Friday, February 27, 2015

हिचे पांग फेडू




"पुण्याला डेक्कन कॉलेजात अशोक केळकर यांच्या प्रेरणेने मराठी डिक्शनरीचं काम वर्कशॉपच्या स्वरूपात चालू आहे. त्यांना ह्या कामासाठी मराठी कळणारे आणि इंग्रजी येणारे लोक हवे आहेत. तुला इंटरेस्ट आहे का?" असं एका मैत्रिणीने विचारलं आणि मी तात्काळ ’हो’ म्हणालो. कारण अशोक केळकरांचं वैखरी’ वाचून मी त्यांचा फॅन झालो होतो आणि मग ’भेदविलोपन’, ’रुजुवात’ ही पुस्तकं विकत घेऊन टाकली होती. या कामाच्या निमित्ताने डॉ. केळकरांशी संबंध येणे, ही मला मोठीच पर्वणी वाटली. गेलो.


केळकरांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्याशी संबंध येऊ शकला नाही. आणि ह्या डिक्शनरीच्या कामाचा पाया त्यांनी व्यवस्थित घालून ठेवलेला असल्याने त्यांनी प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होण्याचं कारणही नव्हतं. भाषेत, साहित्यात, भाषावापरातील वैचित्र्यात आणि त्यातून हाती लागणार्‍या सांस्कृतिक इतिहासाचा माग घेण्यात, मला प्रचंड रस असला तरी मी भाषाविज्ञानाचाच काय, मराठीचा वा साहित्याचाही विद्यार्थी नव्हतो. पण तिथे, म्हणजे डेक्कन कॉलेजातल्या WRLC (Western Regional Language Centre) या स्वायत्त संस्थेत गेल्यावर मला जणू जगण्याचं प्रयोजनच सापडलं. केळकरांचे दोन निबंध मला वाचायला मिळाले. त्यात त्यांनी Dictionary Entry या विषयाचा उहापोह केला होता आणि भारतीय भाषांना अनुरूप असे बदल सध्या रूढ असलेल्या पठडीत सुचवले होते. ही नवी डिक्शनरी त्यांनी सुचवलेल्या नव्या पद्धतीला अनुसरूनच होणार होती. माझे तिथले सहकारी सगळे मराठी, भाषाविज्ञान या विषयांमध्ये एमए, पीएचडी केलेले होते. (त्यांत बहुतेक बायका होत्या; पण स्त्री-पुरुष एकत्र असताना त्यांचा सामुदायिक उल्लेख पुल्लिंगी होतो, असा माझा समज आहे. असो.) एकेका शब्दाच्या अनेक अर्थछटा देणार्‍या चपाट्या (त्यांना citation slips म्हणतात, हे मला तिथेच कळलं.) हातात पडायच्या. शब्द, त्याचा उच्चार, अर्थछटा, उपछटा, उपउपछटा कोणत्या क्रमाने कशा द्यायच्या हे मला समजावून सांगण्यात आलं. खरं सांगायचं तर मी लटपटलो. त्या बायका सगळं लीलया करायच्या! मग मला सांगण्यात आलं, ह्या सगळ्या एंट्र्यांचं व्यवस्थापन होणार आहे, सध्या जास्तीत जास्त अचूकपणे अर्थछटा पकडणे, हे मुख्य काम आहे.

रमलो. कधी कधी सणसणीत वेठ येतो आणि आपल्याला शोध लागतो, की अमुक अमुक ठिकाणी असा असा एक स्नायू आहे आपल्या शरिरात; तसं झालं. साक्षात्कारासारखं. अर्थ माहीत होते; पण हे असं, इतकं आपल्याला माहीत आहे, हे माहीत नव्हतं. मला संस्कृतची काहीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे ऐकू येण्यात सारखे असणारे शब्द, अजिबात वेगळे दिसत असून अर्थाने निकट असणारे शब्द, जराशी फेरफार केला की अर्थ कुठल्या कुठे फिरायला नेणारे शब्द, ह्यांच्यातचे गुंतागुंतीचे नातेसंबंध मला माहीत नव्हते. मला सुख असं की अशा तर्‍हेवाईक, प्रज्ञावान शब्दांची ओळख झाली. त्यांना मी प्रेमाने इंग्रजीत नेऊ लागलो. त्यासाठी वाक्प्रचारांचा मुबलक वापर करू लागलो. ते वाक्प्रचारसुद्धा डिक्शनरीत हवेत, या जाणिवेने गडबडू लागलो; या एकूण कामाच्या अगडबंब आवाक्याने माझी छाती दडपली. 

डिक्शनरी हे एकट्यादुकट्याचं काम नाही. पूर्ण निष्ठा वाहिलेल्या एका गटाचंही काम नाही. ते सदा चालत रहाणारं काम आहे. केळकरांच्या महत्त्वाकांक्षी प्रतिभेच्या, त्यांच्या दिव्यदृष्टीच्या आणि त्यांनी घेतलेल्या अचाट मेहनतीच्या दर्शनाने माझे डोळे दिपले. हेसुद्धा लक्षात आलं की ही डिक्शनरी ज्या क्षणी प्रसिद्ध होईल, त्याक्षणी तिला प्रचंड टीका अंगावर घ्यावी लागेल. कारण भाषा प्रवाही असते. शब्द मावळत असतात, जन्म घेत असतात. गावकुसाबाहेरचे आत येत असतात. एक कॉम्प्युटर येतो आणि किती नवनव्या संकल्पनांना जन्म देतो. एक इंटरनेट येतं आणि संदर्भांचे समुद्र अंगावर येऊन आदळू लागतात. ज्याप्रमाणे एखाद्या नदीत दोनदा हात बुडवता येत नाही - दुसर्‍यांदा हात बुडवताना नदी बदललेली असते - त्याप्रमाणे डिक्शनरी कधीही जुनीच ठरते. म्हणून इंग्रजी डिक्शनर्‍या दर दहा वर्षांनी नवा अवतार घेत असतात. म्हणून दर वर्षी इंग्रजीत कोणकोणत्या नव्या शब्दांची भर पडली, ह्याची बातमी होते. मराठी बोलणारे जगात असतील संख्येने नवव्या की दहाव्या नंबरचे लोक. मराठीबद्दल इतकी कुणाला पडलीय की असल्या ’अकॅडेमिक’ गोष्टीच्या बातम्या होतील? आणि पेपरवाले छापतील? आणि वाचक वाचतील?

हे कळत असूनसुद्धा हे काम कदाचित मातीत जाणार या कल्पनेने उदास झालो. एक गोष्ट ठामपणे सांगावीशी वाटते, हे काम माझ्या हयातीत पूर्ण झालं नाही, पूर्ण झाल्यावर त्यात मला कसलंही श्रेय देण्यात आलं नाही; तरी मला काडीचं दुःख नाही. मी कोणी पुराणात वर्णन केलेला ‍ऋषिमुनी नाही, एक सामान्य विकारी मनुष्य आहे. ह्या डिक्शनरीचं एकमेव काम मी मरेपर्यंत घेऊन बसू शकेन, असा माझा अजिबात दावा नाही. पण दोन विधानं करावीशी वाटतात. एक म्हणजे, चांगल्या वर्तनाचं श्रेय ते चांगलं वर्तन, हेच असतं, त्याबाहेर काहीही नसतं; तसंच ह्या डिक्शनरीच्या कामाला हातभार लागण्याचा वेगळा मोबदला मला मिळाला नाही तरी मला चालेल. दुसरं विधान आयन रँडकडून उचललेलं. "हे बांधकाम केल्याचे पैसे, मानमरातब, कीर्ती, सगळं तू घे; मला समाधान म्हणून ही जाणीव पुरे आहे, की हे घडवणारा साक्षात मी होतो!"

मात्र ह्या कामात माझ्याखेरीज अनेकांचा हातभार होता. त्यांचेही परिश्रम मातीत जाणार या कल्पनेने आणखी उदास वाटायचंच. एक तर मराठी पर्यावरण गरीब. त्यात हे भाषाविषयक - ’ब्राह्मणी’ - काम. त्यात ह्याला ग्लॅमर नाही. त्यात हे कधी पूर्ण होईल आणि कधी ते नावावर लागेल, हे निश्चित सांगता येत नाही. अशा कामाला पैसे देणार कोण? आणि किती? केळकरांचे शिष्य जोपर्यंत सरकारात उच्चपदी बसलेले होते; तोपर्यंत काम चालू राहिलं. पण डिक्शनरी ती! त्यात आजवरच्या कुठल्याही मराठी डिक्शनरीच्या तुलनेत अनेक पट मोठा तिचा आवाका. तिला परिपूर्णतेचा ध्यास. तिला भरपूर वेळ लागणारच.

त्यात आणखी वाईट गोष्ट म्हणजे, ह्या कामाला तसा ’मालक’ नव्हता. आम्ही केलेलं काम कोणीतरी तपासलं असतं आणि मग कुठे बरं म्हटलं असतं, कुठे सुधारणा सुचवल्या असत्या, कुठे वाद घातले असते; तर कसं चीज झाल्यासारखं वाटलं असतं. पण ह्यातलं काहीएक कधीही झालं नाही.

तरीही माझी तक्रार नव्हती. जोपर्यंत वर्षात अधून मधून दहा बारा दिवस दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शब्दांमध्ये पूर्ण बुडून जाण्याचं सुख मिळत होतं, जोपर्यंत एखाद्या अर्थछटेवरून आमच्यात घनघोर वाद चालत होते, कुणी कुठून कुठून संदर्भ आणत होते, चिन्मय इतर भारतीय भाषा, बाहेरच्या भाषा यांच्याशी नाळ जोडून दाखवत होता; तोपर्यंत मला येरवड्याच्या परिसरात राहून मिळेल ते पोटात ढकलून भूक भागवण्याबद्दल यत्किंचितही तक्रार नव्हती.

पण आता वर्ष होऊन गेलं, काम पूर्णपणे थांबलं आहे. केळकर तर गेले. त्यांच्या कामाविषयी कळकळ असलेलं, दुसर्‍या कुठल्याही भारतीय भाषेत झालेलं नाही असल्या पातळीचं काम मराठीत होऊ घातलंय याचं अप्रूप वाटणारं, ’वर’ कोणी बसलेलं नाही. मराठीसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेपोटी साहित्यकृतींना पारितोषिकं देणार्‍यांना असल्या कामाचं मोल नाही की काय कळत नाही. ह्या कामावर सध्या सरकारी मालकी असल्यामुळे बाहेर कुणाला त्याचा थांगपत्ता नसण्याची शक्यताही आहेच.

म्हणून शेवटी मी हे सगळं चव्हाट्यावर मांडण्याचा निर्णय घेतला. घेताना मी WRLC ची अनुमती मागितलेली नाही. हे लिहिताना जर कुठल्या शासकीय नियमाचा भंग झाला असेल, गोपनीयता ओलांडली गेली असेल, तर त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे.