Wednesday, December 18, 2013

आमचा नीरो



’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा बहुधा मी पाहिलेला पहिला सेव्हंटी एम एम चित्रपट. मुंबईतल्या ग्रँट रोडच्या नॉव्हेल्टी थिएटरातल्या अजस्त्र स्क्रीनवर ते वाळवंटी नाट्य पहाताना मी थरारून गेलो होतो. त्यातले काही सीन्स अजून आठवतात. पीटर ओटूल आणि एक जण वाळवंटातल्या विहिरीतून पाणी काढत असतात आणि दूरवरून एक ठिपका येताना दिसतो. त्या ठिपक्याची क्षितिजावर काळी ज्योत होते. ज्योतीतून घोडेस्वाराची आकृती उपजते. पीटर ओटूलचा सोबती घाईघाईत बंदूक उचलतो. गोळी झाडल्याचा आवाज येतो. पण येणार्‍या घोडेस्वाराची गोळी सोबत्याला लागून तो मेलेला असतो. ही चित्रपटातली ओमर शरीफची एण्ट्री.
आणखीही आठवतं. ’मला लढाई (की हिंसा?) आवडू लागली आहे,’ असं अत्यंत चिंताग्रस्त होऊन सांगणारा ओटूल आणि ते ऐकताना करमणूक होत असल्यासारखे दिसणारे ब्रिटिश सेनाधिकारी. ’यू आर मीयरअली अ जनरल; आय मस्ट बी द किंग’ असं शक्‍तिमान ब्रिटिश सेनाधिकार्‍याला ऐकवणार्‍या नामधारी अरब राजाच्या भूमिकेतला अलेक गिनेस. नेहमीप्रमाणे रासवट असणारा अँथनी क्विन. त्या लढाया, ते मृत्यू, तो लहानशा भूमिकेतला आय एस जोहर. आणि ह्या भव्य आणि दीर्घ चित्रपटात स्त्रीच नाही, स्त्रीचा एकही चेहरा कधी दिसत नाही, याचं तेव्हा मनोमन वाटलेलं आश्चर्य.

चित्रपटाचा दिग्दर्शक डेव्हिड लीन आणि नायक पीटर ओटूल यांची ओळखही तेव्हाच झाली. मग मी दोघांचे जे येतील ते चित्रपट पहात गेलो. पीटर ओटूलचा फॅन झालो. ’लॉर्ड जिम’ मला आठवतही नाही. काही तरी आफ्रिकेत घडणारी स्टोरी आहे आणि ओटूल तिथल्या लोकांसाठी लढू पहाणार्‍या एका दारुड्या / अपयशी / कन्फ्यूज्ड माणसाच्या भूमिकेत आहे, असं अंधुक आठवतं. ’लायन इन विंटर’ मधली त्याची आणि कॅथरीन हेप्‌बर्नची जुगलबंदी आठवते. पण ’बेकेट’मधली त्याची आणि रिचर्ड बर्टनची टक्कर मात्र अजिबात आठवत नाही. खरं तर ते वय कौतुकाने इंग्रजी चित्रपट बघण्याचं होतं. बोललेलं फारसं समजत नव्हतं आणि तेव्हा सबटायटल्स नसायची. टीव्ही तर नव्हताच. वाचत होतो खूप. ओटूल आणि बर्टन, दोघेही रंगभूमीवरून आलेले, दोघांचीही उत्तम अभिनेते म्हणून कीर्ती आणि दोघांनाही ऑस्कर नाही; हे मात्र नीट आठवतं.


आज जसा रॉबर्ट द नीरो मला निर्विवादपणे सर्वात मोठा वाटतो, तसा तेव्हा पीटर ओटूल वाटायचा. त्याच्या भूमिकांमधलं वैविध्य मोहून टाकायचं. आज विचार करताना ’नाइट ऑफ द जनरल्स’ हा चित्रपट अतिनाट्यमय वाटतो; पण तेव्हा त्यातल्या थंड आणि विकृत जनरल तांझच्या भूमिकेतल्या पीटर ओटूलचं कोण कौतुक वाटलं होतं. आणि या सगळ्या इन्टेन्स, गुंतागुंतीच्या व्यक्‍तिरेखा पाहिल्यावर आला हलका फुलका ’हाऊ टू स्टील अ मिलियन’. त्यात ह्यू ग्रिफिथ आणि एली वाला(च) यांनी धमाल केली होती. आणि पीटर ओटूलबरोबर होती, चक्क ऑड्रे हेप्‌बर्न. तीनेक वेळा पाहिला मी हा चित्रपट. एकट्या ओटूलने हेप्‌बर्नची जुजबी मदत घेत केलेल्या एका फ्रॉड शिल्पाच्या चोरीची गोष्ट बघायला मजा यायची. अजूनही येईल. आता तो गेल्यावर कदाचित लागेल हा चित्रपट कुठेतरी.




पीटर ओटूलचं शेवटचं दर्शन झालं ते (डेव्हिड लीनच्याच) ’द लास्ट एम्परर’मध्ये. राजकुमाराच्या शिक्षकाच्या लहानशा भूमिकेत तो होता. तोच उंच, किडकिडीत आणि तरीही वजनदार व्यक्‍तिमत्त्वाचा पीटर ओटूल. पण आता खूप म्हातारा. बरं नाही वाटलं. तो गेल्याची बातमी वाचताना दुःख हे झालं, की मला, माझ्या पिढीतल्या अनेकांना आपल्या संस्कारक्षम वयातला एक दुवा निखळल्यासारखं होत असताना आजच्या जगाला त्याचा काही सीरियसनेसच नाही! पीटर ओटूल गेला, तर येत्या रविवारी (बहुधा) लेख येतीलच; पण आम्हाला काय होतंय, हे त्यातून कोणाला किती समजेल? तो आमचा नीरो होता, असं सांगितलं तर समजेल?

No comments:

Post a Comment