मनातली एक फार जुनी खदखद काढून टाकायला आजच्यासारखा मुहूर्त पुन्हा मिळणार
नाही.
आज चिनी आक्रमणाचा पन्नासावा वाढदिवस. एक लढाई आपण सपशेल हरलेली. चीनने एक
ठेवून दिली कानाखाली आणि गाल चोळण्यापलिकडे काही करण्याची औकात आपली नव्हती.
नेहरूंना नावं ठेवण्यात अर्थ नाही कारण देशातल्या तुटपुंज्या संसाधनांमधून धरणं,
पोलाद निर्मितीचे कारखाने उभारता यावेत, यासाठी त्यांनी शस्त्रास्त्रांवर कमी खर्च
केला. दूरचा विचार करून, तात्कालिक लाभ सोडून ’अलिप्त राष्ट्र’ या संकल्पनेचा
पाठपुरावा केला. ’शांततामय सहजीवन’ या तत्त्वावर त्यांचा विश्वासही होता आणि
आपल्या जातिभेदाने पछाडलेल्या शतखंड, गरीब देशासाठी ते तत्त्व उपयुक्तदेखील होतं.
गांधींचा वारसा सांगणार्या, शांततेचा प्रामाणिक पुरस्कार करणार्या या दरिद्री देशाच्या
पंतप्रधानाला वैश्विक राजकारणात भलतीच प्रतिष्ठा होती. एकीकडे ’हिंदी चिनी भाई
भाई’ असा नारा देत असताना आणि तिबेटवरचा चीनचा अधिकार मान्य करत असताना नेहरूंनी
चीनच्या कडव्या विरोधाला न जुमानता दलाई लामांना आश्रयही दिला.
भारताच्या आंतरराष्ट्रीय बडेजावाला सुरुंग लावण्यासाठी चीनने आक्रमण केलं आणि
भारत चीनसमोर उभा राहू शकत नाही, हे जगाला स्वच्छ दाखवून चिनी सैनिक परत गेले.
नेहरूंना हा धक्का सहन झाला नाही आणि दोन वर्षांतच त्यांची प्राणज्योत मावळली.
मात्र एक परिणाम असा झाला की, शांततेचा पुरस्कार करत असताना आपण शस्त्रसज्जसुद्धा
राहिलं पाहिजे, असा धडा देशाच्या धोरणकर्त्यांनी घेतला. आणि पुढे १९६२ नंतर तीनच
वर्षांनी पाकिस्तानने कुरापत काढून भारताला थोडी प्रतिष्ठा परत मिळवायला मदत केली.
काश्मीर, या वादग्रस्त क्षेत्रातल्या पाकिस्तानी आक्रमणाला थोपवण्यासाठी भारतीय
सैन्याने पंजाबात आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली, ज्याची पाकिस्तानला अजिबातच अपेक्षा
नव्हती. एक प्रकारे, ’आम्ही अजून शांतताप्रिय असलो, तरी दुबळे, गाफील, बावळट
राहिलेलो नाही,’ असं भारताने जाहीर केलं.
ते राहू दे. मला वेगळंच बोलायचं आहे. चिनी आक्रमणापुढे आपला निभाव लागला नाही,
हे आपण तेव्हासुद्धा स्वीकारलं होतं. उगाच, ’आमच्या सैनिकांनी केलेल्या उग्र
प्रतिकाराला घाबरून चिनी सैनिक माघारी फिरले,’ अशी आत्मवंचना केली नाही. योग्य तो
धडा घेऊन सुधारणा केली.
मग ते ’ऐ मेरे वतनके लोगो’ गाणं टुकार आहे, हे आपण कधी म्हणणार?
त्याच्याएवढं ओव्हररेटेड गाणं दुसरं नाही. त्याच्या चालीत दम नाही. दर वर्षी
अजूनही २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला ते दिवसभरात पन्नास वेळा ऐकावं लागतं. जणू ते गंभीरपणे
ऐकून ’चुक् चुक्’ केलं नाही, तर देशद्रोह होतो. इथे कोणाला कान नाहीतच की काय?
लताच्या चांगल्या गाण्यात ते अजिबातच मोडत नाही. हकीकतमध्ये कैफी आझमीने काय गाणं
लिहिलंय, कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो! काय
अनुरूप चाल आहे मदन मोहनची! किंवा नया दौरमधलं ’ये देश है वीर जवानोंका’. वा रे
साहिर वारे ओपी! कसं वीरश्रीयुक्त गाणं आहे! ’जिस देशमे’ मध्ये मुकेश वीररस आळवत
नाही; पण ’होठोंपे सचाई रहती है’ हे शैलेन्द्रचं गाणं आख्खं ऐका. ’जो जिससे मिला सीखा हमने,
गैरोंकोभी अपनाया हमने, मतलबके लिये अंधे होकर रोटीको नही पूजा हमने’ ही खरंच आपली
एकेकाळची आत्मप्रतिमा होती.
देशभक्तीपर गाण्याचा कस चालीवरून नव्हे, तर शब्दांवरून जोखावा. ’कोई सिख कोई
जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी ...’ हे काय आहे? सगळ्या यूपी-बिहारवाल्यांना
सरसकट ’भय्या’ म्हणणं, सगळ्या मराठी माणसांना ’घाटी’ म्हणणं आणि सगळ्या मल्याळी-तमिळ-तेलुगू-कन्नडिगांना
’मद्रासी’ म्हणणं, हे अन्नाडी उर्मटपणाचं लक्षण आहे. ’पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल वंग’ यात हिंदी पट्टा गैरहजर आहे; पण देशातल्या प्रमुख संस्कृती
उपस्थित आहेत. सगळ्या दक्षिण भारताला ’द्राविड’ म्हणण्याचा उत्तम पर्याय असताना
प्रदीप त्यांना ’मद्रासी’ म्हणतो. आणि शिखांबरोबर ’जाट’ विनाकारण वाढवतो. कारण तो
स्वतःला स्वतःच्या प्रदेशावर उचलत नाही, खर्या अर्थाने भारतीय होत नाही.
’दस दसको एकने मारा’!
असं नसतं. जगाच्या इतिहासात कधीही असं झालेलं नाही. पोराटोरांना आणि
न्यूनगंडाने पछाडलेल्या बालबुद्धी लोकांना कदाचित खरं वाटत असेल, की भारतीय
सैनिक इतके शूर की एकेकाने दहा दहा चिनी मारले. पण तसं नसतं. धड गरम कपडे नसताना, थंडीत
सुरळीत चालतील अशा बंदुका नसताना ते लढले यात शौर्य आहे; पण त्याला ती ’दस दसको’ची
बेगडी झालर कशासाठी? भारतीय सैनिक काय ’बॉर्डर’ किंवा तत्सम बॉलिवुडी
चित्रपटातल्या नायकांसारखे गोळ्या खा खा खाऊनही मरता न मरणारे होते?
आणखी एक. मृत्यू समोर दिसत असताना धैर्य राखून लढण्यात जे शौर्य आहे, ते दहा
जणांना ठार करण्यात नाही. शत्रूचा सैनिकही माणूसच असतो. तो मरतो, तेव्हासुद्धा
कोणाचा पुत्र, कोणाचा पती, कोणाचा पिता मरत असतो. जीव घेण्यात कसला आलाय मोठेपणा? किमान
देशभक्तिपर गाण्यात तरी तसा उल्लेख नको. चांगल्या म्हणवलेल्या कुठल्या (देशी-परदेशी, कुठल्याही) देशभक्तिपर गीतात असं म्हटलंय?
या गाण्याचं आणखी एक मोठेपण काय, तर ते ऐकताना नेहरूंच्या डोळ्यांत पाणी आलं!
आलंही असेल. ती हरलेली लढाई, त्यात गमावलेले जीव, तो अपमान आणि ’देशाचा
अपमान आपल्याला टाळता आला नाही,’ ही खंत आठवून त्यांचे डोळे पाणावले असतील. पण
म्हणजे, ही काही गाण्याच्या श्रेष्ठत्वाची पावती नव्हे! मुळात नेहरूंच्या अश्रूंचा
आधार घेण्याचं कारणच काय? आपलं आपण ऐकून कळत नाही?
ते एक शोकगीत आहे. आणि फालतू
शब्दांनी सजवलेलं आहे. ’प्यारकी राह दिखा दुनियाको ... तुममेही कोई गौतम होगा,
तुममेही कोई होगा गांधी’ अशा शब्दांचं मार्चिंग साँग विनोदी ठरतं. पण ’ऐ मेरे वतनके
लोगो’ तद्दन बेकार आहे.
हुश्श! मन मोकळं केलं, बरं वाटलं.
No comments:
Post a Comment