Wednesday, July 17, 2013

पूर्व किनार्‍यावरचा ओदिशा



ओदिशा. मराठीत अजून ओरिसा. ही ब्रिटिशांची देणगी. मीरत, पूना, बॉम्बेप्रमाणे. पण ओरिसाचं ओदिशा करायला या लोकांनी खूप वेळ लावला. इथल्या बहुतेक गाड्यांचे नंबर OR ने सुरू होतात. OD ने सुरू होणार्‍या गाड्या कमी दिसतात.

इथे एकूण गाड्याच कमी दिसतात. दोनचाक्या जास्त. कोणार्कहून चिलिका लेकला जाताना जी काही वाहनं दिसली – आडवी आली; त्यात दोनचाक्यांची संख्या सर्वात जास्त. मग तीन चाकी (ज्यांना इथेही ऑटोरिक्षा म्हणतात, उत्तरेप्रमाणे नुसतं आटो, आटो म्हणत नाहीत; जरी इथे फुटकळ सायकलरिक्षा दिसत असल्या तरी) आणि मग चार चाकी. त्या चार चाकी वाहनांच्यात बहुतेक सगळ्या पिवळ्या नंबर प्लेटच्या प्रायव्हेट टॅक्स्या. खाजगी तुरळक. निष्कर्ष: ओदिशात गाडीधारी सुखवस्तूंची संख्या कमी आहे. इथे गरिबी आहे.

या निष्कर्षाला एका बाजूने गावागावात दिसणारे खांद्यावर पंचा वा उपरणं टाकून उघडे फिरणारे पुरुष जरी दुजोरा देत असले, तरी संपूर्ण ओदिशा मुक्कामात मोजून एकही बैलगाडी दिसलेली नाही, त्याचं काय?

असो, असो. हे मी उड्या मारत चाललो. सुरुवातीपासून सुरू करू.

हा आपला अगाध, अफाट भारत देश, इथे जन्म घेणे ही साजरी करण्यासारखी गोष्ट. कारण हिमाच्छादित शिखरं, हत्ती लपेल इतकं उंच गवत, वाळवंट, समुद्रातून उगवणारा आणि समुद्रात मावळणारा सूर्य, चहा-कॉफीचे मळे, पर्जन्यवृक्षांची सदाहरित जंगलं, पलिकडला तीर क्षितिजापार असणार्‍या नद्या यातलं काहीही याचि देही याचि डोळां बघण्यासाठी भारतीय नागरिकाला व्हिसा लागत नाही! हे असं मनात निनादत असताना आपण अजून समुद्रातून उगवणारा सूर्य बघितलेला नाही, हे डाचत होतं. एकदा चेन्नईला गेलो पण मरीना बीचवर पोचेपर्यंत अंधार पडला आणि रात्रीची गाडी पकडायची होती. ओदिशाला जाताना हे मनात जास्त होतं. जरी जगन्नाथाची यात्रा हे निमित्त करून गेलो तरी. मी जगन्नाथाची यात्रा बघायला पुरीला जाणार आहे, हे कळल्यावर बहुतेकांनी मला नाउमेद करायलाच सुरुवात केली.

“फार गर्दी असते.”

हो ना. दहा लाख लोक जमतात आणि रथ ओढतात, हेच तर बघण्यासारखं आहे!

“उन्हाळा असतो, उकाडतं, घाम येतो.”

याचं मुंबईकराला काय?

“लांब आहे. ओरिसा मागास आहे, तिथे सोयी नसतील.”

हे काय भलतंच? गडचिरोलीसुद्धा ’मागास’ आहे. दोन वर्षं सुखात घालवली मी तिथे.

तर निघालो. सोबत एक भाऊ. जाताना अर्थातच ट्रेनने. कारण देश बघत बघत जायचं. जमीन बदलते, भाषा बदलते, लोकांचे पेहेराव, 
घरांची रचना, डोंगरांचे आकार बदलतात. मस्त वाटतं. किती गोष्टी आपण गृहीत धरून चालत असतो, हे कळत जातं. जग किती मोठं आहे, आपल्यापुरता विचार किती छोटा आहे, हे उमजत जातं.

हे जर प्रवासवर्णन असेल, तर वर्ण्य घटनांची सुरुवात मुंबई सोडण्याअगोदर, लोटिटला झाली. रात्री सव्वाबाराची गाडी. इकडच्या तिकडच्या तारखेचा घोळ न करता सर्व सामानासहित, पावसात न भिजता आम्ही सव्वा अकराच्या सुमारास कुर्ला टर्मिनस ऊर्फ लोटिटला हजर झालो. इ-तिकीट काढल्यावर रेल्वे एसएमएस पाठवते. तिकीट वेटिंग किंवा आरेसी असेल, तर चार्ट बनल्यावर एसेमेसने बोगी नं, सीट नं कळवते; पण गाडी वेळेवर सुटणार की नाही, हे कळवत नाही. आमची गाडी ’लेट’ नव्हती; ’रिशेड्यूल’ झाली होती. सव्वाबाराच्या ऐवजी पहाटे चारला सुटणार होती. म्हणजे, झोपेचं पार खोबरं व्हायचं होतं. यात मनाची समजूत घालणारा एक मुद्दा होता: समजा, कळलं असतं की गाडी चार तास उशीराने सुटणार आहे. तर काय तीन बीन वाजता निघणार होतो की काय? आणखी फार तर तासभर उशीर केला असता.

पण ही गाडी मस्त आहे. सुटल्यावर पहिला हॉल्ट मनमाड! नाशिकसुद्धा नाही. मग भुसावळ, मग बहुधा बडनेरा आणि चौथं स्टेशन नागपूर. इथपर्यंत मी अनेकदा आलेलो आहे. पुढे माझ्यासाठी ’अबुझ माड’ – अज्ञात प्रदेश! तर जाणिवेचं क्षेत्र विस्तारणारी पहिली थप्पड इथेच बसली. अहमदाबाद, बडोद्यापासून बहुतेक सर्व मोठ्या स्टेशनांच्या अगोदर एक ’पायरी’वजा स्टेशन येतं, हे लक्षात आलेलं होतं. त्यामुळे नागपूरअगोदर अजनी येतं, हे पटलं होतं. पण नागपूरनंतर इतवारी येतं हे माहीत नव्हतं! मग सुचलं, नागपूर’नंतर’ हा काय प्रकार? नागपूरकडे प्रवास मुंबईहून, नागपूरच्या पश्चिमेकडून सुरू व्हावा, असा निसर्गनियम आहे की काय? कोलकात्याहून निघाल्यास नागपूरच्या अगोदरचं छोटं स्टेशन इतवारी ठरलं असतं, नाही का! कसे मुंबईकेंद्रित विचार करत होतो आपण! अमेरिकनांना अमेरिकेबाहेरचं जग माहीत नसतं, याला का नावं ठेवायची मग?

लवकरच महाराष्ट्र सोडून आम्ही छत्तीसगडात प्रवेश केला.  रायपूर आलं. एसीतून बाहेर येऊन प्लॅटफॉर्मवर उतरलो. तर एक वास आला. वास अमुक किंवा तमुक वस्तूचा, पदार्थाचा नव्हता. वास हवेचा होता. आसमंतात भरून राहिलेला होता. गाईच्या शेणामुतासारखा होता. पण  ओंगळ नव्हता. मी मुंबईत खूप फिरलो आहे. कुर्ल्याहून चालत जोगेश्वरीला गेलो आहे. मला ओंगळ  वासाचं काय? कानपुरात रस्ता चुकून एका अशा ठिकाणी गेलो, की मी मधून चालत होतो आणि दोन्ही बाजूला नुकतीच सोललेली, अजून रक्‍ताचे लाल ओघळ न सुकलेली कातडी टांगलेली होती. कानपूरची गंगा तर अत्यंत घाण होती. तिथे  माझ्या मनात विचार आला होता, कानपूरपेक्षा वाईट वासाचं, गलिच्छ ठिकाण कुठलं असेल? आणि उत्तरही लगेच सापडलं: मुंबई. तीसेक वर्षांपूर्वी मी फतेगडहून मुंबईला घरी येताना माझी गाडी पहाटे पाच साडेपाचला दादरला पोचत असे. तेव्हा सकाळच्या मुंबईची ओळख रेल्वेलाइनशेजारी प्रातर्विधीला बसलेले लोक, अशी होती. माझ्या परिचयाचा एक जण या एका कारणासाठी गोव्याहून मुंबईला अजूनही बसने येतो. सकाळी मुंबईत शिरताना नाकात शिरणारा तो भयानक वास नको म्हणून. रायपूरच्या वासाला नाक मुरडणारा मी कोण?

एक कळलं नाही; IRCTC वर तिकिटं मिळाली, ती एक आरेसी आणि एक वेटिंग, अशी होती. आमच्या सहा बर्थच्या भागात रायपूर गेलं तरी आम्ही दोघेच! अपरात्री केव्हा तरी बाकीच्या चार बर्थवर चौघे येऊन झोपले. सकाळी मला जाग आली, तर बाकी सगळे डाराडूर. मग मी मस्तपैकी दाढीबिढी केली आणि सहा वाजता चहा प्यायला. बरोबर थोडं काम नेलं होतं, ते टायपिंग करत बसलो. लेट सुटलेली गाडी वेळेवर चाललेल्या स्थानिक गाड्यांना रस्ता देत रेंगाळत चालली होती. चार तासांपैकी दीडेक तास मेकअप केला होता, तो गमावून आणखी थोडी लेट झाली. भुवनेश्वर येईपर्यंत माझं काम संपलं आणि ते लगेच मेलही करून टाकलं. माझे वडील हातात ट्रान्झिस्टर धरून उलटा सुलटा करताना मला आठवतात. अचंबा व्यक्‍त करत मला म्हणाले, कुठे काही जोडलेलं नाही आणि लांब कुठे वाजत असलेली गाणी ऐकवतो, बातम्या देतो! त्यांना ट्रान्झिस्टरचं नवल, मला डेटा कार्डचं. मला तेव्हा ट्रान्झिस्टर सामान्य वाटत होता, आजची तरुण पिढी मलाही हसत असेल.


रेल्वे प्रवास संपला.

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Hahaha! Ahe khar 'prawas'warnan! Pudhacha bhag big lihinar ahat ka? Awadel wachayla.

    ReplyDelete