’लोकप्रभा’मध्ये छापून आलेला हा लेख. त्यात अर्थातच पुष्कळ भर घालण्याची इच्छा आहे. फोटो पण टाकायचेत. पण तोपर्यंत ...
चव्वेचाळीसावा
’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ पणजी येथे २० ते ३० नोव्हेंबर या काळात पार
पडला. गोव्यात स्थिरावल्यापासून नववा. मुंबई, दिल्ली,कोलकाता, चेन्नई, बंगलोर
यांसारख्या मोठ्या शहरात एकापेक्षा जास्त ठिकाणच्या थिएटरांमध्ये असल्या
आंतरराष्ट्रीय महोत्सवातले चित्रपट दाखवायचं झालं, तर चोखंदळ प्रेक्षकांची चांगलीच
धावपळ होईल. विचार करा, मुंबईत मेट्रो किंवा लिबर्टी सारख्या दक्षिण मुंबईतल्या
थिएटरमधला चित्रपट पाहून एखाद्याला पुढच्या चित्रपटासाठी अंधेरी किंवा भक्ती पार्कसारख्या
ठिकाणी जायचं असेल, तर ’कला नको पण दगदग आवर’ म्हणण्याची पाळी येणार नाही का?
पणजीत जिथे महोत्सवातले चित्रपट दाखवले जातात, ती सर्व थिएटर्स एकमेकांपासून चालत
जाण्याच्या अंतरावर आहेत. आणि तरीही आयनॉक्स ते कला अकादमी, अशा फेर्या घालणार्या
ऑटोरिक्षा महोत्सववाल्यांसाठी (फुकट) उपलब्ध आहेतच.
ही सोय कितीही मोलाची
असली, तरी गोव्याचं मुख्य आकर्षण वेगळं आहे, हे सांगायला नको. ऐन फेस्टिवलच्या
जागी टिनात आणि नळातून (महाराष्ट्राच्या तुलनेत फारच स्वस्तात) मिळणारी बियर आणि गावात
अनेक जागी सर्वांच्या खिशाला परवडणार्या दरात फिश करी राइस. शिवाय समुद्रकिनारे. आणि या सार्याचा मनावर परिणाम होऊन ’आपण
गोव्यात आहोत,’ या भावनेने मिळणारी सुखसंवेदना. भारतातूनच कशाला, जगातल्या
कुठल्याही भागातून फेस्टिवलच्या निमित्ताने नुसतं गोव्यात येणे, हेच आनंददायक
ठरतं. तेव्हा, इंडियाच्या फिल्म फेस्टिवलसाठी गोवा, हीच जागा योग्य. जेवढ्या लवकर हा
निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जाईल, तेवढं बरं. कारण, सध्या दर वर्षी उद्घाटन
आणि समारोप, या समारंभांसाठी एक अवाढव्य एअर कण्डिशण्ड शामियाना उभारला जातो आणि
फेस्टिवल संपल्यावर उतरवला जातो. मनीश तिवारींनी या अर्थाचं आश्वासन या वर्षी
दिलंय. बघू. देशी-परदेशी फिल्म स्टार्सच्या खांद्याला खांदा लावून वावरण्याचं सुख
हक्काने मिळवण्याचा अधिकार असा सहजासहजी कुणी सोडून देईल का?
हे झालं मखराबद्दल. फेस्टिवलमध्ये
दाखवले जाणारे चित्रपट यांना मखरातल्या मूर्तीचं महत्त्व. इंटरनॅशनल काँपिटिशन,
सिनेमा ऑफ द वर्ल्ड, मास्टरस्ट्रोक्स आणि फेस्टिवल कलायडोस्कोप अशा विविध
नावांखाली देशोदेशीचे उत्तमोत्तम चित्रपट. जपानी आणि ग्रीक चित्रपटांचे खास विभाग.
एक विभाग ऍनिमेशन फिल्म्सचा. अग्नियेस्का हॉलंड या पोलिश दिग्दर्शिकेचा
रिट्रोस्पेक्टिव. याशिवाय सोल ऑफ आशिया, डॉक्युमेंटर्या, इंडियन पॅनोरमा, ईशान्य
भारतातल्या चित्रपटांवर ’फोकस’, दादासाहेब फाळके सन्मान प्राप्त झालेल्यांना
’ट्रिब्यूट’, सत्यजित राय क्लासिक्स, स्टुडंट्स फिल्म्स, वगैरे, वगैरे. शिवाय
जुन्या-नव्या मेनस्ट्रीम सिनेमाचा विभाग आहेच. तुम्ही भारतीय असा, की अभारतीय,
तुम्हाला इथली माहिती असो वा नसो, तुम्हाला ’अभिरूचीपूर्ण’ चित्रपट पहायचे असोत की
इथल्या धंदेवाईक चित्रपटांची झलक पहायची असो, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारं असं
या महोत्सवाचं स्वरूप असतं.
याचा एक अर्थ असाही
होतो, की महोत्सवातले सर्व, किंवा महत्त्वाचे सर्व चित्रपट पहाणं शक्य नसतं. थोडं
बुजुर्गांचा सल्ला घेऊन, थोडं स्वतःच कानोसा घेऊन ठरवावं लागतं. काही चित्रपट
दोनदोनदा असतात, त्यांचा निर्णय पहिला शो पहाणार्यांचं ऐकून घेता येतो. बाकी
चांगले असून चुकणारे चित्रपट नंतरच्या फेस्टिवलवर सोडावे लागतात. पण दिवसाला तीन,
चार, पाच चित्रपट पहाणे ही एक नशा असते. एका बाजूने डोळे शिणतात, तर दुसरीकडे
मनाला सणसणीत पौष्टिक खुराक मिळत असतो. मजा येते. बघताना, मग जोराजोरात चर्चा
करताना आणि अनुभवी, जाणत्या ज्येष्ठांची मतं ऐकताना. दहा दिवसात पन्नास चित्रपट
पहाणार्यांची संख्या कमी नसते. आणि हे अजिबात सोपं, सहज नसतं.
फेस्टिवलवाले चित्रपट
आणि एरवी आपल्याला पहायला मिळणारे चित्रपट यांच्यात फरक काय? एक फरक असा की एरवी
आपण बॉलिवुड आणि हॉलिवुड इथे बनलेले चित्रपट पहातो; पण चित्रपट जगभर सर्वत्र बनत
असतात. इतरत्र बनणारे चित्रपट आपल्याला फेस्टिवलमध्ये सापडतात. हेच वेगळ्या
पद्धतीने सांगायचं, तर एक धंदा म्हणून काढलेले चित्रपट आपण एरवी बघतो; तर चित्र,
संगीत, साहित्य यांसारखं एक कला माध्यम, म्हणून घडवलेले चित्रपट फेस्टिवलमध्ये
असतात.
म्हणजे, धंदेवाईक चित्रपट वाईट आणि कलात्मक चित्रपट चांगले, असं मुळीच
नाही. पण धंदा करणार्या एका यशस्वी चित्रपटामागे तसल्याच प्रकारच्या चित्रपटांची
जशी रांग लागते, तसं कलावाल्या चित्रपटांचं होत नाही. उलट, स्वतःला शहाणा
समजणारा/री प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपू बघतो/ते. स्वतःची चित्रपटीय भाषा
विकसित करू बघतो/ते. त्यामुळे फेस्टिवलमध्ये खूप जास्त वैविध्य सापडतं. आपल्या
ग्रहणक्षमतेचं चौरस पोषण होतं. ही मजा तर फारच थोर. मनाला एकदम तरुण करून टाकणारी.
फेस्टिवलमधल्या
चित्रपटांत आणखी एका प्रकारचं वेगळेपण असतं. ते म्हणजे ’बिटवीन द लाइन्स’.
दिग्दर्शकाने काहीही कसंही सांगो, हा वेगळेपणा दिसतोच. उदाहरणार्थ, ’मिस अँड द
डॉक्टर्स’ मध्ये जुडिथ आणि दोघे डॉक्टर भाऊ, यांच्या नातेसंबंधाविषयी दिग्दर्शक
काहीतरी सांगतेच; पण स्वतःच्या डायाबिटिक लहान मुलीला घरी ठेवून कामाला जाणारी घटस्फोटित
जुडिथ बारमेड असते, तर तिला ही गोष्ट लपवून ठेवावीशी वाटत नाही; डॉक्टरने तिच्या
प्रेमात पडून लग्नाची मागणी घालणे, ही गोष्ट क्रांतिकारक असत नाही; यावरून फ्रान्स,
या देशात, किमान पॅरिस या शहरात बाईने आकर्षकपणा लेऊन पुरुषांना दारूचे ग्लास भरून
देण्याची नोकरी करण्यात कमीपणा मानला जात नाही, हेसुद्धा आपल्याला कळतंच. ’डिस्मँटलिंग’
मधला मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगता यावं, यासाठी जमीन, घर, सर्वस्व विकणारा
बाप ’इथे येऊन रहा, मी पोसतो तुला,’ असं मुलीला म्हणतो; पण मुलगी काही
बापाला घरी न्यायचं नाव काढत नाही! दुसरी मुलगी बापाबद्दल सहानुभूती जरूर दाखवते,
पैशांची अपेक्षा ठेवत नाही; पण तीसुद्धा त्याला घरी नेत नाही. म्हणजे कॅनडात तरुण
मंडळी - मुलगा असो वा मुलगी - एकटेच रहातात. मोकळ्या, विस्तीर्ण फार्मवर आयुष्य
गेलेल्या बापावर कोंदट अपार्टमेंटमध्ये रहाण्याची पाळी आली, तरी त्याला स्वतःकडे न
बोलावण्यात कोणीच काहीच वावगं मानत नाही. म्हणजे, आपल्याकडे वृद्ध आईबापांची काळजी
घेण्याला जितकं महत्त्व आहे, तितकंच तिथे तरुण माणसाने स्वतंत्र होण्याला,
रहाण्याला आहे.
’वी आर व्हॉट वी आर’
नामक अमेरिकन चित्रपटात माणसांना मारून त्यांचं मांस शिजवून खाण्याची परंपरा
जपणार्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. ते धार्मिक आहेत. जेवणाअगोदर देवाची प्रार्थना
करतात, उपासतापास करतात, नैसर्गिक आपत्तीत देवाचा आदेशही शोधतात. त्यांचं चित्रण
अजिबात विकृत नाही. दीर्घकाळ नरमांसभक्षण केल्यामुळे त्यांना विशिष्ट रोगही होतो;
पण त्यांच्या वर्तनात या ’वेगळेपणा’ची खूण सापडत नाही. यावरून ’अमेरिकेत
नरमांसभक्षण करण्याची परंपरा असलेले लोक आहेत’ किंवा ’काही धार्मिक ख्रिस्ती लोक
नरमांसभक्षण करतात’ असल्या प्रकारचं अनुमान काढणं अर्थातच चुकीचं ठरेल. पण मग या
दिग्दर्शकाला म्हणायचं तरी काय आहे, हा प्रश्न उरतोच. याचं उत्तर असं, की या
चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या जिम मिकलची ख्याती हॉरर फिल्म बनवणे, ही आहे. ही
हॉरर फिल्म आहे. ते माणूस मारण्याची, कापण्याची, रक्ताचे पाट वाहण्याची दृश्यं
हॉरर निर्माण करण्यासाठी आहेत. म्हणूनच चित्रपटात एकदा थेट या कुटुंबाच्या
कर्मकांडाप्रमाणे एक फीमेल हात लिपस्टिक बाहेर काढतो; पण त्या लिपस्टिकने
मुडद्यावर लाल रेषा न मारता ओठ रंगवतो! आहे ना हॉरर! असह्य भीती वाटून घेण्यातही
काही जणांना सुख मिळतं, हे लक्षात घेता असले चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा कळते;
पण यात कला कुठे आली, हे कळत नाही. अमेरिकन दिग्दर्शक हॉरर निर्माण करण्यासाठी
नरमांसभक्षण करणारी ’नॉर्मल’ फॅमिली दाखवण्याच्या थरालाही जातील, हा यातला वेगळेपणा
होय, असं म्हणण्याचा मात्र मोह होतो.
पण विकृतीची नॉर्मल
अवस्था, हेच दर्शन घडवणारा एक प्रत्ययकारी चित्रपटही या महोत्सवात बघायला मिळाला:
’सारा प्रिफर्स तू रन’. साराला धावण्याचं वेड आहे. आपल्या गावात पहिली आल्यावर
साराला दूर, माँट्रियलला कॉलेजात प्रवेश मिळतो, धावण्याचं कौशल्य जोपासण्यासाठी. साराची
फी, तिच्या रहाण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च, तिला लागणारे खास बूट, वगैरे गोष्टी,
तिच्या प्रशिक्षणाचा खर्च, हे सगळं उचलण्याइतकी साराच्या घरची परिस्थिती नसते. मग
सारा जवळ रहाणार्या एका तरुणाची मदत घेते. त्यालाही माँट्रियलला जायचं असतं.
सरकारकडून अनुदान मिळावं यासाठी, त्याच्याच सूचनेवरून ती त्याच्याशी चक्क लग्न
करते. अनेक मुली त्याच्या मागे असल्या तरी तो बिचारा हिच्यावर जीव लावतो, तिची
काळजी घेतो. मग ती त्याच्याशी सेक्स करते, पण तिचं शरीर जराही प्रतिसाद देत नाही.
तिला त्यात सुखच लाभत नाही. तिला आपल्यात शून्य रस आहे, हे जाणून तो डिव्होर्स
मागतो. त्यासाठी एकमेव कारण म्हणून वेगळा रहाण्याचा प्रस्ताव मांडतो. वेगळं राहूनही
मी या खोलीचं भाडं भरत राहीन, असं तिला सांगतो. या सर्व प्रकारात तिची प्रतिक्रिया
काय असते? काहीच नसते! ती निर्विकार, थंड रहात नाही. त्याला तोडत नाही. त्याला
त्रास देण्यात विकृत आनंद घेत नाही. तिच्या वागण्यात खोटच काढता येत नाही. पण एक
धावणे सोडलं, तर तिला अन्य कशातही आणि कोणातही काडीचा रस नसतो. प्रेक्षकाला सारा
विकृत वाटत नाही. नॉर्मल वाटते. पण हे दिग्दर्शिकेचं यश आहे. पटकथेचं, साराची
भूमिका करणार्या सोफी देस्मारेचं यश आहे. आणि हे नक्कीच ठसठशीत वेगळेपण आहे.
विकृती हा शब्द जोरकस
आहे. आणि त्याचा जोरकसपणा निगेटिव आहे. धावण्यासारख्या व्यायामाच्या क्रियेला तो
लावला की खटकतं. पण प्रेम, वासना, अगदी वात्सल्य यांना लावला, की अर्थपूर्ण ठरतो.
’जॉय’ या चित्रपटात एकटी रहाणारी एक बाई हॉस्पिटलातून तान्हं मूल पळवते आणि
त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. मुलाला अपाय होण्याची शक्यता दिसून येताक्षणी
चंडिकेचा अवतार धारण करून एकाची हत्याही करते. पण मुलाच्या आईने याबद्दल कृतज्ञ
रहावं का? आपलं तान्हं मूल हिने नेलं आणि त्याचा पूर्ण ताबा घेण्याचा प्रयत्न केला,
वेड लागल्याप्रमाणे मुलाचे लाड केले, तर त्या आईने हसावं की घाबरून अर्धमेलं
व्हावं? पळवणार्या बाईला मात्र मुलाविना एकटं जीवन की आजन्म तुरुंगवास, यात निवड
करताना काहीच अडचण येत नाही. ही अतिरेकी वात्सल्यभावना विकृत नव्हे काय?
’इन हायडिंग’ या पोलिश
चित्रपटातली मुलगी दबलेली असते. अशोभनीय उद्गार काढल्याबद्दल बापाकडून थोबाडीत
खाते. (तरी बिथरत नाही. पूर्व युरोप या बाबतीत आशियाच्या, आपल्याप्रकारच्या नातेसंबंधांच्या
जास्त जवळ आहे, हे यावरून लक्षात येतं. तिच्यावर उत्स्फूर्तपणे हात उगारणारा बाप
तिचा छळ करत नसतो. स्वतःचा अधिकार शाबीत करत असतो. आणि हे तिलाही मान्य असतं.
तरीही ’थप्पड खाऊन निमूट रहाणारी’ असं तिचं व्यक्तिमत्त्व चित्रपटाच्या
सुरुवातीलाच आपल्या स्मृतिपटलावर नोंदलं जातं.) कमी बोलणारी, मोकळेपणा नसलेली,
स्वतःच्या शरिराला जसं ती घट्ट बांधून ठेवत असते, तशीच मन आवळून धरलेली अशी ही
तरुण मुलगी पार बदलताना दिसते. तिच्या घरात लपलेल्या ज्यूइश मुलीच्या सान्निध्यात
आणि तिच्याच प्रेरणेने हिला शरीरसुख म्हणजे काय हे कळतं. ते देणार्या,
चित्तवृत्ती मोकळ्या करणार्या, एक प्रकारे तिच्या घरात बंदी असलेल्या मुलीचा
सहवास गमावण्याची शक्यता तिला मुळीच मान्य नसते. मग तिच्या हातून खून होतात.
धडधडीत असत्य जोपासलं जातं आणि शेवटी स्वतःच्या बापाचा मृत्यू तिला बघावा लागतो.
ही तर सरळ सरळ विकृती.
सुखाच्या अनावर ओढीपायी एका साध्याशा मुलीचं होणारं घोर अधःपतन. या भूमिकेसाठी
मॅग्दालेना बोक्झार्स्का सर्वोत्तम अभिनेत्रीचं बक्षीस घेऊन गेली. पण या
चित्रपटाला ’एका विकृतीचं चित्रण’ यापेक्षा जास्त पैलू होते. कोण मुक्त कोण बंदी,
कोण जुलमी कोण बळी, कोण सरळ कोण चंचल, असल्या विरोधी गुणविशेषांची नाजुक गुंतागुंत
दाखवत मनुष्याच्या बाबतीत अंतिम विधान करता येत नाही, असं या चित्रपटाने सुचवलं.
सगळ्या ’चांगल्या’
चित्रपटांची दखल इथे घेणं शक्य नाही. मी पाहिलेल्यांपैकी उल्लेखनीय अनुभव थोडक्यात
सांगतो. आन्द्रे वायदा या थोर पोलिश दिग्दर्शकाची फिल्म ’वालेसा, मॅन ऑफ होप’
अर्थात लेक वालेसावर होती. वायदा सौंदर्य टिपण्यात रमत नाही. त्याचा फोकस विचलित
होत नाही. ओरियाना फलाची हिने (हीसुद्धा जगप्रसिद्ध मुलाखतकर्ती) घेतलेल्या
वालेसाच्या मुलाखतीतून वालेसाचा यूनियनच्या साध्या नेत्यापासून
राष्ट्रप्रमुखापर्यंत होणारा प्रवास आपल्याला दिसतो. त्यातून वालेसाचं कष्टकरी
मुळं दिसतात तशीच त्याची परिस्थितीचा अंदाज चटकन घेऊन त्वरित निर्णय घेण्याची
क्षमतासुद्धा दिसते. वालेसाचा आणि त्याच्या बायकोचा मानसिक छळ करणार्यांचा सूड तो
घेतो की नाही असल्या, मुद्यापलिकडल्या तपशिलांमध्ये वायदा क्षणभरही अडकत नाही की
वालेसाचं कौटुंबिक जीवन दाखवताना सेक्सची झलक पेश करण्याच्या मोहात पडत नाही.
चित्रपट अजिबात रेंगाळत नाही आणि आपल्याला झालेली वालेसा या ’माणसा’ची ओळख कायमची
आपल्यासोबत रहाते. (आपल्याकडे होणार्या चरित्रात्मक चित्रपटांची तुलनाच काय,
त्यांचा उल्लेखही इथे करवत नाही. इथे सगळे
परमेश्वराचे अवतार!)
माझ्यासाठी सर्वात
प्रभावी चित्रपट ठरला तो ’मारुसिया’. एक आई. मुलीच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची
सर्वतोपरी काळजी घेणारी आई. ’मी कशी नोकरी करू? मला मारुसियाकडे बघायचं आहे,’ असं
म्हणत ही बाई प्रस्थापित व्यवस्थेचे नियम पाळायला साफ नकार देते. रोज नवा दिवस,
नवं साहस. आज काय खाणार, कुठे झोपणार, काय करणार हे रोज नव्याने ठरणार. हेच जणू
तिचं रूटीन. तिच्या खणखणीत अनार्किस्ट भूमिकेमुळे तिला फ्रान्सच्या सरकारकडून मदत
मिळू शकत नाही. बाई सुसंस्कृत. कला, साहित्य या विषयांची नीट माहिती असलेली. पण
कोणीही तिला नांदवू बघत नाही. ’मी पूर्णवेळ आई आहे आणि मला पैसे कमावण्यासाठी
काहीही कां करायचं नाही की कशाला वा कोणाला बांधून घ्यायचं नाही.’ असं प्रत्यक्ष
जगणं कमालीचं अवघड असणार. आणि बाई खरी आहे, मारुसियाची भूमिका मारुसियानेच केली
आहे, हे कळल्यावर तर हादरायला होतं. चित्रपटाची निर्माती शेवटी प्रश्नांना उत्तरं
द्यायला हजर होती. मारुसियाच्या आईला जगरहाटीबद्दल नक्की काय म्हणायचं आहे, हे
तिला बरोबर माहीत होतं. प्रश्न विचारणारे अस्वस्थ होते, उत्तर देताना ती अजिबात
विचलित झाली नाही.
अश्गर फरहदीचा ’द पास्ट’
हा आणखी एक अप्रतिम चित्रपट. दुसर्या नवर्यापासून घटस्फोट घेऊन तिसर्याशी
सोयरीक करू पहाणार्या बाईचं जगणं. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ’हे असं का?’
या प्रश्नाला उत्तर मिळतं ते टप्प्याटप्प्याने. एक उलगडा होतो न होतो तर त्याखाली
आणखी एक पदर असल्याचं उघड होतं. कोणीच दुष्ट नाही, योगायोगाने काही होत नाही.
एकेकाचं दुसर्याबद्दल मार्मिक निरीक्षण. प्रत्येक जण भूतकाळाचं ओझं बाळगतो.
सत्याच्या दिशेने पायर्या चढताना शेवटी आपल्या लक्षात येतं की याला अंत नाही. कशी
रचली असेल याची पटकथा? आणि यातलं कोणीच अभिनय करताना ’सापडत’ नाही.
’द अमेझिंग कॅटफिश’
मध्ये बापाविना तीन मुली एक मुलगा यांना वाढवणारी आई. तिला एड्स. हे सर्व मुलांना
माहीत. प्रत्येक जण आपापल्या जगण्यात मग्न. एकमेकांवर इतका विश्वास की सोडूनच
दिलेलं. अशात एका तरुण मुलीला ते घरात घेतात. घेतात म्हणजे, गिळंकृतच करतात. ती
दोन वर्षांची असल्यापासून जगात एकटी! निरोगी जगणं म्हणजे काय, याचा वस्तुपाठ
देणारा चित्रपट. एड्स झालेल्या सिंगल मदरच्या माध्यमातून! मग यात किती बारीक
तपशील, घटना, व्यक्तिचित्रण आणि काय काय.
मुलगा सहा वर्षांचा
झाल्यावर कळलं की तो जन्मतःच बदलला आहे, खरा मुलगा अमुक घरी वाढतो आहे, तर काय
होईल, हा विषय ’लाइक फादर लाइक सन’ या जपानी चित्रपटाने मांडला. मांडणी जरी भावनिक
अंगाने असली तरी एक घर गरीब एक श्रीमंत, एक घर चोराचं एक शिपायाचं इतक्या ढोबळ
पातळीवर चित्रपट उतरला नाही. सहा वर्षांची भावनिक गुंतवणूक रक्ताच्या नात्यासाठी
सोडून देता येत नाही, हे पटवताना ’मला हा खरा आपला असलेला मुलगा आवडू लागला आहे
आणि यात ’त्या’ मुलाशी आपण बेइमानी करत आहोत, या विचाराने मला रडू येत आहे,’ असं
एक आई म्हणते. एकूणच या समस्येकडे आया बापांपेक्षा वेगळ्या पद्धतीने बघतात!
यातल्या भावनिकतेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकून गेला.
महोत्सवातला सर्वात
गाजलेला चित्रपट होता, ’ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर’. गाजण्याचं कारण होतं, त्यातल्या
दोन तरुणींच्या लेस्बियन संबंधांचं उघड, तपशीलवार आणि विलंबित चित्रण. ही होती एका
मुलीच्या प्रेमाची शोकांतिका. या शोकांतिकेला एकापेक्षा अधिक परिमाणं होती. तिच्या
पंधराव्या वर्षी गोष्ट सुरू होते आणि ती पंचवीस वर्षांची होईपर्यंत चालते. तिचं
प्रेम दुसर्या मुलीवर असतं, अन्य कोणाचा विचारही ती करू शकत नाही, त्या मुलीच्या
सहवासासाठी, स्पर्शासाठी ती तडफडत रहाते, हे बघताना लेस्बियन शरीरसंबंध चित्रणाची
आठवण पुसट होते. केवळ पूर्ण नग्न स्त्री शरिरांचं निकट, स्पष्ट सेक्स दाखवणे, या
पेक्षा जास्त अर्थांनी हा चित्रपट ’बोल्ड’ होता. प्रेम म्हणजे काय, प्रेमपूर्ती
म्हणजे काय, शरिराची ओढ म्हणजे वासना का, अशा अनेक प्रश्नांना नवे फाटे फोडत गेला.
आणि अदील एक्सार्शोपुलास हिचं काम अशक्य कोटीतलं होतं. हिचा जो सापडेल तो चित्रपट पाहिलाच
पाहिजे, अशी संवेदनाशीलता तिच्या चेहर्यात आहे.
खरं तर ओपनिंग फिल्मचा
मान मिळालेल्या ’डॉन वॉन्स’ या चित्रपटाचा अपवाद सोडल्यास मी पाहिलेल्या एकजात
सर्व परदेशी चित्रपटांमध्ये पात्रयोजना अचाट होती. हे कलावंत याच भूमिकांसाठी
जन्माला आलेत, असं निःशंकपणे म्हणावं. हे श्रेय अर्थात नटनट्यांबरोबर दिग्दर्शक,
मेकपमन आणि इतर तंत्रज्ञ यांचंही आहे. मी इथे घेतलेला आढावा केवळ चित्रपटांच्या
आशयाशी संबंधित आहे. त्या आशयनिर्मितीला संगीत, प्रकाश, कॅमेरा, एडिटिंग यांनी कसा
हातभार लावला, याबद्दल मी काहीच म्हटलेलं नाही. चित्रपट ही एकूणच अनेकांनी मिळून
घडणारी, व्यामिश्र कला आहे. हे करायचं तर त्यासाठी सगळे चित्रपट पुन्हा बघावे
लागतील!
एवढं गुणगान केल्यावर
अपेक्षाभंगाची उदाहरणं देणं भाग आहे. एकच देतो. ऋतुपर्ण घोष यांच्याबद्दल इतकं
ऐकलं की त्यांचा शेवटचा चित्रपट’ सत्यान्वेषी’ मोठ्या अपेक्षेने पाहिला. अगदीच
टुकार निघाला. एखाद्या चित्रपटाने उडीच छोटी मारायची ठरवली आणि छोटीच मारली, तर
त्याला चूक म्हणता येत नाही. ’सत्यान्वेषी’ आव मोठ्या संवेदनाशील, चतुर, रहस्यमय
गोष्टीचा आणतो आणि यातलं काही एक करत नाही. पंधरा मिनिटांची कथा ताणून दोन तासांत
सांगतो. यातलं रहस्य शाळकरी आहे. यातल्या पात्ररचनेत सुसंगती नाही. यातलं संगीत
कानाला त्रास देतं. रंग तेवढे नेत्रसुखद आहेत. नेमका हा चित्रपट भारतीय निघावा, हे
वाईट आहे; पण खरं आहे. ऋतुपर्ण घोष यांचे इतर चित्रपट बघायची इच्छा उरली नाही.
गेल्या वर्षीसुद्धा
’एलार चार अध्याय’ हा बंगालीच चित्रपट सर्वात भिकार निघाला होता!
No comments:
Post a Comment