Tuesday, October 7, 2014

सुरेशच्या काही आठवणी



सुरेशच्या न सांगण्यासारख्या गोष्टी खूपच. सांगण्यासारख्याही आहेत. त्याच्या घरी, म्हणजे वरळीच्या बीडीडी चाळीत गेलो असताना एक गणिताचं पुस्तक दिसलं. लहानसं होतं. त्यात गणिताचे विविध प्रकार समजावून सांगितले होते. मी चाळलं. आणि हरखून गेलो. सुरेश बघत होता. हसला, म्हणाला, ने वाचायला. मी घेऊन आलो. ताबडतोब वाचलं. पुन्हा पुन्हा वाचलं. आपल्याला अंकगणितापलिकडे ऑल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगनॉमेट्री, को-ऑर्डिनेट जॉमेट्री, डिफरंशिअयल-इंटिग्रल कॅल्क्युलस, मेट्रायसेस-डिटर्मिनंट्स (च्यायला, यादी करत गेलो, तर बरेच प्रकार आठवले की!) असे मोजके प्रकार माहीत. त्या पुस्तकात काय काय होतं. सगळं एका फटक्यात पचणारं नव्हतं. मी विचार केला, सुरेशपेक्षा आपल्याच जवळ ते पुस्तक असणं बरोबर आहे. सहा महिन्यांनी सुरेशने पुस्तक मागितलं. म्हणाला, साल्या, मी विसरीन असं वाटलं काय? मला काय त्याची किंमत कळत नाही?

सतीश तांबे म्हणतो, ते शंभर टक्के खरं. सुरेशशी त्याच्या जातीबद्दल पूर्ण मोकळेपणाने बोलता यायचं. खरं तर आमच्या सर्वांबद्दल हे म्हणता येईल. त्यामुळे सुरेशलाही आमच्यात जास्त मोकळं वाटत असावं.

सुरेशला भन्नाट कल्पना सुचत. एकदा म्हणाला, मुंबईत घरांचा इतका प्रॉब्लेम. मी एक लहान बोट विकत घेणार आहे. वर्सोव्याच्या किनार्‍यावर लावायची. सकाळी समुद्रातून नरिमन पॉइंटला न्यायची. ऑफीस सुटलं, की बोटीत बसून परत वर्सोवा. बोट हेच घर. किती सोयीचं होईल.

पद्मा कौटुंबिक होती. काही वर्षं ते माझ्या जवळ रहात. पद्मा घरी बोलवायची. मीही दोनेकदा गेलो. माझ्या बिल्डिंगमध्ये पद्माची एक कलीग रहायची. त्यांच्याकडे गणपतीला आली, की पद्मा माझ्या घरी येत असे. एकदा स्टेशनमधून बाहेर पडत असताना एका भरघोस दाढीधारी दांडगट माणसाने माझ्या वाटेत आडवा हात घातला आणि मला रोखलं. सुरेश! पुष्कळ वर्षांनी भेटलो. गप्पा मारल्या. त्याच्याकडे नेहमी सांगण्यासारखं खूप असायचं. सांगून, ऐकून झालं; बरं वाटलं. पण "घरी येतोस?" किंवा "चल, तुझ्या घरी जाऊ" असं कोणीच म्हणाला नाही!

काही वर्षं सुरेश जव्हार शाखेत होता. तो भाग मी तोवर पाहिला नव्हता. म्हणाला, ये. मी असेपर्यंत आलास तर फिरू. जाणं झालं नाही.

एकदा भेटला, तेव्हा हात बँडेजमध्ये होता. पण काय झालं सांगितलं नाही.

जाऊदे. न सांगता गेला, हे काही त्याने बरोबर केलं नाही. आणि मी लिहीत राहिलो, तर नको ते लिहीन. तो शेवटचा केव्हा भेटला, आठवतही नाही. पण त्याचा काय़ संबंध? कधीही भेटला, तरी जवळचा मित्रच होता. सुरेश आणि पद्मा. काय जोडी होती!


No comments:

Post a Comment