Sunday, January 30, 2022

वर्तमानाशी संबंध

मुलगी घरी असली, की वर्तमानाशी एरवी केवळ निरिक्षणापुरता असलेला माझा संबंध वाढतो. आज एक कादंबरी वाचून संपवली: Eileen by Ottessa Moshfegh. चमत्कारिक आहे. आम्ही जेव्हा चार्वाक काढत होतो, तेव्हा एकदा ‘नॉर्मलपणा’ या विषयावर खास विभाग केला होता. श्रीमंत माणसाची नॉर्मलपणाची जाणीव, रस्त्यावरच्या झोपडीत वाढलेल्या मुलीला र्नार्मल म्हणजे काय वाटत होतं, वगैरे. या कादंबरीची निवेदक असलेली (आणि स्वत:ची कहाणी सांगणारी) आयलीन ही एक गलिच्छ, आत्मकेंद्रित, सर्वार्थाने दुर्लक्षणीय व्यक्तिमत्वाची मुलगी आहे. तिची रहाणी, तिचे विचार सगळं एक प्रकारे विकृत आहे. पण संपूर्ण निवेदनात ती त्या विकृतीचं समर्थन करत नाही की त्यातली दारुणता दाखवून देत नाही. ती जे आहे, ते तिच्या लेखी पूर्ण नॉर्मल आहे!

कादंबरीतली ‘गोष्ट’ लहान आहे. पण एकेका घटनेचे पदर उलगडताना ही आयलीन जे काही बारीक बारीक तपशील सांगत जाते, त्यातून ती बुद्धिमान आणि संवेदनशील आहे, हे तर लक्षात येतंच; त्याबरोबर ती तिच्यापुरती भावनिकदृष्ट्या ‘स्वयंपूर्ण’ आहे, हेसुद्धा कळतं.  कादंबरीची निवेदनशैली गडबड करते. म्हणजे कुठेतरी एखाद्या तपशिलाशी आपली नाळ जुळते आणि मग आपली ती तथाकथित विकृती नाकारण्याचं काहीच कारण नाही, जगासमोर ती उघडी पडली नाही म्हणजे झालं; असं स्वत:लाच कुठेतरी वाटू लागतं. आयलीनला जे जमलं, त्या रस्त्याचं आकर्षण वाटू लागतं. ही गोष्ट धोकादायक आहे, न परवडणारी आहे, असं स्वत:ला बजावावं लागतं!

वाचनात भेटलेल्या आणि वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण वाटून कायम लक्षात राहिलेल्या कॅथी, स्कार्लेट ओहारा, नस्तासिया फिलिपोवना अशा नामांकित बायांमध्ये एक भर पडली. आयलीन.


आत्ता काही वेळापूर्वी नेटफ्लिक्सवर ‘डोण्ट लुक अप’ हा चित्रपट पाहिला. मेरिल स्ट्रीप, लिओनार्दो दिकाप्रियो, जेनिफर लॉरेन्स, केट ब्लँचेट अशी दणदणीत कास्ट. एक ९ -१० किलोमीटर रुंदीचा अवकाशातला दगड पृथ्वीवर येऊन आदळतो, त्याची गोष्ट. पण ही गोष्ट अजिबात सायन्स फिक्शन नाही. ती सामाजिक आहे. तिला धड फिक्शनसुद्धा म्हणवत नाही. ती भविष्यात घडते असं नसून आज, वर्तमानात घडते आहे; असं वाटू लागतं. जगभरच्या माणसांमध्ये नैसर्गिक नव्हे, तर मानवपुरस्कृत उत्क्रांती होत होत आता भलताच प्राणी तयार झाला आहे, याचं दर्शन घडतं. ‘जगभरचा माणूस’ असं तिऱ्हाइत वर्णन कशाला; ‘आपण प्रत्यक्षात कमी आणि आभासी जगात जास्त जगतो वावरतो,’ हे ज्ञान होतं. आपली मूल्यं, आपले नातेसंबंध, आपल्या इच्छा आकांक्षा असं सगळं आभासी जगामध्ये आकार घेत आहे, हे पक्कं जाणवतं.




चित्रपट ‘सरकलेला’ आहे, ब्लॅक ह्यूमरवाला आहे. पण माझ्यासारख्याला ‘आपण आणखी फार काळ जगणार नाही आहोत,’ याचं हायसं वाटायला लावणारा आहे!

Wednesday, January 26, 2022

इतिहासलेखन

 ज्यांचं वर्तमान डागाळलेलं आहे आणि ज्यांना भविष्यात काही मोठं करून दाखवण्याचा आत्मविश्वास नाही असेच लोक भूतकाळात शिरून इतिहासाची मोडतोड करून प्रतिष्ठा मिळवायला बघतात.

 इतिहास कोण लिहितो? तो वारंवार का लिहिला जातो?

जगभर इतिहास जेत्यांनी, म्हणजे जे जिंकले त्यांनी लिहिला आहे. विजय झाल्यानंतरच्या काळात प्रचाराची, प्रसाराची साधनं जेत्यांच्या ताब्यात असल्याने जेत्यांनी लिहिलेला इतिहासच पुढच्या पिढ्यांमध्ये प्रचलित होतो. जितांना, म्हणजे जिंकले गेलेल्यांनासुद्धा तो हळूहळू मान्य होतो. कधी त्या इतिहासातून कहाण्या, आख्यायिका, मिथ्यकथा तयार होतात. मग त्यांच्या लोककथा बनतात. आणि ‘बाटगा जास्त कडवा,’ या न्यायाने जित जास्त कडवे होत त्या इतिहासाचे अभिमानी बनतात.

पण ‘जित’, म्हणजे जिंकले गेलेले; लढाई हरलेले इतिहास लिहीतच नाहीत?

तसं नाही. पण शेवटी ‘आपला विजय झाला, शेवटी आपणच थोर ठरलो; असं मांडता यावं, ही सर्वांचीच इच्छा असते. याच इच्छेपोटी जित स्वत:ला जेत्यांमधले मानू लागतात. मग सगळं भारतवर्ष ‘आर्य’ बनतं. इथल्या मूळ निवासींना राक्षस, कपि (म्हणजे बिनशेपटीचं वानर), निषाद, नाग म्हटलेलं त्यांना खटकत नाही. कारण मनाने ते मुळी त्यांच्यातले नसतातच! ते आर्यच असतात!

पण हे सगळीकडे होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, आफ्रिकेतून गुलाम होण्यासाठी पळवून नेलेले काळे कितीही काळ अमेरिकेत राहिले, तरी गोऱ्यांच्यात स्वत:ला विलीन करू शकत नाहीत. त्यांची ओळख वेगळीच रहाते. त्यांनी अमेरिकेचा इतिहास लिहायचा म्हटलं, तर तो वेगळाच असेल. ॲलेक्स हॅलीचं पुस्तक आहे, ‘रूट्स’. ना धड इतिहास, ना कादंबरी, असं. पण त्यात काळ्यांची संवेदनशीलता नीट व्यक्त झाली आहे. काळ्यांना सहानुभूती दाखवणाऱ्या ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’पेक्षा किंवा गुलामगिरीला सहज, नॉर्मल दाखवतानासुद्धा काळ्यांविषयी ममत्व बाळगणाऱ्या ‘गॉन विथ द विंड’पेक्षा ‘रूट्स’ अजिबात वेगळं आहे.


आणि अमेरिकेची गोष्टच वेगळी! ‘अमेरिकेचा शोध कोलंबसाने लावला,’ हे विधानच किती लबाड आणि क्रूर आहे! कोलंबसाने शोधण्याअगोदर अमेरिका नव्हतीच की काय! होतीच. तिथेही एखाद्या खंडप्रदेशाला शोभेल, अशा विविध संस्कृती नांदत होत्या. (त्यांच्याशी नंतरच्या यूएस ऑफ अमेरिका या राष्ट्राने जे करार केले आहेत, ते एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांशी केलेले करार आहेत.) अमेरिकेतल्या त्या मूलनिवासी लोकांचं पूर्ण निखंदन करूनच युरोपातल्या गोऱ्यांनी तिथे स्वत:चं राज्य वसवलं. स्वत:ची प्रजा वाढवली. त्या मूळ रहिवाशांनी जर इतिहास लिहायचा म्हटलं, तर ते काय लिहितील?


मग ‘खरा इतिहास’ कोणी लिहीतच नाही?

‘खरा’ इतिहास, असं काही नसतं. दस्तावेज, पत्रव्यवहार, दप्तरांमधल्या नोंदी यांच्या सहाय्याने तटस्थ इतिहास मांडण्याचा उपद्‌व्याप कोणी केलाच नाही, कोणी करतच नाही, असं नाही. वि. का. राजवाडे ते रोमिला थापर ही उदाहरणं तर देशीच आहेत. असले लोक त्यांच्या प्रत्येक विधानाला आधार देतात. निराधार समजुती कितीही घट्ट असल्या तरी नाकारतात आणि समोर आलेल्या पुराव्यानुसार उभं रहाणारं तथ्य कितीही अप्रिय असलं, तरी स्वीकारतात.  यांनी लिहिलेल्या इतिहासातल्या घटना खोट्या, रचलेल्या, अवास्तव फुगवलेल्या नसतात.

पण तरीही त्यांची मांडणीसुद्धा ‘खरी’ मानता येत नाही. कारण समोर आलेल्या पुराव्यातून निष्कर्ष काढताना लेखकाचे पूर्वग्रह आणि त्याच्या अपेक्षा यांचा फिल्टर काम करत असतोच. मग ‘औरंगजेब सर्व कलांचा विरोधक असला, तरी वैयक्तिक चारित्र्याच्या बाबतीत अत्यंत शुद्ध होता,’ या विधानाला ‘औरंगजेबाचं वैयक्तिक चारित्र्य कितीही शुद्ध असलं तरी तो सर्व कलांचा कडवा विरोधक होता,’ असा पर्याय उभा रहातो. यातलं कुठलं ‘खरं’ मानायचं, हे त्या लेखकाला काय हवंय, यावर अवलंबून असतं.

पण ना जेत्यांचा, ना जितांचा असा, ‘आपला’ इतिहास कोणी लिहीत नाही का?


हे दुर्मिळ आहे. कारण ‘आपला’ म्हणजे कोणाचा, हे ठरवण्यात गडबड होते. ब्रिटन हा एक देश आहे, असं आपण इथे बसून म्हणतो. म्हणजे ब्रिटिशांपैकी कोणीही त्यांचा इतिहास मांडू लागलं, तर तो आख्ख्या ब्रिटनमध्ये एकच असेल, म्हणजे एका अर्थी ‘खरा’ असेल, असं व्हायला पाहिजे. पण तसं नाही होत. स्कॉटिश लोकांना इंग्रजांबद्दल सूक्ष्म रागच आहे. तसंच वेल्श लोकांचं आहे. या दोन्ही प्रदेशांना त्यांची वेगळी भाषा इंग्रजीने दाबून टाकली, याचा फार राग आहे. स्कॉटलंडमधली एखादी गाइड तिथल्या किल्ल्यांविषयी बोलते, तेव्हा इंग्रजांना आक्रमकच म्हणते! उलट, पक्का साम्राज्यवादी असलेला चर्चिल जेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास लिहितो, तेव्हा १९४२ सालच्या स्थितीला ‘कॉमनवेल्थ अलोन’ असं नाव देतो! त्याच्या लेखी आख्खं कॉमनवेल्थ एकच. ज्यात त्याने ब्रिटनचं भारतासकट सगळं साम्राज्य मोजलं.

पण तसं मोजताना त्या ‘एकाच’ कॉमनवेल्थमधल्या सगळ्या लोकांना तो ‘आपण’ मानत नव्हता! कॉमनवेल्थमधल्या सर्व जनतेवर राज्य करण्याचा जणू दैवी अधिकार ब्रिटिशांना आहे, असाच त्याचा ठाम विश्वास होता. पण तसा विश्वास त्या कॉमनवेल्थमधल्या इतरांना वाटण्याचं कारण नव्हतं. पुण्याचा रेसिडेंट माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन याला वाटलं, इथला इतिहास अजून नीट लिहिला गेलेला नाही. त्याच्या सूचनेवरून त्याचा मित्र ग्रँट डफ याने ते काम केलं आणि मराठ्यांचा इतिहास लिहिला; पण तो वाचून इथले सुशिक्षित मराठी लोक खवळले! त्यांना तो ‘आपला’ इतिहास वाटेना. परिणामी एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात शेजवलकर, पारसनीस, सरदेसाई, राजवाडे अशा कितीतरी इतिहास संशोधकांची फळीच निर्माण झाली. त्यांनी संस्थानिकांची दप्तरं धुंडाळली, कसले कसले कागदपत्र तपासले आणि त्या सगळ्याच्या आधारे ‘आपला’ इतिहास मांडला.

तरी आजही भारत देशात सर्वत्र एकच एक इतिहास शिकवला जात नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, याला गुजरातेत पुण्यकर्म मानलं जात नाही. ओडिशात मराठ्यांना क्रूर आक्रमक ठरवलेलं आहे. इतकं की तिथे बाळांना झोपवताना ‘झोप गुपचुप; नाहीतर मराठे येतील,’ असं दरडावलं जातं. दक्षिणेतल्या द्रविडांना आर्यांचं प्रेम नाही. आजही भारत देशातले सगळे भारतीय ‘आपण’ झालेलो नाही!

 

इतिहासलेखन भाग २.

इतिहासासंबंधी एक अगदी वेगळं उदाहरण आहे जर्मनीचं. आणि ते प्राचीन नाहीच, अगदी अलीकडच्या इतिहासाचं आहे. १९२५ नंतरच्या काळात जर्मनीत पहिल्या महायुद्धाचे पडसाद उमटत होते. महागाई प्रचंड वाढत होती. बेकारी होती, इंग्लंड आणि इतर देशांकडून आपण अपमानित झाल्याची भावना जर्मन जनमानसात होती. आणि जरी जर्मनीची युद्धात हार झाली असली तरी जर्मन भूमीवर दुसऱ्या देशाच्या सैन्याचं पाऊल पडलं नव्हतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यकर्त्यांवर लोकांचा राग होता. तो हिटलरने फुलवला. अल्पसंख्य ज्यूंनी देश विकला, अशी फूस बहुसंख्य असलेल्या बिगरज्यू लोकांना दिली. कम्युनिस्ट घरभेदी आहेत, देशद्रोही आहेत,असा प्रचार केला.

आणि अस्मिता हळवी झालेलं जनमत त्याच्या बाजूला झुकत गेलं! लोकांच्या, उद्योगपतींच्या पाठिंब्याने हिटलरने जर्मनीवर प्रभुत्व मिळवलं. आणि यथावकाश सगळी सत्ता एकट्या हिटलरच्या हाती एकवटली. इतकी, की सैनिकांना राष्ट्राच्या नावाने शपथ घ्यावी लागत होती, ती बदलत शेवटी थेट फ्यूररला, म्हणजे हिटलरला एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतली गेली. तो इतिहास सर्वांना माहीत आहे. पुन्हा एकदा महायुद्ध झालं आणि जर्मनी जवळजवळ बेचिराख झाला. तोपर्यंत हिटलरच्या नाझींनी काही कोटी ज्यूंना ठार मारलं होतं. त्यांच्यावर अत्याचार केले होते. अघोरी प्रयोग केले होते.

महायुद्ध संपलं आणि जर्मनीत पुन्हा लोकशाही आली आणि जर्मन लोकांचं राज्य स्थापन झालं.

मग काय केलं त्यांनी? इतिहास नाकारला? केलेल्या गुन्ह्याला पराक्रम मानलं? हिटलर आणि त्याचे रक्तपिपासू साथीदार यांना राष्ट्रवीरांचं स्थान दिलं?

नाही. जनतेचे डोळे उघडले. हिटलरची राजवट क्रूर, अमानुष होती हे त्यांना कळलं. त्याहीपेक्षा हिटलरच्या आणि त्याच्या पक्षाच्या पापामध्ये आपण सर्व सहभागी आहोत, हे त्यांना उमजलं. आज हिटलरकडे ना दुर्लक्ष केलं जातं, ना त्याचं गुणगान गायलं जातं. हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष आणि त्यांची राजवट हे जर्मनीच्या इतिहासातलं एक लाजिरवाणं प्रकरण आहे, असंच  जर्मन शाळांमध्ये इतिहास शिकवताना सांगितलं जातं. नाझी विचारांवर बंदी तर आहेच; शाळेपासूनच बालमनांवर भले संस्कार करून चांगले, जबाबदार नागरिक निपजतील, याची खबरदारी तो देश घेतो. ‘खरेपणा’च्या जवळ जाणारं हे एक उदाहरण आहे.


असं करण्यामागे केवळ सत्याशी निष्ठा, हेच एक कारण नसावं. संस्कृती, देशप्रेम, अमुक देशाचा नागरिक अशी स्वत:ची ओळख बाळगणे या गोष्टी संस्कारांमधून येतात. त्यांत इतिहासाचा भाग मोठा असतो. आपण स्वत:ला जे समजतो; ते खोट्या, रचलेल्या, काल्पनिक गोष्टींवर उभं आहे, हा धक्का संवेदनशील मनाला हादरवतो. मग ते खोटंच धरून ठेवून कायम खोटं जगत बसणे किंवा संस्कृती, देशप्रेम यांसारख्या मूल्यांना नव्याने मुळापासून घडवणे, हे दोनच पर्याय उरतात. दुसरा जरी ‘खरा’ असला; तरी कठीण असतो. बरेच जण पहिला पर्याय निवडतात आणि आयुष्यभर खोटं जगत रहातात. मग त्या मूल्यांची तपासणी करायला ते कधीही तयार होत नाहीत. अशा समुदायाचं मन स्वस्थ, शांत असेल का?

इतिहास पुन्हा लिहिण्याचं एक कारण हेसुद्धा आहे की संस्कृती, देशप्रेम यांसारख्या मूल्यांना क्षुद्र स्वार्थासाठी खोट्या जागी नेऊन बसवण्यासाठी आधार तयार करणे. सोविएत युनियनमध्ये सर्वसत्ताधीश बदलला की इतिहास बदलत असे. जिवंत असताना महान नेता असलेला स्टालिन मेल्यावर लगेच वाईट मनुष्य झाला!  हाती सत्ता असली की सरकारी दस्तावेजांमध्ये कसेही फेरबदल करता येतात. पण यातून विश्वासार्हता संपते. खोटं बोलण्याचा खराब लौकिक नावावर असल्यास लवकर संपते. कारण सांगितलेली एक गोष्ट खोटी ठरली की बाकी सगळ्याच गोष्टींची शंका येऊ लागते! आणि आजच्या इंटरनेटच्या काळात, माहितीचा विस्फोट होण्याच्या काळात, चौकसपणाला बांध घालणं अशक्य झालेल्या काळात खोटेपणाला शाश्वत रूप देता येत नाही.


उदाहरणार्थ, विवेकानंद हिंदू परंपरेचे समर्थक नव्हते. उदाहरणार्थ, भगतसिग कम्युनिस्ट होता, नास्तिक होता. उदाहरणार्थ, फाळणी गांधींमुळे झाली नाही. उदाहरणार्थ, सुभाषबाबू धार्मिक नव्हते आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचा झेंडा हा काँग्रेसचा झेंडा होता. या खऱ्याचं खोटं करण्याचा प्रयत्न मामुली तपासणीतून उघडा पडतो.

असो. ज्यांचं वर्तमान डागाळलेलं आहे आणि ज्यांना भविष्यात काही मोठं करून दाखवण्याचा आत्मविश्वास नाही असेच लोक भूतकाळात शिरून इतिहासाची मोडतोड करून प्रतिष्ठा मिळवायला बघतात.