१५ जूनच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पान ४ वर एक महान बातमी
आहे: पोटाचा सुटलेपणा कमी करण्यासाठी असलेल्या ’gastric bariatric शस्त्रक्रियेमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो! अशी
शस्त्रक्रिया झालेल्यांचा अभ्यास केल्यावर त्यातल्या १०० टक्के लोकांमध्ये सुधारणा
दिसून आली; ६५ टक्के लोकांना मधुमेहावरच्या औषधांची गरज उरली नाही आणि ते ’नॉर्मल’
प्रमाणात साखर खाऊ शकतील. शस्त्रक्रिया न करता नियमित औषध घेणारे, व्यायाम करणारे
व डॉक्टरांनी शिफारस केलेली जीवनशैली अंगिकारणारे यांच्या गटातील ७५ टक्के
लोकांमध्ये सुधारणा दिसली. हे ग्रेट आहे!
मधुमेह बरा होतो, असा दावा असल्याने ही बातमी
महान आहे, असं मुळीच नाही. बातमी महान असण्याची कारणं अशी:
अमेरिकन
डायाबिटिस असोसिएशनच्या परिषदेत या अभ्यासासाठी ज्यांचा गौरव करण्यात आला, त्या डॉ
शशांक शहा यांनी निष्कर्ष सादर करण्याअगोदर
शस्त्रिक्रिया झालेले आणि इतर इलाज करणारे, असे
स्पष्ट दोन गट करून ४ वर्षं अभ्यास केला.
निष्कर्ष
जाहीर झाला, गौरवही झाला; संपला अभ्यास, असं म्हणून ते मोकळे झाले नाहीत. बर्या
झालेल्या मधुमेह्यांवर लक्ष ठेवून ते
परत रोगग्रस्त होतात का, हे तपासण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
भारत
आणि पश्चिमेतले देश, इथल्या लोकांच्या रोगग्रस्ततेमध्ये फरक असतो, असं एक भलं मोठं
विधान त्यांनी केलं. (आपल्या
अभ्यासक्रमातली सर्व पुस्तकं तिथल्या डॉक्टरांनी, तिथल्या रोग्यांचा
अभ्यास करून लिहिलेली असतात आणि आपण बैलाप्रमाणे त्यांना
अनुसरून निदान करत असतो,
औषधांचं प्रमाण ठरवत असतो
आणि समाजातील विविध रोगांचा फैलाव ठरवत असतो. अलिकडच्या
काळात दोन वेळा भारतातल्या लोकसंख्येमधील मधुमेह्यांचं प्रमाण
प्रचंड वाढलं. दोन्ही वेळा
WHO ने मधुमेहाची व्याख्या बदलली आणि ती
आपण स्वीकारली, या एकमेव कारणामुळे!
अर्थात मधुमेहावरील औषधांचा खप दोन्ही वेळा प्रचंड वाढला, हे सांगायला नको.)
या बातमीमधून जशी वैज्ञानिक शिस्त दिसते, तसाच विज्ञानाचा
नम्रपणासुद्धा दिसतो. या तुलनेत मोदीराज्यात ऊत आलेली आणि whatsapp वर फिरत असलेली ’तुळशीमुळे
भूकंप होत नाहीत’ आणि ’गाईच्या मुतात एड्सप्रतिबंधक गुण असतात’, असल्या छापाची
विधानं किती भंपक, मूर्ख, उद्धट आणि बेपर्वा वाटतात.
एक्स्प्रेसला बातमीदारी कळते. एक्स्प्रेसची
पत्रकारिता वेगळी आहे.
(http://indianexpress.com/article/lifestyle/health/gastric-bariatric-surgery-may-help-diabetics-shows-study-mumbai-2853386/)
No comments:
Post a Comment