिला नवे मित्रमैत्रिणी भेटतात. त्यांच्याशी तिचं छान जमतं. तिच्या कझिनच्या बॉयफ्रेंडशी तर तिचं खूपच छान जमतं. इतकं, की तिला दिवस गेले आहेत, हे सुद्धा ती त्याला सांगून टाकते.
आणि शेवटी मायलेकी दोघी आपापले मोठ्ठे निर्णय घेतात. एकोणीस वर्ष एक महिना वयाची मुलगी ठरवते, पोटातलं मूल ठेवायचं नाही, ऍबॉर्शन करायचं. पुढच्या वेळी चित्रपटाच्या अखेरीस जेव्हा आईला प्रश्न होतो, की हा असा चित्रपट तू का काढलास? तर उत्तर देताना ती म्हणते, मी ही फिल्म बनवली कारण मला माझा नवरा अजिबात आवडत नाही. त्याच्यापासून डिव्होर्स घेण्याची माझी इच्छा आहे पण तसं त्याला सांगायचं धाडस माझ्यात नाही. माझी फिल्म त्याने बघावी आणि ती बघून त्यालाच मला डिव्होर्स देण्याची इच्छा व्हावी, असं मला वाटतं!
नंतर मी इन्ग्रिडला विचारलं, घरच्यांना भूमिका देऊन तू बचत केलीस; मग टोरोंटो, ब्रॅडफर्ड, पॅरिस आणि बर्लिन अशा चार ठिकाणी चित्रण करणं तुला कसं परवडलं? म्हणाली, सगळीकडे मी फेस्टिवलच्या निमित्ताने गेले आणि शूट केलं! पण चित्रपट काढून ती खूप आनंदलेली होती. प्रत्येक प्रश्न स्वतःला लावून घेत होती. मी म्हणालो, यातली आई बारीक, सडसडीत आहे, तर मुलगी स्थूल. तर यात एक महत्त्वाचं विधान लपलेलं नाही का? मला म्हणायचं होतं, आईला आकर्षक दिसणं महत्त्वाचं वाटतं, म्हणून तिने वजन ताब्यात ठेवलं आहे. पण आजच्या पिढीतल्या कोवळ्या, तरुण वयातल्या मुलीला तशी अजिबात गरज वाटत नाही. ती आकर्षक आहेच. म्हणून खुशाल वजन वाढू देते. इन्ग्रिडला माझं म्हणणं ऐकूच गेलं नाही. माझा प्रश्न स्वतःला लावून घेत ती उत्तरली, माझ्या नवर्‍याकडले लोक स्थूल आहेत. मुलगी त्यांच्या वळणावर गेली!
आपल्याला काही तरी म्हणायचं आहे, जे ऐकू शकतील त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि त्यासाठी सिनेमा हे माध्यम सर्वथा योग्य आहे, असं आतून वाटल्यावर स्वतःच्या कुटुंबाला वेठीला धरून, जमेल त्या पद्धतीने शूट करून एक फीचर फिल्म सिद्ध करण्याची तिची जिद्द मला अफलातून वाटली. ’मी एक इंडिपेण्डंट फिल्म मेकर आहे,’ असं आवर्जून म्हणताना तिने दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे मला कुठल्याही स्टुडिओचा, म्हणजे भांडवलाचा आधार नाही. आणि दुसरं म्हणजे, या अडचणीला न जुमानता मी मला हवे तसे चित्रपट काढणारच! फेस्टिवलला आलेल्या तिच्या मुलाने आईच्या मागोमाग एक घोषणा केली: आजचा शो मी बाबांना अर्पण करतो आहे. कारण ते इथे येऊ शकलेले नाहीत!
तिचा मला हेवा वाटला. संवाद साधणे, ही तिला गरज वाटली आणि ती तिने हर प्रयत्नाने पूर्ण केली. त्याचा निरागस आनंद तिच्या डोळ्यात व्यक्‍त होत होता. ते दर्शन खूप समाधान देणारं होतं. विकसित, विकसनशील हे देशादेशातले भेद कदाचित समाजाला लागू होत असतील; पण व्यक्‍ती पातळीवर एकेकाचा कस लागत असतो. ’इंडिपेण्डंट फिल्म मेकर’ इन्ग्रिड त्यात पास झाली. चित्रपट करण्याची इच्छा तिने पूर्ण केली. त्या जिद्दीला सलाम!

एक ’अवर्णनीय’ म्हणावी अशी फिल्म पाहिली. नाव होतं, द एण्ड ऑफ टाइम. ’काळ’ या विषयावरचा चित्रपट! हा विषय इतका मोठा, इतका संदिग्ध आहे, की त्याची ट्रीटमेंट अमुक अशी ठरूच शकत नाही. वेगळ्या शब्दात म्हणायचं, तर पूर्ण वैयक्‍तिक होते. तसाच तो होता. सुरुवात ’सर्न’ च्या विश्वाचं जन्मरहस्य शोधण्याच्या प्रयोगापासून झाली. मग वाटेत लाव्हारसाचा प्रवाह, भारतीय प्रेतयात्रा, निसर्गदृष्यं, रांगोळ्यांचे हजारो, चमत्कारिक पॅटर्न्स असं काय काय येत गेलं. घडत काहीच नसल्याने चित्रपटाला वेग होता की नव्हता, याबद्दल विधानही करता येणार नाही. याला डॉक्युमेंटरी म्हणता येत नाही कारण ’टाइम’ म्हणजे काय, हे त्यात समजावून, वगैरे सांगितलं नव्हतं. याला फीचर फिल्म म्हटलं, तरी गोंधळ. स्क्रिप्ट, स्टोरीलाइन, काही काही सांगता येत नाही. पण असंही असतं, कॅमेरा घेऊन, हवा तो विषय ठरवून असंही करता येतं, हे कळलं.

मेरा भारत महान!
तथाकथित मुख्य धारेतले कमर्शिअल चित्रपट असोत, की एका बहुआयामी माध्यमाच्या द्वारे कला करत असण्याचा दावा करणारे फेस्टिवलमधले (पुन्हा तथाकथित!) समांतर असोत; शितावरून भाताची परीक्षा करणं योग्य नव्हे. उदाहरणार्थ, अमिताभचा बादबान बघून भारतातल्या कुटुंबाच्या रहाणीची, कुटुंबामधल्या नातेसंबंधांची, सणांची आणि लग्नसमारंभांची कल्पना करणं बरोबर होईल का? तरीही भारतीय समाजात नातेसंबंधांना मोठं मूल्य आहे, त्यातले संकेत मोडणे हा सामाजिक अपराध आहे, वयाने वडील असणार्‍यांचा आदर करणे, हेसुद्धा एक मूल्य आहे, अशा गोष्टी समजतातच. कधी कधी तर दिग्दर्शकाच्या गावी नसलेलं काही प्रेक्षकाला कळून जातं! कारण, ज्या गोष्टी तो सर्वसामान्य मानतो, गृहीत धरतो, त्या कुणा परक्याला लक्षणीय वाटण्याची शक्यता असतेच.
फेस्टिवलमधले चित्रपट बघताना अशा उलट सुलट बाजूंची जाणीव जरी ठेवली, तरी चौदा देशांमधल्या जगण्याची चुणूक बघून एक भावना अगदी ठामपणे मनात उमटली. ती म्हणजे, या आपल्या भारत देशात रहाणं हे भाग्य आहे. आपण इथे रहात असल्यामुळे आपलं जीवन इतर किती तरी देशांत रहाणार्‍यांपेक्षा जास्त निश्चिंत झालं आहे. मेरा भारत महान! कुणी म्हणेल, भरल्या पोटी असं वाटणारच. पण हा देश आणि तो देश अशी तुलना करायची, तर एका आर्थिक - सामाजिक पातळीवर जगणा‍यांमध्ये करावी. तसं केलं तर पुन्हा हेच म्हणावं लागेल, मेरा भारत महान!
थोडं तपशीलात जाऊ. काँगो या देशाचं नाव न घेता तिथल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ’वॉर विच’ हा चित्रपट बनवणार्‍या किम ग्युएन या कॅनेडियन दिग्दर्शकाने स्वच्छपणे आश्चर्य व्यक्‍त केलं, की ’भारतातही आफ्रिकेइतकीच गरिबी आहे आणि आफ्रिकेत आवश्यक आहेत, तसेच प्रयत्न इथल्या गरिबांची स्थिती सुधारण्यासाठी करावे लागतील; पण इथे वातावरण अगदी सुरक्षित आहे! आफ्रिकेत घराबाहेर पडणे, हेच एक धाडस असतं. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधून मी फिरलो, तरी टेन्शन नाही!’ त्याचं ऐकून मनात विचार आला, आतापर्यंत अगणित वेळा रात्री अपरात्री सुनसान रस्त्यावरून घरी येताना कधीही भीती वाटली नाही. मागे ज्यूक बॉक्समधली जुनी जुनी गाणी ऐकण्यासाठी वेश्यावस्तीतल्या हॉटेलांत चहा पीत बसताना, तिथे खाताना कसला दचका म्हणून नव्हता. हे केवळ मुंबईतच आहे, असं मानण्याचं कारण नाही. उत्तर प्रदेशात असताना लखनौ, कानपूरपासून छिब्राम‌ऊ आणि कायमगंजपर्यंत लहानमोठ्या गावा-शहरांमध्ये मी ओसाड रस्त्यावर हिंडलो आहे. भारतभर या ना त्या निमित्ताने गेलो असताना अशी वेळ आली आहे. कधीच कसलाच प्रसंग उद्‌भवला नाही, असं म्हणता येणार नाही; पण हजारो वेळा वस्तीत आणि जंगलातही फिरलो असताना दोन-तीन वेळा बांका प्रसंग आला असेल, तर त्यातून नियमच सिद्ध होतो!
याच्या कारणात न शिरता पुढे जाऊ. कोरियाच्या मी पाहिलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये अतिशय क्रूर हिंसा होती. शून्य संदिग्धता असलेली नग्न दृष्यं होती. सेक्सचं नागडं दर्शन होतं. किती तरी दृष्यं रक्‍ताने थबथबलेली होती. कोरियातलं सामान्य जनजीवन हे असं आहे, असा निष्कर्ष काढणं जरी उतावीळपणाचं असलं; तरी कला करताना, वास्तव दाखवायचं ठरवलं असताना कोरियन दिग्दर्शकांना असा भडकपणा अंगिकारावासा वाटतो, हे विधान आगाऊ ठरू नये. विशेष म्हणजे यातला एक दिग्दर्शक ’स्प्रिंग समर ऑटम विंटर’ यासारखा शांतरसात न्हालेला अतिसुंदर चित्रपट देणारा असतो, तेव्हा तर नक्कीच. जगण्यातून जेव्हा तरलता, सूचकता खोडली गेलेली असते, तेव्हाच असं होणार, नाही का? आपण सारे, आपला सगळा समाज हळुवार आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. ढसाळची ’माणसाने’ ही कविता भडक प्रतिमांनी सजलेली आहे. पण समाजातल्या सर्व घटकांची अभिव्यक्‍ती भडक व्हावी, इतकी दुर्दशा अजून झालेली नाही. कधीच नव्हती.
फिलिपीन्समधल्या एका चित्रपटात (लिलेट नेव्हर हॅपण्ड) जनावराच्या पातळीवर जगणार्‍या आणि सुसंस्कृत मूल्यांना पार धाब्यावर बसवणार्‍या वर्गाचं चित्रण होतं. दुसर्‍या चित्रपटात (दाय वूम्ब) समुद्रकिनार्‍याजवळ बांबूच्या आधाराने असलेल्या फळ्यांवर गावच्या गाव वसवणार्‍या मुस्लिम कोळ्यांचं जगणं दाखवलं होतं. एका मोटरबोटीतून चोर येतात आणि खुशाल गोळी घालून कोळ्याला जखमी करतात. तो पाण्यात फेकला गेल्यावर त्याच्या बोटीतलं किडुक मिडूक घेऊन ते पसार होतात. कोळ्याची बायको त्याला वाचवते, घरी आणते, शुश्रुषा करते; हे बरोबर आहे; पण पोलिसांकडे किंवा वस्तीतल्या कुण्या म्होरक्याकडे नवराबायको तक्रार करत नाहीत! एकदा सैनिक कोणाच्यातरी मागे धावत जाताना बाजारात विक्रीला ठेवलेल्या वस्तू बिनदिक्कत तुडवत जातात. तर ती सुलतानी मुकाट्याने सहन केली जाते. समाजाचा एक भाग असा साध्या जगण्याच्या अधिकाराविना, न्यायाची शाश्वतीच नसलेल्या स्थितीत जगतो? आपल्याकडल्या आदिवासींना असाच अन्याय सहन करावा लागतो; विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होणार्‍यांची दाद कोणी घेत नाही; असं यावर म्हणता येईल. पण इथल्या अन्यायावर प्रकाश टाकण्याचं, अन्याय करणार्‍यांना जाब विचारण्याचं काम काही ’जागले’ करत असतात. अगदी जिवावर उदार होऊन करतात. इथल्या प्रत्येक नागरिकाला घटनेने समान अधिकार दिले आहेत, असं ठासून मांडलं जातं. कुत्री आणि मांजरंसुद्धा इथे निराधार नसतात!
आर्जेंटिनाचा अलेजान्द्रो फोदेल या दिग्दर्शकाचा ’वाइल्ड वन्स’ हा चित्रपट असाच अतिशय अस्वस्थ करणारा होता. चार मुलं आणि एक मुलगी तुरुंग फोडून पळतात आणि रानातून रस्ता शोधत जातात. या मुलांना दयामायाच नाही! माणसाला ठार करण्यात त्यांना अनमान वाटत नाही. माणूस मारल्यावर त्या कृत्याची आठवण त्यांच्या स्मृतीतून जणू उडून जाते. एकही जण विशीच्या पुढचा नाही. भूक लागलेली असताना हरणाकडे केवळ ’अन्न’ म्हणून बघणार्‍या लांडग्यापेक्षा हे वेगळं नाही. ज्याच्याबरोबर ते खातात पितात, त्याच्यावरही गोळी चालवायला त्यांना काही वाटत नाही. एका बाजूने असं म्हणता येईल, की दिग्दर्शकाने ठरवलं म्हणून ती पात्रं तशी आहेत. असेल. वास्तवात आर्जेंटिनामध्ये असले मानवी लांडगे नाहीत; ’कला’ करण्यासाठी, विशिष्ट मानवी प्रवृत्तीचं दर्शन घडवण्यासाठी दिग्दर्शकाने अशी कथा निवडली आहे, असं म्हणून आपण आर्जेंटिनाची आणि आपली सुटका करून घेऊया. ’काळे बेट लाल बत्ती’ या नाटकातसुद्धा सर्वसामान्य माणसं एकमेकांच्या जिवावर उठतात. पण तो इन्द्रसेन आंग्रे त्यांना तिथपर्यंत ढकलत नेतो! ’वाइल्ड वन्स’मध्ये कोण नेतो? समाज? मग सुटका कुठे झाली?
रुमानिया हा पूर्व युरोपातला एक देश. ’बियॉण्ड द हिल्स’ या चित्रपटात इयत्ता पहिलीपासून बरोबर असलेल्या मैत्रिणीच्यात पूर्ण अडकलेल्या इलेनाची परवड दाखवली आहे. तिच्या मनाचा ताबा सैतानाने घेतला आहे, असं ठरवून एक फादर आणि त्याच्या मठातल्या नन्स तिला फळकुटाला बांधतात, तिला ओरडता येऊ नये म्हणून तोंडात बोळा कोंबतात, तिने पडून रहावं म्हणून साखळ्यांनी जखडतात. शेवटी ती मरते. आपल्या इथल्या अंधश्रद्धाळू अडाणी जनतेसारखंच झालं की हे. पण जर्मनीतून परत गेलेल्या एका मुलीवर असे अत्याचार होताना बघणं ऍब्सर्ड वाटतं. असं वाटतं, युरोपने विज्ञानात शोध लावले, मानवी जीवनाचे आयाम बदलून टाकले; पण त्यांच्याकडेही असले प्रकार आहेतच. ’कदाचित मी अति‍आत्मविश्वास दाखवला असेल, पण माझा उद्देश तिचं भलं करणं हाच होता,’ असं तो फादर म्हणतो. आपल्या‍ इथला मांत्रिक तांत्रिक असं म्हणाला तर त्याचं ऐकून घेतील? तिथला पोलीस फादरशी ज्या अदबीने वागतो, तसं इथे कोण वागेल? आमचा भारत देश म्हणजे एक खण्डच आहे. इथे सुद्धा एकीकडे मुंबई आणि दुसरीकडे मानवत असतं. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स असतात. आम्ही कुठे स्वतःची मूठ सोडतो आहोत? म्हणायचं इतकंच आहे, की युरोप आणि भारत मग एकच का? एकाच पातळीवर बसवायचे का?
अर्थात सगळ्याच चित्रपटांनी असं केलं नाही. ’आमूर’ या फ्रेंच चित्रपटात एका वयस्क जोडप्यातल्या प्रेमाचं हृद्य दर्शन होतं. चित्रपटातल्या वातावरणातही संगीत मैफल होती, मदत करणार्‍या अनोळखी व्यक्‍ती होत्या आणि त्याचबरोबर एक शिवराळ, धसमुसळी नर्सही होती. एकूण दर्शन सुसंस्कृत समाजाचं होतं. पण ’यलो’ या अमेरिकन चित्रपटातलं कुटुंब पार वाया गेलेलं होतं. लोक मजेत ड्रग्ज घेत होते. लहान मुलांची शिक्षिका मुलांना शिकवताना मध्येच बाहेर जाऊन गाडीत ठेवलेल्या ड्रग्जच्या गोळ्या खात होती. आणि ’मला कशाचं काही वाटत नाही,’ अशी तिची तक्रार होती. नॉर्मल जगण्याचा वीट आल्यामुळे ती एक विकृत समांतर जीवन जगत होती. स्वित्झर्लंडमध्ये घडणार्‍या ’सिस्टर’ या चित्रपटात अगदी लहान वयात आई झालेली एक मुलगी आणि तिचा मुलगा चोर्‍यामार्‍या करत मस्त जगतात. ती अर्थातच वेश्याव्यवसाय चालू ठेवते आणि कोणाला तरी गटवून यातून बाहेर पडण्याची आशा बाळगते. एकदा तसं होण्याची शक्यताही निर्माण होते पण त्या मुलाला कळतं की ही आपल्याला एकटा टाकून निघून जाणार, तेव्हा तो तिच्या बॉयफ्रेंडला सांगतो की जगाला जरी आम्ही भाऊ-बहीण असल्याचं सांगत असलो, तरी ही माझी आई आहे. यात आक्षेपार्ह भाग असा की त्या दोघांच्या दुर्दशेची जबाबदारी कोणाचीही असो, चोर्‍यामार्‍या करणार्‍या आणि चोरीची दीक्षा दहा वर्षांच्या मित्राला देणार्‍या मुलाची बाजू दिग्दर्शकाने घेता कामा नये. आणि जर घेत असेल, तर त्या समाजाच्या मूल्यांबद्दल काय बोलावं?
एकूण काय, तर आपलं फार वाईट चाललं आहे, असं म्हणायची सोय या चित्रपटांनी ठेवली नाही. आपला देश गरीब आहे, इथेही दारुण विषमता आहे, जन्माने एखाद्याला मुर्दाबाद करणारी परंपरा इथे आहे; पण याला नाक मुरडण्याचा अधिकार बाहेर कोणाला आहे? म्हणून (एका काडीच्या शेजारी छोटी काडी ठेवली की पहिली जशी आपोआप मोठी होते तशा, एका परीने उथळ लॉजिकमधून) पुन्हा म्हणावंसं वाटतं,
गड्या आपला देश बरा! मेरा भारत महान!

काय फलित या दहा दिवसांचं? जगाच्या पाठीवरच्या कुठल्या कुठल्या देशीचा सिनेमा बघायला मिळाला. त्यातलं ’हे असंच का?, ते तसंच का?’ या प्रश्नांची उकल थेट दिग्दर्शकाकडून करून घ्यायची संधी मिळाली. ’मोअर दॅन हनी’ सारखी मधमाशा, त्यांचा पर्यावरणाशी व माणसाच्या अन्नाशी असलेला संबंध, मधमाशांची पोळी करण्याचा व्यवसाय करणारे आणि पाळण्याच्याच क्रियेमुळे व कीटकनाशक वापरल्यामुळे एकूण मधमाशांवर होणारे विविध परिणाम याचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारी; उत्तर अमेरिका, ऑस्ट्रिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमध्ये शूट केलेली डॉक्युमेंटरी बघायला मिळाली. असे जगभरचे, वेगळ्या विषयांवरचे, मनोरंजनासाठी नव्हे तर एका माध्यमाची क्षमता शोधू बघणारे किंवा आपल्याला जे सांगायचंय ते जास्तीत जास्त प्रखरपणे अचूकपणे पोचवण्यासाठी चित्रविचित्र प्रयोग करणार्‍यांचे सिनेमे बघायला मिळाले.
अनेक वर्षं असले सिनेमे बघण्याची सवय झाल्यामुळे त्यांचं अप्रूप न राहिलेले फिल्म क्रिटिक्स अशा ठिकाणी दिसतात, भेटतात, न भेटताही ऐकू येतात. सिनेमा कितीही थोर असो, भारावून न जाण्याचा वसाच त्यांनी घेतलेला असतो आणि ’बरा होता’, ’डिजिटल असूनही ग्रेनी टेक्श्चर मॅनेज केल्यामुळे ही फिल्म इम्प्रेशन मारून जाते’, ’अ व्हेरी हॅक्नीड ट्रीटमेंट’ असे शेरे ते मारतात. पण कधी कधी ’हा आख्खा चित्रपट रात्री अमुक अमुक कॅमेर्‍यावर शूट केला आहे आणि तरीही जी स्पष्टता, जे अँगल्स मिळवले आहेत, ते खास आहे,’ असं सोदाहरण सांगतात. त्यामुळे आपल्याला ’सिनेमा कसा कसा बघावा’ याची मोफत शिकवणी मिळते.
गोव्याच्या लोकांना या फेस्टिवलमधून काय मिळतं? आयनॉक्सच्या समोरच्या फूटपाथवर खाण्याचे स्टॉल्स लागतात. त्यापलिकडल्या ’किंग फिशर व्हिलेज’ मध्ये जत्राच भरलेली दिसली. डी बी बांदोडकर रोडवर रोषणाई केलेली होती. रोज काळोख पडल्यावर आकाशभर चमचम चांदण्या करणारे फटाके उडवले जात होते. परदेशी दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते जसे आले तसेच भारतातल्या स्टार्सनी सुद्धा पायधूळ झाडली. आयनॉक्सच्या परिसरातल्या दुकानांनी बरा धंदा केला. एका बाजूने जरी हा फेस्टिवल गोव्याचा असला तरी प्रेक्षकांच्यात बाहेरच्यांची बहुसंख्या होती. या फेस्टिवलमुळे गोव्याची नॅशनल - इंटरनॅशनल टूरिस्ट जाहिरात चांगली झाली.

दहा दिवस संपले. अनेक ओळखी झाल्या. पुढच्या वर्षी नक्की भेटण्याचे वायदे झाले. काय सांगावं? कदाचित पुढच्या वर्षी मीच ’उच्चभ्रू’ झालेला असेन; असे सिनेमे बघण्याची सवय होऊन त्यांच्याबद्दल कौतुकाने वा तुच्छपणे बोलू लागेन!