Saturday, July 14, 2012


आमचा रुस्तमेहिंद


      दारासिंग. दारासिंगचं चित्रपटसृष्टीला योगदान काय? त्याच्या मृत्यूनंतर पंतप्रधानांपासून महेश भट ते बिपाशा बसूपर्यंत लहानथोरांनी प्रतिक्रिया नोंदवली. अमिताभ बच्चनसकट. तो एक सत्शील मनुष्य होता, तो सेटवर असला की कोणाचीही मोठ्याने अपशब्द उच्चारण्याची हिम्मत होत नसे. ’रामानंद सागरच्या रामायणात त्याने साकारलेला हनुमान आमच्या मनात कायमचा घर करून आहे,’ असं तर अनेकांनी सांगितलं. त्याच्या रेसलिंगची आठवण निघाली. तो कसा हसरा, आनंदी होता, हे काही जणांनी नोंदवलं.

मिळतील तेवढ्या सर्व प्रतिक्रिया वाचूनही माझं समाधान झालं नाही. वाटलं, हे सगळं फार गुळगुळीत, गुळमुळीत होतंय. त्याने असं नेमकं काय केलं की इतक्या प्रमाणावर त्याच्या मृत्यूची नोंद घेतली जावी, हे यातून कळत नाही. त्याचा उल्लेख सर्वांनी जसा आदराने ’दारासिंगजी’ असा केला; तशाच गुडी गुडी शब्दात सगळ्यांचं म्हणणं व्यक्‍त झालं.

नको, असं नको. इतरांचं विश्लेषण नको. माझं समाधान झालं नाही कारण दारासिंगच्या निधनाने मलाही काही तरी गमावल्यासारखं, आपल्या एकूण घडणीतला एक हिस्सा निखळल्यासारखं झालं. दारासिंग नायक असलेला एकही सिनेमा मी पाहिलेला नाही. त्याला कुस्ती खेळताना पाहिलेलं नाही. म्हणजे मी दुरून न्याहाळणारा, बाहेरचा आणि त्यामुळे कमी दृष्टीस पडलेला प्रेक्षक. हे सिनेमावाले, कुस्तीवाले आतले. त्याला जास्त जवळून ओळखणारे. ते मला त्याच्या अंतरंगाचं, त्याच्या ’अपील’चं तुकड्यातुकड्याने पण सजीव, जिव्हाळ्याचं दर्शन घडवतील; अशी माझी काहीशी भाबडी, बालिश अपेक्षा होती. ती पुरी झाली नाही. रुखरुख लागली. मग वाटलं, दारासिंगला आपण जवळून नाही पाहिला तरीही तो जवळचा वाटतो, असा आपला दावा आहे ना; मग आपणच का प्रयत्न करू नये? त्याची कुस्ती आणि त्याचे सिनेमे संपल्यानंतरही त्याला इतकं महत्त्व मिळालं, याचा बारीक अंश आपल्याला मांडता येतो का,  हे बघूच करून.

’रुस्तमेहिंद’ दारासिंगच्या कुस्त्या वरळीच्या वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये होत. संध्याकाळी कुस्त्या सुरू होत; पण सुरुवात लहान कुस्तीगिरांपासून होत असे. दारासिंगचा आयटेम म्हणजे क्लायमॅक्स! तो सगळ्याच्या शेवटी. काळोख पडल्यावर प्रखर दिव्यांच्या प्रकाशात. तसा तो काही रोज लढत नसे. त्याची लढत असे, तेव्हा गर्दी वाढत असे. फ्रीस्टाइल कुस्ती! किंगकाँग आणि इतर चित्रविचित्र नावाचे, रूपाचे आणि वेषभूषेचे परदेशी पैलवान रोज एकमेकांशी लढत. एकेकाची लढण्याची स्टाइल वेगळी, त्यातल्या बड्या पैलवानांचे स्वतःचे असे विशिष्ट डाव आणि पेच. दारासिंगबरोबर त्याचा लहान भाऊ रंधावा असे. इतरही लहानमोठे भारतीय पैलवानसुद्धा असत; पण त्यांना ग्लॅमर नव्हतं. ग्लॅमर होतं, दारासिंगला आणि त्या अक्राळविक्राळ परदेशी पैलवानांना.

रोज त्या कुस्त्यांची रसभरीत वर्णनं वर्तमानपत्रात छापून येत. शिवाय रोजच्या जाहिराती! मला त्या जाहिराती फार आवडत. त्यांची भाषा, त्यातले फोटो; एक अद्‍भुत मायथॉलॉजी साकारत असे. आज टीव्हीवर WWF चालतं ना, तसंच. पण ते ’देशी’ होतं. ते प्रत्यक्ष बघून आलेले आमचे वडील मित्र आम्हाला त्या कुस्त्यांची हकीकत सांगत. पुढे कित्येक वर्षं बसने वल्लभभाई पटेल स्टेडियमवरून जाताना मला साक्षात कुरुक्षेत्राचं दर्शन घेतल्यासारखं धन्य वाटत असे.

त्या कल्पनावास्तवात दारासिंग अजेय होता. मोठमोठे दैत्य इतरांना लोळवत वाढत्या श्रेणीने कीर्ती मिळवत आणि शेवटी दारासिंगशी लढत. त्याला झुंजवत, त्याचं रक्‍तही काढत. पण शेवटी त्यांची हार होई. दारासिंग कधीही हरणार नाही, ही आपल्या अंतर्मनाने दिलेली ग्वाही खरी ठरताना दर वेळी आनंद होई. तेव्हा टेलिव्हिजन नसला तरी सिनेमा होता. आम्हा लहानांचे आवडते जाड्यारड्या होते; पण ते सगळं शेवटी पडद्यावर. हा खरा! हाडामांसाचा! येवढा पराक्रमी असूनही गोंडस चेहर्‍याचा. उग्र, खुनशी नव्हे; तर हसर्‍या मुद्रेचा.

हे सगळं लुटुपुटुचं, बेगडी आहे, हे कळायला लागेपर्यंत दारासिंग सिनेमात गेला होता. मी पण ’मोठा’ झालो होतो. फौलाद, डाकू मंगलसिंग, टारझन कम्स टू दिल्ली यांसारख्या त्याच्या चित्रपटांमधली त्याची नायिका मुमताज डोळ्यात भरत होती. काय तिचं नाक! अंगांगात सेक्स ठासून भरलेलं असूनही चेहेर्‍यावर मादकतेचा लवलेश नाही. मुमताज वाढत वाढत थेट दिलीप कुमार आणि देव आनंदची नायिका झाली. राजेश खन्ना आणि शशी कपूरची तर झालीच. आणि ती जेव्हा मोठी झाली; तेव्हा तिच्या प्रवासाचं वर्णन हमखास ’दारासिंगपासून सुरुवात करून ...’ असं व्हायचं! दारासिंग सरळ सरळ देमार चित्रपटांचा प्रतिनिधी होता.
पण तो ज्या चित्रपटांचा प्रतिनिधी होता, ते आजच्या बी ग्रेड सी ग्रेड चित्रपटांसारखे मुळीच नव्हते. ते सामान्य होते. बाळबोध होते. त्यांची तांत्रिक बाजू कमकुवत होती. त्यांच्यातला अभिनय ढोबळ होता. ते ग्राम्य, बीभत्स, ओंगळ अजिबात नव्हते. आईला ’जातो’ सांगताना दारासिंग जेव्हा ’माँ, बंदा चला,’ म्हणतो तेव्हाही श्वास आत घेत दंडातली बेटकुळी फुगवतो; अशी टिंगल व्हायची; पण त्यातही एक निरागसता होती. जी आज बनेल दिसणार्‍या रितेश देशमुखमध्ये वा बावळट तुस्‌शार (असंच स्पेलिंग तो करतो) कपूरमध्ये असल्याचा आरोप कोणी करणार नाही. दारासिंगला म्हणूनच ’सिकंदर-ए-आझम’ सारख्या चित्रपटात पृथ्विराज कपूर आणि प्रेमनाथबरोबर चक्क सिकंदराचीच भूमिका मिळाली (तिथेही त्याची नायिका मुमताज!). राज कपूरने त्याच्या ’मेरा नाम जोकर’मध्ये छोटासा रोल दिला. आणि त्याच्या जीवनाच्या अखेरीस ’जब वी मेट’ मध्ये इम्तियाज अलीने त्याला कौतुकाचा हारच घातला. त्याने रंगवलेल्या करीनाच्या आज्ज्याला काही कळत नाही; पण आत्मविश्वास केवढा! फार हिंडता फिरता किंवा बोलता येत नाही; पण मान केवढा!

दारासिंगच्या प्रतिमेचं मर्म हेच होय, असं म्हटल्याने त्याचा अधिक्षेप होईलसं वाटत नाही. रामानंद सागरने त्याला हनुमान केला. हनुमानाची गंमतच आहे. त्याचं वर्णन पुराणात ’बुद्धिमान’ असं केलं आहे आणि त्याच वेळी त्याच्या मठ्ठपणाच्या कहाण्याही प्रचलित आहेत. दारासिंगचा हनुमान अर्थातच मठ्ठ होता. तो इमानी होता, बलवान होता आणि आज्ञाधारक होता. बस्स, आणखी काय पाहिजे? मारुती असा दाखवलेला चालतो पण ’मारुतीच्या हाती शँपेन’ हे नाव चालत नाही; तर अशी मूल्यं बाळगणार्‍यांबद्दल काय बोलावं?

असो. तो विषय वेगळा. दारासिंग गेला; बालपणाचा एक दुवा निखळला. केव्हातरी बालपणीचे सगळेच दुवे निखळलेले असतील आणि स्वतःमधलं पोरपण, झोपी गेलेला आडमुठा आशावाद जागवण्याची चावी स्वतःमधूनच शोधावी लागेल.

No comments:

Post a Comment