Saturday, May 9, 2015

पराचा कावळा




खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खूपच. नोकरी लागली होती आणि लग्न झालं नव्हतं, त्या काळातली. खिशात पैसे असायचे आणि डोक्यावर जबाबदारीची जाणीव नव्हती, तेव्हाची. पैसे खर्च करायला शिकल्यानंतरची. तेव्हा आम्ही जवळ जवळ दर शनिवारी दुपारी बियर प्यायचो. त्रिकोण करत. म्हणजे, एक नंतर तीन. कोणी चौथी मागवली, की एकूण सहा बाटल्या संपवाव्या लागायच्या. एक, दोन-एक, तीन-दोन-एक, मग चार-तीन-दोन-एक; बाटल्या त्रिकोणात मांडता आल्या पाहिजेत. कोरम मोठा असायचा. जमवायचो त्रिकोणाचं. माज होता.

एकदा पिऊन काळोख पडल्यावर फिरत फिरत फोर्टातून मरीन ड्राइव्हवर गेलो. चालत चौपाटी. बांधावरून चालताना माझा तोल गेला आणि मी वाळूच्या दिशेने कलंडलो. की उतरलो वाळूकडे, आठवत नाही. टाइट नव्हतो; पण हल्लक होतो आणि मस्त वाटत होतं.

तर ती जागा होती मफतलाल स्विमिंग पूलच्या दक्षिणेला जो वाळूचा तुकडा वेगळा झालाय, ती. पडताना मला कळलं, की मी वाळूत पडत नसून एका तंबूच्या कॅन्व्हासवर पडतो आहे. बांधाला लागून तिरका आडोसा केला होता कुण्या बेघराने. त्या तंबूवर माझा पाय पडला आणि तंबू फाटला किंवा गाठ सुटली. मी आत. धडपडत. कसातरी तोल सावरत.

आत मिणमिणता उजेड. मी जिथे लँड झालो तिथे शेजारी एक बाळ झोपलेलं. त्याच्या जवळ बाळाची आई. ती किंचाळून उठली. पुरुष धावत आला. माझी घाबरगुंडी उडाली. त्यांचीसुद्धा उडाली. "ही काय तंबू बांधून झोपायची जागा आहे?" असं काहीतरी उसन्या अवसानाने गुरकावत मी बाहेर पडलो आणि मित्रांबरोबर शक्य तेवढा तिथून लांब गेलो. माझ्या मागे कुणीही आलं नाही आणि प्रसंग तिथेच संपला. मी विसरूनही गेलो.

काल आठवलं.

काय केलं असतं मी, जर माझं वजन त्या बाळावर पडलं असतं, तर? किंवा त्या बाईवर पडलं असतं तर? तिथे बर्‍यापैकी अंधार होता आणि मला ते कापड अजिबात दिसलं नाही. मी काय जाणून बुजून निर्दाळला नाही तो बुटका, गरीबडा तंबू! अपघातच होता तो.

तरी पण काय केलं असतं मी जर काही भलतं घडलं असतं तर? मला सांगता येत नाही. विचारच करता येत नाही. कल्पनाशक्‍ती लुळी पडते. चित्र रंगवण्यापर्यंत रेटता येत नाही. काय केलं असतं मी, या प्रश्नाला नुसती थिऑरिटिकल उत्तरं. मला आतून पटेल, असं एकही उत्तर नाही. अशी वेळ कोणावरही येऊ नये, की आपलं आपल्यालाच सांगता येत नाही, आपण नक्की काय केलं असतं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असं मी स्वतःविषयी म्हणतो. बहुधा नीट, शहाणा वागलो असतो, असं नंतरच्या जगण्याचा दाखला देऊन म्हणू शकतो; पण ते खरं नाही. एका क्षणावर जेव्हा निर्णय तोललेला असतो, तेव्हा काय होईल हे नाही येत सांगता. त्या वेळी तंबू सोडून निघूनच गेलो होतो, थांबलो नव्हतो!

आज हे का आठवलं, याचा खुलासा करण्याची गरज नसावी. असले अनुभव बोलती बंद करतात. वडाची साल पिंपळाला लागते आणि पराचे कावळे होतात. दगड उचलण्याचा अधिकार मला नाही, एवढं मात्र नक्की कळतं. इतरांचं माहीत नाही. पण चाललेल्या गदारोळात हे सांगून टाकणं भाग आहे.

No comments:

Post a Comment