Saturday, April 21, 2012

मार्केट इकॉनॉमीत पुस्तकाचा शोध

आजचा अनुभव लिहावाच. त्यात अन्याय होण्याचा संभव आहे; पण ते सांभाळत लिहावाच.

देवेंद्र गावंडेने नक्षलवादावर लिहिलेलं पुस्तक हवंच म्हणून घेतलं, तर ते कधी कोणी ढापलं, कळलंसुद्धा नाही. आता त्याच विषयावरचं माझं पुस्तक पूर्णत्वापर्यंत पोचल्यावर गावंडे वाचलेला असणे अत्यंत आवश्यक झालं. त्यात महेश भागवत यांनी ’त्यात मला म्हणायचंय ते मी नीट मांडलं आहे,’ असं म्हटल्यावर गावंडेचं पुस्तक पुन्हा घेणं अपरिहार्य झालं.
वाशीला मराठी पुस्तक मिळेलच, याची खात्री नाही. दादरला गेलो. तिथे तीन दुकानं मराठी पुस्तकांची. नक्की मिळणार.
"प्रकाशकाकडून कॅटलॉग आला, की आम्ही पुस्तकं मागवतो. साधनेने अजून कॅटलॉग पाठवलेला नाही. त्यामुळे तुम्हाला हवं ते पुस्तक आम्ही अजून मागवलेलंच नाही."
असो. आणखी दोन दुकानं आहेत की. याला काय सोनं लागलंय?
’’देवेन्द्र गावंडे यांनी नक्षलवादावर लिहिलेलं पुस्तक नुकतंच आलंय बाजारात. ते द्या.’
"नाव काय पुस्तकाचं?"
’नाव लक्षात नाही. प्रकाशक साधना आहे बहुतेक.’
"नाव पाहिजे. त्याशिवाय सांगता येणार नाही."
लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव, पुस्तकाचा विषय यातलं काहीही उपयोगाचं नाही. पुस्तकाचं नाव पाहिजे!
म्हणजे स्टॉकमधली पुस्तकं कॉम्प्युटरवर चढवलेली नाहीत, हे उघड आहे. पण, असं म्हणू की नाही घातली; कॉम्प्युटरला आम्ही कागदाचा वैरी समजतो म्हणून नाही घातली.
पण पुस्तकाचं नाव माहीत नसेल, तर पुस्तक आहे की नाही हे सांगता येत नाही, हे कसं? पुस्तकाच्या नावावरून एखादा साक्षर हमालही देईल की काढून. पुस्तकाच्या दुकानातला नोकरवर्ग साक्षर हमालाच्या वरच्या पातळीचा असेल, ही अपेक्षा चुकीची काय?
तिसर्‍या दुकानात पुस्तकाचं नाव माहीत होतं!. "आव्हान नक्षलवादाचे". एका फटक्यात नाव सांगितलं आणि दुसर्‍या फटक्यात "आमच्याकडे नाही!" असं ऐकवलं.
एण्ड ऑफ स्टोरी. आता परत फोर्टात, पीबीएचला जायला पाहिजे. गोपाळ काढून देईल नाही तर तात्काळ मागवेल. असली उत्तरं मिळणार नाहीत. आपला, आपल्या संस्कृतीचा अपमान झाल्यासारखं होणार नाही.

पण संस्कृतीला मध्ये ओढू नये. दांडग्या दांडग्या मॉलमधली क्रॉसवर्डसारखी ऐसपैस दुकानं बघून कसं गार गार वाटलं होतं. वाटलं, आपली गरीब मराठी कधी अशी सुबत्ता गाठणार?
तर एका क्रॉसवर्डमध्ये एकदा चांगल्या नामांकित इंग्रजी लेखकाचं पुस्तक मागितलं. उंच आणि लहानपणापासून इंग्रजी आणि मॉल यांच्यातच वावरलेला दिसणारा तो समोरचा मुलगा गोंधळला. त्याला लेखक आणि पुस्तक, दोन्ही अपरिचित. ही उथळ, खळखळाटी पिढी, असं म्हणत मी चरफडलो. निघणार तेवढ्यात काय वाटलं, मी त्याच्या समोरच्या स्क्रीनमध्ये डोकावलो. त्याला लेखक आणि पुस्तकाचं नाव, माहीत नव्हतं म्हणजे त्यांची स्पेलिंगं माहीत नव्हती, हेसुद्धा आलंच की!. कॉम्प्युटर वेगवान पण माठ मशीन. स्पेलिंग नीट देताच पुस्तक मिळालं!
म्हणजे तिथला स्मार्ट, तरतरीत तरुणही साक्षर हमालच होता की.
आणि हा अनुभव अपवाद नाही, नियम आहे. स्मार्टपणा हा दुर्गुण आहे, या माझ्या धारणेवर एक शिक्का आणखी बसला.

यावरून वाचनसंस्कृती, साहित्याभिरुची असल्या गोष्टींविषयी अनुमान काढू नये. पुस्तकाचं दुकान आणि बुटांचं किंवा साड्यांचं किंवा अंडरवेअरचं, यात मूलभूत फरक असावा की नसावा, हा खरा (पोस्ट मॉडर्न वा मार्केट इकॉनॉमीतला) प्रश्न आहे.