Wednesday, December 26, 2012

स्पेशलवाले


माझा जन्म मुंबईच्या गिरणगावात झाला आणि सोळा वर्षांचा होईपर्यंत मी तिथे राहिलो, वाढलो. त्यामुळे, नवरात्र, गणपती यांसारख्या सार्वजनिक उत्सवातला कानठळ्या बसवणारा आवाज; तसंच गोविंदा, कबड्डी सामने यांसारख्या, नंतर सार्‍या मुंबईचीच ओळख बनलेल्या प्रथा-संस्था यांच्याशी तिथे माझी चांगली ओळख झाली. आणखी एक ’संस्था’ मला तिथे परिचयाची झाली, जिची जान पहचान इतर मुंबईकरांना किती आहे वा होती, मला कल्पना नाही. इतकंच नाही, गिरणगाव आणि नंतर मुंबई शहर सोडून दुसरीकडे रहायला गेल्यावर मलाच ती परकी झाल्यासारखी आहे. ती ’संस्था’ म्हणजे स्पेशलवाले. त्यांच्याकडे मी किंवा माझ्या आसपासच्या कोणी कधी पोलीस खात्याचा भाग म्हणून बघितल्याचं आठवत नाही. ते तसे होते, हे कालांतराने तर्कातून सुचलं. माझ्या मनात तेव्हा त्यांना स्वतंत्र अस्तित्व होतं. आणि ग्लॅमरसुद्धा. त्यांच्या काही आठवणी आहेत, त्या सांगतो.

लहान असताना, म्हणजे शाळेत जाण्याच्या काळात ते दुरून दिसत. त्यांच्या जवळ जाण्याची वेळ कधी आली नाही. मला तशी लहान असल्यापासूनच रात्री बाहेर हिंडण्याची हौस. चाळीत आमच्या मजल्यावर अनेकांकडे गणपती येत असे. बहुतेकांकडचा गौरीबरोबर जाणारा. शेवटच्या रात्री सामुदायिक जागरण असे. त्या काळात आणि त्या वयात मध्यरात्रीचे बारा म्हणजे डोक्यावरून पाणी. ते वाजून गेले म्हणजे जागरण ’संपन्न झालं’. झब्बू खेळत बसलेली मोठी मंडळी झोपायला गेली, की आम्ही दोघे तिघे बाहेर पडायचो. त्यात जबाबदार मानला जाणारा मी. पण त्या प्रसंगी आमचा लीडर रमेश. रस्त्यावर सामसूम असे. दहा एक मिनिटांनी एखादी गाडी त्या अतिरुंद आंबेडकर रोडने जात असे. मी ऐन रस्त्याच्या मध्ये आडवा झोपत असे. दिवसाउजेडी खुळ्यासारखं वाटणारं आणि अशक्यही असलेलं ते कृत्य करण्यात मला सुख होत असे. एखादी सिगारेट किंवा कोणाचकडे पैसे नसतील तर सिगरेटचं थोटुक ओढ; पहाटेपूर्वीच्या काळोखात पाव वाटत फिरणार्‍या तीन चाकी गाडीवाल्याची नजर चुकवून पावाची चोरी कर; नाही तर नुसतंच निर्मनुष्य रस्त्यावरून दादर टीटी ते लालबाग फीर, हे उद्योग अत्यंत रोमँटिक वाटून घेत आम्ही करत असू. आम्ही पांढरपेशांची बावळट मुलं. रमेश तसा नव्हता. त्याची नजर चोहीकडे फिरत असे. आणि ’स्पेशलवाले’ असं तो पुटपुटला की आम्ही धूम ठोकत असू.
तेव्हा कळलंही नाही, पण माझ्या मनात स्पेशलवाल्यांची एक प्रतिमा रुजली. आणि हे माझ्या पुष्कळ उशीरा लक्षात आलं. खूप नंतर, नोकरी लागून जगाची, जगण्याची, मुंबईची यथायोग्य ओळख पाळख झाल्यानंतर. एकदा आम्ही ग्रँट रोड - चर्नी रोड परिसरात होतो आणि शेवटची ट्रेन चुकली. (म्हणजे रात्रीचा एक वाजून गेला होता.) दोन पर्याय होते. एक, बसने घरी जाणे. घरी जायला बस रात्रभर होती. पण आमच्यातल्या काहींना मरणाची झोप येत होती. काही दोन पावलं सरळ चालण्याच्या स्थितीत नव्हते. मग आम्ही चौपाटी गाठली आणि वाळूत विसावलो. मी आणि एक जण शेवटची सिगारेट ओढत होतो आणि मला दुरून दोघे जण डुलत डुलत आमच्या दिशेने येताना दिसले.
"उठ, चल." त्यांच्याकडे खूण करत मी सोबत्याला म्हणालो.
"का? ते आपल्याकडे येताहेत कशावरून? आणि आले तर काय झालं?" तो म्हणाला.
"एक तर इथे झोपलेल्यांना उभं रहा सांगितलं तरी रहाता येणार नाही आहे. दुसरं म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला वास येतो आहे. त्यांना इथपर्यंत यायला लावण्यापेक्षा आपण पुढे जाण्यात शहाणपणा आहे." मी.
सोबती गिरणगावात वाढलेला नव्हता. गिरगावकरसुद्धा नव्हता. "कोण आहेत ते?" तो आश्चर्याने उद्‌गारला.
"स्पेशलवाले." मी उत्तरलो.
त्याच्या "म्हणजे?"कडे दुर्लक्ष करून मी त्याला उठवलं आणि पुढे झालो. ते थांबले. एकाने तंबाखू काढून तळव्यावर चोळायला सुरुवात केली. त्यांनी निवांतपणे आमची चौकशी केली. कोण, कुठून आलात, इथे काय करता, वगैरे. अशा वेळी आपली पांढरपेशी बोली म्हणजे अमोघ इन्शुरन्स आहे, हे मला जाणवलं. तोंडचा वास लपवणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात मीच जीभ जड न झालेला होतो.
आम्ही चोर, भिकारी नाही याची खात्री पटल्यावर एक म्हणाला, "इथे सुनसान जागेत झोपताय. कोण आलं लुटायला, तर काय कराल? हत्यार आहे का काही जवळ? की नुसता दीड वीत बांबू?"
मी ओशाळा हसलो.
"जा, तिथे टिळकापाशी झोपा. तिथे आमची माणसं असतात. पहिल्या गाडीने जा घरच्याला."
मी आडवे असलेल्यांच्या शिव्या खात त्यांना ओढत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी घेऊन गेलो. तिथे भगभगीत उजेड होता. पण इलाज नव्हता. स्पेशलवाल्यांची मर्जी बिघडवण्याची माझी टाप नव्हती.

याच्या अगोदरची एक गोष्ट. माहीमला, कोकण नगरमध्ये रहात असताना दिवाळीनिमित्त नाटकं, वगैरे बसवली जात. सोसायटीच्याच हॉलमध्ये नाटकाची प्रॅक्टीस चाले. प्रॅक्टीस संपली, की वडीलधारे घरी जात. दम मारायला गेटबाहेर जाऊन थोड्या गप्पा करणे, असा आमचा तरुणांचा शिरस्ता होता. एकदा असेच अर्ध्या चड्डीतले दोघे आले. एकाकडे सायकल होती. त्याने आमच्याकडे लाइट मागितला. कोणी तरी नम्रपणे दिला. त्यांची ओळख कोणीच कोणाला सांगावी लागली नाही. इतक्यात गल्लीतून एक जण एकटाच आला. सायकलवाल्याच्या ’शिळोप्याच्या’ चौकशा चालल्या होत्या: नाटक असतं का सोसायटीचं? वा. कोण बसवतं? वा. कुठलं नाटक आहे या वर्षी? वगैरे. चालत येणारा जवळ, अगदी रस्त्याच्या पलिकडल्या बाजूला समोर येईपर्यंत या दोघांचं जणू दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. पण मला खात्री होती, तो असा सुखासुखी जाऊ शकत नाही. अगदी जवळ आल्यावर एकाने त्याला "ए!" म्हटलं.
तो थांबला. पण रस्ता ओलांडून जवळ आला नाही.
या दोघातला एक जण डुलत डुलत पलिकडे गेला.
"कुठून आला?"
"कामावरून."
"कंपनीचं कार्ड आहे?"
"नाही. टेम्परवारी आहे."
"रेल्वेचा पास?"
"--- "
काय होतंय कळायच्या आत त्याच्या फाडकन कानाखाली बसली. तो थेट आडवाच झाला. मला वाटलं, बेशुद्ध पडणार. कसला? तो कळवळला देखील नाही. स्पेशलवाल्यांपैकी आमच्या जवळ जो उभा राहिला होता, तो शांतपणे आम्हाला म्हणाला, "बरंय. जास्त वेळ बाहेर काढू नका. रात्र खूप झालीय."
त्याला घेऊन दोघे गेले. आम्ही गप्पा संपवून निमूट आपापल्या घरी परतलो. आमच्यात एक दोघे होते, ज्यांचे मित्र पोलीस होते. कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनात त्यांची ओळख होती, वटही होती. पण स्पेशलवाल्याशी मैत्री असल्याचं सांगणारा कुणी भेटला नाही. स्वतःकडे कुठलं ना कुठलं आयडेंटिटी कार्ड असणं किती मोलाचं आहे, हे माझ्या लक्षात आलं. आयडेंटिटी कार्ड तुम्हाला समाजात ठाक ठीक बसवतं. तुम्ही ’नागरीक’ असण्यावर शिक्का मारतं. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, की नोकरदार की नुसतेच किरकोळ व्यावसायिक; रेल्वेचा पास चालतो. कारण तुम्ही नियमितपणे कुठे तरी येजा करत असता. जगाच्या आर्थिक व्यवहारात तुमचा सहभाग असतो. म्हणजे जगात कायदा आणि सुव्यवस्था नांदण्यात तुमचे हितसंबंध गुंतलेले असतात.
तुम्ही ’समाजकंटक’ नसता. ’जनता’ असता.

एकदा अचानक मी आणि एक मित्र यांनी ठरवलं, हाइकला जायचं. तेव्हा मी चुनाभट्टीला रहात होतो. पुन्हा शेवटची कर्जत लोकल गेली होती. आम्ही चुनाभट्टीलाच होतो. चालत सायनला आलो. सर्कलमध्ये उभे राहिलो. अनुभव असा, की रात्री मुंबईबाहेर जाणार्‍या ट्रक्सची रीघ लागलेली असते आणि जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात, त्यातला एक थांबून लिफ्ट मिळायला. त्या दिवशी मात्र अर्धा तास उलटला तरी एक ट्रक थांबायचं नाव घेईना! वेळ नुसताच चालला होता. पावसाची चिन्हं होती आणि आम्ही मुंबईतच अडकलो होतो.
स्पेशलवाले आले. स्पेशलवाला कधीही एकटा नसतो. जोडी असते. आमच्याशी बोलून त्यांनी खात्री करून घेतली, की आम्ही कसल्या कुहेतूने निर्मनुष्य रस्त्यावर उभे नाही आहोत. मग एक म्हणाला, "इथे गेल्या आठवड्यात दोघांनी हात दाखवून ट्रक थांबवला आणि लुटला. तेव्हापासून इथे ट्रकवाला थांबत नाही. या,"
असं म्हणून ते आम्हाला थोडं पुढे घेऊन गेले. त्यांनी हात केल्यावर पहिलाच ट्रक थांबला. त्यात त्यांनी आम्हाला बसवून दिलं.

यातल्या एकाही प्रसंगी मी किंवा इतर कोणी स्पेशलवाल्याकडे नाही त्याचं ओळखपत्र मागितलं की त्यांनी दाखवलं. त्यांनी सुरुवातच दमदाटीने केलीय, असंही मला आठवत नाही. मला त्यांची भीतीही वाटली नाही. पुढची घटना स्पेशलवाल्यांची नाही, सरळ सरळ पोलिसांची आहे. सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात नवी, म्हणजे तीस वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझं घर होतं बोरिवलीला. मस्त पार्टी करून आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. प्यायल्यानंतर ताबडतोब झोपी जायचं असेल, तर कशाला प्यायची? झोप काय, आपल्याला अशीही येतेच! पोटात जेवण आणि डोक्यात मस्त नशा घेऊन रस्त्याने वा आडवाटेने वा मनुष्यवस्तीबाहेर रानात मुक्‍त फिरलं कीच पिण्याचं चीज होतं, असं तेव्हाचं ठाम तत्त्व होतं. तर आम्ही फिरत फिरत फारच दूर, रस्ता संपून जेटी येते, तिथे गेलो. मुंबईच संपली! पुढे पाणी. पलिकडे जायचं असेल, तर होडी किंवा फेरीबोट. वारेवा. बोरिवली छानच प्रदेश आहे; असे सुखी होत आम्ही आसमंतात चिटपाखरू नाही, तिथे पार टोकाला बसून होतो.
जीप आली. आमच्यावर हेडलाइट्सचा झोत टाकून इंजीन बंद करून लांब रस्त्यावरच उभी राहिली. जीप पोलिसांची आहे, हे कळायला डिटेक्टिव असण्याची गरज नव्हती.
मी उठलो. जीपजवळ गेलो. वर सांगितलेली ’इन्शुरन्स’ची ढाल परजली. ती कामी आली. पण जीपमधला साहेब खमक्या होता. म्हणाला, "या, बसा जीपमध्ये!"
आलिया भोगासी असावे सादर. सगळे - म्हणजे चार जण - जीपमध्ये चढलो. मग जीप बोरिवलीभर फिरली. वेस्ट संपवून फाटकातून (तेव्हा ब्रिज झाले नव्हते) ईस्टला गेली. मधे मधे थांबत होती. थांबली, की काळोखातून एक पोलीस अवतरत असे. जीपमधल्या साहेबाला कडक सलाम ठोकून एक डायरी पुढे करत असे. डायरीत सही करता करता साहेब जुजुबी चौकशा करी. असे काही तास फिरत शेवटी आम्ही एकदाचे बोरिवली पोलीस स्टेशनात पोचलो. पोलीस स्टेशनच्या आवारात शिरून जीप थांबली.
साहेब उतरला आणि आमच्याकडे ढुंकूनही न बघता आत चालता झाला! आता? "जा!" असा हुकूम झाल्याशिवाय जायचं की नाही? "जाऊ का?" असं विचारलं, तर परिणाम ठीक होईल की होणार नाही? काही कळेना. आम्ही एक बाकडं शोधलं आणि त्यावर जाऊन बसलो. सकाळ व्हायला फार उशीर नव्हता. लख्ख उजाडलं तसं, परवानगी विचारण्याच्या अविर्भावात जीपमध्ये होते त्यातल्या एका पोलिसाला म्हणालो, "जातो!"
आणि गेलो.

’दारू प्यायली म्हणजे आपण काही पाप केलेलं नाही. अपरात्री रस्त्यात फिरताना आपण धतिंगही करत नाही आहोत. आपल्यातल्या काही जणांची जीभ जड झालीय आणि पावलं डगमगताहेत, इतकंच; आपण जनतेचाच एक भाग आहोत. आपलंच रक्षण करण्याचं कर्तव्य पार पाडण्याच्या क्रियेत असणार्‍या पोलिसांची आणि आपली टक्कर होते आहे,’ या तर्काला धरून मी निर्भय राहिलो. गुन्हेगार शोधणार्‍या पोलिसी नजरेच्या मध्ये जरी आम्ही आलो, तरी अखेरीस या पोलिसांचं स्थान आपण आणि गुन्हेगार यांच्या मध्ये आहे, असाच बुद्धीचा निर्णय झाला. रात्रीबेरात्री ही मुंबई चोराचिलटांच्या हवाली नसते, तिथे कायद्याच्या रक्षकांची गस्त असते; असा विश्वास वाटला.
तो विश्वास मी अजून धरून ठेवला आहे. मी उत्तर प्रदेशातल्या लहान शहरांमध्ये पाच वर्षं राहिलो आहे. दिल्लीतसुद्धा रात्री हिंडलो आहे. मुंबईत गुन्हेगारांना पोलिसांची दहशत वाटत असावी, असा माझा समज होता. उत्तरेत एकूणच प्रजेला पोलिसांची दहशत असते, असं मला तिथल्या सहकार्‍यांनी सांगितलं. उत्तरेत पोलिसांसमोर पांढरपेशेपणाचा विमा कुचकामी ठरतो, असं ते ठामपणे म्हणत. ’जनता’ या शब्दापुढे ’जनार्दन’ हा शब्द आठवतो. ’प्रजा’ या शब्दा‌आधी ’राजा’ हा शब्द असणार, असं मनात येतं. दिल्लीतलं बलात्कार प्रकरण आणि त्याविषयीच्या संतापाचं तेल पोलिसांवर काढण्याचा प्रकार, यातून स्पेशलवाल्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

1 comment:

  1. Kaka, ekdam dhinchak vatle "specialwaale.." vachun.. amha TISS madhlya tolkyanchi mumbai madhli ratrichi bhatkanti athvli, kahi junya- havyasha/ nakosha athvninna ujala milala. :)

    ReplyDelete