Friday, August 3, 2012


मृणाल गोरेच्या निमित्ताने


  माझ्या आईचा जन्म १९२६ सालचा. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ती २१ वर्षांची होती. म्हणजेच, स्वातंत्र्यलढा, बेचाळीसची चळवळ, वगैरे अनुभव तिने हळव्या, संस्कारक्षम वयात घेतले. सहाजिक जेपी, अच्युतराव, अरुणा असफ‍अली हे लोक तिचे आयडॉल. त्यांच्याबद्दल ती भरभरून बोलायची. ती अभ्यासू, महत्त्वाकांक्षी नव्हती आणि लढ्यात पुढाकार घेणं तिला सुचलंही नाही. पण गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिने शाळा सोडली. आईचा मार खाल्ला; पण शाळा सोडून लाठ्या खायला गेली. (नंतर पुन्हा शाळेत ऍड्मिशन घेतली पण मॅट्रिक राहिलं ते राहिलंच!)

तिच्या कौतुकाचा आणखी एक विषय होता: समाजवादी पुढारी बायका. राष्ट्र सेवा दलात गेल्यामुळे त्या सगळ्या बायांचा उल्लेख ती एकेरी करत असे. अहिल्या, प्रमिला, सुधा आणि मृणाल, असा. सगळ्यांशी कधी तरी तिची भेटही झाली असणार. शक्य आहे, त्यांनी कधी काळी एकत्र कामही केलं असेल. त्यांना भेटायची इच्छा कधी तिने व्यक्‍त केली नाही, की त्यांच्याशी असलेला खरा खोटा संबंध वापरून कुठे प्रौढी मिरवली नाही. त्यातही तिला जास्त कौतुक हे, की यातल्या बहुतेक बाया सीकेपी आणि त्यांनी जातीबाहेर लग्नं केली! मृणालचं तर विशेष कौतुक. बंडू गोरेशी लग्न करते म्हणाल्यावर म्हणे कोणी कुचेष्टेने म्हणालं, हिला मेडिकल झेपत नाही म्हणून अर्धवट सोडून लग्न करायला निघाली. तर मृणालने जिद्दीने पुढची परीक्षा अत्यंत उत्तम मार्कांनी पास होऊन दाखवली आणि मग शिक्षण सोडून बंडूबरोबर चळवळीत उतरली!

मृणाल गोरेची प्रतिमा माझ्या मनात ही अशी, ग्लॅमरस आहे. तिने पाणीवाली बाई म्हणून जे अचाट कर्तृत्त्व दाखवलं, ते माझ्या जाणिवेत नाही. ’नागरी निवारा’ हे नाव तर मला कडू वाटतं. वर्षानुवर्षं झगडून, नोकरशाहीशी कायद्याची बाचाबाची करून तिने आणि बाबुराव सामंतांनी हजारो सर्वसामान्यांना अत्यंत स्वस्तात घरं मिळवून दिली आणि घर मिळताच तिथल्या मराठी माणसांनी तिला, तिच्या पक्षाला मत द्यायचं बंद केलं! तिच्या आदर्शवादाची गरज संपली, आणि त्यांना सौदेबाज शिवसेना जवळची झाली.

पुन्हा मागे जाऊ. समाजवाद्यांच्यात फूट पडल्यावर माझे वडील प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते झाले तर मृणाल समाजवादी पक्षात गेली. त्यामुळे तिच्याविषयीच्या आपुलकीला माझ्या अपरिपक्‍व मनात एक बारीक अढी होती. आणीबाणी येईपर्यंत ती अढी जाण्याएवढा मी वाढलो होतो. आणीबाणीला ’दुसर्‍या स्वातंत्र्याचा लढा’ असं काही जण म्हणतात. माझा मित्र नंदू धनेश्वर तुरुंगात होता. अरुण केळकर बिहारला गेला होता. मी चळवळ्या कधीच नव्हतो. सुबोध जठार तुरुंगातल्या, भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी नेमाने पैसे गोळा करत असे, तेव्हा त्याने मागितले की मी देत असे. शक्य होईल तिथे भांडत असे. बाकी आपण सार्वजनिकपणे काय करावं हे मला समजत नव्हतं. अरुण एकदा दादरला भेटला आणि आम्ही कॅफे स्विमिंग पूलवर बसलो. तेव्हा अनेकांनी त्यालाच काय, मलाही ओळख देण्याचं टाळलं हे मला जाणवलं. अरूणसारख्या कृतिवीरांविषयी मला आदर वाटे, पण भावनेच्या भरात स्वतः काही करणं खुळचट वाटे.

मग आणीबाणी उठली आणि निवडणुका जाहीर झाल्या. तो काळ मात्र रोमांचकारक होता. शिवाजी पार्कच्या जेपींच्या सभेला जमलेली अफाट गर्दी, बँकेत युनियनने आंदोलन सुरू करताच त्याला केलेला जोरदार विरोध, ’त्या हरिभाऊ गोखल्याला पाडा!’ अशी पु ल देशपांड्यांनी केलेली भाषणं, इंडियन एक्स्प्रेसने उघडलेली काँग्रेसविरोधी मोहीम ... वातावरण एकदम इलेक्ट्रिक होतं.

मग निवडणूक पार पडली. दादरची मतमोजणी रुपारेल कॉलेजमध्ये चालू होती. पहिल्या बुलेटिनची वेळ झाली तेव्हा मी गेटबाहेर होतो. दुपारची वेळ. काही शे माणसं गोळा झाली होती. लाउडस्पीकर खरखरला. कोणीतरी उमेदवारांची नावं आणि त्यांना मिळालेली मतं सांगू लागलं. अहिल्या रांगणेकरची मतं सांगून झाली: बहात्तर हजार. दोन तीन नावांनंतर आर डी भंडारे यांची मतं जाहीर झाली; छप्पन हजार. त्याच क्षणी संपूर्ण जमावातून उत्स्फूर्त आनंदाचा उद्‍गार उमटला. त्या उद्‍गारात हर्ष होता, थोडा उन्माददेखील होता. मी चकित झालो. माझ्या मनातली भावना गर्दीतल्या सगळ्यांच्या मुखातून! मला ते पार अनपेक्षित होतं. मग रात्रभर मी सतीश तांबेबरोबर दादर ते अंधेरी चालत भटकलो. सगळे रस्ते माणसांनी भरले होते. सगळ्यांचे चेहरे उजळले होते. आनंदी आनंद गडे! आम्ही स्वातंत्र्यलढा अनुभवला नाही; पण दुसर्‍या स्वातंत्र्याचा अनुभव अवश्य घेतला!

इंदिरा, संजय दोघेही हरले. मुंबईतल्या, कोकणातल्या सगळ्या जागा जनता पक्षाला मिळाल्या. एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर मध्यभागी मृणाल गोरेचा फोटो. ट्रकवर उभी आणि लोकांना हात करते आहे. काय तो फोटो होता. रंगीत नसलेल्या त्या फोटोतल्या तिच्या त्या आडव्या हातात रुबाब होता, आत्मविश्वास होता, आत्मसामर्थ्याची जाणीव होती. मी त्या फोटोच्या पूर्ण प्रेमात पडलो. आणीबाणीला, इंदिरेच्या दडपशाही राजवटीला गारद केल्याचा जो भाव त्या फोटोतल्या तिच्या त्या आडव्या धरलेल्या हातात व्यक्‍त होत होता, त्यात मला माझ्या हृदयात उचंबळलेल्या आनंदाचं मर्म फ्रीज झालेलं दिसलं. अनेक वर्षं तो वर्तमानपत्री फोटो मी जपला होता. त्या फोटोचं आकर्षण जराही कमी झालं नाही. पुढे केव्हा तरी घर बदलताना तो हरवला. मग स्मृतीतून देखील वजा झाला.
 
मृणालताईंच्या निधनाची बातमी वाचताच हे सगळं आठवलं. आई, आणीबाणी आणि तो फोटो. आणि हो, नागरी निवारा.

No comments:

Post a Comment