हॅपी गुढीपाडवा!
पण हॅपी न्यू इयर नाही.
तीनेक वर्षांपूर्वी
माझ्या परिचयाच्या एका तरुण माणसाने गुढीपाडव्याला शुभेच्छा देणारा संदेश पाठवला:
हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा! तोपर्यंत त्याच्याशी माझा जो संबंध आला होता,
त्यावरून माझं त्याच्याबद्दल बरं मत झालं होतं. म्हणून मी त्याला थोडं समजावलं, की
हिंदु नववर्ष असं काही नसतं, गुढीपाडवा हा मराठी सण आहे, बाहेर फारसा साजरा होत
नाही, वगैरे. पण त्याला ते किती पटलं आणि पुढच्या पाडव्याला मला नववर्षाच्या
शुभेच्छा नाही दिल्या, तरी इतरांना दिल्या की नाहीत, याची मला शंका आहे. हे खूळ
दर वर्षी वाढतच चाललं आहे. सनातन संस्थावाले अर्धवट अकलेचे लोक तशी पोस्टरं
लावतात, हे ठीक; पण त्याची लागण इतरांच्यात का होत चालली आहे? हिंदु नववर्ष म्हणे!
एक तर शिवसेनेसकट सर्व
मराठी माणसांना हे मान्य आहे की मराठी भाषा हिंदीची, मराठी संस्कृती उत्तर भारतीय
संस्कृतीची आणि महाराष्ट्र उत्तर भारताची - दिल्लीची म्हणूया हवं तर - बटीक आहे.
उदाहरणार्थ, मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक माँसाहेब म्हणतात. उच्चार मासाहेब, असा
करतात. मराठीत ’मॉ’चा उच्चार मॉल, मॉड असा होतो. त्यात त्या अर्धचंद्रात अनुस्वार
आला, तर माँजिनी, माँटेक, यातला होतो. म्हणजे तो अर्धचंद्र आणि त्यावरची बिंदी अर्थातच
त्यांनी हिंदीवरून उचलली आहे. साक्षात बाळासाहेबांच्या पत्नीच्या उपाधीत जर
सरसकटपणे मराठीपेक्षा हिंदी रीत मानली जात असेल, तर त्यातून या दोन भाषांमधलं नातं
स्पष्ट होतंच की.
मुद्दा तो नाही. मुद्दा
असा आहे, की ज्याला आपण निर्विवादपणे श्रेष्ठ मानतो, आपल्यावरचं स्थान देतो, त्या
उत्तर भारतीय संस्कृतीत ’हिंदु’ नववर्ष सुरू होऊन पंधरवडा लोटला देखील. तिथे
पौर्णिमेला महिना संपतो. होळीलाच वर्ष संपलं आणि होळीच्या दुसर्या दिवशी -
धुळवडीला (ज्या प्रतिपदेला आता रंग’पंचमी’ म्हटलं जातं) - नवीन वर्ष सुरू झालं. ’हिंदु
नववर्ष’ असं जर काही साजरं करायचं असेल, तर महाराष्ट्राने गुढी पाडवा विसरून
धुळवडीला केशरी / भगवे फेटे घालून तुतार्या वाजवाव्यात.
पण त्यातही गडबड आहे.
मारवाडी, व्यापारी लोकांची. यात गुजराती किती प्रमाणात येतात, माहीत नाही; पण
असतील, तर आता त्यांच्या नववर्षाचा वरचष्मा दिल्लीतही सुरू होऊ शकतो. हे लोक
विक्रम संवत पाळतात. त्य़ांचं नवं वर्ष दिवाळीत, बलिप्रतिपदेला सुरू होतं. वह्या
बदलणे, नव्या वर्षाच्या बोहनीचे वायदे करणे, वगैरे प्रकार तेव्हा होतात. मोठ्या
गाजावाजाने होतात. तेव्हा ते एकमेकांना, त्यांच्या गिर्हाइकांना नवीन वर्षाच्या
शुभेच्छा, भेटीदेखील देतात. तशी कार्डं पाठवतात. बँकेतला कुणीही याची साक्ष देईल,
कारण मुंबईतल्या बँकांच्या शाखांमधले नोकरदार कुणीही असोत, बहुसंख्य कस्टमर्स -
म्हणजे बँकेला पैसे देणारे, बँकेकडून कर्ज घेणारे कस्टमर्स - गुजराती असतात.
परिणामी मुंबईत धंद्याची भाषा गुजराती आहे. मी ज्या बँकेत नोकरी करत होतो, तिथले
काही फॉर्म्स एके काळी इंग्रजी आणि गुजराती, या दोनच भाषांमध्ये असत.
सध्या सर्व भारतीयांना
हिंदु मानण्याची चलती आहे. म्हणून आपण मुसलमान आणि पारशी (सर्वच हिंदु तर हे कोण,
असं विचारू नये.) नवीन वर्षं सोडून देऊ. पण धार्मिक, सांस्कृतिक परंपरा सोडल्या,
तर एक जानेवारी हा न्यू इयर डे असतोच. नवीन वर्षाचे संकल्प गुढीपाडव्याला किंवा
बलिप्रतिपदेला सोडल्याचं उदाहरण मला माहीत नाही. तो मान एक जानेवारीचाच. शिवाय
त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता. त्याहूनही भारी म्हणजे टीव्ही वाहिन्यांची मान्यता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं इतर देश ऐकतील ही स्थिती; ज्या प्रकारे आपण
सर्व शोधांसाठी, तंत्रज्ञानासाठी इतरांवर अवलंबून असतो ते पाहता; तुमच्या आमच्या आयुष्यात येणं कठीण. म्हणून
किमान टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत तरी गुढीपाडव्याच्या प्रतिष्ठापनेसाठी चळवळ
व्हायला हवी. प्रॉब्लेम असा, की तिथे मराठी भाषेला कोणी धूप घालत नाही. गुढी
पाडव्याची डाळ तिथे शिजेल, ही शक्यता नाही. मराठी अनाउन्सर आणि अँकर नथी आणि
गुढघ्यापर्यंत शेरवान्या घालतात, ते आपण गोड मानून घ्यावं.
आणखी एक नवं वर्ष आहे.
वित्तीय वर्ष एकतीस मार्चला का संपतं, याला नक्कीच सज्जड कारण असेल. पण संपतं हे
खरं. कंपन्या, सोसायट्या आपापले अकाउंट्स बनवतात आणि कर भरतात. मुख्य म्हणजे कर
भरतात. करासाठी एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष धरल जात असल्यामुळे काय काय
होतं. मार्च महिन्यात गाडी खरेदी करून घसारा ऊर्फ डिप्रिसिएशनची किंवा घर घेऊन
हप्त्याची वजावट मिळवण्यासाठी धडपड होते आणि म्हणून गाड्या, घरंवाले स्किमासुद्धा
जाहीर करतात. हे नवं वर्ष पैशाशी संबंधित, म्हणून त्याला मोजणं आवश्यक. आणि आता ’उदारीकरणा’नंतर
वीस वर्षांनी आणखी अच्छे दिन येऊ घातल्यावर जास्त आवश्यक झालं आहे.
त्यापेक्षा मी आपला माझ्यापुरता
जून महिना, हाच नवीन वर्षाचा पहिला महिना, असं मानून चालतो. एक कारण, जूनमध्ये
पाऊस सुरू होतो. केरळात तो मेमध्ये येत असेल, उत्तरेत जुलै उजाडत असेल; माझ्या
मुंबईत तो जूनमध्ये अवतरतो आणि जीवनसातत्याची, आणखी एका वर्षाची शाश्वती देतो.
म्हणून तो वर्षाचा पहिला महिना. दुसरं कारण जुनं झालं, पण संपलं नाही: सर्व
शाळाकॉलेजं जूनमध्ये सुरू होतात. नवी पुस्तकं, नवा वर्ग, नवे शिक्षक! आणखी काय हवं
नवं?
तरुणपणी मी पहिल्या
पावसाची आतुरतेने वाट पहात असे. तसं डोंगरात कधीही जावं फिरायला; पण पाऊस आला की
हाइकचा मोसम ऑफिशियली आला! तो वारा, तो चौफेर झोडपणारा वर्षाव, ते पायांना अडवणारं
गवत, ते खळाळ झरे, ती हिरवाई, तो तृप्त दिसणारा निसर्ग! सौंदर्याचा, आनंदाचा,
देहभान विसरण्याचा, देव मानण्याच्या अगदी जवळ जाण्याचा य़ापेक्षा उत्कट अनुभव मला
माहीत नाही. माझ्यासाठी तेच नवं वर्ष. गुढीचा अर्थ लिंगपूजेतून लावायचा की आणखी
कसा लावायचा, याच्याशी मला देणंघेणं नाही.
तरीपण ते ’हिंदु’ नववर्ष
म्हटलं की हसू येतंच. या चित्रविचित्र चालीरीतींच्या देशात सर्वांना एका गाठोड्यात
बांधायचा कशाला हा फुकाचा आटापिटा! देशातल्या सगळ्यांना हिंदू म्हणायचं असेल, तर हिंदुपणाची
एकमेव ओळख संघप्रणित ’विश्वहिंदु’ हीच आहे, असं घोषित करून बाकीच्यांना धर्माबाहेर
काढावं लागेल. नाहीतर हिंदू असा काही एकसंध धर्म नाही, त्यात सत्रा ते सत्राशे
पंथ, रीती आणि परंपरा आहेत, हे मान्य करून ’हिंदु नववर्ष’ ही संकल्पना मोडीत काढावी
लागेल. दोन्ही चालणार नाही.
No comments:
Post a Comment