’बेबी’ नंदा |
माझा काका त्याच्या जवळ
जवळ हयातभर ’फिल्म इंडस्ट्री’त होता. तिकडच्या गोष्टी रंगवून सांगायचा. दोन की तीन
वेळा त्याचं नाव दाखवलं म्हणून त्याने आम्हा घरच्या लोकांना पासावर सिनेमा बघायला
नेलं होतं, असं मला आठवतं. त्यातला एक चित्रपट होता ’आहेर’. मराठी. नामदेव व्हटकर
आणि सुलोचना त्यात होते. ’आहेर’च्या शूटिंगला मी गेल्याचं आणि कमालीचा
कंटाळल्याचंसुद्धा आठवतं.
हे खूप लहानपणचं आहे. मी
प्राथमिक शाळेत असतानाचं. म्हणजे १९६० च्या अगोदरचं. रमणकाकाने ’फर्स्ट लव’ हा
चित्रपट दाखवायला नेलं की नाही, मला आठवत नाही; पण ’फर्स्ट लव’ची पोस्टर्स,
हँडबिलं त्याने घरी आणलेली स्पष्ट आठवतात. हिरो होता मेहमूद. आणि हिरॉइन नाज. हँडबिलावर
दोघांचे फोटो होते आणि तिचं नाव ’बेबी नाज’ असं लिहून ’बेबी’वर काट मारलेली होती.
मी त्याला विचारलं, हे बिघडलंय म्हणून तू घरी घेऊन आलायस का? तो म्हणाला, नाही, ते
तसंच आहे. त्या वयात मी सर्व मानवी व्यवस्थांच्या बाबतीत भयंकर श्रद्धाळू होतो.
’बेबी’वरची ती ठळक काट मला त्रास देत राहिली. वाटलं, हे असं पाहून कोण कशाला लक्ष
देईल? काट मारली म्हणजे चूक, म्हणजे रद्द; असंच सगळे समजतील. रमणकाकाने मला
समजावलं, “अरे, बेबी नाजचा (तो ’बेबी’ नाज, असंच म्हणाला) हा हिरॉइन म्हणून पहिलाच
सिनेमा. यात ती हिरॉइन आहे. म्हणजे ’बेबी’ नाही! जाहिरातीत असतं असं.”
’फर्स्ट लव’ आला आणि
गेला. कोणाला त्याची आठवण नाही. चित्रगुप्तच्या गाण्यांशिवाय त्याचं काही शिल्लक
नाही. रमणकाकाच्या प्रोड्यूसरचे पुष्कळ चित्रपट बुडत. येतच नसत. पण त्याला कधीही,
एकदाही फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडावंसं वाटलं नाही. मस्त रमला होता.
बेबी नाज प्रमाणे नावामागे ’बेबी’ लागलेली नंदा
गेली आणि हे आठवलं. तिचे पाहिलेले न पाहिलेले चित्रपट आठवले. सगळ्यात जास्त ठसलेला
चित्रपट म्हणजे ’इत्तेफाक’. राजेश खन्नाबरोबरचा. आख्खा चित्रपट एका रात्रीत घडतो.
जवळपास एका बंगल्यात घडतो. चित्रपटात गाणं नाही. दाढीचे खुंट वाढलेला राजेश खन्ना
पहिल्यापासून शेवटपर्यंत वेडसर दिसत रहातो. नंदाला फारच कमी बोलणं आहे. आणि
दोघांशिवाय आणखी पात्रं आहेत – नाहीत. तिचा या चित्रपटाएवढा ठळक रोल दुसरीकडे कुठे
पाहिल्याचं आठवत नाही.
इत्तेफाक |
नंदाचा एकूण सिनेमा
स्पष्टपणे दोन भागांत विभागता येतो. एक, साध्यासुध्या ओळखीच्या, एक प्रकारे दुय्यम
भूमिका; आणि दोन, कमी-जास्त ग्लॅमर असलेल्या नायिकेच्या भूमिका. या दुसर्या
प्रकारच्या एकाही भूमिकेत ती कधी ’खरी’ – म्हणजे तिथली, हिंदी चित्रपटातल्या
बेगडी, लुटुपुटूच्या जगातली वाटली नाही. ’जब जब फूल खिले’ मध्येसुद्धा. तशी
स्मिताही वाटली नाही. पण स्मिताचं न वाटणं इस पार, तर नंदाचं उस पार. ग्लॅमरस
नायिका म्हणून नंदाला बघताना काही वाटलंच नाही. त्यामुळे ’धरती कहे पुकारके’, द
ट्रेन’, ’गुमनाम’ सारख्या चित्रपटांमधल्या नंदाचं काही इम्प्रेशनच मनावर राहिलेलं
जाणवत नाही. उलट, ’जब जब फूल खिले’ मध्ये ’ये समा’ म्हणत डोलताना, वादळात शशी
कपूरला हाका घालत असताना, पार्टीत त्याच्या मुस्कटात देताना ती कशी खटकत रहाते,
हेच आठवतं.
त्या मानाने तिला दुय्यम
स्थान असलेल्या चित्रपटांमध्ये ती बरी वाटली. ते बरे आठवतात. मग ’हम दोनो’तल्या
मेजर वर्माचा
भांग दुरुस्त करणारी त्याची पत्नी आठवून बरं वाटतं. कॅप्टन आनंदची
प्रेयसी असलेली साधना दिसते तशीच नंदासुद्धा सुंदर आणि लहान दिसते. पण साधना
’प्रेयसी’ दिसते, तर नंदा ’पत्नी’. आणि यात नंदाच्या अभिनयाचा भाग आहेच. ’काला
बाजार’मध्ये लीला चिटणीसबरोबर ’ना मै धन चाहूँ’ गातानाची तिची सोज्वळ मूर्ती आठवते
आणि त्या सोज्वळपणाच्या पार्श्वभूमीवर अपराधी मन घेऊन पडलेल्या खांद्यांनी जिना
चढणार्या देव आनंदचा कोंडमारा उठून दिसतो, हे जाणवतं. (अर्थात, त्यात गाण्याच्या गोड,
भक्तिरसपूर्ण चालीचाही मोठा
हम दोनो |
वाटा आहे!)
’धूलका फूल’मधली
राजेंद्र कुमारची बायको आठवते. माला सिन्हाशी संबंध संपल्यावर तो नंदाशी लग्न करतो.
ती थोडीशी जरी ’दिल अपना और प्रीत परायी’मधली राज कुमारची पत्नी नादिरा,
हिच्यासारखी असती; तर ’धूल का फूल’चा तोल कलला असता. तो कलला नाही, हे श्रेय बी आर
चोप्राचं. त्याने माला सिन्हाला केंद्रस्थानावरून हलवायला बरोब्बर पूर्ण पवित्र
आणि निरागस दिसणारी नंदा पकडली!
’कानून’सुद्धा आठवतो.
’कानून’मध्ये अशोक कुमार आणि राजेंद्र कुमार यांना मोठे रोल होते; पण बाकीच्या
मेहमूद, पळशीकर, ओम प्रकाश, शशिकला, जीवन अशा किती तरी लोकांच्या लहानमोठ्या
भूमिकांचा समर्थ हातभार चित्रपटाला लागला होता. त्यांच्यातलीच एक नंदा. तिचं कामही
चित्रपटाच्या सफाईदारपणात भरच टाकतं. धनीरामचा खून केल्याची खोटी कबुली द्यायला ती
कालियाला पैसे देते; पण ती नंदा असल्यामुळे हे कृत्य भ्रष्टपणाचा आविष्कार
असल्याचं प्रेक्षाकाच्या मनात येत नाही. ’कानून’सुद्धा बिनगाण्याचा! दोन दोन
बिनगाण्याच्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे, हा एक रेकॉर्डच असावा नंदाच्या
नावावर.
नंदा गेल्यापासून पेपरात
पुष्कळ छापून आलं. चॅनेलवाल्यांनीही तिची गाणी दाखवली. कुठली कुठली इकडची तिकडची
गाणी दाखवताना तिची वरच्या श्रेणीची गाणी दाखवण्याच्या आड काही तरी आलं असावं. ’अल्ला
तेरो नाम’ (हम दोनो) दिसलंच नाही. ’मचलती आरजू’ (उसने कहा था) सुद्धा नाही. ’भैया
मोरे’ (छोटी बहन) नाही. असं कसं? मग रेडिओ सिलोन – श्रीलंका ब्रॉडकास्टिंग
कॉर्पोरेशन आठवतं. हल्ली सकाळचं ’पुराने फिल्मोंके गीत’ ऐकत नाही; पण पूर्ण
विश्वास वाटतो, की त्यांनी नंदाला न्याय दिला असेल.