Monday, March 31, 2014

तिच्यात ग्लॅमर नव्हतं


’बेबी’ नंदा


माझा काका त्याच्या जवळ जवळ हयातभर ’फिल्म इंडस्ट्री’त होता. तिकडच्या गोष्टी रंगवून सांगायचा. दोन की तीन वेळा त्याचं नाव दाखवलं म्हणून त्याने आम्हा घरच्या लोकांना पासावर सिनेमा बघायला नेलं होतं, असं मला आठवतं. त्यातला एक चित्रपट होता ’आहेर’. मराठी. नामदेव व्हटकर आणि सुलोचना त्यात होते. ’आहेर’च्या शूटिंगला मी गेल्याचं आणि कमालीचा कंटाळल्याचंसुद्धा आठवतं.

हे खूप लहानपणचं आहे. मी प्राथमिक शाळेत असतानाचं. म्हणजे १९६० च्या अगोदरचं. रमणकाकाने ’फर्स्ट लव’ हा चित्रपट दाखवायला नेलं की नाही, मला आठवत नाही; पण ’फर्स्ट लव’ची पोस्टर्स, हँडबिलं त्याने घरी आणलेली स्पष्ट आठवतात. हिरो होता मेहमूद. आणि हिरॉइन नाज. हँडबिलावर दोघांचे फोटो होते आणि तिचं नाव ’बेबी नाज’ असं लिहून ’बेबी’वर काट मारलेली होती. मी त्याला विचारलं, हे बिघडलंय म्हणून तू घरी घेऊन आलायस का? तो म्हणाला, नाही, ते तसंच आहे. त्या वयात मी सर्व मानवी व्यवस्थांच्या बाबतीत भयंकर श्रद्धाळू होतो. ’बेबी’वरची ती ठळक काट मला त्रास देत राहिली. वाटलं, हे असं पाहून कोण कशाला लक्ष देईल? काट मारली म्हणजे चूक, म्हणजे रद्द; असंच सगळे समजतील. रमणकाकाने मला समजावलं, “अरे, बेबी नाजचा (तो ’बेबी’ नाज, असंच म्हणाला) हा हिरॉइन म्हणून पहिलाच सिनेमा. यात ती हिरॉइन आहे. म्हणजे ’बेबी’ नाही! जाहिरातीत असतं असं.”

’फर्स्ट लव’ आला आणि गेला. कोणाला त्याची आठवण नाही. चित्रगुप्‍तच्या गाण्यांशिवाय त्याचं काही शिल्लक नाही. रमणकाकाच्या प्रोड्यूसरचे पुष्कळ चित्रपट बुडत. येतच नसत. पण त्याला कधीही, एकदाही फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडावंसं वाटलं नाही. मस्त रमला होता.

 बेबी नाज प्रमाणे नावामागे ’बेबी’ लागलेली नंदा गेली आणि हे आठवलं. तिचे पाहिलेले न पाहिलेले चित्रपट आठवले. सगळ्यात जास्त ठसलेला चित्रपट म्हणजे ’इत्तेफाक’. राजेश खन्नाबरोबरचा. आख्खा चित्रपट एका रात्रीत घडतो.
इत्तेफाक
जवळपास एका बंगल्यात घडतो. चित्रपटात गाणं नाही. दाढीचे खुंट वाढलेला राजेश खन्ना पहिल्यापासून शेवटपर्यंत वेडसर दिसत रहातो. नंदाला फारच कमी बोलणं आहे. आणि दोघांशिवाय आणखी पात्रं आहेत – नाहीत. तिचा या चित्रपटाएवढा ठळक रोल दुसरीकडे कुठे पाहिल्याचं आठवत नाही.

नंदाचा एकूण सिनेमा स्पष्टपणे दोन भागांत विभागता येतो. एक, साध्यासुध्या ओळखीच्या, एक प्रकारे दुय्यम भूमिका; आणि दोन, कमी-जास्त ग्लॅमर असलेल्या नायिकेच्या भूमिका. या दुसर्‍या प्रकारच्या एकाही भूमिकेत ती कधी ’खरी’ – म्हणजे तिथली, हिंदी चित्रपटातल्या बेगडी, लुटुपुटूच्या जगातली वाटली नाही. ’जब जब फूल खिले’ मध्येसुद्धा. तशी स्मिताही वाटली नाही. पण स्मिताचं न वाटणं इस पार, तर नंदाचं उस पार. ग्लॅमरस नायिका म्हणून नंदाला बघताना काही वाटलंच नाही. त्यामुळे ’धरती कहे पुकारके’, द ट्रेन’, ’गुमनाम’ सारख्या चित्रपटांमधल्या नंदाचं काही इम्प्रेशनच मनावर राहिलेलं जाणवत नाही. उलट, ’जब जब फूल खिले’ मध्ये ’ये समा’ म्हणत डोलताना, वादळात शशी कपूरला हाका घालत असताना, पार्टीत त्याच्या मुस्कटात देताना ती कशी खटकत रहाते, हेच आठवतं.

त्या मानाने तिला दुय्यम स्थान असलेल्या चित्रपटांमध्ये ती बरी वाटली. ते बरे आठवतात. मग ’हम दोनो’तल्या मेजर वर्माचा
हम दोनो
भांग दुरुस्त करणारी त्याची पत्नी आठवून बरं वाटतं. कॅप्टन आनंदची प्रेयसी असलेली साधना दिसते तशीच नंदासुद्धा सुंदर आणि लहान दिसते. पण साधना ’प्रेयसी’ दिसते, तर नंदा ’पत्नी’. आणि यात नंदाच्या अभिनयाचा भाग आहेच. ’काला बाजार’मध्ये लीला चिटणीसबरोबर ’ना मै धन चाहूँ’ गातानाची तिची सोज्वळ मूर्ती आठवते आणि त्या सोज्वळपणाच्या पार्श्वभूमीवर अपराधी मन घेऊन पडलेल्या खांद्यांनी जिना चढणार्‍या देव आनंदचा कोंडमारा उठून दिसतो, हे जाणवतं. (अर्थात, त्यात गाण्याच्या गोड, भक्‍तिरसपूर्ण चालीचाही मोठा 
वाटा आहे!)

’धूलका फूल’मधली राजेंद्र कुमारची बायको आठवते. माला सिन्हाशी संबंध संपल्यावर तो नंदाशी लग्न करतो. ती थोडीशी जरी ’दिल अपना और प्रीत परायी’मधली राज कुमारची पत्नी नादिरा, हिच्यासारखी असती; तर ’धूल का फूल’चा तोल कलला असता. तो कलला नाही, हे श्रेय बी आर चोप्राचं. त्याने माला सिन्हाला केंद्रस्थानावरून हलवायला बरोब्बर पूर्ण पवित्र आणि निरागस दिसणारी नंदा पकडली!

’कानून’सुद्धा आठवतो. ’कानून’मध्ये अशोक कुमार आणि राजेंद्र कुमार यांना मोठे रोल होते; पण बाकीच्या मेहमूद, पळशीकर, ओम प्रकाश, शशिकला, जीवन अशा किती तरी लोकांच्या लहानमोठ्या भूमिकांचा समर्थ हातभार चित्रपटाला लागला होता. त्यांच्यातलीच एक नंदा. तिचं कामही चित्रपटाच्या सफाईदारपणात भरच टाकतं. धनीरामचा खून केल्याची खोटी कबुली द्यायला ती कालियाला पैसे देते; पण ती नंदा असल्यामुळे हे कृत्य भ्रष्टपणाचा आविष्कार असल्याचं प्रेक्षाकाच्या मनात येत नाही. ’कानून’सुद्धा बिनगाण्याचा! दोन दोन बिनगाण्याच्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे, हा एक रेकॉर्डच असावा नंदाच्या नावावर.

मचलती आरजू

नंदा गेल्यापासून पेपरात पुष्कळ छापून आलं. चॅनेलवाल्यांनीही तिची गाणी दाखवली. कुठली कुठली इकडची तिकडची गाणी दाखवताना तिची वरच्या श्रेणीची गाणी दाखवण्याच्या आड काही तरी आलं असावं. ’अल्ला तेरो नाम’ (हम दोनो) दिसलंच नाही. ’मचलती आरजू’ (उसने कहा था) सुद्धा नाही. ’भैया मोरे’ (छोटी बहन) नाही. असं कसं? मग रेडिओ सिलोन – श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आठवतं. हल्ली सकाळचं ’पुराने फिल्मोंके गीत’ ऐकत नाही; पण पूर्ण विश्वास वाटतो, की त्यांनी नंदाला न्याय दिला असेल.

Thursday, March 20, 2014

’श्रीमंत’ खुशवंतसिंग आणि आमचा चार्वाक





साल आठवत नाही; पण ते महत्त्वाचं नाही.  आम्ही चार्वाक काढायला सुरुवात केली आणि दर वर्षी काही तरी नवे विषय, वेगळी मांडणी आणण्याचा प्रयत्न करायचो. तर एका वर्षी विषय निघाला, ’नॉर्मलपणा’. विषय निघाला की त्यावर एक टिपण बनवायचं काम बहुधा माझं असायचं. (सुचवणं आणि चर्चेला तोंड फोडणारा सतीश तांबे.) तर, मी टिपण बनवलं. आमचं म्हणणं थोडक्यात असं होतं:
प्रत्येकाला त्याचं जिणं, त्याचा परिसर नॉर्मल वाटतो. उदाहरणार्थ माझा जन्म चाळीत झाला. बालपण तिथेच गेलं, तर चाळीतले सार्वजनिक संडास आणि तिथल्या घरांची सदा उघडी दारं हा माझ्या सहजमूल्यांचा भाग होऊन जातो. मग मला त्यात काही वावगं वाटत नाही. त्याहीपेक्षा खरं असं की जोपर्यंत वेगळी स्थिती माझ्या नजरेत, आकलनात येत नाही; तोपर्यंत माझी असलेली स्थिती, हेच एकमेव वास्तव माझ्यासमोर असतं. त्याचा ठसा अर्थात खोल उमटतो आणि नॉर्मलपणा म्हणजे काय, हे ठरवताना मला सर्वात जास्त दिशा देतो. तर, चाळीतलं रहाणं; रस्त्यावर, झोपडीत वाढणं, एकटं असणं, वगैरे अनंत शक्यतांमध्ये ’श्रीमंतीचा नॉर्मल सेन्स’ हासुद्धा एक अतिमहत्त्वाचा मुद्दा होता. नॉर्मल म्हणजे काय, याचा शोध घेताना नॉर्मल श्रीमंत तर मोजायला हवाच.
आज पन्नाशी ओलांडलेल्या कुणालाही ’नॉर्मल श्रीमंत’ ही संकल्पना मराठीत कळायला किती कठीण, हे समजेल. एक मोठा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा आडवा आला की मराठीत नीट ’श्रीमंत’ ठरतील अशा व्यक्‍तींचा घोर तुटवडा. कोणाला शोधायचं? त्याला वा तिला लिहिण्याचं अंग नसलं तरी विषयाला धरून बोलण्याचं अंग तरी हवंच. कोण?
मला वाटतं, खुशवंतसिंग हे नाव सुनील तांबेने सुचवलं. नवी दिल्ली जिथे वसली आहे, ती बहुतेक जमीन खुशवंतसिगांच्या वडिलांची, हे सांगितल्यावर त्यांच्या श्रीमंतीचा वा ती श्रीमंती त्यांना नॉर्मल वाटल्याचा आणखी खुलासा करायला नको. मी उत्साहाने आमच्या विषयाला धरून एक पत्र बनवलं. आणि ते पाठवून दिलं. फार तर नाही म्हणतील. न विचारता थोडेच हो म्हणणार आहेत?
ते हो म्हणाले! ग्रेट. पण त्यांचं म्हणणं होतं, की मी लिहिणार नाही, कोणीतरी यावं आणि मी बोलेन ते रेकॉर्ड करून लेख बनवावा. इंग्रजीत पत्र लिहिणारा मी, मग हे पुढचं काम करणाराही मीच. गेलो. तो माझा राजधानी एक्स्प्रेसच्या चेअर कारमधून केलेला पहिला प्रवास. दिल्लीत माझी रहाण्याची व्यवस्था सुनीलच्या वडिलांनी मधु दंडवतेंच्या सेक्रेटरीच्या ब्लॉकमध्ये केली. तिथे जाऊन मी खुशवंतसिंग यांचं घर शोधून काढलं. फोन करून भेटायला गेलो, तर ते कानावर हात ठेवते झाले! मी हबकलो. मग मी धीर एकवटून त्यांना विषयाची आठवण दिली. मग त्यांना आठवलं. उत्साहाने म्हणाले, होय, होय. बोलतो. गिव मी ऍन अवर. कम बॅक इन ऍन अवर अँड वी विल टॉक. मुद्दे काढलेला कागद माझ्या हातात होताच. तो मी त्यांच्या सुपूर्द केला आणि बाहेर पडलो. दिल्लीला जाण्याचीही ती माझी पहिलीच वेळ. कुठेही जाण्याचं मला सुचलं नाही की धीर झाला नाही. बरोबर एका तासाने परत गेलो. त्यांनी समोर बसवलं. टेप रेकॉर्डर नीट काम करतो आहे, याची मी खात्री करून घेतली आणि ते बोलू लागले.
मी रीतसर घेतलेली ती एक प्रकारे पहिलीच मुलाखत. त्यानंतर अनेक मुलाखती घेण्याची वेळ आली. पण खुशवंतसिंगांइतकं अस्खलित बोलणारं कोणीही भेटलं नाही. मी अधून मधून फाटे फोडत होतो; पण त्याची गरज नव्हती. ते जे म्हणाले, ते जसंच्या तसं, शब्द न्‌ शब्द उतरवून काढलं, त्याचं मराठी भाषांतर केलं आणि लेख तयार झाला. एक अक्षर एडिट करावं लागलं नाही.
लेख उत्तम झाला. खुशवंतसिंग यांनी इंग्रजी-हिंदी, फारतर पंजाबी आणि त्यांना येणार्‍या इतर भाषा, यांच्या बाहेरच्या भाषेत छापण्यासाठी किती लेख लिहिलेत, मला माहीत नाही; पण मराठीतला हा एकमेव. ’आजचा चार्वाक’ या आमच्या वार्षिक दिवाळी अंकात आलेला. मी आणलेला!

Saturday, January 18, 2014

मूर्तिमंत रुबाब!



आपल्याकडल्या सिनेमात अभिनयक्षमतेपेक्षा नटाच्या - नटीच्या ’प्रेझेन्स’ला - त्यांचा पडद्यावरचा वावर किती रुबाबदार असतो, त्यांच्या पडद्यावरच्या वावरामधून कसे लाखो प्रेक्षक घायाळ होतात, याला जास्त महत्त्व असतं. नसीरने अनेक व्यक्‍तिरेखा आपल्या अभिनयाने जिवंत केल्या असतील; अमिताभला किंवा शहारुखला पाहून जे होतं, ते थोडंच नसीरमुळे होतं? माधुरी इतकी मोठी सुपरस्टार; किती थोर भूमिका आहेत तिच्या नावावर? स्टार विरुद्ध अभिनेता, असं हे भांडण नाही. मुद्दा इतकाच आहे की इथे लीजंड होण्यासाठी उत्तम अभिनेता असून पुरत नाही; प्रेक्षकांच्या हृदयाची तार छेडू शकणारं व्यक्‍तिमत्त्व असलेलं पुरतं. म्हणून देव आनंदचा शेवटचा चित्रपट हिट झाला, त्याला तीस वर्षं उलटली, तरी देव आनंद स्टार असतोच. म्हणून चांगला अभिनेता असूनही फारुख शेख मोठा होत नाही. आणि म्हणूनच पसतीस वर्षं चित्रपट न करून आणि तसाच मोठा काळ स्वतःला पूर्णपणे लोकांच्या नजरेपासून दूर ठेवून सुचित्रा सेन लीजंडच रहाते.

काय तिचा रुबाब! ’देवदास’मध्ये तिची पारू देवदासला ऐकवते, उच्च जातीचा जमीनदार काय तू एकटाच नाहीस, आणखीही आहेत की. माझा पतीही तसाच असेल, तूच कशाला हवास. तो चमकतो. म्हणतो, इतका अहंकार! शोभत नाही स्त्रीच्या जातीला. चल तुझ्या या अहंकारी रूपाला एक डाग देतो. असं म्हणून दिलीप कुमार सुचित्रा सेनच्या कपाळावर रप्‌कन हातातली छडी मारतो आणि जखम करतो.

त्याच्या मागचं पुढचं वर्णन हा वेगळा विषय आहे. मला स्वतःला सुचित्रा सेन नूतन किंवा मीना कुमारीइतकी थोर अभिनेत्री कधी वाटली नाही; पण रुबाब! तिच्या ताठ्याला तोड नाही. या एका वैशिष्ट्यामुळे ती ’आँधी’त इंदिरा गांधींची प्रतिमा म्हणून शोभून दिसते. लोकक्षोभाला सामोरं जायला न डरणारी, बेडरपणे निर्णय घेऊ शकणारी राजकारणी स्त्री तिच्याइतकी परफेक्ट दुसरी सापडली नसती. स्मिता पाटीलकडे काय वाटेल ते दिसण्याची क्षमता होती; पण सुचित्रा सेनचा कोणाही विरोधकाला कस्पटासमान लेखण्याचा तोरा स्मिताकडे नव्हता.

’बम्बईका बाबू’मध्ये देव आनंदचं दुर्दैव असं निघतं, की स्वतःच्या हातून मेलेल्याची इस्टेट हडप करण्यासाठी तो त्याची जागा घेतो - आणि त्याच्या बहिणीच्या प्रेमात पडतो! आता ती कशी भावाकडे ’तसल्या’ नजरेने पाहील? देव आनंदला त्याची कुचंबणा व्यक्‍त करणं जमो, न जमो; समोरची सुचित्रा सेन त्याच्या काळजात कशी कळ उमटवत असेल, हे तिच्याकडे बघताक्षणी प्रेक्षकाला कळतं. अशा वेळी तिला फारसं काही करावं लागत नाही; तिचं ’असणं’ पुरेसं ठरतं. अशा प्रकारची गोष्ट आपल्या मेनस्ट्रीम सिनेमात येत नसल्यामुळे ’बम्बईका बाबू’ लक्षणीय ठरतो. त्यातलं ’साथी न कोई मंजिल’ हे गाणं हृदयाला छेडून जातं.

’ममता’मध्ये तिचा डबल रोल होता. मोठ्या सुचित्रावर संकटं कोसळतात आणि तिला तवायफ व्हावं लागतं. म्हणजे ती फार ताठ राहू शकत नाही; पण ’रहते थे कभी जिनके दिलमे’ गाताना ती खचलेली वाटत नाही; ऐकणार्‍या अशोक कुमारला नीट नैतिक त्रास देणारी दिसते. तिची मुलगी तर सरळ सरळ मानी, स्वतःच्या श्रेष्ठत्वाचं पूर्ण भान बाळगणारी. एका ’बाजारू औरत’ला वाचवण्यासाठी (सुचित्रा सेनच्या उच्चारांनुसार ’बाजाडू औरत’) आपला ’काकू’ का तडफडतोय, हे तिला समजत नाही. आणि तिच्या तोंडच्या ’बाजारू औरत’ या शब्दांनी अशोक कुमार घायाळ होत रहातो.

तिच्या एकूण हिंदी चित्रपटांची संख्या नऊ. मी हे चार पाहिले. आणि खरं तर आमच्या पिढीसाठी ती पारूच. जी मिळाली नाही म्हणून एखाद्याने दारू पीत पूर्ण बरबाद व्हावं, झिजून झिजून मरून जावं; अशी अभिलाषेचं सर्वोच्च शिखर असलेली पारू. चंद्रमुखीने कितीही जीव ओवाळला, तरी जी जखम अजिबातच भरत नाही, अशी ती पारू. सुचित्रा सेन हेच त्या अप्राप्य आत्मप्रतिष्ठेचं दृश्य रूप.

Thursday, January 16, 2014

मला अरविंद केजरीवालला मत द्यायचं आहे! कसं देऊ?


’आम आदमी पक्षाला मत दे,’ हे उत्तर मला मान्य नाही. कारण अरविंद केजरीवालला मत देणे आणि राज ठाकरेला मत देणे, यात फरक आहे. पुन्हा, आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातही फरक आहे. नवनिर्माण सेना हा पक्ष राज ठाकरे यांच्या मालकीचा पक्ष आहे. राज ठाकरे यांच्या बाहेर त्या पक्षाला अस्तित्व नाही. उद्या समजा राज ठाकरे शिवसेनेत (किंवा आणखी कुठे) गेले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या अस्तित्वाचं प्रयोजन संपेल आणि तो विसर्जित होईल. झाला नाही तर तो एक विनोद ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं एकमेव, परिपूर्ण धोरण हे राज ठाकरे यांची सर्वांगीण उन्नती घडवून आणणे, एवढंच आहे. मनसेच्या कुठल्याही उमेदवाराचं पहिलं काम या धोरणाची अंमलबजावणी, हे असल्याकारणाने (आणि मनसेत पूर्ण एकाधिकारशाही असल्यामुळे) मनसेला, मनसेच्या उमेदवाराला दिलेलं मत राज ठाकरे यांना पोचण्याची गॅरंटी आहे.

पण मला राज ठाकरे यांना नाही, तर अरविंद केजरीवाल यांना मत द्यायचं आहे. तिथे प्रॉब्लेम आहे.

अरविंद केजरीवाल हा भारतीय राजकारणाला भेटलेला मसीहा आहे, असं मला वाटत नाही. इतकंच काय, जातींची घुसळण, जागतिकीकरणाचा दबाव, व्यक्‍तीला अजिबातच सार्वभौमत्व न देणारी भारतीय परंपरा, सर्व प्रकारच्या माहितीची सहज उपलब्धता, वाढत्या तरुणाईचा वाढता उतावीळपणा, वेगाने बदलत्या सभोवतालामुळे विशिष्ट वर्गाला आणि विशिष्ट वयाला जाणवणारी असुरक्षितता, वगैरे, वगैरे घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्याची राजकीय स्थिती घडली आहे, असं मला वाटतं. समाजपरिवर्तनाच्या वाटचालीत येणारा हा एक टप्पा आहे, असं मी आजच्या स्थितीकडे बघतो.

पण म्हणजे देश चालवण्याचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक सिनिक, निबर होत चाललेल्या राजकारणी मंडळींवर सोडून द्यावं, असं मला मुळीच वाटत नाही. किंवा, हे राहिले काय नि ते आले काय, आपल्याला काय फरक पडतो? अशी एका परीने विरक्‍त आणि त्याच वेळी ’कुठलाही पक्ष आपल्या हितसंबंधांना दुखवू शकणारच नाही,’ अशी दर्पयुक्‍त अहंकारी भूमिका घेणंही मला पटत नाही. समाजात रहाण्याचे फायदे उपटायचे आणि  सामाजिक कर्तव्यात कसूर करायची, हे काही खरं नाही. म्हणून मी दर निवडणुकीत मत देतो. ७७-८० साली जनता पक्षाला दिलं, नंतर काँग्रेसला देऊ लागलो. भाजपला निर्विवाद बहुमत मिळालं, तर धर्मांध शक्‍ती माजतील आणि देशाचं पूर्ण वाटोळं करतील, अशी मला खात्री आहे. मला वाटणार्‍या या खात्रीच्या बळावर काँग्रेस मला ब्लॅकमेल करते आणि माझं मत लुबाडते, हे मला कळतं. पण पर्याय नाही.

पुन्हा सांगतो, केजरीवाल हा मसीहा आहे, मला - आणि समविचारी इतरांना - मिळालेला महान पर्याय आहे, सर्व समस्यांवरचं उत्तर आहे, असं मला मुळीच वाटत नाही. पण एका केजरीवालमुळे सर्व राजकीय पक्षांची झालेली गोची मला दिसते. प्रशासनातली पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तरदायित्व, वगैरे, खरं तर ज्यांच्या बाबतीत सर्वसंमती व्हावी असे मुद्दे कसे आत्ता, दिल्लीच्या निवडणुकीनंतर ऐरणीवर येऊ लागलेत, हे दिसतं. उद्या केजरीवाल हा दिल्लीच्या जनतेने केलेला प्रयोग बारगळेलही; पण सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी झटकून टाकलेले हे मुद्दे अण्णा हजारे आणि मग केजरीवाल यांच्यामुळे पुन्हा प्रकाशात आले आहेत आणि ते पुन्हा कोपर्‍यातल्या कचर्‍यात लोटून द्यायला संबंधितांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत, असं मला वाटतं.

हे प्रयत्न करणं त्यांना अवघड व्हावं, ही माझी इच्छा आहे. त्यासाठी भारतीय राजकारणात इतर धंदेवाईक (म्हणजे संपत्ती-सत्ता संपादण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून राजकारण करणार्‍या, बापाची इस्टेट वारसाहक्काने घ्यावी, तशा भावनेने पक्षसत्ता ताब्यात घेणार्‍या) राजकारण्यांना जरब देत केजरीवाल आणखी काही काळ रहावेत. असं मला वाटतं. म्हणून मला केजरीवाल यांना मत द्यायचं आहे.

पण ज्या कारणासाठी केजरीवाल यांना मत द्यायचं आहे, त्याच कारणांमुळे तसं करणं अवघड होऊन बसलं आहे. उद्या समजा, मिलिंद देवरा गेले ’आप’मध्ये तर मी त्यांना मत देऊ का? नितेश राणे यांना देऊ का? कुण्या ’राष्ट्रवाद्या’ला देऊ का? राजकारणी एक खेळ खेळत असतात. कालपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या’दोपहरका सामना’ नावाच्या पायखाना फॅक्टरीचे मॅनेजर असलेले संजय निरुपम काँग्रेसमध्ये जाऊन पावन होतात. हुतात्मा स्मारक पवित्र करण्यासाठी ते धुणारे छगन भुजबळ शरद पवारांकडे गेले की धर्मनिरपेक्ष ठरतात. येड्युरप्पा भ्रष्ट म्हणून पक्षाबाहेर होतात आणि मतं आणतात म्हणून पुन्हा आत येतात. आणि हे सगळं होत असताना त्या त्या पक्षांचे प्रवक्‍ते तावातावाने स्वतःचं समर्थन आणि दुसर्‍याचा निषेध करत असतात.केजरीवालना मत म्हणजे या सगळ्याला प्रतिकात्मक विरोध.

पण म्हणूनच तर त्यांच्या पक्षाचा उमेदवार ’नीट’ हवा! तो ’शुद्ध’ हवा, शिवाय आजच्या भ्रष्ट, हिंसक वातावरणात उभा राहू शकणारा हवा. ही अपेक्षा जशी माझी आहे, तशी देशभरात लाखोंची असेल. केजरीवालना दिल्लीतल्या दिल्लीत हे जमत नाही (उदा. बिन्नी यांचा तमाशा), तर भारत नामक अब्ज लोकसंख्येच्या उपखंडात कसं जमायचं? मला माझ्या मतदारसंघात, फार तर शहरात, राज्यात एक वेळ सांगता येईल, की आम आदमी पक्षाची उमेदवारांची निवडप्रक्रिया योग्य आहे (किंवा नाही). पण दुसरीकडे मला काय माहीत?

एके काळी प्रामाणिक समाजकार्य करणार्‍या सोशालिस्टांची नंतरच्या काळात वाताहात झाली याला अनेक कारणं असतील. त्यांची वाताहात ही जागतिक प्रक्रिया असेल. पण एक स्थानिक कारण असं की प्रत्येक सोशालिस्ट स्वतःला शहाणा समजतो. काही प्रमाणात तो असतोही; पण पक्ष चालायचा, राजकारण करायचं तर संघटना हवी, संघटनेची शिस्त हवी, निर्णय झाल्यावर तो पाळायला हवा. पटत नाही म्हणून पक्ष फोडून चालणार नाही, थोडा धीर धरायला हवा. दबावाचं राजकारण जमायला हवं वगैरे, वगैरे. हे आता ’आप’बद्दलही व्हायला हवंच. नुसते स्वच्छ चारित्र्याचे आणि फर्ड्या वाणीचे (आणि अर्थात समाजासाठी काम करण्याची भाबडी इच्छा बाळगणारे) लोक कसे चालतील? काँग्रेसमधले निर्ढावलेले राजकारणी आणि कोणा कोणा उद्योगगृहाच्या मिंधेपणात अडकलेल्या वाहिन्या आणि तसलीच वृत्तपत्रं त्यांचा पोपट करायला टपलेले आहेतच. खैरनारांचं काय झालं आठवतं?

असा हा तिढा. कदाचित मला नीट मांडता आलाही नसेल. पण खरा. मला खरंच केजरीवालना मत द्यायचं आहे. पण देता येईल का, याची शंका आहे.


तरीही द्यावंच; नाही का?

Thursday, January 9, 2014

आवाज दो, हम राष्ट्रभक्‍त हैं!

या आठवड्यात दोन सार्वमतांच्या बातम्या पेपरात झळकल्या आहेत. एक, महाराष्ट्रापासून विदर्भाने वेगळं व्हावं, की होऊ नये. नागपूर या शहरात घेतलेल्या या ’सार्वमता’ने घेणार्‍यांचं समाधान झालं. म्हणून ते आता असंच सार्वमत चंद्रपूरमध्ये आणि मग यवतमाळमध्ये घेणार आहेत. विदर्भ वेगळा व्हावा, असं वाटणार्‍यांनी हे सार्वमत घेतलं होतं. ज्या अर्थी त्यांचं समाधान झालं त्या अर्थी बहुसंख्य ’मतदारां’नी वेगळं होण्याच्या बाजूने मत दिलं असावं. तसं नसतं, तर ’नागपुरात नाही, तरी इतरत्र ही भावना आहेच आणि म्हणून आम्ही इतर ठिकाणी सार्वमत घेणार आहोत,’ अशा स्वरूपाचं निवेदन बातमीत आलं असतं.

विदर्भात महाराष्ट्रापासून फुटून ’स्वतंत्र’ होण्याबाबत एकमत नाही. पण विदर्भाबाहेरच्या महाराष्ट्रात विदर्भाला वेगळं होऊ न देण्याबद्दल - किमान प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये तरी - जवळपास एकमत आहे. तरी या बातमीला वर्तमानपत्रांनी, राजकीय पक्षांनी फारसं महत्त्व दिलेलं दिसलं नाही. बेळगाव महाराष्ट्रात आणण्याबद्दल जशी वर्षा दोन वर्षांनी धंदेवाईक नेते मंडळी पिसं झडझडून आरवत असतात, तेवढंही नाही.

कदाचित राज्यात विदर्भ रहाण्या न रहाण्याविषयी मराठी जनता उदासीन असेल आणि त्याचा सुगावा असल्यामुळे नेतेमंडळीदेखील तितकंसं लक्ष देत नसतील. कदाचित ’अजून तवा पुरेसा तापलेला नाही, तापला की बघू पोळ्या भाजण्याचं,’ असं त्यांच्या मनी असेल. कदाचित ’सार्वमताने काय होतंय, जे होणार ते मुख्य राजकीय पक्षांच्या हायकमांडच्या इच्छेनुसार. मग कशाला लक्ष द्या असल्या लोकमत आजमावण्याच्या पोरखेळाकडे,’ असं त्यांना वाटत असेल. कदाचित असंही असेल की ’विदर्भ इथे राहिला काय, बाहेर पडला काय; शेवटी देशाच्या आतच आहे ना?’ असा सूज्ञ विचारही ते करत असतील.

सार्वमत या विषयाला जोडलेल्या दुसर्‍या बातमीचे संदर्भ मोठे गंमतीशीर आहेत. ते एक एक करून पाहू.

काश्मिरात भारताचं किती सैन्य आहे?
नागरिकांची संख्या आणि सैनिकांची संख्या यांचं प्रमाण काश्मिरात आहे, तितकं जगात दुसरीकडे कुठेही नाही.

ते सारं सैन्य सरहद्दीवर किंवा ताबारेषेवर - लाइन ऑफ कंट्रोल - शत्रूच्या समोर उभं असेल!
नाही. बरंचसं सैन्य अंतर्गत सुरक्षेसाठी काश्मीर खोर्‍यात सर्वत्र पसरलेलं आहे.

त्यांचे आणि तिथल्या जनतेचे संबंध कसे आहेत?
अत्यंत वाईट आहेत. सैनिकाने अत्याचार केला, खून केला तरी त्याला तिथे अटक होऊ शकत नाही, कारण काश्मिरात सैन्याला विशेष अधिकार प्रदान करणारा कायदा लागू आहे. दहशतवादी म्हणून तीन तरुणांना ठार करण्यावरून गेल्या वर्षी निषेधाचा इतका प्रचंड भडका झाला, की त्यात आणखी पुष्कळ मृत्यू झाले. शेवटी गैरप्रकार झाल्याचं मान्य करत काही सैनिकांना आणि त्यांच्या अधिकार्‍याला अटक करण्यात आली. यातून  स्वतःची प्रतिमा सुधारत नाही, हे ओळखून नुकतंच सैन्याने त्या आरोपींचा ताबा मागितला आहे, त्यांना कोर्ट मार्शल करण्यासाठी. एक प्रकारे सैनिक अत्याचार करतात, खोटे एन्काउंटर करतात, याचीच यात कबुली आहे.

शांती भूषण असं का म्हणाले, की भारतात रहावं की नाही, याबद्दल काश्मिरात सार्वमत घेण्यात यावं?
असं मुळीच नाही. सध्या चाललेल्या आरड्याओरड्यात हे लपून रहातंय की शांती भूषण असलं काही म्हणालेलेच नाहीत. ते म्हणाले, काश्मीर खोर्‍यातल्या सुरक्षिततेसाठी सैन्याचा वापर करण्याबाबत सार्वमत घेण्यात यावं.

पण काश्मिरातून सैन्य काढून घेतलं, तर पाकिस्तानला आक्रमण करण्याची संधीच मिळेल की!
सीमेवर सैन्य ठेवण्याला कशाला कोण विरोध करेल! मुद्दा अंतर्गत सुरक्षिततेचा आहे. सैन्यामुळे अंतर्गत सुरक्षितता मजबूत होते, की डळमळीत होते, हा वाद आहे.

पण हे तिथे जाऊनच कळेल. किंवा तिथल्या जनमनाचा कानोसा घेतला तर कळेल.
अगदी बरोबर. ही तर सर्वात मोठी गंमत. इकडून तिकडून जो गोंधळ चाललेला आहे, जी तोडफोड चालू आहे, त्यात प्रत्यक्ष स्थानिक जनतेचं काय म्हणणं आहे, याची शून्य दखल आहे! काश्मीरचं काय़ व्हावं, हे जणू काश्मीरच्या लोकांना न विचारताच ठरवायचं आहे.

काय कारण असेल याचं?
एक, काश्मिरात रहाणारे सर्व अल्पवयीन आहेत, स्वतःचा निर्णय घेण्यात सक्षम नाहीत. दोन, त्यांना काय वाटेल ते म्हणायचं असो, आम्हा इतर भारतवासियांची इच्छा आहे की त्यांच्या मुलुखाला धरून ठेवावं.

का?
का काय! राष्ट्राभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही? राष्ट्राच्या भल्यासाठी आदिवासींना नाही त्यांच्या गावातून हुसकावत आपण? शेतकर्‍यांच्या जमिनी नाही घेत ताब्यात जबरदस्तीने?

असं असेल तर शहरात रस्तारुंदीसाठी इमारती पाडणंसुद्धा योग्य म्हणावं लागेल.
नाही, ते बरोबर नाही. राष्ट्रहित म्हणजे कोणाचं हित? तुमचं आमचं ना? ते सांभाळलं पाहिजे. आदिवासी, शेतकरी यांना आपल्या बरोबरीने मोजणं चूक आहे. आणि आदिवासी, शेतकरी यांना इतकी किंमत दिली तर उद्या गिरणी कामगारांना घरं द्यावी लागतील. तिथे मॉल किंवा टॉवर कसे उभे करता येतील? प्रगती म्हणजे मॉल, प्रगती म्हणजे टॉवर, इतकं सोपंही कळत नाही काय तुम्हाला?

हे काही तरी भलतंच होतंय. आपण काश्मीर खोर्‍याबद्दल बोलत होतो.
तेच. काश्मीर खोर्‍याचं काय करायचं हे ठरवताना काश्मिरी लोकांना कशाला मध्ये घ्यायला पाहिजे?

असं कसं? त्यांना जर पटवून दिलं की भारतात रहाण्यात, भारताच्या विकासवाटचालीत सामील होण्यात त्यांचं भलं आहे, तर किती सोपं होऊन जाईल. प्रमाणाबाहेर सैन्य ठेवायला नको, तो तणाव नको, तो प्रचंड खर्च नको, आणि सीमा एकदम सुरक्षित! कोणा गाढवाला पाकिस्तानात जावसं वाटत असेल!
आणि ते स्वातंत्र्य मागू लागले तर?

का मागतील? भारतात उन्नतीला किती संधी आहे! काश्मीरच्या आत राहून ती मिळेल?
पण ते नाही ऐकले तर?

तसा प्रयत्न करणे तर आपल्या हाती आहे? तसा प्रयत्न होतो आहे का?
काश्मीरच्या लोकांचे एवढे लाड कशाला करायचे पण? सैन्याने पकडून ठेवलंय ना काश्मीर? आणखी प्रयत्न कशाला?

ही जबरदस्ती झाली!
झालीच. जबरदस्तीनेच काश्मीर पकडून ठेवलंय आपण. पण तसं मोठ्याने बोलायचं नाही. तिथल्या लोकभावनेचा उल्लेखही करायचा नाही. बोंबाबोंब करायची ती राष्ट्रभावनेच्या नावाने. आणि राष्ट्रभावनेत काश्मिरींचा सहभाग अजिबात नको, हे करायचं पण बोलायचं नाही.

पण आपण त्यांना पटवून देऊ ना! लोकशाही आहे ना आपल्या देशात?
लोकशाहीचा आणि काश्मीरचा काय संबंध? उगीच विषयाला फाटे फोडू नका.

काश्मीरच्या राज्यप्रमुखाला पूर्वी मुख्यमंत्री म्हणत नसत, पंतप्रधान म्हणत, हे खरं आहे का?
चूप! लोक आता ते विसरून गेलेत. त्याची आठवण दिली, तर काश्मीरला पंतप्रधान का होता, मुख्यमंत्री का नव्हता, हे सांगावं लागेल. १९६५ मध्ये ते बदललं, हे सांगावं लागेल. भलतंच काही तरी! त्यापेक्षा इतिहासच खोटा सांगणं सोपं. लोकांनाही खरा इतिहास नको असतो. खरा इतिहास अडचणीत आणतो. त्यापेक्षा भ्रम किती छान.

ही सार्वमताची भानगड आपल्याच मागे का? इतर देश बरे सुटले यातून.
म्हणूनच खोटा इतिहास सांगायचा. नाही तर कॅनडात क्यूबेक प्रांतात असंच सार्वमत घेतलं गेलं, हे सांगावं लागेल.
खरं की काय!
अगदी चुटपुटत्या बहुमताने क्यूबेक देशात रहावं, फुटून वेगळं होऊ नये, असं निर्णय झाला.

कसं डेअरिंग केलं कॅनडाने? च्यायला.
ते मूर्ख आहेत. लोकशाही म्हणजे सर्व लोकांच्या मते चालणारं राज्य, असं ते समजतात. आदिवासी, शेतकरी, काश्मिरी हे ’लोक’ नव्हेत, हे कळण्याइतकं शहाणपण आपल्याला आहे. त्यांना काही कळत नाही. मूर्ख!

तो इतिहासही लपवून ठेवायला पाहिजे.
मूर्खपणा करणारे संपत नाही ना. येत्या वर्षात म्हणे स्कॉटलंडमध्ये सुद्धा असंच सार्वमत घेणार आहेत, ब्रिटनमध्ये रहायचं की वेगळं व्हायचं, यावर.

हे काय भयंकर!
मग? तो जेम्स बाँड शॉन कॉनेरी. तो मोठा स्कॉटिश देशभक्‍त आहे. त्याला स्कॉटलंड वेगळं व्हायला हवं आहे.

नको. नको. असलं काही तरी सांगू नका. त्यापेक्षा आपण स्वतःला खोट्या इतिहासात रमवू आणि राष्ट्र म्हणजे आपण तुपण, हे ध्यानात ठेवू. उगीच कोणी ऐरे गरे राष्ट्रात मोजूया नको.
चला तर मग. शांती भूषण आणि राष्ट्र, हे दोनच शब्द धरायचे. सैन्याचे अत्याचार, लोकशाही, जनमत, हे शब्द दाबून टाकायचे. यातच राष्ट्राचं हित आहे. ज्याला हे मान्य नाही, जो खोटा इतिहास स्वीकारत नाही, त्याचा निषेध करायचा. त्याच्या डोक्यात दगड घालायचा. त्याच्या घराच्या काचा फोडायच्या. राष्ट्राच्या नावाने काही केलं तरी चालतं. अगदी भ्रष्टाचारसुद्धा!

बोलो, दगड मारनेवालो, आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!


इतिहास बदलनेवालो, हम तुम्हारे साथ हैं! 

Wednesday, December 18, 2013

आमचा नीरो



’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा बहुधा मी पाहिलेला पहिला सेव्हंटी एम एम चित्रपट. मुंबईतल्या ग्रँट रोडच्या नॉव्हेल्टी थिएटरातल्या अजस्त्र स्क्रीनवर ते वाळवंटी नाट्य पहाताना मी थरारून गेलो होतो. त्यातले काही सीन्स अजून आठवतात. पीटर ओटूल आणि एक जण वाळवंटातल्या विहिरीतून पाणी काढत असतात आणि दूरवरून एक ठिपका येताना दिसतो. त्या ठिपक्याची क्षितिजावर काळी ज्योत होते. ज्योतीतून घोडेस्वाराची आकृती उपजते. पीटर ओटूलचा सोबती घाईघाईत बंदूक उचलतो. गोळी झाडल्याचा आवाज येतो. पण येणार्‍या घोडेस्वाराची गोळी सोबत्याला लागून तो मेलेला असतो. ही चित्रपटातली ओमर शरीफची एण्ट्री.
आणखीही आठवतं. ’मला लढाई (की हिंसा?) आवडू लागली आहे,’ असं अत्यंत चिंताग्रस्त होऊन सांगणारा ओटूल आणि ते ऐकताना करमणूक होत असल्यासारखे दिसणारे ब्रिटिश सेनाधिकारी. ’यू आर मीयरअली अ जनरल; आय मस्ट बी द किंग’ असं शक्‍तिमान ब्रिटिश सेनाधिकार्‍याला ऐकवणार्‍या नामधारी अरब राजाच्या भूमिकेतला अलेक गिनेस. नेहमीप्रमाणे रासवट असणारा अँथनी क्विन. त्या लढाया, ते मृत्यू, तो लहानशा भूमिकेतला आय एस जोहर. आणि ह्या भव्य आणि दीर्घ चित्रपटात स्त्रीच नाही, स्त्रीचा एकही चेहरा कधी दिसत नाही, याचं तेव्हा मनोमन वाटलेलं आश्चर्य.

चित्रपटाचा दिग्दर्शक डेव्हिड लीन आणि नायक पीटर ओटूल यांची ओळखही तेव्हाच झाली. मग मी दोघांचे जे येतील ते चित्रपट पहात गेलो. पीटर ओटूलचा फॅन झालो. ’लॉर्ड जिम’ मला आठवतही नाही. काही तरी आफ्रिकेत घडणारी स्टोरी आहे आणि ओटूल तिथल्या लोकांसाठी लढू पहाणार्‍या एका दारुड्या / अपयशी / कन्फ्यूज्ड माणसाच्या भूमिकेत आहे, असं अंधुक आठवतं. ’लायन इन विंटर’ मधली त्याची आणि कॅथरीन हेप्‌बर्नची जुगलबंदी आठवते. पण ’बेकेट’मधली त्याची आणि रिचर्ड बर्टनची टक्कर मात्र अजिबात आठवत नाही. खरं तर ते वय कौतुकाने इंग्रजी चित्रपट बघण्याचं होतं. बोललेलं फारसं समजत नव्हतं आणि तेव्हा सबटायटल्स नसायची. टीव्ही तर नव्हताच. वाचत होतो खूप. ओटूल आणि बर्टन, दोघेही रंगभूमीवरून आलेले, दोघांचीही उत्तम अभिनेते म्हणून कीर्ती आणि दोघांनाही ऑस्कर नाही; हे मात्र नीट आठवतं.


आज जसा रॉबर्ट द नीरो मला निर्विवादपणे सर्वात मोठा वाटतो, तसा तेव्हा पीटर ओटूल वाटायचा. त्याच्या भूमिकांमधलं वैविध्य मोहून टाकायचं. आज विचार करताना ’नाइट ऑफ द जनरल्स’ हा चित्रपट अतिनाट्यमय वाटतो; पण तेव्हा त्यातल्या थंड आणि विकृत जनरल तांझच्या भूमिकेतल्या पीटर ओटूलचं कोण कौतुक वाटलं होतं. आणि या सगळ्या इन्टेन्स, गुंतागुंतीच्या व्यक्‍तिरेखा पाहिल्यावर आला हलका फुलका ’हाऊ टू स्टील अ मिलियन’. त्यात ह्यू ग्रिफिथ आणि एली वाला(च) यांनी धमाल केली होती. आणि पीटर ओटूलबरोबर होती, चक्क ऑड्रे हेप्‌बर्न. तीनेक वेळा पाहिला मी हा चित्रपट. एकट्या ओटूलने हेप्‌बर्नची जुजबी मदत घेत केलेल्या एका फ्रॉड शिल्पाच्या चोरीची गोष्ट बघायला मजा यायची. अजूनही येईल. आता तो गेल्यावर कदाचित लागेल हा चित्रपट कुठेतरी.




पीटर ओटूलचं शेवटचं दर्शन झालं ते (डेव्हिड लीनच्याच) ’द लास्ट एम्परर’मध्ये. राजकुमाराच्या शिक्षकाच्या लहानशा भूमिकेत तो होता. तोच उंच, किडकिडीत आणि तरीही वजनदार व्यक्‍तिमत्त्वाचा पीटर ओटूल. पण आता खूप म्हातारा. बरं नाही वाटलं. तो गेल्याची बातमी वाचताना दुःख हे झालं, की मला, माझ्या पिढीतल्या अनेकांना आपल्या संस्कारक्षम वयातला एक दुवा निखळल्यासारखं होत असताना आजच्या जगाला त्याचा काही सीरियसनेसच नाही! पीटर ओटूल गेला, तर येत्या रविवारी (बहुधा) लेख येतीलच; पण आम्हाला काय होतंय, हे त्यातून कोणाला किती समजेल? तो आमचा नीरो होता, असं सांगितलं तर समजेल?

Saturday, December 14, 2013

महोत्सवी चित्रपट म्हणजे काय?

’लोकप्रभा’मध्ये छापून आलेला हा लेख. त्यात अर्थातच पुष्कळ भर घालण्याची इच्छा आहे. फोटो पण टाकायचेत. पण तोपर्यंत ...

चव्वेचाळीसावा ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ पणजी येथे २० ते ३० नोव्हेंबर या काळात पार पडला. गोव्यात स्थिरावल्यापासून नववा. मुंबई, दिल्ली,कोलकाता, चेन्नई, बंगलोर यांसारख्या मोठ्या शहरात एकापेक्षा जास्त ठिकाणच्या थिएटरांमध्ये असल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवातले चित्रपट दाखवायचं झालं, तर चोखंदळ प्रेक्षकांची चांगलीच धावपळ होईल. विचार करा, मुंबईत मेट्रो किंवा लिबर्टी सारख्या दक्षिण मुंबईतल्या थिएटरमधला चित्रपट पाहून एखाद्याला पुढच्या चित्रपटासाठी अंधेरी किंवा भक्ती पार्कसारख्या ठिकाणी जायचं असेल, तर ’कला नको पण दगदग आवर’ म्हणण्याची पाळी येणार नाही का? पणजीत जिथे महोत्सवातले चित्रपट दाखवले जातात, ती सर्व थिएटर्स एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. आणि तरीही आयनॉक्स ते कला अकादमी, अशा फेर्‍या घालणार्‍या ऑटोरिक्षा महोत्सववाल्यांसाठी (फुकट) उपलब्ध आहेतच.

ही सोय कितीही मोलाची असली, तरी गोव्याचं मुख्य आकर्षण वेगळं आहे, हे सांगायला नको. ऐन फेस्टिवलच्या जागी टिनात आणि नळातून (महाराष्ट्राच्या तुलनेत फारच स्वस्तात) मिळणारी बियर आणि गावात अनेक जागी सर्वांच्या खिशाला परवडणार्‍या दरात फिश करी राइस. शिवाय समुद्रकिनारे.  आणि या सार्‍याचा मनावर परिणाम होऊन ’आपण गोव्यात आहोत,’ या भावनेने मिळणारी सुखसंवेदना. भारतातूनच कशाला, जगातल्या कुठल्याही भागातून फेस्टिवलच्या निमित्ताने नुसतं गोव्यात येणे, हेच आनंददायक ठरतं. तेव्हा, इंडियाच्या फिल्म फेस्टिवलसाठी गोवा, हीच जागा योग्य. जेवढ्या लवकर हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जाईल, तेवढं बरं. कारण, सध्या दर वर्षी उद्‍घाटन आणि समारोप, या समारंभांसाठी एक अवाढव्य एअर कण्डिशण्ड शामियाना उभारला जातो आणि फेस्टिवल संपल्यावर उतरवला जातो. मनीश तिवारींनी या अर्थाचं आश्वासन या वर्षी दिलंय. बघू. देशी-परदेशी फिल्म स्टार्सच्या खांद्याला खांदा लावून वावरण्याचं सुख हक्काने मिळवण्याचा अधिकार असा सहजासहजी कुणी सोडून देईल का?

हे झालं मखराबद्दल. फेस्टिवलमध्ये दाखवले जाणारे चित्रपट यांना मखरातल्या मूर्तीचं महत्त्व. इंटरनॅशनल काँपिटिशन, सिनेमा ऑफ द वर्ल्ड, मास्टरस्ट्रोक्स आणि फेस्टिवल कलायडोस्कोप अशा विविध नावांखाली देशोदेशीचे उत्तमोत्तम चित्रपट. जपानी आणि ग्रीक चित्रपटांचे खास विभाग. एक विभाग ऍनिमेशन फिल्म्सचा. अग्नियेस्का हॉलंड या पोलिश दिग्दर्शिकेचा रिट्रोस्पेक्टिव. याशिवाय सोल ऑफ आशिया, डॉक्युमेंटर्‍या, इंडियन पॅनोरमा, ईशान्य भारतातल्या चित्रपटांवर ’फोकस’, दादासाहेब फाळके सन्मान प्राप्‍त झालेल्यांना ’ट्रिब्यूट’, सत्यजित राय क्लासिक्स, स्टुडंट्स फिल्म्स, वगैरे, वगैरे. शिवाय जुन्या-नव्या मेनस्ट्रीम सिनेमाचा विभाग आहेच. तुम्ही भारतीय असा, की अभारतीय, तुम्हाला इथली माहिती असो वा नसो, तुम्हाला ’अभिरूचीपूर्ण’ चित्रपट पहायचे असोत की इथल्या धंदेवाईक चित्रपटांची झलक पहायची असो, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारं असं या महोत्सवाचं स्वरूप असतं.

याचा एक अर्थ असाही होतो, की महोत्सवातले सर्व, किंवा महत्त्वाचे सर्व चित्रपट पहाणं शक्य नसतं. थोडं बुजुर्गांचा सल्ला घेऊन, थोडं स्वतःच कानोसा घेऊन ठरवावं लागतं. काही चित्रपट दोनदोनदा असतात, त्यांचा निर्णय पहिला शो पहाणार्‍यांचं ऐकून घेता येतो. बाकी चांगले असून चुकणारे चित्रपट नंतरच्या फेस्टिवलवर सोडावे लागतात. पण दिवसाला तीन, चार, पाच चित्रपट पहाणे ही एक नशा असते. एका बाजूने डोळे शिणतात, तर दुसरीकडे मनाला सणसणीत पौष्टिक खुराक मिळत असतो. मजा येते. बघताना, मग जोराजोरात चर्चा करताना आणि अनुभवी, जाणत्या ज्येष्ठांची मतं ऐकताना. दहा दिवसात पन्नास चित्रपट पहाणार्‍यांची संख्या कमी नसते. आणि हे अजिबात सोपं, सहज नसतं.

फेस्टिवलवाले चित्रपट आणि एरवी आपल्याला पहायला मिळणारे चित्रपट यांच्यात फरक काय? एक फरक असा की एरवी आपण बॉलिवुड आणि हॉलिवुड इथे बनलेले चित्रपट पहातो; पण चित्रपट जगभर सर्वत्र बनत असतात. इतरत्र बनणारे चित्रपट आपल्याला फेस्टिवलमध्ये सापडतात. हेच वेगळ्या पद्धतीने सांगायचं, तर एक धंदा म्हणून काढलेले चित्रपट आपण एरवी बघतो; तर चित्र, संगीत, साहित्य यांसारखं एक कला माध्यम, म्हणून घडवलेले चित्रपट फेस्टिवलमध्ये असतात. 
म्हणजे, धंदेवाईक चित्रपट वाईट आणि कलात्मक चित्रपट चांगले, असं मुळीच नाही. पण धंदा करणार्‍या एका यशस्वी चित्रपटामागे तसल्याच प्रकारच्या चित्रपटांची जशी रांग लागते, तसं कलावाल्या चित्रपटांचं होत नाही. उलट, स्वतःला शहाणा समजणारा/री प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपू बघतो/ते. स्वतःची चित्रपटीय भाषा विकसित करू बघतो/ते. त्यामुळे फेस्टिवलमध्ये खूप जास्त वैविध्य सापडतं. आपल्या ग्रहणक्षमतेचं चौरस पोषण होतं. ही मजा तर फारच थोर. मनाला एकदम तरुण करून टाकणारी.

फेस्टिवलमधल्या चित्रपटांत आणखी एका प्रकारचं वेगळेपण असतं. ते म्हणजे ’बिटवीन द लाइन्स’. दिग्दर्शकाने काहीही कसंही सांगो, हा वेगळेपणा दिसतोच. उदाहरणार्थ, ’मिस अँड द डॉक्टर्स’ मध्ये जुडिथ आणि दोघे डॉक्टर भाऊ, यांच्या नातेसंबंधाविषयी दिग्दर्शक काहीतरी सांगतेच; पण स्वतःच्या डायाबिटिक लहान मुलीला घरी ठेवून कामाला जाणारी घटस्फोटित जुडिथ बारमेड असते, तर तिला ही गोष्ट लपवून ठेवावीशी वाटत नाही; डॉक्टरने तिच्या प्रेमात पडून लग्नाची मागणी घालणे, ही गोष्ट क्रांतिकारक असत नाही; यावरून फ्रान्स, या देशात, किमान पॅरिस या शहरात बाईने आकर्षकपणा लेऊन पुरुषांना दारूचे ग्लास भरून देण्याची नोकरी करण्यात कमीपणा मानला जात नाही, हेसुद्धा आपल्याला कळतंच. ’डिस्‌मँटलिंग’ मधला मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगता यावं, यासाठी जमीन, घर, सर्वस्व विकणारा बाप ’इथे येऊन रहा, मी पोसतो तुला,’ असं मुलीला म्हणतो; पण मुलगी काही बापाला घरी न्यायचं नाव काढत नाही! दुसरी मुलगी बापाबद्दल सहानुभूती जरूर दाखवते, पैशांची अपेक्षा ठेवत नाही; पण तीसुद्धा त्याला घरी नेत नाही. म्हणजे कॅनडात तरुण मंडळी - मुलगा असो वा मुलगी - एकटेच रहातात. मोकळ्या, विस्तीर्ण फार्मवर आयुष्य गेलेल्या बापावर कोंदट अपार्टमेंटमध्ये रहाण्याची पाळी आली, तरी त्याला स्वतःकडे न बोलावण्यात कोणीच काहीच वावगं मानत नाही. म्हणजे, आपल्याकडे वृद्ध आईबापांची काळजी घेण्याला जितकं महत्त्व आहे, तितकंच तिथे तरुण माणसाने स्वतंत्र होण्याला, रहाण्याला आहे.

’वी आर व्हॉट वी आर’ नामक अमेरिकन चित्रपटात माणसांना मारून त्यांचं मांस शिजवून खाण्याची परंपरा जपणार्‍या एका कुटुंबाची गोष्ट आहे. ते धार्मिक आहेत. जेवणाअगोदर देवाची प्रार्थना करतात, उपासतापास करतात, नैसर्गिक आपत्तीत देवाचा आदेशही शोधतात. त्यांचं चित्रण अजिबात विकृत नाही. दीर्घकाळ नरमांसभक्षण केल्यामुळे त्यांना विशिष्ट रोगही होतो; पण त्यांच्या वर्तनात या ’वेगळेपणा’ची खूण सापडत नाही. यावरून ’अमेरिकेत नरमांसभक्षण करण्याची परंपरा असलेले लोक आहेत’ किंवा ’काही धार्मिक ख्रिस्ती लोक नरमांसभक्षण करतात’ असल्या प्रकारचं अनुमान काढणं अर्थातच चुकीचं ठरेल. पण मग या दिग्दर्शकाला म्हणायचं तरी काय आहे, हा प्रश्न उरतोच. याचं उत्तर असं, की या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या जिम मिकलची ख्याती हॉरर फिल्म बनवणे, ही आहे. ही हॉरर फिल्म आहे. ते माणूस मारण्याची, कापण्याची, रक्‍ताचे पाट वाहण्याची दृश्यं हॉरर निर्माण करण्यासाठी आहेत. म्हणूनच चित्रपटात एकदा थेट या कुटुंबाच्या कर्मकांडाप्रमाणे एक फीमेल हात लिपस्टिक बाहेर काढतो; पण त्या लिपस्टिकने मुडद्यावर लाल रेषा न मारता ओठ रंगवतो! आहे ना हॉरर! असह्य भीती वाटून घेण्यातही काही जणांना सुख मिळतं, हे लक्षात घेता असले चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा कळते; पण यात कला कुठे आली, हे कळत नाही. अमेरिकन दिग्दर्शक हॉरर निर्माण करण्यासाठी नरमांसभक्षण करणारी ’नॉर्मल’ फॅमिली दाखवण्याच्या थरालाही जातील, हा यातला वेगळेपणा होय, असं म्हणण्याचा मात्र मोह होतो.

पण विकृतीची नॉर्मल अवस्था, हेच दर्शन घडवणारा एक प्रत्ययकारी चित्रपटही या महोत्सवात बघायला मिळाला: ’सारा प्रिफर्स तू रन’. साराला धावण्याचं वेड आहे. आपल्या गावात पहिली आल्यावर साराला दूर, माँट्रियलला कॉलेजात प्रवेश मिळतो, धावण्याचं कौशल्य जोपासण्यासाठी. साराची फी, तिच्या रहाण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च, तिला लागणारे खास बूट, वगैरे गोष्टी, तिच्या प्रशिक्षणाचा खर्च, हे सगळं उचलण्याइतकी साराच्या घरची परिस्थिती नसते. मग सारा जवळ रहाणार्‍या एका तरुणाची मदत घेते. त्यालाही माँट्रियलला जायचं असतं. सरकारकडून अनुदान मिळावं यासाठी, त्याच्याच सूचनेवरून ती त्याच्याशी चक्क लग्न करते. अनेक मुली त्याच्या मागे असल्या तरी तो बिचारा हिच्यावर जीव लावतो, तिची काळजी घेतो. मग ती त्याच्याशी सेक्स करते, पण तिचं शरीर जराही प्रतिसाद देत नाही. तिला त्यात सुखच लाभत नाही. तिला आपल्यात शून्य रस आहे, हे जाणून तो डिव्होर्स मागतो. त्यासाठी एकमेव कारण म्हणून वेगळा रहाण्याचा प्रस्ताव मांडतो. वेगळं राहूनही मी या खोलीचं भाडं भरत राहीन, असं तिला सांगतो. या सर्व प्रकारात तिची प्रतिक्रिया काय असते? काहीच नसते! ती निर्विकार, थंड रहात नाही. त्याला तोडत नाही. त्याला त्रास देण्यात विकृत आनंद घेत नाही. तिच्या वागण्यात खोटच काढता येत नाही. पण एक धावणे सोडलं, तर तिला अन्य कशातही आणि कोणातही काडीचा रस नसतो. प्रेक्षकाला सारा विकृत वाटत नाही. नॉर्मल वाटते. पण हे दिग्दर्शिकेचं यश आहे. पटकथेचं, साराची भूमिका करणार्‍या सोफी देस्मारेचं यश आहे. आणि हे नक्कीच ठसठशीत वेगळेपण आहे.

विकृती हा शब्द जोरकस आहे. आणि त्याचा जोरकसपणा निगेटिव आहे. धावण्यासारख्या व्यायामाच्या क्रियेला तो लावला की खटकतं. पण प्रेम, वासना, अगदी वात्सल्य यांना लावला, की अर्थपूर्ण ठरतो. ’जॉय’ या चित्रपटात एकटी रहाणारी एक बाई हॉस्पिटलातून तान्हं मूल पळवते आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. मुलाला अपाय होण्याची शक्यता दिसून येताक्षणी चंडिकेचा अवतार धारण करून एकाची हत्याही करते. पण मुलाच्या आईने याबद्दल कृतज्ञ रहावं का? आपलं तान्हं मूल हिने नेलं आणि त्याचा पूर्ण ताबा घेण्याचा प्रयत्न केला, वेड लागल्याप्रमाणे मुलाचे लाड केले, तर त्या आईने हसावं की घाबरून अर्धमेलं व्हावं? पळवणार्‍या बाईला मात्र मुलाविना एकटं जीवन की आजन्म तुरुंगवास, यात निवड करताना काहीच अडचण येत नाही. ही अतिरेकी वात्सल्यभावना विकृत नव्हे काय?

’इन हायडिंग’ या पोलिश चित्रपटातली मुलगी दबलेली असते. अशोभनीय उद्‍गार काढल्याबद्दल बापाकडून थोबाडीत खाते. (तरी बिथरत नाही. पूर्व युरोप या बाबतीत आशियाच्या, आपल्याप्रकारच्या नातेसंबंधांच्या जास्त जवळ आहे, हे यावरून लक्षात येतं. तिच्यावर उत्स्फूर्तपणे हात उगारणारा बाप तिचा छळ करत नसतो. स्वतःचा अधिकार शाबीत करत असतो. आणि हे तिलाही मान्य असतं. तरीही ’थप्पड खाऊन निमूट रहाणारी’ असं तिचं व्यक्‍तिमत्त्व चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्या स्मृतिपटलावर नोंदलं जातं.) कमी बोलणारी, मोकळेपणा नसलेली, स्वतःच्या शरिराला जसं ती घट्ट बांधून ठेवत असते, तशीच मन आवळून धरलेली अशी ही तरुण मुलगी पार बदलताना दिसते. तिच्या घरात लपलेल्या ज्यूइश मुलीच्या सान्निध्यात आणि तिच्याच प्रेरणेने हिला शरीरसुख म्हणजे काय हे कळतं. ते देणार्‍या, चित्तवृत्ती मोकळ्या करणार्‍या, एक प्रकारे तिच्या घरात बंदी असलेल्या मुलीचा सहवास गमावण्याची शक्यता तिला मुळीच मान्य नसते. मग तिच्या हातून खून होतात. धडधडीत असत्य जोपासलं जातं आणि शेवटी स्वतःच्या बापाचा मृत्यू तिला बघावा लागतो.

ही तर सरळ सरळ विकृती. सुखाच्या अनावर ओढीपायी एका साध्याशा मुलीचं होणारं घोर अधःपतन. या भूमिकेसाठी मॅग्दालेना बोक्झार्स्का सर्वोत्तम अभिनेत्रीचं बक्षीस घेऊन गेली. पण या चित्रपटाला ’एका विकृतीचं चित्रण’ यापेक्षा जास्त पैलू होते. कोण मुक्‍त कोण बंदी, कोण जुलमी कोण बळी, कोण सरळ कोण चंचल, असल्या विरोधी गुणविशेषांची नाजुक गुंतागुंत दाखवत मनुष्याच्या बाबतीत अंतिम विधान करता येत नाही, असं या चित्रपटाने सुचवलं.

सगळ्या ’चांगल्या’ चित्रपटांची दखल इथे घेणं शक्य नाही. मी पाहिलेल्यांपैकी उल्लेखनीय अनुभव थोडक्यात सांगतो. आन्द्रे वायदा या थोर पोलिश दिग्दर्शकाची फिल्म ’वालेसा, मॅन ऑफ होप’ अर्थात लेक वालेसावर होती. वायदा सौंदर्य टिपण्यात रमत नाही. त्याचा फोकस विचलित होत नाही. ओरियाना फलाची हिने (हीसुद्धा जगप्रसिद्ध मुलाखतकर्ती) घेतलेल्या वालेसाच्या मुलाखतीतून वालेसाचा यूनियनच्या साध्या नेत्यापासून राष्ट्रप्रमुखापर्यंत होणारा प्रवास आपल्याला दिसतो. त्यातून वालेसाचं कष्टकरी मुळं दिसतात तशीच त्याची परिस्थितीचा अंदाज चटकन घेऊन त्वरित निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा दिसते. वालेसाचा आणि त्याच्या बायकोचा मानसिक छळ करणार्‍यांचा सूड तो घेतो की नाही असल्या, मुद्यापलिकडल्या तपशिलांमध्ये वायदा क्षणभरही अडकत नाही की वालेसाचं कौटुंबिक जीवन दाखवताना सेक्सची झलक पेश करण्याच्या मोहात पडत नाही. चित्रपट अजिबात रेंगाळत नाही आणि आपल्याला झालेली वालेसा या ’माणसा’ची ओळख कायमची आपल्यासोबत रहाते. (आपल्याकडे होणार्‍या चरित्रात्मक चित्रपटांची तुलनाच काय, त्यांचा  उल्लेखही इथे करवत नाही. इथे सगळे परमेश्वराचे अवतार!)

माझ्यासाठी सर्वात प्रभावी चित्रपट ठरला तो ’मारुसिया’. एक आई. मुलीच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची सर्वतोपरी काळजी घेणारी आई. ’मी कशी नोकरी करू? मला मारुसियाकडे बघायचं आहे,’ असं म्हणत ही बाई प्रस्थापित व्यवस्थेचे नियम पाळायला साफ नकार देते. रोज नवा दिवस, नवं साहस. आज काय खाणार, कुठे झोपणार, काय करणार हे रोज नव्याने ठरणार. हेच जणू तिचं रूटीन. तिच्या खणखणीत अनार्किस्ट भूमिकेमुळे तिला फ्रान्सच्या सरकारकडून मदत मिळू शकत नाही. बाई सुसंस्कृत. कला, साहित्य या विषयांची नीट माहिती असलेली. पण कोणीही तिला नांदवू बघत नाही. ’मी पूर्णवेळ आई आहे आणि मला पैसे कमावण्यासाठी काहीही कां करायचं नाही की कशाला वा कोणाला बांधून घ्यायचं नाही.’ असं प्रत्यक्ष जगणं कमालीचं अवघड असणार. आणि बाई खरी आहे, मारुसियाची भूमिका मारुसियानेच केली आहे, हे कळल्यावर तर हादरायला होतं. चित्रपटाची निर्माती शेवटी प्रश्नांना उत्तरं द्यायला हजर होती. मारुसियाच्या आईला जगरहाटीबद्दल नक्की काय म्हणायचं आहे, हे तिला बरोबर माहीत होतं. प्रश्न विचारणारे अस्वस्थ होते, उत्तर देताना ती अजिबात विचलित झाली नाही.

अश्गर फरहदीचा ’द पास्ट’ हा आणखी एक अप्रतिम चित्रपट. दुसर्‍या नवर्‍यापासून घटस्फोट घेऊन तिसर्‍याशी सोयरीक करू पहाणार्‍या बाईचं जगणं. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ’हे असं का?’ या प्रश्नाला उत्तर मिळतं ते टप्प्याटप्प्याने. एक उलगडा होतो न होतो तर त्याखाली आणखी एक पदर असल्याचं उघड होतं. कोणीच दुष्ट नाही, योगायोगाने काही होत नाही. एकेकाचं दुसर्‍याबद्दल मार्मिक निरीक्षण. प्रत्येक जण भूतकाळाचं ओझं बाळगतो. सत्याच्या दिशेने पायर्‍या चढताना शेवटी आपल्या लक्षात येतं की याला अंत नाही. कशी रचली असेल याची पटकथा? आणि यातलं कोणीच अभिनय करताना ’सापडत’ नाही.

’द अमेझिंग कॅटफिश’ मध्ये बापाविना तीन मुली एक मुलगा यांना वाढवणारी आई. तिला एड्स. हे सर्व मुलांना माहीत. प्रत्येक जण आपापल्या जगण्यात मग्न. एकमेकांवर इतका विश्वास की सोडूनच दिलेलं. अशात एका तरुण मुलीला ते घरात घेतात. घेतात म्हणजे, गिळंकृतच करतात. ती दोन वर्षांची असल्यापासून जगात एकटी! निरोगी जगणं म्हणजे काय, याचा वस्तुपाठ देणारा चित्रपट. एड्स झालेल्या सिंगल मदरच्या माध्यमातून! मग यात किती बारीक तपशील, घटना, व्यक्‍तिचित्रण आणि काय काय.

मुलगा सहा वर्षांचा झाल्यावर कळलं की तो जन्मतःच बदलला आहे, खरा मुलगा अमुक घरी वाढतो आहे, तर काय होईल, हा विषय ’लाइक फादर लाइक सन’ या जपानी चित्रपटाने मांडला. मांडणी जरी भावनिक अंगाने असली तरी एक घर गरीब एक श्रीमंत, एक घर चोराचं एक शिपायाचं इतक्या ढोबळ पातळीवर चित्रपट उतरला नाही. सहा वर्षांची भावनिक गुंतवणूक रक्‍ताच्या नात्यासाठी सोडून देता येत नाही, हे पटवताना ’मला हा खरा आपला असलेला मुलगा आवडू लागला आहे आणि यात ’त्या’ मुलाशी आपण बेइमानी करत आहोत, या विचाराने मला रडू येत आहे,’ असं एक आई म्हणते. एकूणच या समस्येकडे आया बापांपेक्षा वेगळ्या पद्धतीने बघतात! यातल्या भावनिकतेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकून गेला.

महोत्सवातला सर्वात गाजलेला चित्रपट होता, ’ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर’. गाजण्याचं कारण होतं, त्यातल्या दोन तरुणींच्या लेस्बियन संबंधांचं उघड, तपशीलवार आणि विलंबित चित्रण. ही होती एका मुलीच्या प्रेमाची शोकांतिका. या शोकांतिकेला एकापेक्षा अधिक परिमाणं होती. तिच्या पंधराव्या वर्षी गोष्ट सुरू होते आणि ती पंचवीस वर्षांची होईपर्यंत चालते. तिचं प्रेम दुसर्‍या मुलीवर असतं, अन्य कोणाचा विचारही ती करू शकत नाही, त्या मुलीच्या सहवासासाठी, स्पर्शासाठी ती तडफडत रहाते, हे बघताना लेस्बियन शरीरसंबंध चित्रणाची आठवण पुसट होते. केवळ पूर्ण नग्न स्त्री शरिरांचं निकट, स्पष्ट सेक्स दाखवणे, या पेक्षा जास्त अर्थांनी हा चित्रपट ’बोल्ड’ होता. प्रेम म्हणजे काय, प्रेमपूर्ती म्हणजे काय, शरिराची ओढ म्हणजे वासना का, अशा अनेक प्रश्नांना नवे फाटे फोडत गेला. आणि अदील एक्सार्शोपुलास हिचं काम अशक्य कोटीतलं होतं. हिचा जो सापडेल तो चित्रपट पाहिलाच पाहिजे, अशी संवेदनाशीलता तिच्या चेहर्‍यात आहे.

खरं तर ओपनिंग फिल्मचा मान मिळालेल्या ’डॉन वॉन्स’ या चित्रपटाचा अपवाद सोडल्यास मी पाहिलेल्या एकजात सर्व परदेशी चित्रपटांमध्ये पात्रयोजना अचाट होती. हे कलावंत याच भूमिकांसाठी जन्माला आलेत, असं निःशंकपणे म्हणावं. हे श्रेय अर्थात नटनट्यांबरोबर दिग्दर्शक, मेकपमन आणि इतर तंत्रज्ञ यांचंही आहे. मी इथे घेतलेला आढावा केवळ चित्रपटांच्या आशयाशी संबंधित आहे. त्या आशयनिर्मितीला संगीत, प्रकाश, कॅमेरा, एडिटिंग यांनी कसा हातभार लावला, याबद्दल मी काहीच म्हटलेलं नाही. चित्रपट ही एकूणच अनेकांनी मिळून घडणारी, व्यामिश्र कला आहे. हे करायचं तर त्यासाठी सगळे चित्रपट पुन्हा बघावे लागतील!

एवढं गुणगान केल्यावर अपेक्षाभंगाची उदाहरणं देणं भाग आहे. एकच देतो. ऋतुपर्ण घोष यांच्याबद्दल इतकं ऐकलं की त्यांचा शेवटचा चित्रपट’ सत्यान्वेषी’ मोठ्या अपेक्षेने पाहिला. अगदीच टुकार निघाला. एखाद्या चित्रपटाने उडीच छोटी मारायची ठरवली आणि छोटीच मारली, तर त्याला चूक म्हणता येत नाही. ’सत्यान्वेषी’ आव मोठ्या संवेदनाशील, चतुर, रहस्यमय गोष्टीचा आणतो आणि यातलं काही एक करत नाही. पंधरा मिनिटांची कथा ताणून दोन तासांत सांगतो. यातलं रहस्य शाळकरी आहे. यातल्या पात्ररचनेत सुसंगती नाही. यातलं संगीत कानाला त्रास देतं. रंग तेवढे नेत्रसुखद आहेत. नेमका हा चित्रपट भारतीय निघावा, हे वाईट आहे; पण खरं आहे. ऋतुपर्ण घोष यांचे इतर चित्रपट बघायची इच्छा उरली नाही.
गेल्या वर्षीसुद्धा ’एलार चार अध्याय’ हा बंगालीच चित्रपट सर्वात भिकार निघाला होता!