Thursday, June 9, 2016

बिग ब्रदर इज वॉचिंग यू!

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक गूढ बातमी आहे. पान १७ वर. न्यूयॉर्क टाइम्सवरून घेतलेली. बातमी अशी: मायक्रोसॉफ्टच्या शास्त्रज्ञांनी एक पेपर प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी पांक्रियाच्या - स्वादुपिंडाच्या - कॅन्सरचं निदान इंटरनेटवर केलेल्या सर्चेसवरून करता येण्याची शक्यता वर्तवली आहे.

http://epaper.indianexpress.com/…/Indian-Exp…/09-June,-2016…

स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान हमखास उशीरा होतं आणि निदान झाल्यानंतर केवळ ३ टक्के रोगी पाच वर्षं जगतात. हे प्रमाण लवकर निदान झाल्यास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत नेता येईल, असा दावादेखील मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासकांनी केला आहे.

माझ्या एका जवळच्या मित्राला स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचं निदान उशीरा झालं आणि त्यानंतर दोनेक महिन्यांत तो गेला. म्हणून ही बातमी उत्सुकतेने वाचली. पण जे सांगितलंय, ते पचत नाही. उलट, भलभलते संशय येतात.

एक म्हणजे, इंटरनेटवर कोण काय सर्च करतो आहे, याची आकडेवारी गोळा करताना मायक्रोसॉफ्टच्या तथाकथित शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं नाही. त्यांच्या व्यवहारांची चिकित्सा करताना त्यांची परवानगी घेतली नाही. हे मुळात बरोबर नाही.

यावर कुणी म्हणेल, इंटरनेटवर सर्च करणे, ही सार्वजनिक क्रिया आहे. तिची नोंद घेतली तर तो गुन्हा नाही. गुन्हा नसणारच. मायक्रोसॉफ्ट गुन्हा करून त्याला अशी उघड प्रसिद्धी देणं अशक्य आहे. पण मुळात मायक्रोसॉफ्टकडे कॅन्सर बिन्सरवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ असण्याचं कारण काय? याचं उत्तर बातमीत सापडतं. डॉ होर्वित्झ नावाची ही व्यक्‍ती मेडिकल डॉक्टर आहे आणि काँप्युटर सायंटिस्टसुद्धा आहे.

दुसरं असं की इंटरनेट सर्च इंजीन वापरणार्‍यांनी घेतलेले शोध आणि त्यांना असलेल्या व्याधी, यांचा संबंध जुळवण्याचं का कुणाला सुचलं? तर, मायक्रोसॉफ्टवाल्यांनी ’हेल्थ अँड वेलनेस डिव्हिजन’ नावाचा एक विभाग अलिकडे बनवला असून त्यात ’चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर ऑफ हेल्थ इंटेलिजन्स’ अशी एक पोस्ट असल्याचंही बातमी वाचून कळतं.

मायक्रोसॉफ्टला हेल्थ अँड वेलनेस विभाग काढून नेट वापरणार्‍यांच्या आरोग्याची उठाठेव करण्याचं कारण? काँप्युटरसमोर बसून डोळे, तंगड्यांचे स्नायू, पाठीच्या कण्याचा खालचा भाग, यांना इजा पोहोचते, इकडे का लक्ष देत नाहीत ते? ते ;वेलनेस’मध्ये येत नाही?

’इंटेलिजन्स’चा अर्थ गुप्‍त(पणे जमवलेली) माहिती. आता, मला तरी स्वच्छ जाणवतं की सर्च इंजीन चालवणार्‍यांनी सर्च इंजीन वापरणार्‍यांविषयी ’इंटेलिजन्स’ जमा करायचं ठरवलं तर ते हेल्थवरून सुरुवात करणार नाहीत. ते इकनॉमिक वा समाजशास्त्रीय वा सर्च करणार्‍याचं सामाजिक प्रोफायलिंग करणारी माहिती अगोदर जमा करतील. जी माहिती जगातल्या सर्व शासनकर्त्यांना आणि मार्केटिंगवाल्यांना आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना आणि कोणत्याही कारणाने ब्लॅकमेलिंग करणार्‍यांना हवी असते. ’आपल्याकडची माहिती आपण अमेरिकन सरकारला दाखवतो,’ अशी कबुली मायक्रोसॉफ्टच काय, गूगलनेही दिली आहे. आणि यात काहीही गूढ, धक्कादायक नाही. चार वेळा नवीन घरांचा शोध घ्या; तुमच्या इमेल अकाउंटशेजारी बिल्डर लोकांच्या जाहिराती आपोआप येऊ लागतील. टूरिस्ट सर्च करा, टूरिझमवाल्यांच्या जाहिराती येतील. सर्वरवाले आपले सर्चेस पहात असल्याशिवाय हे शक्य नाही.

मग अचानक हेल्थचा पुळका कशाला? याचं उत्तर सोपं आहे. प्रकृतीची चौकशी केली की बरं वाटतं. बाकीच्या चौकशांची संभावना नसत्या गोष्टीत नाक खुपसणे, अशी होते!

आता विचार करा. तुम्ही कशाकशाचा सर्च करता. सर्च तपासता येतो, तर मेल तपासणं अशक्य नाही. तुम्ही कुणाकुणाला मेल करता, मेलमध्ये काय लिहिता, स्वतःच्या कोणत्या गोष्टी उघड करता, याचा विचार करा. त्यातल्या कशाकशावरून तुम्हाला ब्लॅकमेल करणं शक्य आहे, याचाही विचार करा.

पण हे नवीन नाही. वेब सर्चचे लॉग्ज तपासून फ्लूच्या साथीचा शोध लवकर कसा लावता येईल, यावरचा एक पेपर गूगलने तर २००९ मध्येच प्रसिद्ध केला होता. पण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नव्हतं (ही माहिती याच बातमीत आहे). मला तर वाटतं, हेल्थ इंटेलिजन्स हे थोतांड आहे, आपल्या ’सॉफ्ट’ व्यवहारांची तपासणी करण्याचा तो एक बहाणा आहे. "आम्ही तुमचे सगळे (सॉफ्ट) व्यवहार डोळ्यांत तेल घालून तपासू, कारण त्यामधून आम्हाला तुमच्या आरोग्यासंबंधी लवकर निदान करता येईल." कुणाला Xत्या बनवतात!

’The data used by the researchers was anonymised, meaning it did not carry identifying markers like a user name, so the individuals conducting the searches could not be contacted.' असं एक विधान बातमीत आहे. ’संशोधकांनी वापरलेल्या माहितीमधून ओळख पटवणारे तपशील काढून टाकण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यक्ष सर्च करणार्‍यांशी संपर्क साधता आला नाही.’ माहिती गोळा झाली तेव्हा तपशील होते. नंतर काढून टाकले. कोणी काढले? मायक्रोसॉफ्टनेच काढले. पण काढल्यामुळे तोटा असा झाला की सर्च करणार्‍यांशी थेट बोलून आणखी काही आरोग्यासंबंधित गोष्टी स्पष्ट करून घेता आल्या नाहीत! बारीक सूचन असं की मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजीन (बिंग) वापरा कारण ते तुम्हाला गंभीर आजार होणार असल्याची पूर्वसूचना डॉक्टरांच्या अगोदरच देऊ शकतील. आणि तुमच्या इंटरनेटवापरावर बारीक लक्ष ठेवणार्‍यांना तुमचा नावपत्ता माहीत असण्याची मुभा द्या!

मायक्रोसॉफ्ट (वा अन्य कुणी) नेटवापराच्या संशोधनाची व्याप्‍ती केवळ आरोग्यावर लक्ष ठेवण्यापुरतीच राखतील, याची गॅरंटी कोण देणार? माझा मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्सवर विश्वास नाही. माझा जगड्व्याळ बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विश्वास नाही. माझा अमेरिकन सिस्टीमवर विश्वास नाही. सोशल मीडियामुळे एका बाजूने आपल्याला पंख फुटत असले तरी त्या पंखांमधून एक वेसण घातली आहे, जिच्या नाड्या अदृश्य पण खर्‍या शक्‍तीच्या हाती आहेत आणि ही शक्‍ती सदासर्वदा कनवाळू रहाण्याची काहीही शाश्वती नाही, असं मात्र मला खात्रीने वाटतं.

अधिक प्रकाश पडायला हवा असेल तर नंदा खरेंची ताजी कादंबरी ’उद्या’ वाचा!

Read the full newspaper online, on your smartphone and tablet
epaper.indianexpress.com

No comments:

Post a Comment