Tuesday, October 7, 2014

सुरेशच्या काही आठवणी



सुरेशच्या न सांगण्यासारख्या गोष्टी खूपच. सांगण्यासारख्याही आहेत. त्याच्या घरी, म्हणजे वरळीच्या बीडीडी चाळीत गेलो असताना एक गणिताचं पुस्तक दिसलं. लहानसं होतं. त्यात गणिताचे विविध प्रकार समजावून सांगितले होते. मी चाळलं. आणि हरखून गेलो. सुरेश बघत होता. हसला, म्हणाला, ने वाचायला. मी घेऊन आलो. ताबडतोब वाचलं. पुन्हा पुन्हा वाचलं. आपल्याला अंकगणितापलिकडे ऑल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगनॉमेट्री, को-ऑर्डिनेट जॉमेट्री, डिफरंशिअयल-इंटिग्रल कॅल्क्युलस, मेट्रायसेस-डिटर्मिनंट्स (च्यायला, यादी करत गेलो, तर बरेच प्रकार आठवले की!) असे मोजके प्रकार माहीत. त्या पुस्तकात काय काय होतं. सगळं एका फटक्यात पचणारं नव्हतं. मी विचार केला, सुरेशपेक्षा आपल्याच जवळ ते पुस्तक असणं बरोबर आहे. सहा महिन्यांनी सुरेशने पुस्तक मागितलं. म्हणाला, साल्या, मी विसरीन असं वाटलं काय? मला काय त्याची किंमत कळत नाही?

सतीश तांबे म्हणतो, ते शंभर टक्के खरं. सुरेशशी त्याच्या जातीबद्दल पूर्ण मोकळेपणाने बोलता यायचं. खरं तर आमच्या सर्वांबद्दल हे म्हणता येईल. त्यामुळे सुरेशलाही आमच्यात जास्त मोकळं वाटत असावं.

सुरेशला भन्नाट कल्पना सुचत. एकदा म्हणाला, मुंबईत घरांचा इतका प्रॉब्लेम. मी एक लहान बोट विकत घेणार आहे. वर्सोव्याच्या किनार्‍यावर लावायची. सकाळी समुद्रातून नरिमन पॉइंटला न्यायची. ऑफीस सुटलं, की बोटीत बसून परत वर्सोवा. बोट हेच घर. किती सोयीचं होईल.

पद्मा कौटुंबिक होती. काही वर्षं ते माझ्या जवळ रहात. पद्मा घरी बोलवायची. मीही दोनेकदा गेलो. माझ्या बिल्डिंगमध्ये पद्माची एक कलीग रहायची. त्यांच्याकडे गणपतीला आली, की पद्मा माझ्या घरी येत असे. एकदा स्टेशनमधून बाहेर पडत असताना एका भरघोस दाढीधारी दांडगट माणसाने माझ्या वाटेत आडवा हात घातला आणि मला रोखलं. सुरेश! पुष्कळ वर्षांनी भेटलो. गप्पा मारल्या. त्याच्याकडे नेहमी सांगण्यासारखं खूप असायचं. सांगून, ऐकून झालं; बरं वाटलं. पण "घरी येतोस?" किंवा "चल, तुझ्या घरी जाऊ" असं कोणीच म्हणाला नाही!

काही वर्षं सुरेश जव्हार शाखेत होता. तो भाग मी तोवर पाहिला नव्हता. म्हणाला, ये. मी असेपर्यंत आलास तर फिरू. जाणं झालं नाही.

एकदा भेटला, तेव्हा हात बँडेजमध्ये होता. पण काय झालं सांगितलं नाही.

जाऊदे. न सांगता गेला, हे काही त्याने बरोबर केलं नाही. आणि मी लिहीत राहिलो, तर नको ते लिहीन. तो शेवटचा केव्हा भेटला, आठवतही नाही. पण त्याचा काय़ संबंध? कधीही भेटला, तरी जवळचा मित्रच होता. सुरेश आणि पद्मा. काय जोडी होती!


Friday, October 3, 2014

मोदींमुळे .... अमेरिकन एनाराय


मोदींचा अमेरिका दौरा कसा यशस्वी झाला, यावर भरभरून लिहिलं जात आहे. त्यात अमेरिकन सरकारने मोदींना कोणती ठोस आश्वासनं दिली, यावर भर नाही; तर मोदींमुळे तिथे भारताबद्दल, भारतीयांबद्दल एक विशेष भावना निर्माण झाली, यावर आहे. तरीही एका गोष्टीला द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही आहे.

अमेरिकेत, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये सर्वात जास्त आर्थिक ताकद असलेला ’एथ्निक’ गट म्हणजे ज्यूइश लोक. हे लोक केवळ पैशाने सामर्थ्यवान आहेत, असं नाही; तर राजकीय दृष्ट्यासुद्धा जागरूक आहेत. इतके, की सार्‍या जगात कितीही टीका झाली, तरी अमेरिका इस्रायलची तळी उचलल्याशिवाय रहात नाही. अलिकडल्या काळात इस्रायलने पॅलेस्टाइनवर बॉम्बफेक करून हजारो निरपराध जीवांची हत्या केली. रुग्णालयांवर बॉम्ब टाकले. सामान्य लोकवस्तीवर टाकले. जगभर याच्या विरोधात निदर्शनं झाली. अमेरिकेतही झाली. पण अमेरिकेने इस्रायलला आवरण्यासाठी काहीही कृती केली नाही. अमेरिका सतत सर्व बर्‍यावाईट बाबतीत इस्रायलची पाठराखण करते, याला एकमेव कारण म्हणजे अमेरिकेतील ज्यूइश लॉबी.

अमेरिकेत ज्यू लोकांच्या खालोखाल श्रीमंत असलेला एथ्निक गट कोण ठाउक आहे? भारतीय. इंडियन्स. भारतीय लोक तिथे तुलनेने कष्टाळू मानले जातात. एकमेकांना धरून ठेवणारे, कौटुंबिक नातेसंबंधांमधून अत्यंत उपयुक्‍त असा मानसिक आधार पुरवण्याची रीत असलेले मानले जातात. सॉफ्टवेअर उद्योगात भारतीयांना विशेष गती आहे, असंही आता मानलं जातं. व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होते आणि केविन स्टेसी लुंगी डान्स करतो, ते आपोआप नाही.

पण ज्यू आणि भारतीय यांच्यात एक महत्त्वाचा, भला मोठा फरक आहे. ज्यूईश लोक जितके इस्रायलबद्दल हळवे, कडवे असतात; तितके भारतीय भारताबद्दल नसतात. तिथल्या एनाराय लोकांना भारतात ढवळाढवळ करण्याची अपार हौस; पण अमेरिकेत भारताच्या हितसंबंधांना पुष्टी देण्यासाठी फार काही करवत नाही. सॉफ्टवेअर इंजीनियरना व्हिसा देण्याची मागणी करणे म्हणजे भारतातून अमेरिकेत जाणार्‍यांचं हितरक्षण; भारताचं हितरक्षण नव्हे.

आणखी एक फरक असा, की अजून तिथल्या भारतीयांनी स्वतःचा ’क्लाउट’ एकजुटीने वापरलेला नाही. एका अर्थी, अमेरिकन राज्यकर्त्यांना भारतीयांच्या वजनदारपणाची जेवढी जाणीव आहे, तेवढी खुद्द भारतीयांना नाही!

यात फरक पडत चालल्याच्या काही खुणा दिसू लागल्या आहेत. एक म्हणजे अमेरिकेतले बहुसंख्य भारतीय ’हिंदू’ होत चालले आहेत. तिथे मोठमोठी देवळं बांधली जात आहेत. पूजा घातल्या जात आहेत. भिक्षुकी हा एक भरपूर पैसा मिळवून देणारा व्यवसाय होऊ लागला आहे! भारतात हिंदुत्ववाद्यांची ताकद जेवढ्या प्रमाणात वाढत गेली, तेवढ्या प्रमाणात तिथे हा बदल होत गेला. सध्या अमेरिकन एनाराय हा विश्व हिंदु परिषदेपासून संघाच्या सर्व संघटनांसाठी निधीचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे.

परवाच्या मॅडिसन स्क्वेअर ग्राउंडमधल्या समारंभात इवेंट मॅनेजमेंटचा भाग मोठा असला; तरी त्यातून भारतीयांच्यात मोठ्या प्रंमाणात
एकसंधता येऊ लागल्याचा संदेश प्रक्षेपित झाला, हे नक्की. यातून एक ’इंडियन लॉबी’ जन्माला येईल का? अमेरिकेच्या राजकारणावर, परराष्ट्र धोरणावर, अमेरिकन गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारी, भारताच्या वतीने प्रभाव टाकणारी एक शक्‍ती यातून आकार घेईल का?
असं होण्याला जे अडथळे आहेत, त्यात एक अडथळा अमेरिकन धार्मिकता, हा आहे. त्यांना ज्यू असणं समजतं पण हिंदू असणं ’एक्झॉटिक’ वाटतं. एक्झॉटिक प्राणी न्याहाळायला बरा; पण राज्य करायला कसा चालेल? धर्माने ख्रिस्ती असणे याला राजकारणात अपार महत्त्व आहे. परिणामी भारतीय वंशाचे जे कोणी तिथे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगतात, ते ’आपण चर्चला जातो, ख्रिस्ताला मानतो,’ असं आवर्जून बोलून दाखवत असतात. त्यात चटकन बदल होणे कठीण आहे.

दुसरी अडचण खास भारतीय आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि तिथल्या स्थानिक लोकांसाठी ’इंडियन’ हीच आपली ओळख असली, तरी आपल्याला अंतर्यामी तेवढं पुरत नाही. आपण पंजाबी असतो, ब्राह्मण असतो, द्रविडियन असतो आणि बंगाली असतो. असल्या भेदांच्यात एकी होणं अशक्य आहे. आणि याचा सुगावा अमेरिकनांना लागल्याशिवाय रहाणार नाही. कारण आपणच अभिमानाने स्वतःचं श्रेष्ठत्व सांगण्याच्या भरात हे सांगून टाकणार. भाषा, वर्ण, जात यांना ओलांडून भारतीयांच्यात एकी घडवून आणण्यासाठी प्रभावी व्यक्‍तिमत्वाच्या प्रतिभावान माणसाची गरज आहे.

इंडियन लॉबी निर्माण होणं म्हणजे देशी भारतीयांसाठी गुड न्यूजच असेल, असं मानण्याचं कारण नाही, हेसुद्धा स्पष्ट केलं पाहिजे. आपल्याकडला सॉफ्टवेअर उद्योग म्हणजे तिथल्या उद्योगाला मिळणारी एक स्वस्तातली सेवा आहे. कॉल सेंटर या उद्योगातही किती प्रतिष्ठा आहे, हे सर्व जाणतात. इथल्या महत्त्वाकांक्षी युवकाला या पातळीवरच सुरुवात करण्याला पर्याय नाही आणि नसेल. दुसरं असं की आजच एनाराय जेव्हा इथे त्यांच्या ठेवी ठेवायला येतात, तेव्हा सवलती मागतात. त्यांना गुंतवणूक करताना स्पेशल ट्रीटमेंट हवी असते. त्यांच्या स्टार्टअपला शासकीय परवाने झटपट मिळावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. यात बदल होणार नाही. त्यांनी काढलेले उद्योग इथल्या जनतेच्या जीवनात व्हॅल्यू ऍडिशन करण्याची शक्यता कमी. अमेरिकन एनाराय पक्के इंटरनॅशनल नागरीक झाले आहेत. त्यांचा ग्राहकवर्गही बाहेरचाच असेल. भारतात स्वस्तात मिळणारं कौशल्य वापरून फायदा वाढवणे, हाच त्यांचा उद्देश राहील; स्वदेशाचं कल्याण हा नव्हे.

पण एक विषय आहे, जिथे ज्यूईश आणि हे अमेरिकन नवहिंदू यांच्या धारणा एकत्र येतात; तो म्हणजे मुसलमान विरोध. क्लॅश ऑफ सिविलायझेशन्स, ही मांडणी इथल्या हिंदुत्ववाद्यांनी जोरदारपणे उचलून धरली होती. पराकोटीचा मुस्लिमद्वेष, हा हिंदुत्ववादी विचाराचा मूलाधार आहे. इस्रायलला हे निश्चित पसंत पडेल. अमेरिकेतल्या ज्यूईश लॉबीचाही याला पाठिंबाच असेल. मग यातून कोणती कृतियोजना आकार घेईल? पाकिस्तानचं काय होईल? काश्मीर प्रश्नाविषयी अमेरिकेची भूमिका बदलेल का? या सगळ्यावर चीनचं काय म्हणणं असेल? आणि अमेरिका चीनच्या म्हणण्याची कशी दखल घेईल?

स्थिती विचार करण्यासारखी आहे. अमेरिका आणि अमेरिकेतले भारतीय, यांचे प्राधान्यक्रम काय आहेत आणि ते कुठे एकत्र येतात, कुठे एकमेकांना छेद देतात, यावर पुढचं अवलंबून आहे.