Sunday, May 3, 2015

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे



बाबासाहेब पुरंदर्‍यांशी माझी ओळख पु ल देशपांड्यांनी करून दिली. ’गणगोत’मधून. पु लंच्या ’गणगोत’मध्ये बाबासाहेबांचं व्यक्‍तिचित्र आहे. वाचून अनेक वर्षं लोटली; पण दिनेश, ऋग्वेदी, रावसाहेब ही व्यक्‍तिचित्रं नीट आठवतात. तसेच बाबासाहेब. ते वाचून मला कळलं, बळवंत मोरेश्वर पुरंदरे तरुणपणातच ’बाबासाहेब’ झाले. वयपरत्वे नाही.

त्या वेळी दादरच्या अमर हिंद मंडळात वसंत व्याख्यानमाला होत असे. तिथे केव्हातरी बाबासाहेबांना शिवाजीवर बोलताना ऐकलं. इम्प्रेस झालो. मग त्यांची शिवचरित्राची व्याख्यानं ऐकणं भाग होतं. दहाएक व्याख्यानं ओळीत असत. सगळी ऐकली. एकापेक्षा जास्त वेळा ऐकली. शिवाजी माझ्या प्रेमाचा विषय. (अजून आहे.) बाबासाहेब ज्या रसाळ शैलीत धडाधड तारखा, नावं आणि स्थळं यांचे तपशील फेकत; त्याचं अपार कौतुक वाटे. त्यांच्या तोंडून शिवाजी ऐकताना अंगावर रोमांच उठत. आपल्यातला एक जण उठतो आणि स्वराज्याची स्वप्नवत्‌ संकल्पना नुसती मांडत नाही; तर प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा जागवतो; कसं झालं असेल शिवाजीच्या सोबत्यांना! तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी यांसारखे लोक कसे स्वतःच्या जिवावर उदार झाले असतील, याचं चित्र माझ्या मनात रंगू लागे. शिवाजीचा भक्‍त मी होतोच; बाबासाहेबांबद्दलही प्रेम निर्माण झालं.

मग ’राजा शिवछत्रपति’ विकत घेणं भागच झालं. चांगले हार्ड बाउंड दोन जाडजूड खंड. त्याची पारायणं केली. शिवाजीचं चरित्र मला पाठ झालं. शाळकरी वय, पौगंडावस्था ओलांडली तरी शिवाजीबद्दल वाचत राहिलो. जे वाचायला मिळालं, त्यातून या राजाबद्दल आदर वाढत गेला. त्याच्या लढाया, त्याचे डावपेच, त्याचा मुत्सद्दीपणा, त्याची दूरदृष्टी, त्याची न्यायबुद्धी, त्याचा मनसबदारीला असलेला विरोध, प्रजेच्या हितासाठी त्याने वेळोवेळी प्रसृत केलेले आदेश ... माझ्या मुलखात शिवाजीसारखा एक लोकनेता होऊन गेला, याचा मला प्रचंड अभिमान वाटत असे. नंतर कितीतरी वर्षं कुणी अमराठी भेटला, गप्पा झाल्या की मी त्याला शिवाजीचं अचाट कर्तृत्व सांगण्याचा प्रयत्न करत असे. पुढे देशभर कुठे कुठे हिंडताना शोध लागला की शिवाजी आणि आंबेडकर, या दोन मराठी माणसांचे पुतळे भारतभरच्या गावागावात आहेत. सारा देश त्यांना ओळखतो.

शिवाजीचं नाव ठाउक नाही, तो मराठीच नव्हे. पण मला शिवाजीच्या लोकोत्तर व्यक्‍तिमत्वाची नीट ओळख करून दिल्याबद्दल मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा कायमचा ऋणी राहीन. अर्थात मी शिवाजीची भजनं गात समाधान पावणार्‍यातला नव्हतो. एक शिवाजी घेऊन बसायचं आणि त्याचा उदो उदो करायचा; तर तसं कालच्या आजच्या कुणाही गावगुंडाबद्दल करता येईल! महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या इतर थोर व्यक्‍तींची माहिती करून घेऊन मग त्यांच्या संदर्भात शिवाजी किती, कसा थोर, हे ठरवलं पाहिजे. नाही तर मी म्हणणार, शिवाजी थोर; समोरचा म्हणणार, अलेक्झांडर थोर. किंवा हनिबाल थोर. किंवा रोमेल थोर. मला ते नाव माहीत नाही, त्याला शिवाजी माहीत नाही. हा वाद नाही आणि संवादही नाही.

वाचन वाढत गेलं, तसे बाबासाहेब मात्र दूर होत गेले. त्यांचं काही काही खटकू लागलं. उदाहरणार्थ, ’राजा शिवछत्रपति’ची सुरुवात होते राम दंडकारण्यात येतो, तिथपासून. तिथेच ते एक प्रकारे ’ही शाहिरी आहे, हा इतिहास नव्हे,’ असं बजावतात. पुढे प्रकरण येतं ’साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. देवगिरीच्या यादवांचा पराभव करून अगोदर अल्लाउद्दिन खिलजी आणि नंतर त्याचा सेनापती मलिक कफूर यांनी दक्षिणेत मुसलमानी सत्ता स्थापन केली, तिथून सुरू होते ही ’साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. तोपर्यंत इतिहास म्हणजे लढाया आणि राजघराणी नव्हे आणि राजाचा धर्म काय यावरून प्रजेचं सुखदुःख ठरत नाही, हे समजण्याइतकी अक्कल मला आली होती. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं यांचा छळ वाईट म्हणायचा आणि ज्या काळात तो छळ झाला, ते यादवराज्य चांगलं म्हणायचं, यातला विरोध मला जाणवू लागला होता. मी शिवाजीचा भक्‍त होतो म्हणून शिवाजीची हरेक गोष्ट मला थोर वाटत होती, असं नव्हतं. शिवाजी जरा अतीच थोर होता म्हणून तो मला इतका प्रिय झाला. बाबासाहेबांची शाहिरी पुढच्या वयात मला भावेनाशी झाली. जसं ’गर्जा महाराष्ट्र माझा’ ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे रहायचे थांबले, तसंच.

ते असो. स्वतः बाबासाहेबांनी कधी स्वतःला इतिहासकार म्हटलं नाही. त्यांची प्रसिद्धी शिवशाहीर म्हणून. आता शाहीर पोवाडेच गाणार! तसंच बाबासाहेब शिवाजीचे पोवाडे गात. त्यांची स्टेजवर हत्तीघोडे नाचवणारी ’जाणता राजा’ नावाची सर्कस बघण्याची इच्छा मला झाली नाही. पुढे त्यांनी कोल्हापूरजवळ शिवकाल जिवंत करायचा महाप्रकल्प जाहीर केला. तिथे शिवकालीन समाजजीवन प्रत्यक्ष बघायला मिळणार होतं. शालिनीताई पाटीलही त्या प्रकल्पाशी संबंधित होत्या. त्याचं पुढे काहीच झालं नाही.

आपल्याकडे बहुतेक पुरस्कार हे उतारवयात एकूण कारकीर्दीचा गौरव म्हणून दिले जातात. त्यांना विशिष्ट फोकस असा नसतो. राजकीय गणितं मात्र असू शकतात. ’महाराष्ट्रभूषण’सुद्धा याला अपवाद नाही. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना ’महाराष्ट्रभूषण’ हा सन्मान देऊन महाराष्ट्र सरकारने काही वावगं, विसंगत केलं असं मला मुळीच वाटत नाही. उलट, या संधीचा लाभ घेऊन मी त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्‍त करतो.

No comments:

Post a Comment