शाहीर साबळे
यांच्याविषयी दोन शब्द लिहिणं भाग आहे.
मला कान तसा उशीरा आला,
मी सतरा वर्षांचा होऊन गेलो, तेव्हा. कान आला आणि मी लतामध्ये आख्खाच्या आख्खा
बुडून गेलो. रोग म्हणावं इतका. त्यातून बाहेर यायला वीसेक वर्षं लागली असतील.
जास्तच. बाहेर आलो तेव्हा मला स्वतःच्या आवडीनिवडींकडे, अभिरुचीकडे चौकसपणे निरखून
बघता येऊ लागलं. मला गजल आणि गजले आवडत नाहीत. कानाला सहनच होत नाहीत. मला
वाटायचं, लताचा अपवादात्मक सुरेलपणा माझ्या कानात जाऊन बसला आहे आणि म्हणून
गजल्यांचं कणसुरं गायन मला खटकतं. नीट
मोकळेपणाने गातच नाहीत! अगदी एखाद्दुसरा
अपवाद सोडला, तर मला गजल ऐकताना ताबडतोब कंटाळा येतो. अर्थात, तलत नाही. कारण तलत
कणसुरा गात नाही.
सतराव्या वर्षानंतर आपण बर्यापैकी ’जागे’ झालेलो असतो. बुद्धी काम करू लागलेली असते, भावनेचे लगाम सांभाळू लागलेली असते. ज्याला पिंड असं म्हणतात, तो याअगोदरच बनतो आणि त्याचा आणि बुद्धीचा संबंध नसतो आणि तो तयार होण्यात बुद्धी फारशी भाग घेत नाही. गजल आवडणे, हा माझा जर पिंडच नसेल, तर ही नावड नक्कीच सतराव्या वर्षाअगोदर विकसित झाली असणार. (लता आवडण्याचा संबंधसुद्धा बुद्धीशी लावता येणारच. पण लता मला वामनाच्या तीनही पावलांमिळून इतकी मोठी वाटते, कसला पिंड आणि कसली बुद्धी!) संगीत असं काहीतरी जगात आहे आणि त्याचा आपला फार निकटचा संबंध आहे, हे कळणं म्हणजे कान आल्याची जाणीव. हे जरी सतराव्या वर्षानंतर झालं असलं, तरी त्याअगोदर मला गाणी ऐकू येत होती. ऐकू येत होती आणि मेंदूत शिरून संस्कारसुद्धा करत होती. वेगळे शब्द वापरायचे, तर पिंड घडवत होती.
त्यामुळे मला गजले - म्हणजे गजल गाणारे - न आवडण्याचं कारण लता हे आहे, असं आता मी म्हणत नाही. ते ’श्रेय’ मी शाहीर साबळे यांना देतो. कारण मी शाळकरी वयापासून शाहिरांची गाणी ऐकत आलो आहे. काय त्यांचा दाणेदार आवाज. तेजस्वी. गोळीबंद. कुठल्या सुरात कंगोरा, खडबडीतपणा नाही. बद्दू मऊपणा नाही. माझं बालपण नायगावात, कामगारवस्तीत गेलं. सणासुदीला ठणठणीत आवाजात लाउडस्पीकरवर गाणी वाजवणे, हा तिथला शिरस्ता. तेव्हा घराघरात रेडिओ नव्हता. कानात हेडफोन (इयरफोन आणि हेडफोन यांच्यात फरक काय? की एकच ते? एक छोटा आणि दुसरा मोठा?) घालून भोवतालाला (यात ’ताल’ का आहे?) वजा करून टाकण्याची तेव्हा सोय नव्हती, रीत असण्याची तर गोष्टच नाही. जे वाजतंय ते ऐकावं लागायचं. माझी आई काम करताना सतत मोठ्याने गायची. तिच्या गाण्यात अमरशेख यायचा, कारण अमरशेख तिच्या तारुण्याचा साक्षीदार होता. अमरशेखची गाणी कधी मधी मुंबई ब वर लागायची कामगार सभेत, वगैरे. (मुंबई ब हे रेडिओ स्टेशन आहे, कामगार सभा हा त्या रेडिओ स्टेशनवरचा एक गाण्यांचा कार्यक्रम. च्यायला, हे आता सांगायला पाहिजे, नाही का!) अमरशेखच्या आवाजातला पहाडीपणा मला थरारून टाकायचा. पण त्याचमुळे मला शाहीर साबळ्यांचा आवाज पहाडी वाटला नाही. टणटणीत गोळीबंद वाटला. एकेक सूर परिपूर्ण!
कुठली गाणी? अर्थात लोकगीतं. ’सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा हा डोंगर, अडवा हा डोंगरह तयाला माजा नमस्कार’ हे गाणं मी प्रथम ऐकलं, तेव्हा वाच्यार्थ आणि लक्षणार्थ हा फरक मला माहीत नव्हता. मला ही कल्पना फॅसिनेटिंग वाटली. डोंगर आडवा येतो आणि काय होतं? तर ’अगगगगग विंचू चावला!’ केवढा? तुझ्याएवढा! मजाच. हे गाणं कधीही सुरू झालं की त्याची उंच सुरुवात पुरी होऊन ते ’अगगगगग’ वर येईपर्यंत मी लक्ष देऊन ऐकायचो. काय तो जोश, काय सुस्पष्ट उच्चार. आणि काय लोकगीताचा लहेजा!
’या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो’ हे बहुधा मी पाठ केलेलं - किंवा मला पाठ झालेलं - पहिलं गाणं असावं. ते मी कधी विसरलोच नाही. आत्ता दोन चार वर्षांपूर्वी कामवालीला म्हणून दाखवलं, तर ती खूष. "आमचं गाणं हे. तुम्हाला कसं ठाऊक?" तिने कौतुकाने विचारलं. अत्यंत चित्रमय गाणं. शब्दात असलेलं सगळं दिसतं. शेवटी ’उडविले दारूगोले!!!’ कसं खटक्यात वर चढतं! त्या लहान वयातही मला जाणवलं होतं, हे गाणं असंच, एक्साइट होऊन संपणार. नाहीतर नुसतं विरून गेलं असतं न संपता.
पुढे केव्हातरी ’नवरा दांड्यावरून म्हणजे कुठून येतो आणि तिथून का येतो,’ या विषयावर एक गंभीर निबंध वाचनात आलेला आठवतो.
त्या काळात सेवंटीएट आरपीएमच्या रेकॉर्ड्स असत. या गाण्याच्या मागे ’रुणझुण वाजंत्री’ होतं. ही दोन गाणी एकामागोमाग एक वाजायची. ’या गो दांड्यावरना’ इतकं दुसरं फटाकडं वाटलं नाही; पण नवरा नवरीपाशी येईपर्यंतचं वर्णन खास लोकगीतांच्या ढंगात आहे. शिवाय या दोन गाण्यातला कोरस. त्या वयात मला ’कोरस असतो आपला गाण्याला दागदागिने चढवायला’ असं सुचलं नाही. मला मनापासून त्यात आशय ऐकू यायचा. शाहिरांच्या आवाजाला तो किरटा बायकी कोरस वेगळाच काँट्रास्ट द्यायचा.
किती गाणी. पह्यलं नमन, आरे क्रिश्ना आरे कान्हा, आई माझी कोनाला पावली, .... या गाण्यांनी माझा पिंड घडवला! कसा मी ऐकणार गजल! मस्त तापलेल्या ढोलकीवर टण्ण बोल वाजावा, तसा शाहीर साबळ्यांचा आवाज. शिवाय मोकळा ढाकळा. कृत्रिमतेचा लवलेश नाही. हृदय दुःखाने भरून आल्याचा आव नाही. आणि कितीही वेगात जोशात गायलं तरी शब्द आणि शब्दांमधला आशय पोचणारच. ’काट्याच्या अणीवर वसले तीन गाव’ हे गाणं मला वेडा करून गेलं. हे लिहिणारे ज्ञानेश्वर? बरा माणूस असणार! ’आठशे खिडक्या नऊशे दारं’ हे गाणं जगात सगळ्यांना माहीत आहेच, असं मानून मी एकदा आमच्या ’अबब हत्ती’ या लहान मुलांच्या मासिकात अंककोड्यात सुगावा म्हणून वापरलं होतं. अनेकांना ते माहीत नाही, हे कळून आश्चर्य वाटलं होतं. शाहीर साबळे हा महाराष्ट्राचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे, हे काय सिद्ध करण्याचं विधान आहे? ते तर स्वयंसिद्ध आहे! शाहीर साबळे यांना महाराष्ट्राच्या अमुक एका भागापुरतं मर्यादितदेखील करता येत नाही. ते सगळीकडचे!
शाहिरांनी माझ्यावर मोठेच उपकार केले. आई गाणी म्हणायची आणि रेडिओवर ’आपली आवड’ लावायची. भावगीतांचा भरीव संस्कार त्यामुळे माझ्या कानांवर झालेला आहे. ती बहुतेक आवडतातच; पण गीतातला भाव म्हणजे तोच भावगीतांमधला; काव्य म्हणजे तेच, कोमटी, मचूळ चवीच्या भावना व्यक्त करणारं; या मानसिकतेतून मी बुद्धीच्या सहाय्याने मुक्त झालोच असतो; पण शाहीर साबळ्यांचे उपकार की तो झगडा मला करावा लागला नाही. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर असे संतकवी आणि त्यांच्या आणि इतरांच्या अस्सल मराठी मातीतल्या रचना शाहीर साबळे यांच्यामुळे माझ्या आत जाऊन बसल्या. ’महाराष्ट्राची लोकधारा’ हे त्यांचं लोकोत्तर काम आहे.
इतकं लिहिलं तरी त्यांची लोकनाट्यं राहिलीच. ’यमराज्यात एक रात्र’ आलं तेव्हा मी फार लहान होतो. ’आंधळं दळतंय’ पाहिलेलं आणि आवडलेलं आठवतंय. मुंबईतल्या मराठी माणसाची परवड त्यांनी त्यात मांडली होती. शाहिरांसारखा इथल्या मातीतला माणूस इतर मराठी नागर गायनसंस्कृतीपासून लांब आणि शिवसेनेच्या जवळ जाणं अटळ होतं. पण शिवसेनेचा प्रचारक होऊन जाण्याइतके ते लहानही नव्हते. त्यामुळे यथावकाश बाळासाहेबांपासून ते लांबही गेलेच. त्यांची कला काही राजकारणातून जन्मली नव्हती की राजकारणासाठी घडलेली नव्हती.
असो. ते गेले आणि त्यांचं ऋण व्यक्त करायचं राहून गेलं आहे, हे आठवलं.