Friday, September 12, 2014

पक्षी निरीक्षण


माझं रायटिंग टेबल खिडकीला लागून आहे. खिडकीबाहेर रस्ता नाही, आमच्या सोसायटीचं आवार आहे. बांबू, सुरू, सिल्व्हर ओक, रातराणी, चाफा, रॉयल पाम, विविध प्रकारच्या लिल्या, माड अशी झाडं खिडकीबाहेर दिसतात. मला नुसती मान वळवावी लागते.


अगदी माझ्या खिडकीला लागून एक ख्रिसमस ट्री आहे. इथे रहायला आलो, तेव्हा तो लहान होता. त्याचा शेंडा खिडकीपर्यंत आला नव्हता. तेव्हा त्याच्या अगदी शेंड्यावरच्या बेचक्यात फुलचुखीसारख्या पक्ष्यांच्या जोडीने घर केलं होतं. नर-मादीपैकी एक राखी, एक ठिपक्याठिपक्यांचा. किंवा ची. आता झाडाचा शेंडा पार दुसर्‍या मजल्याच्याही वर गेला आहे. (आम्ही श्रीमंत आहोत. सोसायटीच्या एकूण सात बिल्डिंगांपैकी चार ग्राउंड प्लस तीन आणि तीन बिल्डिंगा ग्राउंड प्लस दोन, अशा आहेत. माझी ग्राउंड प्लस दोन आहे. मी पहिल्या मजल्यावर. उंच टॉवरमध्ये रहाणं मला महानगरी बिचारेपण, गरिबीचं लक्षण वाटतं. आम्ही श्रीमंत आहोत.) तर ख्रिसमस ट्री. आमच्या बिल्डिंगमध्ये शिरताना जी कमान केली आहे, तिच्यावर एक वेल चढवली आहे. तिला निळी, गारवेलीसारखी फुलं येतात. तिची वाढ राक्षसी आहे. खिडकीच्या ग्रिलवर चढली आणि दोन दिवस दुर्लक्ष झालं की ती दोन चार वेटोळे घालून पक्की झालेली असते. तिच्या मागोमाग आणखी एक तरी कोंब खिडकीच्या दिशेने उगारलेला असतो. ही वेल नित्यनेमाने कमानीवरून झेप घेऊन ख्रिसमस ट्रीवर चढते आणि भराभरा त्याच्या आडव्या फांद्य़ांवरून सर्वत्र पसरत वर चढत जाते. एकदा वेलीच्या इतक्या दोर्‍या झाडावर चढल्या की बिचारा ख्रिसमस ट्री कलला. वेलीने जोर लावणं कमी केलं नाहीच, उलट तिची खेचाखेची वाढत गेली. झाड जास्त जास्त कलत गेलं. बायकोने माळ्याला सांगून वेलीच्या झाडावर चढलेल्या सगळ्या दोर्‍या कापून घेतल्या नसत्या, तर वेलीने तो ट्री नक्की आडवा केला असता. आता माळीच लक्ष ठेवतो. वेलीच्या पकडी वाढू लागल्या, की तो कापून टाकतो. मग झाडावर चढलेल्या वेलीच्या दोर्‍यांवरची पानं सुकत जातात. दोर्‍यांमधला जोम कमी होत जातो. आणि केव्हातरी वाळका गुंता जमिनीवर पडून दुसर्‍या दिवशी झाडला जातो.


ख्रिसमस ट्रीवर चिमण्या, बुलबुल, साळुंख्या, फुलचुख्या बसतात. कावळ्यांना मज्जाव आहे. कावळा बसलाच, तर इतर पक्षी कावळा जाईपर्यंत आवाज करत रहातात. हे मला बसल्या बसल्या काम करता करता आपोआप कळलं. तसंच मुद्दाम लक्ष न देता मला चिमण्याची चिवचिव ऐकता आली. रोज रोज ऐकून त्या चिवचिव करण्यात मला पॅटर्न्स जाणवले. चिव चिव चिव चिव .. असं अनेक शब्दांचं वाक्य चिमणा उच्चारतो. चिमणी एक तर ’चीव’ असं, ’हो’, बरोबर’, ’कबूल’ असा एका शब्दाचा प्रतिसाद देते; नाहीतर चिवचिवाटात ’र’ घालते. हे लिहिता येत नाही; पण हा उच्चार अलग अलग शब्दांचा नसतो. ’कुर्रर्रर्रर्र’ कसं असतं? तसंच हे चिर्रर्रर्र असतं.

अगदी आत्ता मला आणखी एक आवाज ओळखू यायला लागला आहे. हा आवाज चिमणा करतो. ’च’ला कशी धार असते; तशी या उच्चाराला नसते. जणू स्वरयंत्राच्या तारा ढिल्या पडाव्यात. हा ’च’ ’स’कडे झुकलेला असतो. एरवीची चिवचिव कशी जाहीर घोषणाबाजी असते? तसं हे नसतं. इथे चोचीवाटे उच्चार जणू अनैच्छिकपणे बाहेर पडत असतो. रोज रोज कानात मधेच हा आवाज शिरू लागल्यामुळे मला ’चिमणीच ती; हे असं कधी बोलते? यत काही नियम, काही पॅटर्न आहे का?’ असं कुतूहल उत्पन्न झालं. म्हणून मी तसा आवाज आल्याबरोबर बाहेर बघितलं. तर अद्‌भुत! साली जोडी सेक्स करत होती. दोन्ही पायांवर टुणटुण करत चिमणा चिमणीच्या जवळ यायचा आणि चढायचा. लगेच उतरायचा. जरा बाजूला सरकून पुन्हा टुणटुण करत जवळ जायचा. पुन्हा चढायचा. हे करताना तोंडाने तो, हल्लीच ओळखू आलेला ’च’ला ’स’च्या जवळ नेणारा आवाज. चिमणी गप्प. ज्या ज्या वेळी हा आवाज आला, त्या त्या वेळी मी खिडकीबाहेर नजर टाकली आणि प्रत्येक वेळी त्यांचं हेच चालू होतं.

सुरुवातीला मी सकाळी टेबलाजवळ किंवा खिडकीजवळ आलो असताना मधेच हा आवाज यायचा. मग एकदा दुपारी आला. एकदा संध्याकाळीसुद्धा आला. मग मनात आलं, ती कबुतरं दिवसभर घुटुर्रघूं करत दिवसभर एकमेव उद्योग म्हणून सेक्स करत असतात, हे पाहून त्यांना मी फुलटायमर म्हणू लागलो; तर या चिमण्यांचं तरी काय वेगळं आहे! अगदी कबुतराइतक्या त्या फोकस्ड नसतील; पण कबुतरं पॅरापेटवर बसून ऐन उघड्यावर करतात म्हणून दिसतात. या चिमण्या पानांच्या दाटीत स्वतःला झाकत करतात.

आता पुढचं वाटतं. सर्वच प्राण्यांचा हा धर्म नसेल, कशावरून? आहार, निद्रा, भय आणि मैथुन ... पहिल्या तिनांना प्राधान्य, हे खरं; पण त्यात न गुंतलेला उरला सगळा वेळ ...

पण नाही; असं नसेल. (माणूस सोडून इतर) प्राण्यांमध्ये माजावर येणे, विणीचा हंगाम, अशा गोष्टी असतात. कुत्र्यांच्या बाबतीत नाही का आपण भाद्रपदाचा उद्धार करत? पक्ष्यांच्या बाबतीत तसं असतं की नसतं? कावळे दर वर्षी पावसाळ्याअगोदर नवं घरटं बांधतात. सुगरणीसुद्धा. आणि पक्षी घरटं बांधतात, ते ऊन-पावसापासून निवारा म्हणून नव्हे; अंडी घालायला सुरक्षित जागा म्हणून. म्हणजे कावळे आणि सुगरणी, यांचा विणीचा हंगाम, म्हणजेच सेक्स करण्याचा हंगाम पावसाळा, हा आहे. पुढच्या पावसाळ्यात लक्ष द्या; कावळ्याच्या पिल्लांचे कोवळे आवाज पावसाळ्यातच ऐकू येतात.
इतर पक्षी? मागे एकदा दुसरीकडे रहात असताना आमच्या गॅलरीत कबुतरांनी घर केलं. कळेपर्यंत त्यात अंडी आली होती. वाईट वास पसरला होता. पण अंडी आहेत; त्यातून पिल्लं बाहेर येऊन ती उडाली, की घरटं मोडून टाकू, असं ठरवलं. तर काय. एक पिल्लू मोठं होईपर्यंत नवीन अंडं. कंटिन्युअस प्रॉडक्शन. फुल टायमर. म्हणजेच, कबुतरांमध्ये विणीचा हंगाम नसतो, असं झालं ना.

अर्थात, मी काही सहा महिने कबुतरांच्या घरट्याचं निरीक्षण करत बसलो नाही. चिमण्यांच्या बाबतीतही आणखी काळ गेल्यावर निष्कर्षांमध्ये कदाचित बदल करावा लागेल, कदाचित भर घालावी लागेल ... पण त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. हे असं काही बाही लिहिता लिहिता तेही होऊन जाईल.

No comments:

Post a Comment