Tuesday, August 2, 2016

कोण मुबारक बेगम?





लता गायला लागेपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या गायिका होऊन गेल्या, त्यांना सर्वांना स्वतःचं स्थान आहे. त्यांच्या करियरचा स्वतःचा असा काही ग्राफ आहे. त्यात नूरजहान, सुरैया, खुर्शीद सारख्या गाणार्‍या नट्या होत्या तशाच जोहराबाई, अमीरबाई, शमशाद यांसारख्या फक्‍त आवाज देणार्‍या गायिकासुद्धा होत्या. यातल्या प्रत्येकीची गायकी स्वतंत्र आहे आणि कोणाच्याही गाण्यांची, गायकीची चर्चा करताना लताचा संदर्भ न घेता करता येते. किमान, ज्यांचे कान लताच्या गायकीने एकारून टाकले नाहीत, त्यांना नूरजहानचं ’बैठी हूँ तेरी याद का लेकर के सहारा’ किंवा शमशादचं ’न आँखों में आँसू न होठों पे आहे’; किंवा सुरैयाचं ’दूर पपीहा बोला’ किंवा खुर्शीदचं ’घटा घनघोर’ ऐकताना लता आठवत नाही. त्या गाण्यांमध्ये कमी जास्ती ठरवताना लताला मधे आणावं लागत नाही.

यांच्यातली शेवटची गायिका गीता दत्त. ’घूंघटके पट खोल’ किंवा ’मेरा सुंदर सपना’ असली गाणी तिला मिळाली आणि पुढेही सुरुवातीला ओ पी नय्यर आणि काही प्रमाणात (गुरुदत्तमुळे?) एस डी बर्मन य़ांनी तिला गाणी दिली. पण सूर्य उगवल्यावर तारे दिसेनासे व्हावेत, तशा गीतासकट सगळ्याच गायिका गायब (संदर्भ गायब होण्याचा आहे; गुणवत्तेचा नाही) झाल्या. आशासकट ज्या कोणी उरल्या, त्यांना लताच्या पुढे दुय्यम स्थानच स्वीकारावं लागलं. आता, लता-आशा या बहिणींचं स्थान भक्कम झाल्यावर त्यांनी दुसर्‍या कुणाला उभंच राहू दिलं नाही, असं म्हटलं जातं. त्यात तथ्य असो वा नसो, लताच्या गायकीला न अनुसरता कुणी नवी गाणारी गातेय, असं होण्याची शक्यता उरली नाही, हे खरं. त्यासाठी लताचं गाणं थांबावं लागलं; इतकंच नाही, लताची छाया असलेल्या अलका याज्ञिकच्या गाण्याने कान किटून थेट फ्यूजन संगीताचा वेगळा बाज आणणार्‍या रेहमानचं आगमन व्हावं लागलं.

यांच्यात मुबारक बेगम कुठे बसते? प्रामाणिक उत्तर द्यायचं तर बसत नाही. तिचा आवाज असा, की तो लताच्या गायकीचं अनुकरण करू शकत नाही. जीवनाची मजा वैविध्यात असते, असं किती जरी म्हटलं; तरी लता-आशा यांच्यातल्या वैविध्यात इथल्या संगीतकारांची आणि श्रोत्यांची हौस जणू पूर्णपणे फिटली. इतर गायिकांच्या एखाद्‍ दुसर्‍या गाण्यामुळे या विधानाला बाधा येत नाही. तरी असं होतंच की एखादं गाणं त्या वेळच्या प्रसंगामुळे, त्यातल्या शब्दांमुळे, चालीमुळे मनात अडकून पडतं आणि आपोआप गाण्याच्या आवाजाची स्मृतीसुद्धा मनात एक खास स्थान धरून बसते.

याचं ऑल टाइम थोर उदाहरण म्हणजे ’कभी तनहाइयोंमें हमारी याद आयेगी’. या गाण्याच्या थोरवीबद्दल नवीन काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही; ऐकावं आणि मान झुकवावी. (वा झुकवू नये. मान झुकवणं मान्य नसल्यास पुढचं वाचू नये! कारण ते जगाला मान्य आहे, असं गृहीत धरून पुढचं लिहिलं आहे). भुताटकीचं गाणं आहे. ’ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया; न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आयेगी’ या भयंकर शापवाणीला इतकी अनुरूप चाल लावणार्‍या स्नेहल भाटकरला वंदन असो. असं वाटतं, मुबारक बेगमने काय वेगळं गायलंय हे गाणं? या गाण्यातली खास तिची काँट्रिब्यूशन म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे ’ये बिजली राख कर जायेगी’ म्हटल्यावर ’तेरे’ म्हणताना तिचा आवाज फाटल्यासारखा होतो. वाटतं, शाप देणारीला काय पराकोटीच्या वेदना होताहेत शाप देताना! शापाचा एक हिस्सा तिने स्वतःच्या दिशेनेदेखील रोखला आहे! मुबारक बेगमचा आवाज या तिखट तळतळाटाला एकदम फिट बसला आहे. तिची निवड करणार्‍या स्नेहल भाटकरला धन्यवाद द्यायला हवेत. या गाण्यावर मुबारक बेगमचाच स्टॅम्प आहे. (असतो. प्रत्येक गाण्यावर एकेकाचा स्टॅम्प असतो. ते कधीतरी नंतर) ही चाल आणि तिचा आवाज एकमेकांना भेटण्यासाठीच जन्माला आले जणू. (https://www.youtube.com/watch?v=rpYFab53aqM)

पण मग कुठेतरी वाचायला मिळतं, की स्नेहल भाटकरला हे गाणं लताकडूनच गाऊन घ्यायचं होतं; पण योग आला नाही. मग वाटतं, धन्यवाद लताला द्यायला हवेत की तिने हे गाणं सोडलं! असेना लता थोर; हे गाणं लता गाते आहे, अशी कल्पना करताच येत नाही.

मुबारक बेगमचा आवाज गरतीपणापेक्षा बैठकीला जवळचा आहे. तरी त्या आवाजात एक निरागस हरलेपणाचा भावसुद्धा आहे. ’तुम्हारा दिल मेरे दिलके बराबर हो नही सकता, वो शीशा हो नही सकता, ये पथ्थर हो नही सकता; हम हाले दिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये’ या गाण्यात सामान्य गणिकेच्या आवाजाला असाव्यात तशा मर्यादा तिला असल्यासारखं वाटत गाण्याची सुरुवात होते. पण त्यामुळे गाणं खाली येत नाही; ती मर्यादा त्या गाण्याच्या, त्या वेळच्या प्रसंगाच्या आशयाचा भागच असल्यासारखं वाटतं. म्हणजे पुन्हा संगीतकार सलील चौधरीचेच मार्क वाढतात! गाणं ’हम-’ वर थबकतं आणि लगेच ’हाले दिल सुनायेंगे’ हे शब्द येताना वाजणारा ढोलक आवाजाला मागे सारतो. चित्रपटातल्या बाकी सर्व (बाईच्या) गाण्यात लता. तीसुद्धा कुठली लता, तर ’बिछुआ’ आणि ’जुल्मी संग आँख लडी’ वाली! त्या मस्तवाल उग्रनारायणसिंहाच्या मैफिलीतलं मुबारक बेगमचं गाणं पूर्णदेखील होत नाही, इतकं ते कमी दखलपात्र. पण तिचा आवाज या सगळ्या माहोलात नेमका बसतो आणि गाणं मनात जागा बनवतं. (https://www.youtube.com/watch?v=Fv6-VaS3oGs)

’देवदास’मधलं तिचं गाणं - ’वो न आयेंगे पलटकर’ हे याला पूर्ण न होण्याच्या गुणधर्मामुळे एका परीने समांतर; पण इफेक्ट वेगळा. चंद्रमुखीचा निरोप घेऊन देवदास कायमचा सोडून चालला आहे आणि पार्श्वभूमीवर मुबारकच्या आवाजातलं हे गाणं अंधुक ऐकू येतं आहे: "नाही येणार तो!" नीट लक्ष दिलं नाही, तर गाण्याचे शब्द धड ऐकूही येणार नाहीत. आणि ऐकू आले नाहीत तरी प्रसंग पुरेसा बोलका आहे. शब्द ऐकू आले तर चंद्रमुखी नव्हे; तिच्यासारख्या नाच-गाणी करणारींचा, वेश्यांच्या मनचा दर्दच जागतो. त्यांच्याकडे इतके येतात आणि जातात. काही पुन्हा पुन्हा देखील येतात. पण नातं असतं ते तेवढ्यापुरतंच. येणारा नाच बघायला, गाणं ऐकायला, मन रिझवायला, शरिराची भूक भागवायला येतो. त्यापलिकडे त्याने यावं, अशी आस मनी उपजल्यास हेच उत्तर - वो न आयेंगे पलटकर उन्हे लाख हम बुलाये! समाजातल्या खालच्या स्तरातलीची आस ही अशी मुबारक बेगमच्या आवाजातच व्यक्‍त व्हावी जणू. (https://www.youtube.com/watch?v=0uOD04nHurA)

मुबारक बेगम एक नंबरची गायिका नाही, तिचा आवाज मेनस्ट्रीम नायिकेला शोभत नाही; या सर्वमान्य विधानाला एकच अपवाद. आश्चर्य म्हणजे तो अपवाद कोणाचा; तर चित्रपटातल्या तीन वेगळ्या बायकांना एकच आवाज देणार्‍या, लताचे जवळपास गुलाम होऊन गेलेल्या शंकर-जयकिशनचा. हे कसं घडलं, योजून घडलं की योग आला; माहीत नाही. पण ’मुझको अपने गले लगालो’ हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीमधलं मेनस्ट्रीम गाणंच आहे. महम्मद रफीबरोबर गाताना मुबारक बेगमचा आवाज जराही बिचकत नाही, दुय्यम ठरत नाही, त्याच्या मागे मागे जात नाही. त्या आवाजात लाडिकपणा सापडतो, सेक्सीपणा सापडतो आणि शंकरजयकिशनी स्मार्टपणा तर सापडतोच सापडतो. त्यात हे गाणं ठेक्याचं, उडतं नाही; ते नीट मेलडीवालं आहे. चटकदार आहे; गोडही आहे. (https://www.youtube.com/watch?v=D7vA3gKYIvA)

राहून राहून आश्चर्य वाटतं, हे कसं झालं असेल? शंकरजयकिशनला मुबारक बेगम मेनस्ट्रीमसाठी आवश्यक अशा बरोब्बर नेमक्या सुरात, भावनेत कशी वाजवता आली? जे बाकी कोणीच केलं नाही? ग्रेट! त्या काळात काही कारणांमुळे लता रफीवर रागावली होती आणि त्याच्या बरोबर गात नव्हती. पण तिच्या दुर्दैवाने तो काळ फारच नायकप्रधान मांडणीचा, शम्मी कपूरवाला होता. लता रफी एकत्र न गाण्याने रफीचं काहीएक नुकसान झालं नाही; उलट इतर गायिकांना संधी मिळू लागली. त्यातलंच हे एक गाणं. कधी कधी वाटतं, भांडण थोडं लांबायला हवं होतं! आपल्या कानांचं थोडं भलं झालं असतं! शंकरजयकिशनने नंतर मुबारक बेगमला घेतल्याचं माहीत नाही!

No comments:

Post a Comment