श्री ४२० या चित्रपटाचा
आणि माझा खास संबंध आहे.
जेव्हा कॉम्प्युटरच काय,
व्हीडिओ कॅसेट्सदेखील नव्हत्या; त्या काळात सिनेमा बघायला थेटरातच जावं लागायचं.
आणि तेव्हा ’मॅटिनी’ नावाचा एक प्रकार होता. ३-६-९ असे दिवसात तीन शोज नवीन रिलीज
झालेल्या सिनेमाचे असायचे, तर सकाळी ११ वाजताच्या मॅटिनीला एखादा जुना सिनेमा
लागलेला असायचा. तो आठवडाभर चालायचा. कधी जास्त. आमच्या पिढीची अभिरूची कॉलेजला
दांडी मारून पाहिलेल्या त्या मॅटिनीवरच पोसली.
तर त्या काळात मी श्री
४२० सात वेळा पाहिला. (त्यापेक्षा जास्त वेळा पाहिलेला एकच चित्रपट, तीसरी मंजिल.
शम्मी कपूरबद्दल लिहून झालं आहे, पुन्हा आज नको.) राज कपूरच्या प्रेमात पडलो.
नर्गिसच्या प्रेमात पडलो. तिसर्यांदा पहाताना वाटलं, यातली गाणी काहीतरी वेगळी
आहेत. १९५६ साली या सिनेमाला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट संगीताचं अवॉर्ड का नाही
मिळालं, याचं आश्चर्य वाटून मी तपास केला आणि ’चोरी चोरी’ सापडला. तिथून खरा मी
’जुन्या’ गाण्यांच्यात शिरलो. ’ही गाणी अशी काय वेगळी आहेत?’ हे माझ्यापेक्षा दहाएक
वर्षांनी मोठा असलेल्या मित्राला म्हणालो. त्याने मला कॅफे स्विमिंग पूलची ओळख
करून दिली. दादरला ऐन समुद्राकाठचं हे वरून उघडं रेस्टॉरंट. तिथे ’जुन्या’ गाण्यांचा
प्रचंड स्टॉक होता. त्या गाण्यांची यादी केलेली एक वही होती. नंबर लिहून दिला की
काउंटरवरचा ’ऑडजॉब’ (त्याचं खरं नाव आठवत नाही) सेवंटीएट आरपीएमची रेकॉर्ड काढून
लावायचा. चारेक फूट उंचीच्या स्पीकरमधून गाणं वाजायचं. पुढची दहा वर्षं मी नित्य
नेमाने, शक्यतो रोज कॅफे स्विमिंग पूलवर गेलो आणि गाणी लावली - ऐकली. त्या दहा
वर्षांमध्ये आयुष्यभर पुरेल इतका ’प्राणवायू’ माझ्या मेंदूने शोषून घेतला आहे.
तर श्री ४२० या सिनेमाने
ही वाट दाखवली. मग मी आरके फिल्म्सचे सगळे सिनेमे बघितले. (पुढे ’बॉबी’नंतर सोडून
दिलं.) राज कपूरचे बघितले. नर्गिसचे बघितले. धारेलाच लागल्यासारखं झालं आणि दिलीप,
देव यांचेही बघितले. इतर अनेक गाण्यांसाठी बघितले. ’रमय्या वस्तावय्या’ हे गाणं मी
कधी सर्वोत्तम गाण्यांच्यात मोजलं नाही; पण पुढे "अमुक गाणं त्या दशकाचं
रमय्या वस्तावय्या आहे का?" असं म्हणत गेलो. आणि मला काय म्हणायचं आहे, हे
सगळ्यांना कळतही गेलं. श्री ४२० हा चित्रपट हिंदी चित्रपट परंपरेत जितका मोठा आहे,
त्यापेक्षा हे गाणं हिंदी सिनेसंगीतात जास्त मोठं आहे, असं माझं आजही मत आहे. घोळक्यात
गाणी म्हणता म्हणता हे गाणं म्हणायला सुरुवात केली, की मिळणार्या प्रतिसादामुळे
’सिनेसंगीत हे आधुनिक काळातलं लोकसंगीत होय,’ या विधानाला हा एकच पुरावा मला
पुरेसा वाटायचा.
इतक्या वेळा बघून मला हा
सिनेमा बघताना कधी कंटाळा आला नाही. सुरू झाल्या क्षणापासून संपेपर्यंत एक क्षण हा
सिनेमा थबकत नाही! सुटं दृश्यच नाही. एकातून दुसरं निघतं. शेवटपर्यंत निघत रहातं.
त्यातलं एक गाणं (शाम गयी रात आयी तू बलम आजा) कापलेलं आहे. या पक्क्या बांधणीच्या
सिनेमात ते कुठे बसेल, या प्रश्नाचं उत्तर मला कधी मिळालं नाही. गाणं बरं आहे,
नर्गिसने बरं दाखवलंही असेल; पण कापलं ते बरंच केलं असं वाटतं. राज कपूर हुशार
दिग्दर्शक, एडिटर वाटतो.
यातली ललिता पवार आठवते. खुदकन हसणं म्हणजे काय, हे ती जेव्हा "तीन आने का दो? येडं की खुळं!" असं म्हणून हसते, तेव्हा कळतं. राज कपूरला सेक्सचा सेन्स उत्तम. रमय्या वस्तावय्या नाचणारी ती जी कोणी आहे, तिच्यात हिरवंकच्च सेक्स ठासून भरलं आहे. त्यातले संवाद, काय
विचारता! पहाडी सन्यालच्या तोंडचा "बहोत आये बम्बई खरीदने, लेकिन बम्बईनेही
उनको खरीद लिया."
रशीद खान: "कोई
विद्या बेचने आता है, तो कोई ईमान खरीदने."
नेमो: "अब तुम्हे
विद्याकी नही, मायाकी जरूरत है; माया!"
काय वन लायनर्स आहेत!
असं कधी कोणी कोणाला
प्रपोज केलंय?: "जब एक शरीफ लडका किसी लडकीसे प्यार करता है, ... तर त्या
दोघांनी लग्न करायला हवं. लग्नानंतर मुलं होणार. त्यांना वाढवायचं, शिकवायचं, ...
पर मुझे तो महिनेका सिर्फ पैतालीस रुपया मिलता है!"
मग ती टिपिकल मुंबईकर
होऊन म्हणते, "एकाच्या कमाईवर नाही होणार; पण दोघे नोकरी करू शकतात!" मग
त्याच्या हातातली कपबशी थरथरू लागते. मग ती बावरून उठते. मग पाऊस सुरू होतो.
मग का नाही मन्ना डे आणि
लता गाऊ लागणार, "प्यार हुवा इकरार हुवा है, प्यारसे फिर क्यूँ डरता है
दिल," ?
तरी माझा आवडता डायलॉग वेगळा
आहे. तो नादिराच्या तोंडी आहे. नुसता डोळा भिडवून कापून टाकेल, अशी धारदार नजर
तिची; त्यातून आग ओकत ती म्हणते, "तुम हो कौन! तुम्हारी हैसियत क्या है! चंद
घंटोंके लिये तुम्हे एक नयी जिंदगी दिखायी, तो हमारी बराबरी करने लगे?"
बापरे! यातला ’ह’ असा
चाबकासारखा बसतो त्याच्या अंगावर की तिचे शब्द पुन्हा पुन्हा आठवताना सगळी
नैतिकताच गुंडाळली जाते त्याची.
यथावकाश मी राज कपूरमधून बाहेर आलो, शंकर जयकिशनची बाजू घेऊन हिरिरीने भांडणं बंद केलं, श्री ४२०ची तर आता आठवणही येत नाही. राहिलीत ती त्यातली गाणी. आज पेपरात या चित्रपटाचं कौतुक वाचलं आणि आठवणी जाग्या झाल्या.
No comments:
Post a Comment