Monday, August 31, 2015

मराठी चित्रपटनिर्मिती आता वरच्या यत्तेत गेली?


'डबल सीट' नावाचा मराठी चित्रपट पाहिला. 



लहानशी कथा आहे. ’मुंबईतलं कनिष्ठ मध्यमवर्गातलं  नवीन लग्न झालेलं मराठी जोडपं घर घेऊ बघतं तर काय होतं’ इतकीच. यात कोणी खलनायक नाही. समस्या सोडवायला देव अवतरत नाही की कोणी देवदूतासारखा माणूस मदतीचा हात देत नाही. सगळी गोष्ट माणसांची. माणसांची सुखंदुःखं, रागलोभ आणि माणसांनी शोधलेले सुटकेचे रस्ते. झालंय काय, ठो ठो पिस्तुलबाजी, जबरी मारामारी, नजर फिरवणारा पाठलाग; नाही तर कुटील कटकारस्थानं, अचाट संकटं आणि घनघोर गैरसमज यांचा मारा टीव्हीवरून सतत अंगावर घेण्याची सवय झाल्यामुळे पडद्यावर काय सामोरं येणार, याच्या नॉर्मल अपेक्षाच नॉर्मलपणा ओलांडून गेल्या आहेत. परिणामी नवीन काहीही बघताना ’आता काहीतरी होणार! आता "ढँण!" असं संगीत वाजून आकाश कोसळणार!’ अशी उत्सुकता मनाला ताणून धरत रहाते. रंजन करून घेताना ’तणाव’ हीच  स्थिती असणं इतकं अंगवळणी पडलंय, की साध्या सरळ माणसांची गोष्ट बघण्यात प्रॉब्लेम होतो! म्हणून ’डबल सीट’ बघून मस्त फ्रेश वाटतं.


आणि मग विचार करताना लक्षात येतं की या ’साध्या सरळ’ कथेचं सादरीकरण सरधोपट नाही. त्यात खूप बारकावे आहेत. लक्षात य़ावी अशी खबरदारी घेतलेली आहे. उदाहरणार्थ, मुक्‍ता बर्वे ही ताकदीची अभिनेत्री आहे. वंदना गुप्ते डायलॉगबाजी करण्यात उस्ताद आहेत. संदीप पाठक लोकप्रिय विनोदी नट आहे. आणि अंकुश चौधरी तर आघाडीचा हीरो आहे. पण यातल्या एकालाही (वा अन्य कुणाला) ’वा! क्या सीन तोडा है!’ असा उद्‍गार वसूल करणारी जागा दिलेली नाही! चित्रपटात भावना उचंबळण्याला वाव आहे पण भावनोद्रेकाला ठसठशीतपणे पेश करणारा एकही प्रसंग नाही. सगळे कलाकार असा संयम दाखवत आहेत, म्हणजे हे दिग्दर्शकीय धोरण आहे. मराठी मेनस्ट्रीम सिनेमात हे दुर्मिळ आहे.


लग्न होऊन सासरी आलेली नवी नवरी मुक्‍ता चहा देते तो प्रसंग. ती बावरलेली, unsure दिसते. बरोबर आहे; घर, माणसं नवीन आणि आता हेच कायमचं आपलं होणार म्हटल्यावर बावरायला होणारच. तिचं असं, तर चहा घेणार्‍यांचं लक्ष चहापेक्षा टीव्हीवर चाललेल्या सीरीयलमध्ये जास्त गुंतलं आहे!  तिच्या बावरलेपणाबरोबर मुंबईच्या चाळीतल्या संस्कृतीचा एक पैलूसुद्धा प्रेक्षकासमोर येतो. ही नवी सून पुढच्याच सीनमध्ये तोंड उघडून एका शेजारणीला पार पॅक करून टाकते. हुशारी दाखवत स्वतःचा पॉलिसी विकण्याचा उद्योग यशस्वीपणे दामटते! म्हणजे, नव्या नव्या संसारात बावरली असली तरी ही मुलगी बर्‍यापैकी खमकी आणि कृतिशील आहे, अशीसुद्धा खूणगाठ प्रेक्षक मारतो. सीनमधून एका वेळी अनेक संस्कार साधणारी अशी रचना आपसूक होत नाही, ती कष्टसाध्यच असते. त्यामागे योजनाच असते.


आई-वडील-दोन भाऊ आणि आता मोठ्या भावाची बायको, असं पाच जणांचं कुटुंब; चाळ, चाळीतले तरुण आणि इतर; गावच्या मुलीच्या नजरेतून दिसणारी मोहनगरी मुंबई, या पसार्‍यात मुख्य कथानकाला समांतर आणखी प्रवाह असू शकतात. त्यातून contrast मांडता येतो आणि त्यातून कथानकातल्या, व्यक्‍तिचित्रणातल्या गोष्टी अधोरेखित करता येतात. हा धोपटमार्ग या चित्रपटाने टाळला आहे. थेटपणे वा आडून मुख्य कथानकाला पुष्टी देत नाही, असा प्रसंगच यात नाही.  नायकाच्या वडिलांचा व्यवसाय रेसच्या घोड्यांना प्रशिक्षण देणे, हा आहे. इतका वेगळा व्यवसाय असूनही पटकथा त्या दिशेने एक पाऊलही टाकत नाही. नायकाच्या पैसेवाल्या मित्राचं काम नायकाला अस्वस्थ करून विशिष्ट दिशेने प्रेरित करणे, इतकंच आहे. पोलीस मित्र नायकाला झोपडी विकत घेण्याच्या फसव्या मार्गाला जाऊ देत नाही. आवडती टीव्ही स्टार भेटते, घराच्या जाहिरातीवर तिचाच फोटो असतो; पण ती कथानकात घुसत नाही. चाळीतली फटाकडी तरुणी संडासाच्या रांगेत उभी असताना पळून जाते पण तिच्या कोर्ट मॅरेजला स्वतःच्या सासूसकट साक्षीदार होण्याइतका धीटपणा आता नायिकेत आला आहे, ही सूचना करण्यापलिकडे तिचंही काही काम नाही. अगदी मुंबई दाखवण्याचा मोहदेखील एका गाण्यापलिकडे टाळलेला आहे. एक प्रकारे, redundancy, वायफळ जागा असं काही नाहीच!



हा चित्रपट निर्दोष आहे, असं म्हणायचं कारण नाही. आणि मला इथे परीक्षण करण्याची जबाबदारीही घ्यायची नाही. ही ’आर्ट फिल्म’ नाही. हा वर्तमानातल्या सर्वसाधारण मराठी सिनेप्रेक्षकाला उद्देशून काढलेला ’मेनस्ट्रीम’ सिनेमा आहे. म्हणूनच तर त्यातल्या निवेदनात सफाई आणण्यासाठी केलेले प्रयत्न डोळ्यात भरतात. तंत्र वा आशय, दोन्ही बाबतीत प्रायोगिकतेचे पंख लावून कलेच्या आकाशात भरारी घेतल्याचा दावा करू न बघणार्‍या या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये घेतलेली मेहनत / दक्षता पाहता ’मराठीत आता दर्जेदार, कलात्मक चित्रपट निर्माण होऊ लागलेत,’ या विधानाच्या पलिकडे जाऊन ’मराठी चित्रपटनिर्मिती आता वरच्या यत्तेत गेली आहे,’ असं म्हणावंसं वाटतं. ’टाइमप्लीज’ या पहिल्या चित्रपटात नायक-नायिकेसकट इतर व्यक्‍तिरेखांना कंगोरेदार, मिश्र नैतिकतेच्या पेश करण्याचं आव्हान पार पाडल्यावर या दुसर्‍या चित्रपटात सघन सादरीकरणाची जबाबदारी पेलून दाखवल्यामुळे दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याकडून यापुढे याहीपेक्षा उंच उडीची अपेक्षा रहाणार आहे. आणि त्यांचा एकूण कल चाकोरीत बंदिस्त न रहाण्याकडे असावा, असं मानायला जागाही आहे.


No comments:

Post a Comment