Sunday, September 15, 2013

एका देवाची उत्क्रांती

गणपती हा माझा आवडता देव होता. गणपती येण्याच्या आदल्या दिवशी मी, माझा भाऊ, माझा काका आणि एखाद्दुसरा मित्र, असे रात्री उशीरापर्यंत जागूनडेकोरेशनकरायचो. आमच्या दहा बाय दहाच्या खोलीतली पुष्कळ जागा त्या डेकोरेशनमध्ये जात असे. रमणकाकाला डेकोरेशनची भारी हौस होती. डेकोरेशन हा शब्द त्याचाच. तो ठरवायचा त्याप्रमाणे आम्ही करायचो. गणपतीच्या चेहर्‍यावर उजेड पडेल असा फोकस, वरून दोन्ही बाजूंनी येणार्‍या विविध आकाराच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मागे कधी फिरतं चक्र, कधी आरसा, असा सारा थाट असायचा. चाळीच्या दुसर्‍या माळ्यावर आमच्याच गणपतीचं डेकोरेशन सर्वात भारी असायचं. अर्थात, खालच्या कर्णिकांचं आमच्यापेक्षाही भारी असायचं. पण त्यांचा गणपतीच मोठा, दहा दिवसांचा असायचा. आमचा गौरीबरोबर जाणारा. श्रावण महिन्यात केव्हातरी रणदिव्यांचं पोस्टकार्ड यायचं. जोडकार्ड. दादा उत्तर पाठवायचे. गणपती आणायला दादांबरोबर अनेकदा मीच जात असे. सोबत प्रधानांकडल्या विश्राम, धोंडू, गोविंदा, लक्ष्मण यांपैकी एक गडी. हे मजल्यावर बर्‍याच घरी काम करत असले, तरी ते प्रधानांचे गडी यात त्यांच्यासकट कोणाला शंका नव्हती.





गणेशचतुर्थीला दादांबरोबर पलिकडल्या दादरच्या खांडके बिल्डिंगमधल्या रणदिव्यांच्या दुकानात गेलो, की तिथे नाक्यापासूनच लोकांची झुंबड असायची. कोपर्‍यावर ताशेवाल्यांचे दोन चार गट दणादण टिपर्‍या हाणत स्वतःची जाहिरात करत उभे असायचे. त्यांच्यामुळे कानात तोंड घालून बोललं तरी ऐकू जाणार नाही, इतका आवाज आसमंतात भरलेला असायचा. आम्ही कधी ताशेवाले घेतले नाहीत. हातातल्या झांजा जोरजोरात वाजवत आणि तोंडाने ’बाप्पा मोरया’च्या घोषणा देत आम्ही घरी यायचो. आमच्या घरी लहानमोठ्या झांजांचे तीनेक जोड होते. आणि एक जोडी टाळांची. टाळांचा ठणठणाट थोरच पण त्या खोलीत एकाऐवजी टाळांचे दोन जोड वाजू लागले की कान किटत. आरतीतले शब्द ऐकू येईनासे होत. ते मला आवडत नसे. पण टाळ-झांजांचा गजर, आरत्यांचा आरडाओरडा, खांडके बिल्डिंगपाशी असणारा कानाचे पडदे फाटतील असा आवाज, हे सारं मला प्रिय होतं. फारच.

गणपती दिसायला नितांत सुंदर. प्रसन्न. चाळीत, आसपास, नातेवाइकांकडे, असा मी अनेक गणपती पहात होतो. नुसता नमस्कार करून प्रसाद घेत नव्हतो, मूर्तीचं निरीक्षण करत होतो. मला आमच्या घरची मूर्तीच सर्वात सुंदर वाटत असे. दुपारी कोणी आलेलं नसलं, की मी पलंगावर बसून गणपतीकडे पहात रहायचो. गणपतीचं रूप मला इतकं प्रिय होतं, की पुढे इंटरसायन्सला असताना एका मित्राच्या पाखंडी बडबडीमुळे विचारात पडून जेव्हा देवबीव आपल्याच मनाचे खेळ आहेत, हा साक्षात्कार मला झाला; तेव्हा स्वतःच्या नास्तिकतेची ’सीटी’ (confirmatory test. ही केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये असायची.) घेणं मला गरजेचं झालं आणि ’गणपतीची मूर्ती बघूनही आपल्या मनात श्रद्धा जागली नाही, तर आपला देवावरचा विश्वास नक्की उडाला’ असं मी ठरवलं. त्यानंतरही मी डेकोरेशन करण्यात काकाला मदत करत राहिलो, गणपती मला सुंदर दिसत राहिला, आवडतही राहिला; पण या सोंडवाल्या ढेरपोट्या देवाच्या आकर्षणाचं हे काय रहस्य आहे, असं कुतूहलही उत्पन्न झालं.

त्यानंतर आजतागायत मला कधीही देवाची गरज भासलेली नाही. कोणत्याही प्रकारच्या कठीण प्रसंगी देवाचा धावा करावासा वाटलेला नाही. कुठल्याही कूट प्रश्नासमोर जाताना किंवा अनवट उत्तराचा थांग लावताना कधीही देवाचा भोज्या करावासा वाटलेला नाही. कुणाला गाणं येतं, कुणी डावरा असतो, तसा मी पूर्ण नास्तिक आहे.

पण याने सांस्कृतिक अडचणी सुटत नाहीत. आता मला देवाच्या नावाने दुसर्‍यांना त्रास देणे अजिबात चूक, गुन्हेगारी कृत्य वाटतं. पण मग लहानपणी मलाच गल्लीत हनुमान जयंतीच्या वा नवरात्राच्या निमित्ताने लागणारा लाउडस्पीकर हवासा होता त्याचं काय, असा प्रश्न उभा होतो. मग सुचतं, ’पण मी वाढलो की नंतर. वय वाढल्यावर माणसाची समज वाढायला हवी की नको?’ परवा मामाकडे गेलो असताना शेजारच्या गुजरात्यांनी प्रथमच गणपती आणला. ताशांचा प्रचंड गजर करत. रीतभात विचारावी तसं त्या बाईने मामीला काळजीने विचारलं, आता रात्रभर हे ताशे वाजवत ठेवायचे ना? नशीब विचारलं. ठेवले असते वाजवत, तर? पलिकडल्या सुधारित झोपडपट्टीवाल्यांनी पहाटे चार ते पाच ’खबरदार कुणी झोपेल तर’ असा पण केल्यासारखी गाणी वाजवली, तेव्हा कुठे विचारलं?

देव अमान्य झाल्यावर फक्‍त वर वर सोपं होतं. आता, मामाच्या शेजारच्या सुधारित झोपडीवाल्यांचीच गोष्ट. "जय देवी जय देवी महिषासुरमथिनी हो धैषासुरमथिनी ..." हा धैषासुर कोण? पुढे. "आरती ओवाळू भारती ओवाळू .." ही भारती कोण? "जय मंगलमूर्ती"च्या पुढे "श्री मंगलमूर्ती" किंवा "जय श्री शंकरा"च्या पुढे "स्वामी शंकरा" कुठल्या आरती संग्रहात आहे? एकदा श्रद्धा सोडली, की बुद्धीतून उत्तर शोधणं आलंच. सुचतं असं की आपली तर थोर मौखिक संस्कृती. लिहिलेलं सोडून मुखाचा शब्द अनुसरणारी. खरं तर ’शब्द’ नाहीच; ध्वनी अनुसरणारी. भटजी म्हणतो, करतो, सांगतो, त्याला ’होय महाराजा’ म्हणत जाणारी. आणि हा अडाणचोटपणा ही झोपडीवाल्यांची मक्‍तेदारी मुळीच नाही.
या करवादण्यातून प्रश्न सुटतो का? तर, मुळीच नाही. लोकांनी आवाज करू नये, आरतीच्या नावाखाली अर्थशून्य बकवास करू नये, यासाठी काय करावं? त्यांचं लोकशिक्षण करावं, हे मला मुळीच मंजूर नाही. एक तर हे सगळं श्रद्धेत येतं. त्यात कसलं आलंय शिक्षण? नास्तिकाला विचाराल, तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक शून्य. दोन्ही विवेकाला नाकारणार्‍या. आपली ती श्रद्धा, दुसर्‍याची अंधश्रद्धा. - आणि यात लबाडी नाही की सिनिसिझम नाही. हे खरंच आहे.

सुचणं नंबर दोन: श्रद्धा तेवढी खरी, कृती दुय्यम. एक जण कचर्‍यापासून काहीही हातून सोडताना ’गंगार्पणमस्तु’ म्हणत असे, तर तो मेल्यावर स्वर्गाला गेला, अशी एक कहाणी आहे. का गेला? तर तो काय देतो, यापेक्षा त्याची भावना मोठी. ती शंभर टक्के निर्मळ असल्याने त्याच्या कृतीला पुण्याचं मोल आलं आणि त्याला स्वर्गप्राप्‍ती झाली. मग तशाच निर्मळ भावनेने म्हटलेल्या चुकीच्या आरत्या फळ देऊन जाणारच.

यावर मला सुचणारं प्रत्युत्तर वाकड्यात जाणारं आहे. कोणी तरी लिहिलेल्या आरत्या उत्क्रांत होत शब्दापलिकडे गेल्या, ’श्रद्धामय’ झाल्या; असं जर असेल, तर गणपती हा विद्येचा देव उत्क्रांत होत आवाजाचा, सार्वजनिक वर्गणीचा, चाळीस आणि पन्नास फुटी धूड मुर्त्यांचा, डान्सिंग लाइट्सच्या बटबटीत मखराचा आणि हजारो रुपयांचा क्षणात धूर आणि कचरा करून टाकणार्‍या फटाक्यांचा मठ्ठ देव झालेला आहे. त्याच्याशी मला काहीही सांस्कृतिक देणंघेणं नाही. गणपतीवरून असलेले श्लील अश्लील विनोद मी इथे सांगणार नाही; पण मांडव उभारण्यासाठी रस्त्याला भोकं पाडायला प्रवृत्त करणार्‍या, बहुजनांच्या भक्‍तिभावनेला अतिआक्रमक बनवून काही जणांच्या मानसिक शांततेला नष्ट करायला कारणीभूत होणार्‍या, एरवी कामाच्या धावपळीत असलेल्या या शहराच्या वाहतुकीला पांगळं बनवणार्‍या या तथाकथित देवाला मनात घाण घाण शिव्या घालण्यापासून मला कोणी अडवलंय?

पण तरीही प्रश्न सुटला असं झालं का? जो मुळातच नाही, त्या देवाला घातलेल्या शिव्या नुसत्या माझ्या मनाच्या अंतराळात भटकणार. माझ्या त्राग्याचं प्रतीक, एवढं सोडून त्यांना काहीच अर्थ प्राप्‍त होणार नाही. कधी वाटतं, हे टिळकांचं पाप. ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या घरीच असायला हवा. गावोगावी जत्रा आणि उरूस भरतात, ते परंपरेने. ती बरीवाईट परंपरा किमान धार्मिक नाही. साथ आल्यासारखे जे गणपती वाढत चाललेत; तसं उरूस, जत्रांचं होत नाही. समूहाचं रूपांतर जमावात करून त्यांच्यात धर्मवेडाचा उन्माद ठासून भरण्यात उरूस, जत्रा कमी पडतात.


काय माहीत? कदाचित गणपतीच्या कटकटींनी गांजलेल्या माझ्या मनाच्या या वाह्यात वावड्या असतील. पण कधी हे गणपती विसर्जित होतात आणि माझ्या शहराचं चलनवलन नॉर्मलपदी परततं, असं मला होत आहे.

No comments:

Post a Comment