Saturday, January 2, 2016

एक मस्त नाट्यानुभव : "पुरावाच काय अमेरिकेला"




सतीश तांबे यांच्या कथेचं अभिजीत झुंजारराव यांनी नाट्यरूपांतर केलेल्या ’पुरावाच काय अमेरिकेला’ या नाटकाचा प्रयोग बघितला. त्यांचं जयंत पवार यांनी लिहिलेलं परीक्षण फेसबुकावर आल्यामुळे वाचायला मिळालं. नाटक बघून माझी प्रतिक्रिया वेगळी झाली होती. एरवी ती नोंदवण्याचा आळस केला असता; पण हे परीक्षण वाचून लिहिणं आवश्यक वाटलं.

पण हे परीक्षण नाही; यात नाटकाच्या अंगांवर कॉमेंट नाही. तांत्रिक तपशील नाहीत. ही एक प्रतिक्रिया आहे. जयंत पवार यांच्या परिक्षणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली. तर,

नाटकाचं कथानक थोडक्यात असं:
आयुष्यभर डाव्या विचारांची कास धरलेल्या जयंतरावांना आपोआपच अमेरिका आणि अमेरिकी छाप यांविषयी तिटकारा वाटत असतो. उलट बाजूने सामाजिक बांधिलकीच्या भावनेपोटी स्वार्थ त्यागणार्‍याविषयी कमालीचा आदर असतो. त्यांची बायको जरी त्यांच्या संसारात पूर्ण साथ देत असली; तरी सर्वसाधारण गृहिणीप्रमाणे तडजोडवादी असते. पुढच्या पिढीतल्या त्यांच्या मुलीला मात्र काहीच न साधणार्‍या सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणं मान्य नसतं.
अशात अनेक वर्षं शहर सोडून आडगावी प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टर मित्राचा अमेरिकेला जायला निघालेला मुलगा व्हिसा, वगैरेच्या कामासाठी मुंबईला येतो आणि सर्वात जवळचं, म्हणून जयंतरावांच्या घरी मुक्काम करतो. तो वागण्या-बोलण्यात अजिबात आंग्लाळलेला नसला तरी संघर्ष अटळ असतो.

१. नाटकात कथेचा आशय व्यक्‍त होतो का, या प्रश्नाला स्वच्छपणे "होय", असंच उत्तर द्यावं लागेल, इतका तो प्रभावीपणे प्रक्षेपित होतो. या नाटकातील प्रश्नामध्ये प्रेक्षक ओढले गेले आणि त्यांना कलेच्या आस्वादाचा मोठा आनंद मिळाला. प्रक्षेपित झालेला आशय सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाचा होता; भावनिक वा स्मरणरंजनातला नव्हता. आणि तरीही प्रेक्षकांच्या भावना उचंबळलेल्या दिसल्या. नाटकाच्या शेवटी आलेल्या परमोत्कर्षबिंदूपाशी प्रेक्षकांनी चक्क उभे राहून टाळ्या वाजवल्या! दिग्दर्शकाच्या यशाची ती पावती होती. माध्यमांतर (वा कलांतर) करताना आशयच तर पकडायचा असतो; बाकी तपशील निसटले, तरी चालण्यासारखं असतं. कारण ते तपशील बर्‍याचदा माध्यमविशिष्ट (वा कलाविशिष्ट) असण्याची शक्यता असते.

२. कथेत / नाटकात अमुक प्रतिपादनाची उघडपणे बाजू घेतलेली नाही. म्हणजे, ज्याचा पुरस्कार करायचा आहे, ते म्हणणं मांडणार्‍या पात्राबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती निर्माण होईल, प्रेक्षक त्या पात्राशी सहमत होतील, अशी सोयीस्कर रचना नाही. त्याच्याविरुद्ध असलेली बाजू प्रेक्षकांच्या नजरेत लंगडी ठरावी यासाठी विरुद्ध बाजू मांडणार्‍या पात्रांमध्ये काही खोट ठेवण्याची क्लृप्तीसुद्धा अवलंबलेली नाही. मुळात ’हे बरोबर आणि ते चूक’ असं काही मांडलेलं नाही. दोन गोष्टी मांडलेल्या आहेत. एक, मूल्यांशी बांधिलकी बाळगण्यातून जवळच्यांशी पंगा घ्यावा लागतो आणि त्यातून कुचंबणा होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे, जरी अशी कुचंबणा झाली, तरी व्यवहारवादी होण्यापेक्षा कुचंबणेचं लोढणं गळ्यात घेणारी बांधिलकीच मोठी! नाटकातल्या प्रत्येक पात्राला (सूत्रधार हे नाटकाच्या आतलं पात्र नव्हे) स्वत:ची विचारधारा आहे. समोर येणारं भांडण विचारधारांमधलं आहे. आणि ते वैचारिक, तार्किक निबंधाच्या माध्यमातून न येता जिवंत, ओळखीच्या पात्रांद्वारे आल्यामुळे संघर्ष भलताच तेज होतो. बर्नाड शॉ धर्तीच्या या रचनेमुळे नाटकातून बौद्धिक आनंददेखील मिळतो. विचार जेव्हा भावना म्हणून व्यक्‍त होतात, तेव्हाच त्यातून नाट्य निर्माण होतं आणि या नाटकातल्या नाट्याची जात ही अशी आहे. जी मराठी रंगभूमीवर फारशी रूढ नाही. आणि मूळ कथालेखकाला सुचलेलं हे नाट्य नाटकामधून टोकदारपणे प्रक्षेपित होत आहे!

३. पण मग सूत्रधार हे जादा पात्र घालण्याचं कारण? सूत्रधार लेखकाची भूमिका निभावत नाही. ती (सूत्रधार बाई आहे) आशयाला धरून भाष्य कमी करते; नाटकात थोडा फार भाग घेत ती पात्रांची ओळख करून देण्याचं, संघर्षाचा परिचय करून देण्याचं काम करते (एकदा ती अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता म्हणून अवतरते, तो भाग तर मस्तच वठला आहे). पण कथानकाच्या प्रवाहात खंड पाडून सूत्रधाराकडून निवेदन करवण्याचं कारण? नाटकाच्या सुरुवातीला तर ती इतकी लांबण लावते की हीच खरी नाटक सादर करणार आणि बाकी पात्रं कठपुतळ्यांसारखी निर्जीव हालचाली करणार, असा घाबरवणारा विचारही मनात येऊन जातो.
प्रत्यक्ष घटनांवर भर देण्यापेक्षा निवेदनाला मोठा अवकाश का दिला आहे, याचं मला सुचलेलं उत्तर असं:
या नाटकामध्ये रंगतदार व्यावसायिक नाटकाची लक्षणं आहेत. थोडी कल्पकता असलेला निर्माता हे काम सहज करू शकेल. परंतु अभिजीत झुंजारराव या दिग्दर्शकाने सादर केलेला प्रयोग, हा ’हौशी मंडळींनी तुटपुंज्या संसाधनांच्या सहाय्याने केलेलं लुटुपुटूचं व्यावसायिक नाटक’ या स्वरूपाचा अजिबात नव्हता. कथेमधल्या व्यवसायिक नाटकाच्या शक्यता समोर आणणे, हा त्यामागचा उद्देश नव्हता. त्यातली प्रायोगिकता स्पष्ट होती. दिग्दर्शकाला कथाच सादर करायची आहे. ’ही एक कथा आहे, तिच्यातली पात्रं जरी इथे हिंडताना फिरताना दिसत असली; तरी कथावाचनाच्या जवळ जाणारा अनुभवच मिळवून द्यायचा आहे,’ असं म्हणत रंगमंचावर सादर होणारं नाटक बघताना प्रेक्षकांचं कथेचं भान हरवू नये, याची काळजी दिग्दर्शक घेतो आहे; असं सारखं जाणवत होतं. आणि असं असून देखील कथेतला आशय जोरकसपणे समोर आला! माध्यमांतर - कलांतर - टोटल जमलं!

४. तरीसुद्धा एक गोष्ट खरी की मी आणि इतर प्रेक्षक यांच्यासमोर एक नाटक सादर झालं, कथावाचन झालं नाही. नाटक म्हणजे कलावंत आणि आस्वादक यांच्यात जिवंत संवाद घडवून आणणारी मंचीय कला आहे. त्यामुळे तिच्या आविष्कारात प्रेक्षकाची भूमिकासुद्धा मोजावी लागते. प्रेक्षकाचा सहभाग जेवढा मोठा, तेवढं नाटक जास्त रंगतं. मी पाहिलेला प्रयोग विलक्षण रंगला. प्रेक्षकांची संख्या तशी कमी असूनही चांगला रंगला. कलावंतांच्या रसरशीत ऊर्जेने प्रेक्षकांना सहजी कब्जात घेतलं. कलावंतांच्या रंगमंचीय वावरात सहजता होती. त्यांची देहबोली त्यांच्या वैचारिक बैठकीला सुसंगत होती. आणि प्रेक्षकांसोबत रंगून जाऊन भावखाऊ अभिनय करण्याचा मोह पडावा, अशा अनेक जागा असूनही कुणाचा तोल गेला नाही. हे श्रेय जेवढं कलावंतांचं, तेवढंच दिग्दर्शकाचं. त्याने ऊर्जेला फुलवलं पण मर्यादा ओलांडू दिली नाही.


कलाकृती आस्वादताना शक्य तितकं तटस्थ रहावं. कलाकृती काय म्हणते आहे, याचा मागोवा घ्यावा. कलाकृतीचं म्हणणं पटणे न पटणे हा पुढचा भाग; पण त्याअगोदर ते म्हणणं समजून घेण्याचा प्राथमिक भाग पूर्ण करायलाच हवा. पण होतं काय, की कलाकृतीचा विषय, आशय, तिचं माध्यम, विशिष्ट पठडी यापैकी कशाबद्दलही आपले आग्रह इतके जोरदार असतात की आपण त्या कलाकृतीचा खरा आस्वाद घेऊ शकत नाही. सतत ती स्वतःच्या मनाजोगतं वळण घेईल, ही अपेक्षा बाळगत रहातो. मग ती मनातली संस्कारित प्रतिमा आणि समोर सादर होणारी कला, यातलं अंतर आपल्याला खटकत रहातं. त्या खटकण्याला व्यक्‍त करणे जरी अर्थपूर्ण असलं, तरी ते काहीसं मुद्द्याला सोडून आहे. That is another story!