Monday, June 22, 2015

मी आणि ’योगा’



लग्न झालं आणि मी बोरिवलीला रहायला गेलो. तिथे जाऊन दोन वर्षं व्हायच्या आत मला बढती मिळाली आणि पुढची पाचेक वर्षं यूपीत काढावी लागणार, हे माझ्या लक्षात आलं. तिथे आपल्याला योगासनं करायला भरपूर वेळ मिळेल, असं वाटून मी बोरिवलीतच रहाणार्‍या आमच्या बँकेतल्या बोरकरांकडून माफक शिकवणी घेतली आणि यूपीत फतेगडला सकाळी उठून ’योगा’ करायला सुरुवात केली. 

ही माझी आणि योगाची ओळख. मी तसा चालणारा माणूस. फतेगडला रविवारी कंपनी आणि काम नसेल तर आणि कुठे जाणार नसेन तर सहज चार पाच तास चालत घालवायचो. वाटेत एकदा जेवण आणि दोनदा चहा, असे जुजबी हॉल्ट्स. त्यामुळे यूपीत जरी मी बर्‍यापैकी नियमितपणे आसनं केली तरी माझ्या तंदुरुस्तीचं श्रेय मी कधी योगाला दिलं नाही.
मुंबईत परतलो आणि चुनाभट्टीला रहायला गेलो. मग दर रविवारी सक्काळी कुर्ल्याला निकम गुरुजींच्या ’अंबिका योग कुटीर’मध्ये जाऊन रीतसर शुद्धिक्रिया, योगासनं असं शिक्षण घेतलं. धौती करायला सुरुवात केली तेव्हा बाहेर येणार्‍या पित्तामुळे घसा सोलवटला. वज्रासन झाट जमायचं नाही. सणसणीत कळा यायच्या. डोळे मिटायला सांगितलं की ’खरंच सगळ्यांनी मिटलेत का,’ याची अपार उत्सुकता वाटायची आणि माझे उघडलेले डोळे हमखास पकडले जायचे. पण रमलो. इतका, की कधी शनिवारी मित्राकडे पार्टी करून तिथेच झोपलो की मला दुसर्‍या दिवशी सकाळी कधी घरी जातो आणि शुद्धिक्रिया-आसनं करतो, असं व्हायचं. मग मला सकाळी चहा चालायचा पण नाश्ता नको व्हायचा. पोट भरल्यावर आसनं कशी करणार!

निकम गुरुजींचा शिष्य झाल्यावर मला योगाची गंमत कळू लागली. एक म्हणजे, योगामुळे पोट आत जात नाही. मुळीच जात नाही. पण धौतीमुळे ते मऊ, लवचिक होऊन जातं. मग लक्षात आलं की मुळात पोट ’वाढत’ नसतं, ’सुटतं’. (भिडे भिडे वाढतं, पण तो संदर्भ वेगळा) जणू धरून ठेवलेलं ताब्यातून सटकतं आणि सुटतं. धौती करत असताना ते इतकं नरम असतं, की पट्टा बांधून कितीही आवळता येतं. आत धरून ठेवता येतं. धौतीमुळे पचनसंस्था एकदम फिट राहाते. कपालभातीमुळे फुफ्फुसांचा आकार खांद्याच्या हाडांपर्यंत वाढल्यासारखा वाटतो. दमछाक वाढते. श्वास सोडून मिनिटभर रहाता येतं. हालचालींमध्ये चपळता येते. स्टेशनच्या दिशेने चालताना गाडी येताना दिसली की प्रतिक्षिप्‍त क्रियेने धावत सुटायला होतं. तसा निर्णय घ्यावा लागत नाही. हातातलं खाली पडलं, तर तत्क्षणी वाकता येतं. स्नायूंमध्ये कधीही वेठ-वळ येत नाही. कमी झोप पुरते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या अगोदर उघड्या डोळ्यांवर सपासप पाणी मारून घेतल्याने डोळे निवांत रहातात, त्यांच्यावर चुकूनही चिपाड चढत नाही.

मला फ्रेशनेसची कळच अवगत झाली जणू. अंगात ऊर्जा सळसळत असणे हे इतकं भावलं, की बाकी कसलीही शिस्त अंगी नसलेला मी योगाचा निष्ठावंत पाईक झालो. योगाच्या वास्तव-अवास्तव दाव्यांविषयी तात्त्विक चर्चा करणारे मला भंपक, बुद्दू वाटू लागले. व्यायाम सोडला की शरीर लगेच बेडौल होऊ लागतं, अशी सरसकट टिप्पणी ऐकू येत असताना योगाचा परिणाम खूप जास्त काळ टिकतो, पुन्हा आसनं चालू केली, की ताबडतोब शरीर सुरळीत, सफाईदार होतं, हा माझा अनुभव होता. कुठल्याही तर्कापेक्षा, सर्वमान्य तत्त्वापेक्षा प्रत्यक्ष प्रमाण श्रेष्ठ, असं विज्ञान तर म्हणतंच; पण त्याहीपेक्षा हा कॉमनसेन्स आहे!

पुढे मी गडचिरोलीत शोधग्रामला रहायला गेलो. तिथे रात्री साडेआठ वाजता जेवणं आटपायची. कितीही वेळ काढला तरी मुंबईच्या मानाने लवकर झोपणं व्हायचं. मला सकाळी साडेपाचला उठायची सवय लागली. योगाच्या भानगडीत ’पहिल्या चहा’ची गरज संपून गेली होती. मग मी रोज सकाळी मस्त तास दीड तास शुद्धिक्रिया-योगासनं करायचो. संध्याकाळी झाडा-जंगलात भरपूर चालायचो. बोलता बोलता एकदा अभय बंगना मी विचारलं, की हृदयविकाराचा धोका किमान होऊन जायला वजन किती कमी हवं? ते उत्तरले, You should look famished. तर मी तसा, उपासमार झालेला दिसू लागलो. अर्धमत्स्येंद्रासन सहजी जमू लागलं. रोज वीस सूर्यनमस्कार होऊ लागले.

मुंबईला परतल्यावर पुन्हा मुंबईकर झालो. जागरणं, अरबट चरबट खाणं, पिणं; मध्यंतरीच्या काळात पिणं जरा वाढलंच. मधुमेह येऊन चिकटला. योगासनं अनियमित झाली. पायांवरचं वजन वाढलं, चपळता कमी झाली, धौती तर संपलीच. कधी हिमालयातली ट्रेक ठरली की महिनाभर आसनं करायचो. ट्रेक सुरळीत निभावून न्यायला ती पुरायची. आता वर्तमानातलं सांगायचं, तर बायकोच्या संयमी आग्रहामुळे ब्रह्मविद्येचा वर्ग केला. त्याअगोदर आठवणींवरची धूळ झटकायला नव्या घराजवळ सानपाड्याला योग विद्या निकेतनच्या क्लासला गेलो ... आता पुन्हा गाडी रुळावर आली आहे. दिवसाआड शुद्धिक्रिया - आसनं; संध्याकाळी ब्रह्मविद्येचे श्वसनप्रकार करतो आहे. पुन्हा अत्यंत उत्साही वाटतं आहे. एक ट्रेक केली तिला महिना झाला नाही आणि पंधरा दिवसात पुन्हा मनालीला ट्रेकसाठी चाललो आहे. योगा झिंदाबाद!


आता थोडं राजकीय - सामाजिक. शिवसेनेने शिवाजीवर प्रोप्रायटरी हक्क गाजवायला सुरुवात केली आणि समाजवादी - कम्युनिस्ट यांनी शिवाजीला दूर केलं. आपण हा मूर्खपणा केला, हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. नंतर कम्युनिस्टांनी शिवजयंतीनिमित्त पोस्टरं लावण्याचे प्रकार केले पण उपयोग झाला नाही. तसंच आता चालू आहे का? स्वतःचं योगायन सविस्तर गायलं म्हणून मी हिंदुत्ववादी, पुराणमतवादी होऊन जातो का? योगावर मी या आधीही लिहिलं आहे, हे तर फारच बरं झालं. कारण आता मी म्हणायला मोकळा की योगामुळे जर मन ताळ्यावर येत असेल, तर टो-गाडिया, बाबू बजरंगी, वाटेल ते बरळणार्‍या त्या कोण साध्व्या आणि भगवे वस्त्रधारी साधू आणि खुनाचा कट केल्याचा आरोप असणारे पदाधिकारी आणि गुजरातेत गरोदर बायकांची पोटं चिरणारे आणि लोकांना जिवंत जाळणारे जे कोणी धर्म-संस्कृतिरक्षक आहेत, त्यांना जर बसवलं योगा करायला; तर त्यांची माथेफिरू हिंसा कमी होईल का? ट्विटरवर बीभत्स अपप्रचार करणारे शांत होतील का? उन्माद कमी होईल का? होणार नसेल तर काय उपयोग योगा इंटरनॅशनल होऊन?

तरी योगाला अधिकृत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, यात काय बिघडलं? मोदीं प्रत्यक्ष कामापेक्षा शोबाजी जास्त करत असतील, तर न केलेल्या कामाबद्दल बोला; शोबाजीबद्दल कशाला? जमाना मार्केटिंगचा आहे, शोबाजी pays! आणि एके काळी इंदिरा गांधींनी जसं विरोधी पुढार्‍यांना पोपट केलं होतं, की इंदिरा जे करेल त्याला विरोध करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांच्यापाशी उरला होता; तसंच आज पुन्हा घडताना दिसतंय. संघवाले आपले विवेकानंद, भगतसिंग, सुभाषबाबू, एकेक आयकॉन ढापत चाललेत आणि ते कसं चुकीचं, खोटारडं आहे, असा आरडाओरडा करंण्यापलिकडे संघविरोधकांना दुसरं काम उरलेलं दिसत नाही. योग काय बाबा रामदेवनेच करावा? आम्ही करू नये? योगाला परदेशी कोणी नेलं? बी के एस अय्यंगार यांचं योगाच्या बाबतीत योगदान किती? आजच्या भूगोलाच्या हिशेबात पतंजली भारतीय की पाकिस्तानी? (पाणिनी पाकिस्तानी!) शरीर आणि मन यांना सुरळीत करणारी, त्यांमध्ये सुसंवाद स्थापन करणारी एक प्रणाली; असं योगाकडे न बघता योगाला हिंदू म्हणून दूर करणारे (जे कोणी करतात ते) मुसलमान एक मूर्ख आणि संघ-भाजपने योगावर मालकी हक्क दाखवला म्हणून योगाचं महत्त्व कमी  करू पहाणारे काँग्रेसवाले सुद्धा मूर्खच. मी जे योगाचे वर्ग केले तिथे शिकवणारे आणि शिकणारे, यांमध्ये सर्वसामान्यांची, काम करून पोट भरणार्‍यांची बहुसंख्या होती. वातावरणात धार्मिकतेचा लवलेश नव्हता.

असो. पाखंडी असल्यामुळे मला योगासनं करण्यात अडचण येत नाही आणि योगा केल्याने माझ्या पाखंडीपणाला धक्का लागत नाही. यात कोणाला प्रॉब्लेम होत असेल, तर माझा इलाज नाही.

No comments:

Post a Comment