कोर्ट पाहिला. समोर
घडणार्या गोष्टीपलिकडे बरंच काही सांगणारे चित्रपट इथे फार निघत नाहीत. ’एलिझाबेथ
एकादशी’ तसा होता. ’कोर्ट’देखील आहे. पण क्रांतिकारक म्हणावा, इतका वेगळा आहे.
अगोदर माझी सिनेमा
बघण्याची पद्धत काय आहे, हे सांगणं इथे आवश्यक आहे. कोणत्याही कलाविष्काराप्रमाणे
चित्रपट कलावंत ’कला’ या त्याच्या माध्यमाद्वारे माझ्याशी संवाद साधतो आहे, असं मी
मानतो. हा संवाद अर्थातच एकतर्फी असतो. कलावंत काहीतरी सांगत असतो आणि मी ते ग्रहण
करत असतो. आणि कलाकृती, ही एकमेव अभिव्यक्ती त्या एकतर्फी संवादाला सिद्ध करत
असते. कलावंताच्या मनातील आशय कलाकृतीमधून मूर्तरूप घेतो.
कलाकृती ही जरी
कलावंताची निर्मिती असली, तरी निर्मिती पूर्ण झाल्याबरोबर ती स्वायत्त होते. मग
कलाकृतीमधून ज्याप्रमाणे कलावंताला अभिप्रेत असलेला आशय व्यक्त होतो; तसंच त्या
कलावंतावरील संस्कार, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्याची कलाभाषेची जाण, वगैरे
गोष्टीसुद्धा व्यक्त होतात. त्यामुळे कलावंताला काय म्हणायचं आहे आणि कलाकृती काय
सांगते आहे, या दोन गोष्टी तंतोतंत एकरूप असतीलच, असं नाही.
एक आस्वादक म्हणून
माझ्यासमोर कलाकृती असते. ती काय म्हणते आहे, हे मी जाणून घेत असतो. त्यालाच मी
कलास्वाद म्हणतो. कलावंताची वेगळी मुलाखत घेऊन त्याच्या कलेतील घटकांचा नेमका आशय
समजावून घेणे, हे माझ्या मते कलास्वादाच्या बाहेर आहे. (म्हणजे ते चूक आहे वा तसं
करू नये, असं मुळीच नाही!)
याचा एक परिणाम असा होतो
की माझ्या कलास्वादाला माझ्या आकलनशक्तीच्या, माझ्या संदर्भचौकटीच्या मर्यादा
पडतात. मग ’तू जरी अमुक म्हणत असलास, तरी तो कलावंत वेगळा, तमुक खुलासा देतो आहे,’
असं मला सुनावलं जाण्याची शक्यता निर्माण होते. पण त्यामुळे मी आणि त्या विशिष्ट
कलावंताची कलानिर्मिती वा एकूणच कला, यांमधल्या नातेसंबंधावर परिणाम होत नाही. माझ्या आकलनशक्तीचा विकास, संदर्भचौकटीचा
विस्तार, या माझ्या कुवतीनुसार, गरजेनुसार होत जाणार्या प्रक्रिया आहेत.
आता खरंच ’कोर्ट’.
चित्रपटात प्रसंग
संपल्यावर कॅमेरा तसाच राहणे, पात्रं निघून गेली तरी कथानकाशी संबंधित नसलेल्या
घटना त्या स्थळी घडताना दिसत राहणे, असं बर्याचदा होतं. आणि अशावेळी कॅमेरा बहुधा
वाइड अँगलने काहीशा अंतरावरून घटना न्याहाळत असतो. मग दृष्य रस्त्याचं असेल,
कोर्टाचं असेल किंवा हॉटेलच्या वा इमारतीच्या आतलं असेल. जणू ’दृष्यचौकट’ याच
वास्तवाकडे लक्ष वेधायचं आहे. काही काळ तिथे कथानक घडत असतं; ज्याच्या बरोबर आपण रहाणार असतो, त्यातून साकारणार्या कहाणीचा माग
घेणार असतो. पण कहाणी अमुक इकडे गेली, तिच्यातून अमुक असं तात्पर्य निघालं; तरी ते
दुय्यम होय. ज्या चौकटीत कहाणी आकार घेत आहे, तिची जाणीव सुटता कामा नये!
एक कोर्ट असतं. तिथे
न्यायाधीश, सरकारी वकील, आरोपीचा वकील, कारकून, वगैरे लोक काम करत असतात. तिथे
खटले चालतात आणि उलट (आणि अर्थातच सुलट) तपासण्या होतात, साक्षींच्या नोंदी होतात,
वगैरे. यातला एकेक जण आपापल्या घरी रहात असतो. त्याचं त्याचं एक विश्व असतं. ती विश्वं
सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिक बाबतीत एकमेकांपेक्षा अगदी वेगवेगळी असतात. या
वेगवेगळ्या विश्वांना एकमेकांशी जोडणारा दुवा म्हणजे कोर्ट. प्रत्येकाचं जगणं या
पोटसिस्टिमा आणि कोर्ट ही त्या पोटसिस्टिमांना एकत्र आणणारी जणू विशाल सिस्टीम.
असं ते ’कोर्ट’.
आणि हे लोक तिथे पोट
भरण्यासाठी नोकरी करतात. बँकेतल्या कारकुनाने जशी बेरीज करताना बेरजेतले आकडे म्हणजे
रक्कम होय, हे विसरून जावं; तसंच या लोकांचं होतं. सरकारी वकील बाईला आरोपीवरील
आरोप सिद्ध करण्याचं काम नेमून दिलं आहे. ते काम निष्ठेने करताना कायदा, पुरावे,
साक्षी या सगळ्याच अर्थ ती स्वतःच्या कामाला सुसंगत असाच लावते. इतकंच नाही,
’कशाला लांबण लावायची, काय दहा वर्षांसाठी डांबायचं ते डांबा आणि संपवून टाका,’
असं सहज म्हणून जाते. तो एक माणूस आहे, आपण आपल्या कामात यशस्वी होण्याचा अर्थ एक
माणूस काही वर्षं खितपत पडणे, असा होईल; हे तिला सुचत नाही.
न्यायाधीशही वेगळा नाही.
तोसुद्धा एकूण कामकाजाकडे तशाच निर्विकारपणे पाहतो. सरकारी वकील बाई बाहेर जे जीवन
जगते; त्यात जसा कोर्टाचा, कोर्टातील कामकाजाचा काहीही संदर्भ नसतो, तसंच
न्यायाधीशाच्या जगण्यातही कोर्टरूमच्या आतील घटना बेदखल असतात. डुलकी घेत असताना
त्याला दचकून जागं करणार्या मुलांना शिक्षा देताना तो नेमका आवाज करू न शकणार्या
मुक्या मुलाच्या कानशिलात वाजवतो! तसं करताना वा तसं केल्यावर त्याच्या मनात
’न्यायभावना’ जागी होत नाही. बाहेरचा माणूस बाहेर राहतो आणि कोर्टातला न्यायाधीश
कोर्टात.
(इथे ’असा असतो न्याय!’
असं म्हणण्याला वाव आहे. इतकंच नाही, ’थोबाडीत मारण्याचा अन्याय करून न्यायदेवता
पुन्हा झोपी जाते,’ असंही नाट्यपूर्ण विधान इथे केलं तरी ते चूक ठरणार नाही. पण
मला कोर्टाबाहेरचा माणूस पूर्ण वेगळा असणे, बाहेर कंगोरेदार व्यक्तिमत्त्वं
असणारी माणसं व्यवस्थेच्या आत कार्यरत असताना भावनाशून्य असतात, हा आशय जास्त मोठा
दिसतो.)
काय असतात त्यांची
’नॉर्मल’ आयुष्यं? न्यायाधीश लठ्ठ पगाराच्या नोकर्यांविषयी उपदेश करतो. न्यूमरॉलॉजी
आणि अंगठीतले खडे यांचं समर्थन करतो. सरकारी वकील बाई कायदा हातात घेण्याचा प्रचार
करणारं, भडक, उथळ नाटक बघते. कष्टकरी, गरीब लोकांमध्ये जागृती निर्माण करू पाहणार्या
आरोपीचा वकील श्रीमंत गुजराती असतो. त्याचे आईवडील त्याच्यामागे लग्नाचा लकडा
लावतात. त्याचा मित्र म्हणून घरी आलेला सरळ सरळ ’खालच्या वर्गातला’ दिसत असताना त्याच्याशी
जराही वावगं वागत नाहीत (याच संस्कारांमधून हा सामाजिक जाणिवेचा वकील झाला का? पण
एक लाख रुपयांचा जामीन भरणारा हा वकील कोर्टाच्या सिस्टीमसमोर अगदी पडतं घेतो. तरी
त्यातल्या त्यात याच पात्राच्या निकट चित्रपट जातो. कुठल्याशा पंथाचे लोक त्याला
काळं फासतात हे दाखवतो आणि मग त्याला रडतानाही दाखवतो.)
पिकनिकला जाऊन भेंड्या
खेळणे ही न्यायाधीशाची मौजेची कल्पना, नाटक पाहणे ही सरकारी वकील बाईची; तर
पबमध्ये मित्रमैत्रिणींसोबत बियर पिणे, ही गुजराती वकिलाची.
कोर्टातला खटला आणि या
तिघांचं जगणं यात किती तफावत आहे! आरोपी शाहीर आहे. एका ठिकाणी सामाजिक अन्यायाची
उदाहरणं देऊन मग ’आम्हाला कलाकार न म्हणण्याची कृपा करा’ या उद्वेग व्यक्त
करणार्या शब्दांवर गाणं संपवल्यावर त्यामागोमाग पंधरा वर्षांखालील मुलींचा अंग
हलवत नाच सुरू होतो गरिबांनी जीव द्यावा, अशी ही व्यवस्था आहे, असं गायल्याबद्दल
त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खटला भरला जातो. त्याला
शेदीडशे वर्षांपूर्वीच्या पारतंत्र्यातल्या कायद्याची जोड दिली जाते. म्हणून
विचारावंसं वाटतं, हा चित्रपट म्हणजे अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध कडवटप
प्रतिक्रिया आहे का?
यात एक इन्स्पेक्टर आहे,
ज्याने या प्रकरणाचा तपास केलेला आहे. माणूस अजिबात गुर्मीवाला नाही. अदबशीर
वागतो. कोर्टात आणि त्याच्या चौकीतही. पण काम चोख करतो. कोणतं काम? जनजागृती
करणार्याला जनतेपासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करणे, हे काम. ’इन्स्पेक्टर उद्धट
असो की नम्र; तो शेवटी त्याच व्यवस्थेचा भाग आहे आणि ती व्यवस्था गरिबाला नाडणारी
आहे,’ असं म्हणतो का हा चित्रपट?
ज्याने आत्महत्या केली,
असं आरोपात म्हटलं आहे, त्याची बायको साक्ष देते. तिचा चेहरा दगडी आहे. ती खोटं, गुळमुळीत
बोलत नाही; पण एका शब्दात उत्तरं देऊन पुढे खुलासे अजिबात करत नाही. हे मी
आदिवासींमध्ये पाहिलं आहे. आणि त्यांची शब्दसंपत्ती तुटपुंजी असते, हे त्यामागचं
कारण नाही. त्यांना ही व्यवस्था आपली वाटतच नाही. इथल्या व्यवस्थेमधल्या एखाद्या प्रेमळ,
सहानुभूतिदार व्यक्तीशी फार तर तोंडी संवाद होईल; मनामनांचा होणार नाही ही खात्री
त्यांना असते. ज्याप्रमाणे अदबशीर इन्स्पेक्टरसुद्धा अहितच करणार; तसाच
व्यवस्थेच्या आतली व्यक्ती वरवरच कन्सर्न दाखवणार. त्यामुळे ते त्यांच्यातल्या
नसलेल्या व्यक्तीशी औपचारिक सभ्यपणा दाखवतात; पण मन उघडं करत नाहीत. आरोपीचा वकील
मृताच्या पत्नीला घरपर्यंत लिफ्ट देतो आणि गाडी चालू झाल्यावर सीट बेल्ट लावायला
सांगतो! त्यात त्याचं चूक नाही, तो शहरी जगण्यातली दक्षता घेत असतो. पण त्यातून
दोघांच्या जगण्यातलं, दोघांच्या ’कन्सर्न्स’मधलं अंतर अधोरेखित होतं. मग तिने
त्याच्याकडे काम मागण्याचा अर्थ औपचारिक उपचार पाळणे, इतकाच उरतो.
खुनाचा आरोप असलेला
शाहीरसुद्धा बोलत नाही. त्याच्या गाण्यांमध्ये, सादरीकरणामध्ये कळकळ जाणवते; पण
कोर्टात वा इतर कुठे ती कळकळ वा तिच्याबरोबर येणारा क्षोभ व्यक्त होत नाही. तो
क्रांतिकारी विचारांची पुस्तकंसुद्धा लिहितो आणि छापून घेतो. वकिलाने जामीन भरला,
हे कळल्यावर कृतज्ञतेने गदगदत नाही; हे पैसे परत कसे करता येतील, याचा विचार करू
लागतो.
हा मनुष्य पूर्णपणे कर्मयोगी आहे. तो जरी ’सनदशीर’ मार्गांचा पुरस्कर्ता असला (संपूर्ण चित्रपटात
कुठेही त्याचा कसल्याही प्रकारच्या हिंसक पर्यायाकडे कल असल्याचा, त्या पर्यायाला
जवळ करणार्यांशी संपर्क असल्याचा सूचकही उल्लेख नाही. आहेत ते केवळ आरोप. फुटकळ
पुराव्यांच्या तकलादू आधाराने केलेले आरोप.) आणि आपला संदेश गाऊन, पुस्तकं छापून
प्रसारित करत असला तरी ’हाती शस्त्र घ्या’ असं तो कधी सुचवत नाही. गाण्यातूनही तो
जीव द्या, असंच सांगतो! व्यवस्थेविरुद्ध हिंसेची चिथावणी देण्याचा जोड आरोप जरी
ओघाओघाने त्याच्यावर होत असला, तरी मुख्य खटला आत्महत्येला प्रवृत्त करण्यावरून
आहे!
चित्रपट जरी दोन वकील
आणि न्यायाधीश,यांच्या जगण्याकडे काहीसं जवळून
निरखून पहात असला तरी मृताची पत्नी, आरोपी शाहीर यांच्या जगण्याच्या खोलात
शिरत नाही. तिच्या रहाण्याच्या जागेपाशी किमान जाणं होत: शाहिराच्या बाबतीत तेही
नाही. त्याचे कार्यक्रम तेवढे दिसतात. त्याचा सहकार्यांशी होणारा संवादही दिसत
नाही. का?
कारण शाहीर, मृत सफाई
कामगार आणि त्यांचं जग, हा मुळी चित्रपटाचा फोकसच नाही. संख्येने ते मोठे असले तरी
प्रस्थापित समाज’चौकटी’च्या ते बाहेर आहेत. आणि चित्रपट चौकटीच्या आत जे घडतं वा
घडत नाही, त्यावर लक्ष केंद्रित करतो. शेवटी सगळं होऊन गेल्यावर चौकट रिकामी होते,
कोर्टरूमची दारं खिडक्या लावल्या जातात, दिवे बंद होतात आणि काळोख होतो. त्यानंतर
जणू ’न्यायव्यवस्थेवरील टिप्पणी’चा उपसंहार म्हणून न्यायाधीश त्याच्या सग्यासोयर्यांबरोबर
निवांत मौजमजा करताना दिसतो.
इतक्या कोरडेपणाने,
भाष्याविना तपशील दाखवत, भावना ठळक करण्यासाठी पार्श्वसंगीताचा वापर करण्याचा
मार्ग पूर्ण टाळत हा चित्रपट प्रचलित व्यवस्थेवर अत्यंत दाहक भाष्य करतो.
एक म्हणता येईल की लोक
मराठी, गुजराती बोलतात तेव्हा इंग्रजी सबटायटल्स येतात; पण इंग्रजी भाषणाच्या
वेळीदेखील सबटायटल्स इंग्रजीच रहातात! यातून निघणारा अर्थ दोन प्रकारे मांडता
येईल. एक, चित्रपट इंग्रजीतून आस्वाद घेणार्यांसाठी, घेऊ शकणार्यांसाठी बनवला
आहे, ज्या वर्गाविषयी सहानुभूती दाखवतो, त्यांच्यासाठी नाही. हे जरी खरं असलं, तरी
जे दिसतं, त्यामागचा आशय कुणाही संवेदनशील मनाला भिडणारा आहेच. म्हणजे, जो मरतो
त्याच्या मृत्यूची जबाबदारी व्यवस्था स्वतःवर घेत नाही. त्याचं काम व्यवस्थेचा भाग आहे; पण त्याच्या
जिवाला कवडीमोल मानत व्यवस्था स्वतःचे दाखवण्यापुरते असलेले नियम पाळत नाही. उलट,
त्याच्या मृत्यूची जबाबदारी अशा एकावर लादते, जो नेमका व्यवस्थेबाहेरच्या तसल्याच लोकांमध्ये जागृती
निर्माण करण्यासाठी झटत असतो.
इंग्रजी
सबटायटल्सबद्दलचं हे म्हणणं असंही मांडता येईल की या चित्रपटाचा रोख रुंद आहे,
स्थलकालदेशाच्या सीमा ओलांडणारा आहे. यातून पुन्हा असं ध्वनित होतं की सदा वाइड
अँगलने विस्तारित दृष्य दाखवणार्या या चित्रपटाचा विषय भारत, मुंबई, मराठी लोक,
इथली न्यायव्यवस्था नसून जगभरची प्रस्थापित व्यवस्था, हा आहे!
यात संगीत नाही पण साउंड
उत्तम आहे, यात प्रमुख तीन पात्रं सोडली, तर बाकी सार्या भूमिका व्यावसायिक नट नसणार्यांनी
केल्या आहेत, यात सॉफ्ट कट जवळपास नाही, दिग्दर्शकाने ’क्राफ्टिंग’ नाकारण्याचा
प्रयत्न केला आहे, दिग्दर्शकाचं लहान वय हेच त्याचं सामर्थ्य ठरलं की काय, वगैरे
तांत्रिक बाबींमुळे कसा काय कमी जास्त परिणाम साधला गेला आहे, हे सोदाहरण सांगणं
तज्ज्ञांचं काम आहे. चित्रपट या माध्यमात मला तेवढी गती नाही.
पण माझ्या कलास्वादाला
असलेल्या मर्यादा रुंदावण्यासाठी ’कोर्ट’ पुन्हा बघणं मला आवश्यक वाटतं.
No comments:
Post a Comment