Thursday, March 20, 2014

’श्रीमंत’ खुशवंतसिंग आणि आमचा चार्वाक





साल आठवत नाही; पण ते महत्त्वाचं नाही.  आम्ही चार्वाक काढायला सुरुवात केली आणि दर वर्षी काही तरी नवे विषय, वेगळी मांडणी आणण्याचा प्रयत्न करायचो. तर एका वर्षी विषय निघाला, ’नॉर्मलपणा’. विषय निघाला की त्यावर एक टिपण बनवायचं काम बहुधा माझं असायचं. (सुचवणं आणि चर्चेला तोंड फोडणारा सतीश तांबे.) तर, मी टिपण बनवलं. आमचं म्हणणं थोडक्यात असं होतं:
प्रत्येकाला त्याचं जिणं, त्याचा परिसर नॉर्मल वाटतो. उदाहरणार्थ माझा जन्म चाळीत झाला. बालपण तिथेच गेलं, तर चाळीतले सार्वजनिक संडास आणि तिथल्या घरांची सदा उघडी दारं हा माझ्या सहजमूल्यांचा भाग होऊन जातो. मग मला त्यात काही वावगं वाटत नाही. त्याहीपेक्षा खरं असं की जोपर्यंत वेगळी स्थिती माझ्या नजरेत, आकलनात येत नाही; तोपर्यंत माझी असलेली स्थिती, हेच एकमेव वास्तव माझ्यासमोर असतं. त्याचा ठसा अर्थात खोल उमटतो आणि नॉर्मलपणा म्हणजे काय, हे ठरवताना मला सर्वात जास्त दिशा देतो. तर, चाळीतलं रहाणं; रस्त्यावर, झोपडीत वाढणं, एकटं असणं, वगैरे अनंत शक्यतांमध्ये ’श्रीमंतीचा नॉर्मल सेन्स’ हासुद्धा एक अतिमहत्त्वाचा मुद्दा होता. नॉर्मल म्हणजे काय, याचा शोध घेताना नॉर्मल श्रीमंत तर मोजायला हवाच.
आज पन्नाशी ओलांडलेल्या कुणालाही ’नॉर्मल श्रीमंत’ ही संकल्पना मराठीत कळायला किती कठीण, हे समजेल. एक मोठा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा आडवा आला की मराठीत नीट ’श्रीमंत’ ठरतील अशा व्यक्‍तींचा घोर तुटवडा. कोणाला शोधायचं? त्याला वा तिला लिहिण्याचं अंग नसलं तरी विषयाला धरून बोलण्याचं अंग तरी हवंच. कोण?
मला वाटतं, खुशवंतसिंग हे नाव सुनील तांबेने सुचवलं. नवी दिल्ली जिथे वसली आहे, ती बहुतेक जमीन खुशवंतसिगांच्या वडिलांची, हे सांगितल्यावर त्यांच्या श्रीमंतीचा वा ती श्रीमंती त्यांना नॉर्मल वाल्याचा आणखी खुलासा करायला नको. मी उत्साहाने आमच्या विषयाला धरून एक पत्र बनवलं. आणि ते पाठवून दिलं. फार तर नाही म्हणतील. न विचारता थोडेच हो म्हणणार आहेत?
ते हो म्हणाले! ग्रेट. पण त्यांचं म्हणणं होतं, की मी लिहिणार नाही, कोणीतरी यावं आणि मी बोलेन ते रेकॉर्ड करून लेख बनवावा. इंग्रजीत पत्र लिहिणारा मी, मग हे पुढचं काम करणाराही मीच. गेलो. तो माझा राजधानी एक्स्प्रेसच्या चेअर कारमधून केलेला पहिला प्रवास. दिल्लीत माझी रहाण्याची व्यवस्था सुनीलच्या वडिलांनी मधु दंडवतेंच्या सेक्रेटरीच्या ब्लॉकमध्ये केली. तिथे जाऊन मी खुशवंतसिंग यांचं घर शोधून काढलं. फोन करून भेटायला गेलो, तर ते कानावर हात ठेवते झाले! मी हबकलो. मग मी धीर एकवटून त्यांना विषयाची आठवण दिली. मग त्यांना आठवलं. उत्साहाने म्हणाले, होय, होय. बोलतो. गिव मी ऍन अवर. कम बॅक इन ऍन अवर अँड वी विल टॉक. मुद्दे काढलेला कागद माझ्या हातात होताच. तो मी त्यांच्या सुपूर्द केला आणि बाहेर पडलो. दिल्लीला जाण्याचीही ती माझी पहिलीच वेळ. कुठेही जाण्याचं मला सुचलं नाही की धीर झाला नाही. बरोबर एका तासाने परत गेलो. त्यांनी समोर बसवलं. टेप रेकॉर्डर नीट काम करतो आहे, याची मी खात्री करून घेतली आणि ते बोलू लागले.
मी रीतसर घेतलेली ती एक प्रकारे पहिलीच मुलाखत. त्यानंतर अनेक मुलाखती घेण्याची वेळ आली. पण खुशवंतसिंगांइतकं अस्खलित बोलणारं कोणीही भेटलं नाही. मी अधून मधून फाटे फोडत होतो; पण त्याची गरज नव्हती. ते जे म्हणाले, ते जसंच्या तसं, शब्द न्‌ शब्द उतरवून काढलं, त्याचं मराठी भाषांतर केलं आणि लेख तयार झाला. एक अक्षर एडिट करावं लागलं नाही.
लेख उत्तम झाला. खुशवंतसिंग यांनी इंग्रजी-हिंदी, फारतर पंजाबी आणि त्यांना येणार्‍या इतर भाषा, यांच्या बाहेरच्या भाषेत छापण्यासाठी किती लेख लिहिलेत, मला माहीत नाही; पण मराठीतला हा एकमेव. ’आजचा चार्वाक’ या आमच्या वार्षिक दिवाळी अंकात आलेला. मी आणलेला!

No comments:

Post a Comment