लालू प्रसाद यादव. भ्रष्टाचाराचं
प्रतीक. बिहारातल्या जंगल राजचा प्रणेता.
ही एवढीच आहे का त्यांची
ओळख?
लालूंनी बिहारात सत्ता
हस्तगत केली, ती काँग्रेसच्या जगन्नाथ मिश्रांकडून (लालूंना सजा झाली, त्याच
घोटाळ्यात जगन्नाथ मिश्रा यांनाही झाली; लालूंना पाच वर्षं, मिश्रांना चार वर्षं).
’पिछडा पावे सौ मे साठ’ या घोषणेद्वारे. ही वाट यादवांबरोबर इतर पिछड्यांना दाखवून
लालू सत्तेवर आले आणि दोन वेळा निवडून आले. चारा घोटाळा प्रकरणात ते अडकले आणि
त्यांना राजीनामा द्यावा लागला. पण स्वतः राजीनामा देत त्यांनी स्वतःच्या अर्धांगिनीला
मुख्यमंत्री करून एक प्रकारे न्यायप्रक्रियेची थट्टाच केली.
सत्ता मिळवताना लालूंनी अगोदरपासून
मागास, दरिद्री असलेल्या बिहार या राज्यात उच्चवर्णियांची सत्तेवरची पकड मोडून काढली
आणि सामाजिक न्यायाचा तराजू योग्य दिशेने सरकवला. पण नंतरच्या काळात जातींच्या
उतरंडीत मध्यम स्थानी असलेल्या यादवांनी खालच्या जातींवर चालू केलेली अरेरावी
थोपवणं लालूंना जमलं नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांची हार झाली. त्यांना हरवून
भाजपच्या सहकार्याने सत्तेवर आलेल्या नितीश कुमारांनी लालूंच्या काळात बोकाळलेल्या
अनागोंदीला बांध घालण्याला प्राधान्य दिलं. मग हळू हळू पायाभूत सोयीसुविधा आणल्या.
कायदा आणि सुव्यवस्था स्थापन झाल्यावर पिछड्या जातींच्या कल्याणाच्या योजना सुरू
केल्या. शाळा काढल्या. मुलींना सायकली वाटल्या. नितीश कुमारांच्या काळात बिहारातील
गरिबी निर्मूलनाचा वेग महाराष्ट्र आणि गुजरातसकट सार्या देशातल्या कुठल्याही
राज्यापेक्षा सातत्याने अधिक राहिला आहे.
नितीश कुमारांनी
आणलेल्या या विकासाच्या धडाक्यामुळे अगोदरच्या लालूराजचा रंग अगदीच विद्रूप वाटू
लागला. आणि लालूंच्या त्या कारकीर्दीला नाव देण्यात आलं, ’जंगल राज’. चारा घोटाळा
प्रकरणात सीबीआय कोर्टाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आणि
त्यांना तुरुंगात जावं लागलं. भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना पुढील
सहा वर्षं निवडणूक लढवण्यास मनाई झाली. पण त्याहून मोठं म्हणजे लालूंचं नाव
भ्रष्टाचाराचं प्रतीक म्हणून ठरवून टाकणं सोपं झालं. आज बिहारच्या निवडणुकीच्या
संदर्भात या दोन गोष्टींचा उल्लेख वारंवार होतो आहे: एक, लालूसारख्या भ्रष्ट
नेत्याच्या पक्षाला बिहारी जनतेने विधान सभेतील सर्वात मोठा पक्ष बनवलं आहे; आणि
दोन, लालूंच्या काळचं जंगल राज बिहारी जनतेला पुन्हा यायला हवं आहे का?
यातून माझी एक आठवण जागी
होते. २००२ साली गुजरातेत झालेल्या मुसलमानांच्या कत्तलीनंतर काही वर्षांनी नरेंद्र
मोदी मुख्यमंत्री असताना, मी एकदा अहमदाबादला गेलो होतो. जिच्याबरोबर गेलो
होतो, तिच्या परिचयाच्या एका मुसलमान कार्यकर्त्याची तिथे भेट झाली. त्याने तिथल्या
मुसलमान वस्तीच्या दशेचं वर्णन करून एकूण गुजरातेतला विकास कसा असंतुलित आहे, हे
सांगितलंच; पण पुढे तो ठामपणे म्हणाला, आम्हाला
पुन्हा मोदीच निवडून यायला हवे आहेत!
आश्चर्य वाटून मी
विचारलं, का? मोदींच्या काळात भयंकर कत्तल झाली ना मुसलमानांची?
तो उत्तरला, होय,
म्हणूनच ते पुन्हा निवडून यायला हवे आहेत. मोदींच्या नावाला त्या कत्तलीचा जो कलंक
चिकटला आहे, तो आता त्यांना फार डाचू लागला आहे. तसला प्रकार पुन्हा झालेला त्यांना
मुळीच चालणार नाही. त्यामुळे राज्यावर असताना हिंदु-मुसलमानांच्यात जराही दंगल,
हिंसाचार ते होऊ देणार नाहीत. मोदी आले, तर आमच्या जिवाला धोका नाही!
आज लालूंची स्थिती अगदी
तशीच आहे. देशपातळीवर राजकारण करू इच्छिणार्या लालूंना नितीश कुमारांबरोबर सत्ता सांभाळताना ’जंगल राज’ किंवा भ्रष्टाचार यांचा
प्रादुर्भाव पुन्हा झालेला मुळीच परवडणारा नाही. उलट, रेल्वे
मंत्रालयातल्या लखलखीत कारकीर्दीची आवृत्ती बिहारात काढून दाखवण्याचा प्रयत्न ते
करतील.
तो सुद्धा माझा अनुभवच.
१९८१ साली मी नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशात रहायला गेलो. पाच वर्षं राहिलो. पुढे माझी
मुलगी आंध्र प्रदेशातल्या मदनपल्लीजवळच्या ऋषि व्हॅली स्कूलमध्ये शिकायला गेली. ती
तिथे सहा वर्षं होती. अधल्या मधल्या नंतरच्या काळात माझ्या हिमालयात, वगैरे सफरी
चालू होत्याच. म्हणजे मी रेल्वेने भरपूर प्रवास करत आलो आहे. भारतीय रेल्वेतील बदल
मी पहात आलो आहे. म्हणून मी निःशंकपणे म्हणू शकतो, की भारतीय रेल्वे आधुनिक कोणी
केली असेल, तर ती लालूंनी. लालूंच्या काळात आरक्षणप्रणाली सुधारली. प्लॅटफॉर्म्स चकचकीत
झाले. वेटिंग रूम्स सुधारल्या. रेल्वेतलं जेवण रुचकर झालं, रेल्वेच्या सेवेत
टापटीप आली. ’अपग्रेडेशन’ची पद्धत सुरू झाली. प्लॅटफॉर्मवर मोबाईल चार्जिंग,
एसटीडी, वगैरे सोयी उपलब्ध झाल्या (त्या महाराष्ट्रात सर्वात शेवटी का झाल्या, हे
माहीत नाही).
लालूंनी तोट्यातली
रेल्वे फायद्यात आणली. आणि तरीही त्यांच्या कारकीर्दीत एकदाही भाडेवाढ झाली नाही!
त्यांनी दाखवलेला फायदा भ्रामक होता, असं नंतर म्हटलं गेलं; पण त्यांच्या सफाईदार
व्यवस्थापनाचा अभ्यास हार्वर्डसारख्या नामांकित विद्यापिठांनी केला, तेव्हा तसं
काही बाहेर आल्याचं ऐकिवात नाही. रेल्वेत लालूंनी चमत्कार घडवला!
आज याची आठवण अजिबात
निघत नाही. कारण लालू यादव हा
मनुष्य शहरी लोकांना, पांढरपेशांना, उच्चवर्णियांना अजिबात आवडत नाही.
त्याच्याबद्दल काहीही चांगलं बोलण्याची इच्छा त्यांना होत नाही.
याला दोन कारणं आहेत. एक
म्हणजे, शहरी (आणि पांढरपेशा आणि उच्चवर्णीय) रहाणी, शहरी (आणि पांढरपेशा आणि
उच्चवर्णीय) वाणी, शहरी (आणि पांढरपेशा आणि उच्चवर्णीय) शिष्टाचार यांना लालू
जराही धूप घालत नाहीत. राष्ट्रीय पातळीवरचा दुसरा कुठलाही नेता असं करत नाही. आणि शहरी
(आणि पांढरपेशा आणि उच्चवर्णीय) लोक तर खुशाल गृहीत धरत असतात की ग्रामीण,
कष्टकरी, निम्न जातीच्या लोकांपेक्षा ते बुद्धी, व्यवहार, वगैरे बाबतीत वरचढ आहेत.
या बाबतीत कसलीही शहानिशा करण्याचं त्यांच्या मनात बिलकुल येत नाही. उलट, याबद्दल
कोणी शंका घेतल्यास त्यांना राग येतो!
याचमुळे
शहरी (आणि पांढरपेशा आणि उच्चवर्णीय) मूल्यांना जवळच्या अशा व्यवस्थेला लालू हा
मनुष्य सर्वात धोकादायक वाटतो. लालूंचा गावरानपणा त्यांच्या सांस्कृतिक
वर्चस्ववादाला उघड आव्हान देतो. लालूंच्या बाबतीत ’कोणीही चालेल, लालू चालणार
नाही’ अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. म्हणून मग लालूंना पद्धतशीरपणे बाजूला
सारण्याचं राजकारण जन्म घेतं. हे दुसरं कारण.
उघड आहे, की हे राजकारण
शहरी (आणि पांढरपेशा आणि उच्चवर्णीय) वर्गावरच काम करतं. गावकर्यांवर या
राजकारणाचा प्रभाव पडण्यासाठी ग्रामीण लोकांना शहरी (आणि पांढरपेशा आणि
उच्चवर्णीय) लोकांविषयी विवेकशून्य आदर वाटण्याची स्थिती निर्माण करावी लागते. तशी
करता आली नाही, की मग गोंधळ होतो. ’ते’ कसा विचार करतात, हे कळेनासं होतं. "या
बिहारच्या लोकांना जंगल राज हवंय का? त्यांना भ्रष्टाचार प्रिय आहे का?" असले प्रश्न
पोटतिडिकीने विचारावेसे वाटतात. पण आपल्या भोवताली आपल्यासारख्याच लोकांनी चालवलेल्या भ्रष्टाचाराकडे,
अनागोंदीकडे बघावंसं वाटत नाही!
व्यापम घोटाळ्याची
व्याप्ती माहीत असताना; प्रमोद महाजन, बंगारु लक्ष्मण, सुखराम असल्या माणसांची
माहिती असताना एका लालूंना धरून भ्रष्टाचारी म्हणून धोपटण्यात सरळ सरळ गडबड आहे!
लालूंच्या ’कुटुंबकल्याण’
कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करायचं कारण नाही. लालूंच्या पक्षाच्या विजयामुळे पुन्हा
जुलुम जबरदस्ती सुरू करायला काही यादवांना चेव येईल, या धोक्याकडे काणाडोळा
करण्याचंही कारण नाही. पण काही तारतम्य आहे की नाही? एक लालू भ्रष्ट आणि बाकी काय
धुतल्या तांदळाच्या चारित्र्याचे? एक लालू गुंड आणि ...
असो. मोदी-शहा यांच्या
अपप्रचाराला तोडीस तोड जवाब दिल्याबद्दल आणि नितीश कुमारांच्या अंत्योदयी विकासाचा
मार्ग मोकळा केल्याबद्दल आज, या क्षणी मी थोडा वेळ तरी लालूंना झिंदाबाद करीन!