आपल्याकडल्या सिनेमात
अभिनयक्षमतेपेक्षा नटाच्या - नटीच्या ’प्रेझेन्स’ला - त्यांचा पडद्यावरचा वावर
किती रुबाबदार असतो, त्यांच्या पडद्यावरच्या वावरामधून कसे लाखो प्रेक्षक घायाळ
होतात, याला जास्त महत्त्व असतं. नसीरने अनेक व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाने जिवंत
केल्या असतील; अमिताभला किंवा शहारुखला पाहून जे होतं, ते थोडंच नसीरमुळे होतं? माधुरी
इतकी मोठी सुपरस्टार; किती थोर भूमिका आहेत तिच्या नावावर? स्टार विरुद्ध अभिनेता,
असं हे भांडण नाही. मुद्दा इतकाच आहे की इथे लीजंड होण्यासाठी उत्तम अभिनेता असून
पुरत नाही; प्रेक्षकांच्या हृदयाची तार छेडू शकणारं व्यक्तिमत्त्व असलेलं पुरतं.
म्हणून देव आनंदचा शेवटचा चित्रपट हिट झाला, त्याला तीस वर्षं उलटली, तरी देव आनंद
स्टार असतोच. म्हणून चांगला अभिनेता असूनही फारुख शेख मोठा होत नाही. आणि म्हणूनच
पसतीस वर्षं चित्रपट न करून आणि तसाच मोठा काळ स्वतःला पूर्णपणे लोकांच्या
नजरेपासून दूर ठेवून सुचित्रा सेन लीजंडच रहाते.


’बम्बईका बाबू’मध्ये देव
आनंदचं दुर्दैव असं निघतं, की स्वतःच्या हातून मेलेल्याची इस्टेट हडप करण्यासाठी
तो त्याची जागा घेतो - आणि त्याच्या बहिणीच्या प्रेमात पडतो! आता ती कशी भावाकडे
’तसल्या’ नजरेने पाहील? देव आनंदला त्याची कुचंबणा व्यक्त करणं जमो, न जमो;
समोरची सुचित्रा सेन त्याच्या काळजात कशी कळ उमटवत असेल, हे तिच्याकडे बघताक्षणी
प्रेक्षकाला कळतं. अशा वेळी तिला फारसं काही करावं लागत नाही; तिचं ’असणं’ पुरेसं
ठरतं. अशा प्रकारची गोष्ट आपल्या मेनस्ट्रीम सिनेमात येत नसल्यामुळे ’बम्बईका
बाबू’ लक्षणीय ठरतो. त्यातलं ’साथी न कोई मंजिल’ हे गाणं हृदयाला छेडून जातं.
’ममता’मध्ये तिचा डबल
रोल होता. मोठ्या सुचित्रावर संकटं कोसळतात आणि तिला तवायफ व्हावं लागतं. म्हणजे
ती फार ताठ राहू शकत नाही; पण ’रहते थे कभी जिनके दिलमे’ गाताना ती खचलेली वाटत
नाही; ऐकणार्या अशोक कुमारला नीट नैतिक त्रास देणारी दिसते. तिची मुलगी तर सरळ
सरळ मानी, स्वतःच्या श्रेष्ठत्वाचं पूर्ण भान बाळगणारी. एका ’बाजारू औरत’ला वाचवण्यासाठी
(सुचित्रा सेनच्या उच्चारांनुसार ’बाजाडू औरत’) आपला ’काकू’ का तडफडतोय, हे तिला
समजत नाही. आणि तिच्या तोंडच्या ’बाजारू औरत’ या शब्दांनी अशोक कुमार घायाळ होत
रहातो.
तिच्या एकूण हिंदी
चित्रपटांची संख्या नऊ. मी हे चार पाहिले. आणि खरं तर आमच्या पिढीसाठी ती पारूच.
जी मिळाली नाही म्हणून एखाद्याने दारू पीत पूर्ण बरबाद व्हावं, झिजून झिजून मरून
जावं; अशी अभिलाषेचं सर्वोच्च शिखर असलेली पारू. चंद्रमुखीने कितीही जीव ओवाळला,
तरी जी जखम अजिबातच भरत नाही, अशी ती पारू. सुचित्रा सेन हेच त्या अप्राप्य
आत्मप्रतिष्ठेचं दृश्य रूप.
No comments:
Post a Comment