Friday, June 17, 2022

छावणी: विद्रोहाचा एकसुरी पण जळजळीत हुंकार


 प्रेमानंद गजवी हे नाव मराठी नाट्यक्षेत्राला चांगल्यापैकी परिचित आहे. त्यांच्या मांडणीबाबत मतभेद होऊ शकतात; पण त्यांच्या बांधिलकीविषयी नाही. त्यांच्या वयाला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या ‘छावणी’ या दीर्घांकाचा प्रयोग बघण्याची संधी मिळाली. प्रयोग लक्षणीय वाटला. का वाटला, ते सांगण्याचा हा प्रयत्न. मी जे पाहिलं, मला जे प्रतीत झालं, त्याची संगती लावण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रेमानंद गजवी लिखित आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज दिग्दर्शित ‘छावणी’ हे नाटक म्हणजे मी म्हणतो तेच, असा माझा दावा नाही.

१. १.      प्रयोगात सर्व पात्रं एका जागी उभं राहून आपापले संवाद म्हणतात. कधी ते एकमेकांशी बोलतात, तर कधी प्रेक्षकाकडे अर्धवट वा पूर्ण वळून आपापलं म्हणणं ऐकवतात. दोघांनाही माहीत असलेल्या गोष्टी तपशिलात जाऊन एकमेकांना सांगण्याचा ढोबळपणा जो मराठी नाटकाच्या सुरुवातीला बऱ्याचदा असतो, तो इथे अनेकदा आहे. पात्रांची, त्यांच्यातल्या संबंधांची माहिती एके काळी सूत्रधार प्रेक्षकांना पुरवत असे; आता बिनसूत्रधाराच्या सादरीकरणामध्ये पात्रं स्वत:च हे काम करतात. प्रतिभेला अजिबात ताण न देता पार्श्वभूमी सांगण्याची जबाबदारी चटकन पार पाडता येते.

‘छावणी’मधला वेगळेपणा असा की रंगमंचाची लांबी रुंदी अजिबात न वापरता खणखणीत आवाजात आणि चढ्या सुरात भाषण दिल्यागत सर्व काही प्रेक्षकांना ऐकवलं जातं. या शब्दांमधून ‘संवाद’ कमी घडतो, संभाषणही जेमतेमच होतं. होते ती विचारांची, युक्तिवादांची देवघेव. किंवा एका विशिष्ट भूमिकेची आव्हानात्मक मांडणी. यातून नाटक ‘वैचारिक’ आहे, असं बजावलं जातं. एरवीच्या नाटकांमध्ये रंगमंचावर समोर येणाऱ्या सहज हालचाली टाळल्यामुळे आणि ‘उच्च रवातील’ सुस्पष्ट उच्चारांमुळे शब्दांमधल्या आशयाकडेच प्रेक्षकाचं लक्ष खेचलं जातं. प्रत्यक्ष पात्रं कमी महत्त्वाची होऊन जातात.

मराठीत शुद्ध वैचारिक नाटकं आली नाहीत, असं मुळीच नाही. ‘उद्‌ध्वस्त धर्मशाळा’ हे सर्वात ठळक उदाहरण. ‘…धर्मशाळा’मध्ये अशा तऱ्हेचा आवेश नाही. पण तिथल्या वैचारिक संघर्षाचा इथे अभाव आहे. एका भूमिकेचे विविध पैलू विशद करण्यासाठी फुटकळ आक्षेप घेतले जातात, इतकंच. आवेशामुळे ती भूमिका प्रेक्षकाला गर्जना करून बजावली जाते. यातून या विचाराची मांडणी प्रचारकी थाटाची होते. ती मांडणी मान्य असणाऱ्याला बळ देणारी होते. तटस्थ मानसिकतेसमोर वैचारिक घुसळण मांडली जाण्याचा प्रयत्न होत नाही.

२. २.      ‘छावणी’ म्हणजे नक्षलवाद्यांची जंगलातली छावणी. समोर येणारे सर्व कमांडो बायका आहेत. त्यांची प्रमुखही बाईच आहे. पुरुष कमांडोंचे उल्लेख आहेत; पण दर्शन नाही. एक लक्षणीय पुरुषपात्र आहे; पण कमांडो असलेल्या बायका सतत लढ्याचा, हिंसेचा उच्चार करत असताना हा पुरुष समन्वयाची भाषा करतो! यातून नाटकाला काय अभिप्रेत असावं? की हा लढा भूमीचा आहे, म्हणजे बाईला जवळचा आहे, तिला निर्वाणीची भूमिका घेण्याला भाग पाडणारा आहे, असं? नाटकातला प्रश्न थेट जगण्याची, जीव बचावण्याशी संबंधित आहे म्हणून बाईला शस्त्र उचलणं अपरिहार्य झालेलं आहे,असं? की जगण्याच्या लढाईत / आधुनिक काळात / व्यक्ती म्हणून पहाता बाई आणि पुरुष हा भेद अनावश्यक ठरला आहे, असं?

३.  ३.   यात चक्क शंकराचार्य हे एक पात्र आहे. एका हिंदू धर्मपीठाचा प्रमुख, या नात्याने तो त्याची भूमिका मांडतो. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जाते; पण तो उत्तरादाखल जरी शौर्याचे डायलॉग मारत नसला, तरी स्वत:ची भूमिका सोडत नाही. नाटकाच्या वैचारिक प्रकृतीशी हे सुसंगतच आहे: भीतीपोटी एक भ्याड व्यक्ती होऊन तो ‘शंकराचार्य’ या विचाराशी बेईमान होत नाही, की भ्रष्ट होत नाही.

४.      ४. नाटक उघडपणे विद्रोही आहे. एके काळी, जेव्हा मुंबई-महाराष्ट्रावर काँग्रेसचं निरंकुश राज्य होतं, त्या काळी, मुंबईत कामगारांच्या आंदोलनांमध्ये कम्युनिस्ट, सोशालिस्ट दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून ‘‘… जो सरकार निकम्मी है, उसे हमे बदलनी है’’ अशी घोषणा मोठ्या आवेशाने दिली जाई आणि लोकनियुक्त सरकार पाडण्याचं आवाहन म्हणजे राष्ट्रद्रोह, अशी समजूत नसल्याने घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होत नसे. हे नाटक या घोषणेच्या दोन पावलं पुढे जातं. सरकारच नव्हे, तर साऱ्या व्यवस्थेलाच टक्कर देऊ बघतं. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी हिंसेचा पुरस्कार करतं. राष्ट्र या मूल्यापेक्षा, समाजस्थैर्य या मूल्यापेक्षा आत्मप्रतिष्ठा हे मूल्य मोठं असल्याचं ठामपणे मांडतं. आत्मप्रतिष्ठेला माणुसकी या वैश्विक मूल्याशी जोडतं.

विवेकानंदांनीच राष्ट्रापेक्षा माणुसकी मोठी, असं म्हटलं आहे हे विसरून चालणार नाही.

५.      ५. नाटकाच्या अगदी अखेरच्या भागात ‘नक्षलवादातून राष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका’ मांडला जातो. आणि त्याला ‘संविधान’ हे उत्तर असल्याचं सांगितलं जातं. या काहीशा गुळमुळीत उल्लेखामधून नाटकभरातल्या प्रखर विद्रोहाचा प्रभाव पातळ होत नाही. या उल्लेखामुळे नाटकात नक्षलवाद विरुद्ध आंबेडकरवाद असा विरोध मांडल्याचा आभास निर्माण होतो; पण तसंही नाही. नाटकात चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे; तिथलं जंगल, तिथले आदिवासी आणि नक्षलवादी असे उल्लेख असले तरी नक्षलवादी तात्त्विक भूमिका सुस्पष्टपणे समोर येत नाही. पात्रांचं बाह्य रूप सामान्यजनांच्या मनातल्या नक्षलवादी प्रतिमेला जवळचं आहे, इतकंच. त्याचबरोबर आंबेडकरवाद किंवा संविधानातील तरतुदी यांचंसुद्धा विवेचन आढळत येत नाही. जे समोर येतं, ते नक्षलवादाचा मार्ग नाईलाजाने स्वीकारणाऱ्या आंबेडकरी दलित जनतेच्या विद्रोही भावनेला दिलेलं प्रातिनिधिक रूप.

एकूण, स्वत:ला आंबेडकरी मानणाऱ्यांच्या अस्मितेला शब्दकळेच्या माध्यमातून जोरदार पाठबळ देण्याचं काम हे नाटक, या नाटकाचा हा प्रयोग यांच्याकडून होतं. या परिघाबाहेरच्या मनाला आवाहन करण्याचा इरादा कुठेही व्यक्त होत नाही.

Monday, June 13, 2022

जेम्स हेरिअटचं ‘लेट स्लीपिंग व्हेट्स लाय’

 या पुस्तकाबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. एक एक करून सांगतो.

१. पुष्कळ दिवसांनी ‘जुन्या’, ‘खानदानी’ इंग्रजीतलं लिखाण वाचायला मिळालं. भाषा सतत बदलत असते, हे आपल्याला ठाऊक असतं आणि त्यानुसार जशी आपल्या तोंडची भाषा आपल्या नकळत बदलत जाते, तसंच ललित आणि वैचारिक लिखाणाची भाषाही बदलत असते. मराठीत सर्व प्रकारच्या शैलीवर ‘कोसला’ने भला मोठा आघात केला, भाषा ‘सैल’ केली. हे असं सगळीकडे चालू असतं; पण कुठे ही उत्क्रांती असते आणि कुठे क्रांती, हे कळण्यासाठी त्या त्या भाषेकडे, म्हणजे भाषेतल्या वर्तमानपत्री लिखाणाकडे, कथा-कादंबरी-कवितेकडे आणि वैचारिक मांडणीकडे लक्ष ठेवावं लागेल. नुसतं वाचत राहून चालणार नाही, या विशिष्ट संदर्भात सजग रहावं लागेल.

इंग्रजी सतत वाचत असूनही मी असं लक्ष कधी ठेवलं नाही. त्यामुळे जेम्स हेरिअटचं ‘लेट स्लीपिंग व्हेट्स लाय’ हे पुस्तक वाचताना अचानकच हे भान आलं: असलं इंग्रजी आता वाचनात येत नाही! यातला काळ १९३०चा आहे; पण लिखाण १९६० नंतर झाल्याचे उल्लेख येतात. म्हणजे १९६० पर्यंत इंग्रजी असं लिहिलं जात होतं? आश्चर्य वाटतं. एक बारीक मुद्दा सुचतो तो असा, की भाषा तर बदलत असतेच; म्हणजे भाषांतर करताना काळाचं केवढं भान ठेवावं लागत असेल! ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ ही (अमेरिकन) कादंबरी १९५५ ते ६० या काळात लिहिली गेली. पण ती घडते तो काळ तीसेक वर्षं अगोदरचा आहे. तर ती एकविसाव्या शतकात मराठीत आणताना भाषेला कोणता बाज द्यावा?

असो. हेरिअटच्या ‘खानदानी’ (म्हणजे अस्सल ब्रिटीश) भाषेची काही उदाहरणं द्यावीच लागतील.

पान १२: He was elaborately casual

पान १३: studied carelessness

पान २६: I was very chary of affronting such natural dignity and anyway, Mr Pickersgill was fundamentally a fine stockman.

पान ८९: I reeled out into the fresh air and the sunshine. Looking round at the tranquil scene, the long stretch of grass, the loop of pebbly river with the green hills rising behind, I had a sense of unreality.

हेरिअट ॲब्सर्ड लिहीत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ डिक्शनरीत आहे, तोच त्याला अभिप्रेत आहे. वेगळा, तरल अर्थ सुचवण्यासाठी तो अलंकारिक भाषा वापरतो, (ब्रिटीश असल्यामुळे उदंड) ऑक्सिमोरॉन घडवतो. आणि ही अलंकारिकता खास ब्रिटीश आहे, असं मला वाटतं. त्याचं लिखाण वाचताना इंग्रजी वाचनाच्या संदर्भात मला एकदम ‘गावी गेल्या’सारखं वाटलं!

२. हा कथासंग्रह आहे. निवेदकाचं नाव जेम्स हेरिअट आहे. लेखकाचं नावही तेच आहे. म्हणजे हे त्याचे स्वत:चे अनुभव आहेत. पण हे नावच खरं नाही. आणि हे सगळं यॉर्कशायर काउंटीत घडत असलं, तरी गावाचं नाव काल्पनिक आहे! ज्या मित्राने मला हे वाचायला दिलं, तो हेरिअटच्या प्रेमात पडला. त्याने हेरिअटचं सगळं लिखाण वाचून काढलं आणि कामानिमित्त इंग्लंडला गेल्यावर डॅरोबाय (Darrowby) हे गाव शोधू लागला. मिळेना. मग त्याला कळलं की त्याचं खरं नाव अमुक अमुक असून तमुक तमुक गावातल्या त्याच्या घराचं रूपांतर आता म्युझियममध्ये करण्यात आलं आहे. मित्र तिथे गेला. तिथल्या बाईला हेरिअट भारतातही वाचला जातो, हे कळून आश्चर्य वाटलं आणि तिने मित्राची भेट हेरिअटच्या मुलीशी घालून दिली.

असं आपल्या इथे खांडेकरांबाबत होऊ शकतं. समग्र खांडेकर तमिळमध्ये गेले आहेत; अशा रीतीने, की म्हणे अनेक तमिळी वाचकांना ते तमिळ लेखक आहेत, असंच वाटतं! मलाच बंगलोरात एक तरुण मनुष्य भेटला, ज्याने शाळकरी वयात कन्नड भाषेमध्ये ययाती वाचल्याला अनुभव वर्णन करून सांगितला. तो अर्थातच तेव्हा ययातीने भारून गेला होता. तर खांडेकरांच्या शिरोड्याच्या घराचं काही करण्यात आलंय का? करायला हवंच, असं मुळीच नाही; कारण खांडेकरांचं लिखाण शिरोड्याभोवती गुंफलेलं नाही. बाकी गो नी दांडेकरांची ‘पडघवली’ आठवते आणि त्यांचीच ‘रानभुली’ ही चिमुकली कादंबरीसुद्धा आठवते. ती जवळपास सगळी रायगडावर घडलेली आहे आणि रायगडाचं जे होतं आहे किंवा होणार आहे, त्यामागे ‘रानभुली’ची प्रेरणा असण्याचं काही कारण नाही!

नवीन नोकरीला लागलो असताना मित्राच्या घरी दापोलीला जाताना मला असंच अत्यंत रोमांचक वाटलं होतं. तिथे मी हर्णैला गेलो, मुर्डीला गेलो, कादंबरीतल्या रावज्याचं दुकान असतं त्या कुठल्याशा नाक्यावर गेलो. कादंबरीतली ठिकाणं खरोखर असतात, याचा मी घेतलेला तो पहिला अनुभव होता. ‘गारंबीचा बापू’ माझ्या मनात पक्का जाऊन बसला होता!

३. हेरिअटच्या सगळ्या गोष्टी ग्रामीण जीवनाविषयी आहेत. जनावरांचा डॉक्टर म्हणून काम करत असताना त्याला आलेल्या अनुभवांमध्येच त्याच्या लिखाणाचं मूळ आहे. एखाददुसरी कथाच माणसांबद्दल असेल; ज्यातली पात्रं इतर कथांमध्ये भेटणारीच आहेत. मग त्यात ग्रामीण वातावरण, जनावरांना होणारे रोग आणि त्यांच्यावरचे उपाय, शेतकऱ्यांची अवजारं, निसर्गाचे विभ्रम असं सगळं वारंवार येतं. हेरिअट स्वत: त्या गावचा नाही, त्याची भाषा तिथली बोली नाही. शेतकऱ्यांच्या तोंडी तो त्यांची बोलीच घालतो; मात्र त्या बोलीचा प्रमाण भाषेत खुलासा करत नाही की त्या बोलीची यत्किंचितही थट्टा करत नाही. (एक गंमत अशी की तो जिच्यावर लाइन मारतो तिच्या तोंडी प्रमाण भाषा, पण तिच्या शेतकरी बापाच्या तोंडी मात्र स्थानिक ग्रामीण बोली, असा प्रकार आहे! यातून काय अर्थ काढावा? हेरिअटला कुठेतरी प्रमाण भाषेची उच्चभ्रूता मान्य होती, असा? की यॉर्कशायर काउंटीमध्ये तरुण, शिकलेली पिढी त्यांची बोलीभाषा त्यागू लागली होती, असा?)

हेरिअट स्वत: तसं स्पष्टपणे म्हणत नसला तरी तिथल्या पर्यावरणात जाती नाहीत, कुठल्याही कामाला वरच्या वा खालच्या दर्जाचं मानलं गेलेलं जाणवत नाही की शहरी-ग्रामीण असा उच्च-नीच भाव खटकत नाही. वयालाही फार मान मिळतो आहे, असं वाटत नाही. पैसा आणि कामातली सफाई यांचा तेवढा मान ठेवलेला आढळतो. जनावरांवर उपचार करताना दुर्गंधाचा सामना करावा लागतो. घोडी, गाय, शेळी, कुत्री यांची अडलेली बाळंतपणं करताना कुठे कुठे हात घालावे लागतात. हे सगळं करताना हेरिअटच्या निवेदनातून केवळ कामाविषयी प्रेम, बांधिलकी दिसून येते. जनावरांवर प्रेमच करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याच्या प्रती कृतज्ञताच वाटताना दिसते.

असला, निवेदनाला गढूळ करणारा उच्च-नीच आशयच पार्श्वभूमीवर नसल्याने निसर्गवर्णन, कामातल्या अडचणी आणि वर्तनातले खटके यांचा आस्वाद शुद्ध स्वरूपात घेता येतो. एक विशुद्ध सुख मिळत रहातं.

४. अगदी खरं सांगायचं तर या कथांमधल्या एकेका प्रसंगामध्ये फारसा ‘पंच’ नाही, ठसका नाही. या कथाही भरीवपणात किश्शांच्याच जवळ जाणाऱ्या असल्या तरी शंकर पाटील किंवा द मा मिरासदार यांच्या कथेत असतो तसा खमंग किस्सेबाजपणा तर इथे फारच दुर्मिळ आहे. माणसामाणसातल्या नातेसंबंधामध्येच आशय शोधणाऱ्याचा इथे विरस होईल. पण संवेदनशील भाषा, तरल निसर्गवर्णन आणि रांगड्या ग्रामीणपणाचा दाट सुगंध यांचा आस्वाद घेण्याचं वावडं नसलेल्याला या कथा रमवून टाकतील. जेम्स हेरिअटच्या भाषेचा – आणि दृष्टिकोनाचा - नमुना दिल्याशिवाय रहावत नाही:

पान २०८: It was all there in his face, in the softening of his eyes as they moved over the huddle of grass fields cupped in a hollow of the fells. These fields, clawed by past generations from the rough hillside and fighting their age-old battle with hather and bracken, run up to a ragged hem of cliff and scree and above you could just see the lip of the moor – a wild land of bog and peat hag. Below, the farm track disappeared round the bend of a wooden hill. The pastures were poor and the knuckles of rock pushed out in places through the thin soil, but the clean, turf-scented air and the silence must have been like a deliverance after the roar and smoke of the steel-works.

५. साहित्याविषयी मला नेहमी पडणारा आणि न सुटलेला प्रश्न. लेखक हा समाजाचा घटक असतो, यात वाद नाही. ललित लेखक वा अन्य कोणी कलावंत स्वत:ला समाजापेक्षा वरचा तर नाहीच; वेगळा जरी मानू लागला, तरी ती गंभीर चूक आहे, असं मला वाटतं. याच्या पुढे जाऊन असंही वाटतं की लेखक केवळ ‘लेखक’ म्हणून समाजात वावरावा की आणखीही कोणी असावा? आणि त्या ‘आणखी कोणी’ असण्याचं प्रतिबिंब त्याच्या लिखाणात पडावं? की लेखनाचे ललित आणि वैचारिक असे स्पष्ट दोन भाग करावेत आणि वैचारिक साहित्याला तटस्थ, अलिप्त, हस्तिदंती मनोरावासी, वगैरे रहाण्याची मुभा असावी? आणि कलेत नेहमीच होतं तसं इथेही सीमा धूसर असाव्यात आणि पारमार्थिक, आधिभौतिक, वगैरे प्रकारच्या ललित लिखाणालासुद्धा ही मुभा लागू व्हावी?

हेरिअट व्हेट आहे, जनावरांचा डॉक्टर आहे. तीच त्याची नजर आहे. त्या नजरेतून त्याला दिसणारं जग अधिक विशाल, अधिक संकुचित आहे, असं म्हणता येत नाही. ते वेगळं आहे, इतकं नक्की. अशा वेगवेगळ्या लिखाणांच्या गोधडीतूनच भाषेचं आणि म्हणून त्या संस्कृतीचं भव्य, कोलाजमय क्षितीजव्यापी लँडस्केप तयार होत असतं.

आणि अशा वेगवेगळ्या पठड्या नसतील तर त्या संस्कृतीचं समावेशक चित्र तयारच होत नाही की ते मुळातच नसतं?