Tuesday, June 26, 2012


दिल्ली

मध्यंतरी दिल्लीला जाण्याचा योग आला. विमानाने गेलो, दुसर्‍या दिवशी विमानाने आलो. आता विमानप्रवास खूप वेळा करून झाला; पण अजूनही ’आपला या जगाशी काही संबंध नाही - I don't belong here' असं वाटत रहातं. बुजल्यासारखं नाही होत; पण उपटसुंभ असल्यासारखं वाटत रहातं. अजूनही बोर्डिंग पास घेताना मी गप्पपणे तिकीट पुढे करतो. आणि अजूनही मला न चुकता खालचं काहीही न दाखवणारी पंखावरची सीट मिळते.
तर, दिल्ली. बैठक होती इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये. बघितलंय? विमानतळावर परकेपणा वाटणार्‍या मला इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये काय चैन पडणार? नशिबाने चर्चा करणारे आणि चर्चेचा कंटेंट, यातलं काहीच अप्रामाणिक नव्हतं. त्यामुळे नंतर परिसर जाणवेनासा झाला. पण लक्ष दिलं, तर काय ते लोक, काय ते पाहुणे, किती त्यांच्या भ्रू उच्च. खरा स्नॉब अजिबातच आखडू नसतो, तेवढीही किंमत तो तुम्हाला देत नाही; याचा प्रत्यय देणारे मोठ्या मनाचे उदारमतवादी चेहरे तर किती दिसतात.
कोण जाणे. असं काही नसेलही. माझ्या टवकारलेल्या मनाचे खेळ असतील. नेमाडेच्या पांडुरंग सांगवीकरला नाही का पुण्यात सर्वत्र वेश्या दिसतात. प्रॉब्लेम पुण्याचा नाही; पांडुरंगच्या न्यूनगंडाचा आहे. तसंच.
दिल्ली विमानतळावरून मुक्कामी आणि तिथून इंडिया हॅबिटॅट सेंटरला जाताना वाटेत राष्ट्रपती भवन आणि दुनियाभरच्या एम्बस्या बघत गेलो. दिल्ली भयंकर प्रॉब्लेम करते. दिल्लीचा तो भाग बघताना मुंबई कशी भिकारी, भिकारडी आहे, मुंबईत कशी घाण आहे - अगदी श्रीमंत, उच्चभ्रू वस्तीतदेखील ’तसा’ रुबाब नसतो, वगैरे सुचत रहातं. पण म्हणून मुंबई सोडून दिल्लीला जवळ करण्याचा विचार अजिबात पटत नाही. दिल्लीची मेट्रो. उत्तम सेवा. स्वच्छता, कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, सगळ्या बाबतीत उत्तम. पण मेट्रोत ’जनता’ आढळत नाही! सगळे रूलिंग क्लासमधले. पटत नाही. मुंबईतल्या लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये हल्ली फक्‍त अमीर लोक मुळीच नसतात. तिथले सगळे खाऊन पिऊन सुखी, त्यामुळे गुबगुबीत असतात, असं एक वेळ म्हणता येईल. तसं जरी म्हटलं, तरी गाडीत चढण्याअगोदर प्लॅटफॉर्मवर अगदी भांडवलशाही समाजवाद असतो. ’भांडवलशाही’ कारण जवळपास सगळेच आपापल्या कामाच्या विचारात गर्क असतात. संपत्ती निर्माण करण्याची त्यांना घाई असते. आणि ’समाजवाद’, कारण गरीब-श्रीमंत एकच स्पेस शेअर करतात. तिथे मात्र सैल वाटतं! तरी मनात एक खुटखुटत रहातं: दिल्लीच्या वर्गभेदाला नाक मुरडताना; हॅबिटॅट सेंटरमधल्या कॅफेत ताजी भाजलेली, गरमागरम बिस्किटं खात खात ’या गरीब देशात इतका थाट?’ असा प्रश्न मनात उभा करताना, खरंच आपल्याला दिल्लीच्या रूलिंग क्लासचा दांभिकपणा टोचतो आहे; की ही विशुद्ध असूया आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही!