Thursday, January 22, 2015

गांधी


उद्या संध्याकाळी ’महात्मा गांधी आणि वर्तमान’ या विषयावर परिसंवाद आहे. या निमित्ताने मनात ’गांधी’ या विषयावर जे काही बाही येत असतं, त्यातलं थोडं इथे उतरवण्याचा प्रयत्न करतो.

’आज गांधी असते तर?’ किंवा ’आजच्या संदर्भात गांधीविचार किती सुसंगत आहे’ अशा प्रकारचे प्रश्न सततच उभे केले जात असतात आणि उभे करणार्‍याच्या कलानुसार त्यांची बरीवाईट उत्तरं दिली जात असतात. यातला एक वर्ग गांधींविषयी कसलाही पुरावा न देता वाटेल ते आरोप करत असतो किंवा तोंडाला येईल ते भकत असतो. त्यांच्या आरोपांना कितीही उत्तरं दिली, त्यांची विधानं सप्रमाण खोडून काढली तरी त्यांना फरक पडत नाही कारण त्यांचा उद्देशच मुळी अपप्रचार, हा असतो. ते मूर्खपणा करत नसतात पण त्यांच्या तोंडाला लागण्यात वेळ दवडणे म्हणजे मूर्खपणा होय.
गांधीवाद, असा एक शब्दप्रयोग ऐकिवात आहे. हा शब्दप्रयोग प्रचलित होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍या लोकांचा एक वर्गच बराच काळ अस्तित्वात होता, ज्याचे तुरळक अवशेष आजही सापडतात. गांधी हे व्यक्‍तिमत्त्व अतिशय प्रभावी असल्याने आणि त्याला उच्च नैतिक मूल्यांची प्रभा असल्याने स्वतःला गांधींचे अनुयायी वा गांधीवादी म्हणवणे ही या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट होती आणि आहे. पण समाजवाद, भांडवलवाद यांसारखी गांधीवाद ही एक पोथीबद्ध आर्थिक-सामाजिक विचारसरणी नसली तरी गांधींनी इतक्या विविध विषयांवर मतं व्यक्‍त केली आहेत आणि त्यांचं जगणं त्यांच्या विचारांशी इतकं सुसंगत राहिलं आहे की वेगवेगळ्या संदर्भात ’मी गांधीवादी आहे,’ असं अनेक जण ठामपणे म्हणू शकतात. मात्र स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍या सगळ्यांच्या एकूण स्वरूपात पूर्ण सुसंगती असेलच, असं नाही. एक गोष्ट खरी की कोणत्याही प्रश्नाला भिडताना पूर्णपणे देशी चौकटीतून विचार गांधींनी जेवढा केला तेवढा अन्य कोणीही भारतीय पुढार्‍याने वा विचारवंताने केलेला नाही.

’गांधी’ म्हटल्यावर ताबडतोब काय आठवतं, या प्रश्नाला अर्थातच एक उत्तर नाही. अहिंसा, सत्याग्रह, नयी तालीम, चरखा, स्वच्छता, धार्मिकता, टाइम मॅनेजमेंट, सत्याचे प्रयोग, सेक्सचे प्रयोग, हिंद स्वराज, पारदर्शी वर्तन, ग्राम स्वराज, पंचा, उपोषण, देशीयता, फाळणी, ... किंबहुना एका नावाशी इतके वैविध्यपूर्ण पैलू जोडलेले असण्याचं दुसरं उदाहरण सापडणं अवघड. यात काय नाही याचंही उत्तर ढळढळीत आहे : कला! गांधींनी कोणत्या विषयावर कधी, कुठे काय म्हटलं, याचं उत्तम संकलन जरी उपलब्ध असलं तरी संगीत, चित्रकला, साहित्य, चित्रपट असल्या विषयांवर गांधी काय म्हणाले, हे शोधणं मुष्किल आहे. या विषयांवरची त्यांची मतं सामाजिक, नैतिक स्वरूपाची आहेत; ढोबळ आहेत. कलेच्या आत शिरणारी नाहीत. त्यामुळे कुणी कलावंत स्वतःला ’गांधीवादी कलावंत’ म्हणवून घेत असेल, तर त्याला वा तिला नेमकं काय म्हणायचं आहे, हे कळणार नाही.

पण कला सोडून दिली तरी खूप गांधी उरतो. त्याची चर्चा आपल्याला करता येईल. गांधींनी या देशाला अहिंसा शिकवली का? मुळात गांधींनी अहिंसा हे तत्त्व टॉल्स्टॉयकडून मिळवलं. हिंसेचा मुकाट स्वीकार, असं स्वरूप ना टॉल्स्टॉयना अभिप्रेत होतं, ना गांधींना. उलट अहिंसा हा हिंसेचा सर्वोत्तम प्रतिकार होय, असं ते मानत. अन्यायाचा प्रतिकार अजिबात न करण्यापेक्षा हिंसा करणं श्रेयस्कर, असं त्यांनी म्हटलं आहे. गांधींची सविनय कायदेभंग ही धोरणनीती त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वातूनच उगम पावलेली आहे. ’अमुक कायदा मला अन्यायकारक वाटतो, म्हणून तो मी मोडणार आहे; पण कायदा मोडणे हा प्रशासकीय नियमांनुसार गुन्हा असल्यामुळे मला सजा व्हायला हवी. आणि मी हा गुन्हा अजाणतेपणी न करता पूर्ण भानावर राहून जबाबदारीने करत असल्यामुळे मला जास्तीत जास्त सजा व्हायला हवी,’ असं अगोदरच सांगण्याची भूमिका म्हणजे सविनय कायदेभंग. ज्या प्रशासनाचा दावा ’कायद्याचं राज्य’ चालवण्याचा असेल, त्याला असल्या प्रतिकारासमोर किती असहाय्य होत असेल, हे सांगायला नको. ब्रिटीश सत्तेला या खंडप्राय देशातल्या गरीब आणि निःशस्त्र अशा जनतेकडून जबरदस्त आव्हान उभं करण्यात गांधी यशस्वी झाले ते त्यांच्या अहिंसा या अमोघ शस्त्राच्या बळावर.

आजच्या काळात अहिंसा हे हत्यार प्रभावी ठरेल का? ओसामा बिन लादेन किंवा प्रभाकरन यांच्यासारख्या क्रूर दहशतवाद्यांसमोर ठरणार नाही, हे तर उघड आहे. गांधींनंतरचा अहिंसक प्रतिकाराचा सर्वात मोठा लढा म्हणजे मेधा पाटकरांचं नर्मदा बचाव आंदोलन. त्याची काँग्रेस सरकारने काय वासलात लावली, हे आपण पाहिलं. आदिवासी बेघर झाले, आयुष्यातून उठले तरी चालेल; बिगरआदिवासींचं कल्याण झालंच पाहिजे, कारण बिगरआदिवासींचं हित म्हणजेच देशहित. आणि देशहितासाठी बलिदान करणं ही वास्तविक अभिमानाची गोष्ट आहे, हे आदिवासींनी जाणलं पाहिजे!

आता मोदी सरकारच्या काळात सरकारला कोणाचीही जमीन काढून घेण्याचा आणि ती कधीही परत न करण्याचा अधिकार कायद्यानेच मिळाला आहे. आज गांधी असते, तरी त्यांना या निगरगट्ट सरकारच्या बाबतीत काहीतरी वेगळं करावं लागलं असतं. काळ बदलला, सरकार बदललं, अहिंसा आणि सविनय कायदेभंग यांनाही बदलायला हवं.

मात्र नक्षलवादी हिंसेचा पर्याय गांधींनी नाकारलाच असता. अरुंधती रॉय जरी नक्षलवाद्यांना ’हाती बंदूक घेतलेले गांधीवादी’ म्हणाल्या असल्या तरी.

नयी तालीम म्हणजे हात वापरत शिकणे. ज्या प्रकारची शिक्षणपद्धती गांधींना अभिप्रेत होती, तशी सेवाग्राममध्ये होती. ती पद्धती जशीच्या तशी आज लागू करावी, असं कट्टर गांधीवादी सोडून कुणी म्हणणार नाही; पण आपल्या देशाच्या गरजांना अनुरूप, आपल्या देशातील जनतेला, विशेषतः बालकांना यूजर फ्रेंडली वाटेल, असं स्वरूप शिक्षणपद्धतीचं असावं, हा खरं तर अतिगंभीर विचार नाही; हा कॉमनसेन्स आहे. पण किंडर गार्टन, माँटेसरी, अशा बालशिक्षणाच्या पद्धतींचं बरंवाईट अनुकरण करणार्‍या आपल्या धोरणांमध्ये गांधीविचारांना जागा नाही!

गांधींच्या मनातली अर्थव्यवस्था गावाला एक स्वयंपूर्ण एकक बनवणारी होती. आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या, जागतिकीकरणाच्या युगात ही संकल्पना हास्यास्पद ठरेल. पण दिवसेंदिवस नवं तंत्रज्ञान आणि नवीन अर्थधोरणं बेरोजगारांच्या संख्येत भर घालत असताना प्रत्येक धडधाकट माणसाच्या हातांना काम देणे, हे आव्हान जगभरच्या राज्यकर्त्यांना भेडसावतं आहे. गांधी म्हटल्यावर चरखा आठवणार्‍यांना हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की गांधींनी विशिष्ट विचार करून चरखा शोधला; तो त्यांच्यासोबत अगोदरपासून नव्हता. बहुतेक शेतकरी शेतीचा हंगाम संपला की मोकळे असतात, त्यांना काम नसतं. म्हणजे ते तेव्हा उत्पादक नसतात; पण उपभोक्‍ता असतातच. त्यांना स्वतःचा गाव न सोडता, मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता न लागता कोणतं उत्पादक काम देता येईल, ज्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल देशातच सहजी उपलब्ध असेल; या विचारातून गांधींनी शोध घेतला आणि समोर आलेल्या अनेक पर्यायांमधून चरख्याची निवड केली. गावोगावी, घराघरात चरखा असावा; त्यावर घरातल्यांनी सूत कातावं, त्यातून विणलेल्या कापडाच्या विक्रीतून पैसा मिळावा आणि खेड्यातल्या सर्वसामान्य माणसाकडे क्रयशक्‍ती निर्माण व्हावी, असा विचार चरख्यामागे होता. गांधी नावाच्या बनियाला हेसुद्धा कळत होतं की चरख्याच्या सुतामधून तयार झालेले कपडे जाडेभरडे असणार, बाजारातल्या इतर सुती कपड्यांशी स्पर्धा करण्यात कमी पडणार. म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना खादी वापरणं सक्‍तीचं केलं. खादीवापराला देशभक्‍तीशी जोडून दिलं. गावात पैदा होणारी खादी शहरात खपावी म्हणून खादीचा जोरदार प्रचार होईल, शहरी लोकांच्या नजरेत खादी ग्लॅमरस होईल, अशी व्यवस्था उभी केली! साठ सालच्या अगोदरचा सिनेमा पहा; त्यातला नायक जर आदर्शवादी असेल, तर तो खादीधारक असेलच असेल.

चरखा, सूतकताई, खादी यांची टिंगल करणं सोपं आहे; अर्थकारणाचा असा जनताभिमुख विचार आणखी कोणी केला आहे? भारतात जागतिकीकरणाची पहाट झाल्यानंतर मध्यमवर्गाच्या एका भागात पैसा आला; पण रोजगारनिर्मिती मंदावली, विषमता वाढली. वर्षाला लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना चरख्यासारख्या संकल्पनेची नितांत गरज आहे. आज गांधींची तोंडदेखली आठवण निघते; क्रियाशील आठवण निघण्याची गरज आहे.

तोंडदेखल्या आठवणीवरून आठवलं: पंतप्रधान मोदींनी गांधींचं नाव घेत देशभरात स्वच्छता मोहीम सुरू केली आणि राजकीय पुढारी, फिल्म स्टार हाती झाडू घेते झाले. गांधींनी काय केलं होतं? स्वच्छता तर त्यांना प्रिय होतीच. पण त्यांनी जे केलं, त्याचा आशय स्वच्छतेच्या किती तरी पुढे जाणारा होता. गांधींनी साबरमती आश्रम काढला तेव्हा त्यांचं नाव मोठं झालेलं होतं आणि त्यांच्या सोबत, त्यांच्या आश्रमात रहायला अनेक लोक उत्सुक होते. आश्रमात रहाण्यासाठी एक अट अशी होती की संडास साफ करावा लागेल! मुंबईसारख्या शहरात ओनरशिप ब्लॉक आल्यानंतर इथला मध्यमवर्ग संडास साफ करायला शिकला. त्या अगोदर चाळींमधले संडास फक्‍त भंगी साफ करत. आणि वरच्या वर्गात, जिथे ओनरशिप ब्लॉकची व्यवस्था रूढ झालेली नाही, तिथे आजही या घाणेरड्या कामाला कोणी उच्चवर्णीय हात लावत नाही. मोदींचं अनुकरण करणार्‍यांपैकी एकानेही संडास साफ केला नाही. गांधींनी एका फटक्यात स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलं आणि त्याच वेळी वरची जात - खालची जात हा किंवा चांगलं काम - घाणेरडं काम हा भेद - तात्त्विकदृष्ट्या नव्हे, तर प्रत्यक्षात - नष्ट करून टाकला. त्यांच्या पत्नीने जेव्हा ते काम करण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी तिला स्वच्छ सांगितलं, इथे रहायचं असेल, तर हे काम करावं लागेल; अन्यथा तू दुसरीकडे जाऊन रहा!

आज झाला आहे का हा भेद नष्ट? आज नाही का असल्या उपक्रमाची गरज? उचलणार का मोदी असलं अर्थपूर्ण पाऊल?

जातिभेदावरून आपसूकच गांधीच्या आणखी एका कृत्याची आठवण येते. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना गांधींनी ’हरिजन’ असं नाव दिलं. तसंच आदिवासींना त्यांनी ’गिरिजन’ म्हटलं. नुसती नावं देऊन ते थांबले नाहीत. ठक्करबाप्पांसारखे समाजसेवक गांधींच्या प्रेरणेने आदिवासींमध्ये काम करू लागले. आदिवासी म्हणजे ’समाज’ नव्हे, ते कोणी तरी जंगलवासी, जंगली आहेत, या समजुतीला तडा देण्याचा कृतीशील प्रयत्न गांधींनी केला. गांधींनी काढलेल्या नियतकालिकाला ’हरिजन’ हे नाव त्यांनी दिलं. अस्पृश्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचाच हा प्रयत्न होता.

पण दलितांमध्ये आंबेडकर जन्मले आणि आंबेडकरांनी दलितांना अस्मिता दिली, स्वाभिमान दिला. हिंदुधर्मात समानतेची वागणूक मिळणं शक्य नाही, हे पटल्यावर आंबेडकरांनी धर्मांतराची हाक दिली आणि त्यांच्यापाठोपाठ लाखो पूर्वाश्रमीचे अस्पृश्य बौद्ध झाले. त्यांनी धार्मिक रूढीतून करावी लागणारी, खालचं स्थान दाखवून देणारी कामं बंद केली. सहाजिकच त्यांना गांधींनी दिलेलं नाव त्यांचा वेगळेपणाच स्पष्ट करणारं आणि म्हणून अपमानास्पद वाटू लागलं. आंबेडकरांमुळे गांधींच्या कृत्याला करुणेच्या ऐवजी ’वरच्याने खालच्याला दाखवलेली दया’ हा रंग प्राप्‍त झाला. नवबौद्धांना गांधीप्रणीत करुणेची गरज उरली नाही! उद्या आदिवासींमध्ये जर कुणी आंबेडकर जन्मला, तर तिथेही असंच होईल. गांधींच्या प्रयत्नाचं खुजेपण स्पष्ट होईल.

मग या संदर्भात गांधी खुजे होते का?

मला असं म्हणावंसं वाटत नाही. आंबेडकर एकूण भारतीय जनतेतल्या एका समाजघटकाचे नेते होते. गांधींचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा होता. आणि कितीही चुकीचं असलं तरी बहुसंख्य उच्चवर्णियांना कितीही समजावलं तरी ते त्यांची जातीय अस्मिता त्यागणार नाहीत, हे गांधींना समजत होतं.

याहूनही स्पष्ट शब्दांत मांडायचं तर गांधीच्या प्राधान्यक्रमात अस्पृश्यतानिवारणाच्या वरही काहीतरी होतं. स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे सहसा गांधींविषयी चांगलं बोलत नाहीत. त्यांना गांधी हा शत्रुपक्षाचा प्रतिनिधी वाटतो. मग ते पुणे करारापासून पुरावे मांडू लागतात. पण गांधींनी अस्पृश्यतानिवारणाला कमी लेखलं नसलं तरी त्यांच्या प्राधान्यक्रमात अस्पृश्यतानिवारणाला सर्वोच्च स्थान नव्हतं, हेच आणि एवढंच खरं. अस्पृश्यतानिवारणासाठी देशाची, समाजाची अखंडता पणाला लावण्याची गांधींची तयारी नव्हती.

देशातली आणि महाराष्ट्रातली आजची स्थिती आपल्यासमोर आहे. प्रश्न गांधी बरोबर की आंबेडकर हा उरलेला नाही. अजून किती काळ सामाजिक स्थान जन्मावरून ठरणार, अजून किती काळ माझ्यासमोरचे रोजगाराचे पर्याय माझ्या जन्मदत्त जातीवरून ठरणार, हा आहे. परवाच प्रसिद्ध झालेला अस्पृश्यता पाळण्याविषयीचा अहवाल या संदर्भात बोलका आहे. ’घरवापसी’ असं गोंडस नाव देत हिंदू धर्मात परत आणलेल्यांना त्यांची पूर्वीचीच जात देण्यात येईल, हे प्रतिपादन गांधींना पडलेली मर्यादा आजही स्पष्ट करत आहे.

हिंद स्वराज. माझ्यासारख्याच्या महानगरी मानसिकतेसाठी गांधींच्या एकूण एक मांडणीमधला पचायला सर्वात अवघड भाग. या पुस्तकात गांधींनी पश्चिमी विकासाच्या संकल्पनेची, तंत्रज्ञानाची, एकंदर आधुनिकतेची कडवट निंदा केली आहे. १९०८ साली लिहिलेल्या या पुस्तकातील ओळन्‌ ओळ आजही मला मान्य आहे, असं ते १९३८ साली म्हणाले. रेल्वे कशाला पाहिजे, आधुनिक वैद्यकशास्त्र कशाला पाहिजे, असले सवाल त्यांनी या पुस्तकात उभे केले आहेत. मानवी अस्तित्वाचं प्रयोजन काय, इथपर्यंत ते जातात आणि सुखसोयी प्राप्‍त करण्याच्या दिशेने चाललेला ’प्रगती’चा मार्ग नाकारतात. एक प्रकारे ज्ञानपिपासेचा आजचा अर्थ नाकारतात. मनःशांती, ईश्वरप्राप्‍ती, हेच मानवी जीवनाचं इप्सित, असं प्रतिपादतात. आज जे देश आधुनिक अर्थाने प्रगतीच्या शिखरावर आहेत, त्या देशांमधले नागरीक सुखी नाहीत, यावरून किंवा आज जगभर विषमता, पर्यायाने दुःख वाढत आहे, यावरून गांधींच्या प्रतिपादनात तथ्य आहे, असं म्हणण्याचा मोह होईल. पण ते खरं नाही. उलट, निसर्गोपचाराची कास सहसा न सोडणारे गांधी, आधुनिक विज्ञानाच्या एवढे विरोधी होते, तर चष्मा तरी का घालत होते, असं विचारावंसं वाटतं. वैज्ञानिक प्रगतीच्या पश्चिमी आविष्कारातूनच चष्मा घडला आहे. तो हवा, तर त्याला जोडून त्या सार्‍या प्रगती-संकल्पनेचं लटांबर स्वीकारावं लागतं. चष्मा सुटा काढता येत नाही.

पण गांधींइतका ’देशीय’ माणूस नाही! कोलकात्याला नवीन उघडलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या उद्‌घाटनाला त्यांना बोलावलं. तिथल्या भाषणात ते म्हणाले, "माझ्या ओळखीच्या पन्नास डॉक्टरांना मी ’गूळ’ या पदार्थाची रासायनिक रचना विचारली. आनंदाची गोष्ट अशी की सर्व पन्नास डॉक्टरांनी माझ्या पत्राला उत्तर दिलं. आणि दुःखाची गोष्ट अशी की सर्व जणांचं उत्तर ’माहीत नाही’ असं होतं. आपल्या रोजच्या जेवणात असणार्‍या, अतिपरिचयाच्या या पदार्थाची रचना आपल्याला माहीत नाही! कोणी शोधून काढण्याचा प्रयत्न केला नाही!"

त्यांचं म्हणणं होतं, की शिक्षणाचा संबंध जगण्याशी हवा आणि वैद्यकशास्त्राचा संबंध अर्थात आपल्या जीवनशैलीशी हवा. तसा जर तो नसेल, तर इथल्या दुखण्याचं निदान आपण कसं काय करणार?

यात तर शंभर टक्के तथ्य आहे! आजही आहे. आणि आजचे डॉक्टर तेव्हाच्या तुलनेत किती ’शहाणे’ झालेत, याची खात्री नाही.

असं खूप बोलत रहाता येईल. केवळ गांधीमुळे स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात सहभाग घेता आला आणि सार्वजनिक जीवनात स्त्रीच्या असण्याला इथे मान्यता मिळली. हा एकोणऐंशी वर्षे वयाचा, स्वतःला धार्मिक म्हणवणारा माणूस जितका काळ जिवंत राहील, तितका काळ आपल्या हिंदुत्वाला लोक विचारणार नाहीत, या जाणिवेतून त्यांचा खून झाला. गांधींची टाइम मॅनेजमेंट थोर होती. बसून बोलताना ते चरख्यावर सूत कातत. भेटायला येणार्‍यांना सकाळी चालायला गेले असताना भेटत. त्यांचा सचिव ’या दगडापासून त्या झाडापर्यंत’ अशी मर्यादा भेटणार्‍याला घालत असे. गांधींइतका पारदर्शी राजकीय पुढारी झाला नाही. इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी गेले असताना ते रोज बाहेर येऊन काय चर्चा झाली, काय ठरलं हे जाहीरपणे सांगत. त्यांच्या स्वदेशी चळवळीमुळे ब्रिटनमधल्या कापडधंद्यावर अरिष्ट आलं. तिथल्या कामगारांचं काम कमी झालं. तर हा माणूस ब्रिटनला गेला असताना आवर्जून कापडकामगारांना भेटायला गेला आणि त्यांना बहिष्कारामागची कारणं समजावून सांगितली. पटवूनही दिली! फाळणीला त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला आणि स्वातंत्र्य मिळालं म्हणून देशभर झालेल्या जल्लोषात त्यांचा सहभाग शून्य होता. स्वतःच्या आत्मकथेला त्यांनी ’सत्याचे प्रयोग’ असं नाव दिलं आणि स्वतःच्या चुकांचा पाढा वाचला.

गांधींना लोकांनी ’महात्मा’ हे बिरुद बहाल केलं. त्यांची आत्मकथा वाचली, की कळतं, हा माणूस महात्मा म्हणून जन्मला नाही. या माणसाने खूप चुका केल्या. आणि तो प्रत्येक चुकीमधून शिकत गेला. स्वतःमधल्या त्रुटी त्याने लपवून ठेवल्या नाहीत. तो वाढत गेला आणि वाढता वाढता महात्मा झाला. त्याने एक प्रकारे दाखवून दिलं की महात्मा होणं आपल्या हातात असतं. त्यासाठी दोनच गोष्टी लागतात. एक, ध्येयाविषयी स्पष्टता. आणि दोन स्वतःवर अढळ विश्वास. आपण जर महात्मा होऊ शकत नसलो, तर त्याचा अर्थ या दोनांपैकी काही तरी आपल्यात नाही. किंवा दोन्ही नाही; आपल्याला महात्मा होण्याची इच्छाच नाही. महात्मापद दूर राहिलं, जन्मभर शिकत राहून स्वतःमधल्या त्रुटी दूर करत रहाता आलं, तरी स्वतःला गांधीवादी म्हणवण्याचा अधिकार प्राप्‍त होईल. या अर्थी मला गांधीवादी होण्याची इच्छा आहे. बघूया जमतंय का.

No comments:

Post a Comment